Monday, April 23, 2007

गणित

परवा प्रत्युषचा result आणायला गेलो होतो. कोणी आमचा फोटो काढला असता तर आमची मुखकमले किती प्रेक्षणीय झाली होती हे कळालं असतं. प्रत्युष सोबत नव्हता आणि मी आणि कल्याणी गोरयामोरया चेहरयाने अंजली teacher समोर उभे होतो.

It was a funny situation, now I think. निकाल इयत्ता नर्सरीचा! अंजली टीचरचं वय फार फार तर २५-२६ असेल आणि तरीही आम्ही टेन्शन मधे होतो:). प्रत्युषचं शाळेतलं कर्तॄत्व तसं कोण्या अथर्व फाटकला बुकलणे, "शेपटीवाल्या प्राण्यांची सभा" या "सुपरहीट" गाण्यात मासा होणे, रोज शाळेत फक्त नाश्त्यासाठीच जातो असा पक्का समज करुन घेणे इतपतच मर्यादित होतं. शिवाय "परिक्षेहून" आल्यावर त्यानं "मी टीचरला काहीही सांगीतलं नाही कारण त्यांनी मला थांबवून घेतलं असतं आणि माझी व्हॅन चुकली असती" असंही declare केलं होतं. इथे declare या शब्दाला वेगळा वास आहे- ही एकतर्फी सुचना आहे, त्यावर परत वाद घालायचा नाही!! आणि चाणाक्ष लोकांना या वाक्यातील टिळकांसारखा तीव्र मराठी बाणाही जाणवला असेलच.

एव्ह्डं सगळं होऊनही चिरंजीव "Excellent" शेरयाने "पास" झाले हा आम्हाला मोठा relief होता. श्रेयनामावली पुढीलप्रमाणे कल्याणी- इंग्रजीतील अत्यंत बेचव आणि कसलीही चाल-ताल नसलेल्या कविता आणि तत्सम गोष्टी प्रत्युष कडून तयार करुन घेणे , अंजली टीचर- न कंटाळता त्या गोष्टी प्रत्युष कडून वदवून घेणे आणि अर्थात प्रत्युष-मधल्यामधे सॅडविच होणे!

एकूणच मराठी मध्यमवर्गीय माणूस शिक्षक, परीक्षा, अभ्यास,निक्काल (!), मार (क्रम महत्वाचा!!)या सगळ्यांना वचकून असतो. अर्थात आपण कोणाकोणाला घाबरुन असतो ही यादी खूप मोठी आहे पण इथे आपण फक्त सभ्य लोकां विषयीच बोलत आहोत त्यामुळे शैक्षणिक वातावरणतच ही यादी संपते.

माझ्यावेळी असंच होतं का? हा विचार करता करता आवडते आणि नावडते विषय इथे गाडी थबकली. मराठीतल्या सर्व "ढ" कवींनी गणिताची कसली भिती घातलीय आपल्याला! "गणित विषय माझ्या नावडीचा..रवीवार माझ्या आवडीचा.." गाणेबीणेही लिहीले आणि आमच्या सारख्या भाबड्या आणि आंधळा विश्वास ठेवणारया मंडळींची पंचायत करुन ठेवली!

गणिताच्या एकेका शिक्षकांनी माझ्यावर घेतलेली मेहनत आठवली की आता गहीवरुन येते...चाफेकानवडे सर..नंदू उर्फ देशपांडे बाई..दाते बाई.. list is endless..
आणि तरीही माझ्या मठ्ठ डोक्यात शिरायचं नाही ते नाहीच. पाढे पाठ करणे इथून नावडीला सुरुवात व्हायची ते आलेख-काळ-काम-वेग-दोन नळ असलेले हौद-वस्तुंच्या समान/असमान वाटण्या- साधं व्याज-चक्रवाढ व्याज---गाडी नाही थांबु शकत...इयत्ता नववी पर्यंतचा जो काही अभ्यासक्रम होता तो सारा या यादीत यायचा. बाकीच्या विषयांचे मार्क आणि गणितातील मार्क यात जे सुरेख अंतर होतं, त्यामुळे आमची सरासरी कायम ७५%-७७% यातच घुटमळायची!

१०वीचं वर्ष! लातूर पॅटर्न प्रसिध्द झाला नव्हता तरीही शाळाशाळांमधुन मरेस्तोर मेहनत घ्यायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी रवानगी उपासेसरांकडे झाली. माणूस अत्यंत साधा, कायनेटीकवरुन यायचा, एका मोठ्ठ्या हॉल मधे सतरंजी टाकून आम्ही बसायचो (लातूरला सर्व क्लास हॉल मधे सतरंजी टाकून आणि पंख्याच्या हवेत चालतात. मी मुंबईचे AC classes बघीतल्यावर चकीतच झालो होतो) ते खरं तर १०वीची मुलं नाही घ्यायची पण त्यांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली. आयुष्यात पहील्यांदा कोणी तरी माझ्या कुत्र्याचे पाय उंदराला पद्ध्तीच्या अक्षराची स्तुती केली! जरा त्यांच्याकडे बघण्याचं बळ आलं. बरा माणुस दिसतोय असं वाटण्या अगोदर त्यांनी शिकवणी बंद केली. मग आमची रवानगी जालनापुरकर सरांकडे झाली. आमचे पिताश्री-मातोश्री त्यांचे आदरणीय, त्यामुळे त्यांचे नियम सारुन त्यांनी मला आधे मधे स्विकारले. त्यांची शिकवण्याची पध्दत हा PhD चा विषय आहे. संपुर्ण गणित हा माणुस double meaning च्या वाक्यातुन शिकवायचा! गणितापेक्षा त्यांचे जोकच लक्षात राहायचे. "दोन "मानुस" एकत्र आले की "पुरुस" होतात" असले अचाट, बेफाम, अश्लील विनोद त्यांच्याकडे अमर्याद संख्येत होते. मघाच्या वाक्याचा साध्या गणिती भाषेत अर्थ multiplication of two "minus" numbers result in a "plus" number इतपत veg आहे! असल्या उद्योगातुन गणिताची गोडी कधी लागली ते कळालच नाही. शाळेतल्या बोर्डावर नाव आलं. मार्कांमधलं अंतर कमी झाल्यानं महेन्द्र जोशी, मंजुषा नाईक, गीतांजली गादगीकर यांच्या जोडीला संवेद गळेगावकर असं नाव add झालं.या यादीतली सगळी जण भयंकर don मुलं. मंजुषा राज्यात पहीली आली, महेन्द्र, गीता दोन्ही वर्ष मेरीट! माझा नंबर थोडक्यात हुकला तरी गणितानं आयुष्यात जे ठाण मांडलं ते आज पर्यंत!

बारावीला परत उपासे, जोशीकाका, vector भोसले, ह्यॅं ह्यॅं सुर्यवंशी (तंबाखुच्या सवयीमुळे ते सारखा घसा खाकरायचे!) यांच्यामुळे गणिते हवेत सोडवण्याइतपत प्रगती झाली. As a subject, it was no more hated one. In fact I realized a very strong relation between arts and maths. There are so many ways to interpret a mathematical problem and to reach to a solution. Isn't it same when it comes to an art form like painting or poetry?

आज मी Software Quality या क्षेत्रात आहे Six Sigma Black Belt केला आहे. आकड्यांशी खेळणं, निष्कर्ष काढणं हा जॉबचा भाग असला तरीही त्याच्याविषयीचं कुतुहल किंचितही कमी झालेलं नाही. Project Team जे सांगते आणि जे सांगत नाही त्यातली missing link आकडे पुर्ण करतात!

आज आपले (जे कोणी दिव्य गॄहस्थ असतील ते) "शी"क्ष"न" मंत्री गणित option(??)ला टाकण्याची भाषा करताहेत. माझ्या दॄष्टीनं राजकारण्यां एव्ह्डं untouchable कोणीच नाही, त्यांच्या विषयी एक वाक्य लिहावं एव्ह्डीही या जमातीची लायकी नसते पण गणितासारख्या विषयात खुप मुले (त्यातही परत हे घाणेरडे लोक मतांच्या राजकारणासाठी जातीवर आधारीत पास-नापास असां वर्गीकरण दाखवतात. आता तर भेदाभेद टाळण्यासाठी मेरिट लिस्टही publish करत नाहीत.) नापास होतात असं फालतु कारण जेंव्हा दिलं जातं, तेंव्हा यांच्या अकलेची कीव येते. typical राजकारण्यांसारखं कोणत्याही प्रॉब्लेमच्या मुळाशी न जाता वरवरची मलम पट्टी करायची आणि कोणताही फार विचार न करता निर्णय घ्यायचे हेच तंत्र ईथे ही वापरले आहे.
बेसीक गणित सोडलं तर आज आपले अभ्यासक्रम, शिकवण्याची पत्द्धत इतकं कालबाह्य आहे की कोणालाच त्यात गम्य वाटु शकेल असं वाटतं नाही. मध्यंतरी एक सुरेख ब्लॉग वाचला (मराठीच होता पण नाव विसरलो) त्यातही आपला मित्र हेच प्रश्न उपस्थित करतो. कॅलक्युलेटर असताना त्याचा वापर शिकवायचा सोडून पाढे कसले पाठ करुन घेता? आपल्या दैनंदिन जीवनातलं गणित सोडून गळक्या हौदाची कसली उदाहरणं देता?

प्रत्युषचा निकाल चांगला लागला म्हणून पप्पु पास हो गया म्हणत शांत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्याला जर याच educational system मधे शिकायचं असेल तर प्रचलित गणित तो शिकलेही पण गणितातील खरं सौंदर्य त्याला दाखवुन द्यायचच हेही तितकंच खरं.

Friday, April 13, 2007

स्मिताचं अचानक आठवणं

I do not need
to see you appear;
being born sufficed for me
to loose you a little less
- Rilke


परवा एका फिल्मी फंक्शनमधे स्मिताचा मुलगा आला होता स्मिताचं पोस्टर inaugurate करायला. Ditto स्मिता! खोल आत काही तरी ढासळलं. स्मिता हवी होती आज असं वाटून गेलं. आज सिनेमात इतके प्रयोग सुरु आहेत, चांगल्या अभिनेत्यांसाठी रोल लिहीले जाताहेत, commercial आणि art films मधली रेघ पुसट होत चालली आहे आणि स्मिता नाही?

स्मिताच्या अभिनयबद्द्ल नव्याने काय लिहायचं? she made a history; but she is history now.स्मिता म्हटलं की मला आठवतो जैत रे जैत, अर्ध्यसत्य, मिर्चमसाला आणि अजून कितीतरी powerhouse performances. नमकहलाल सारखे काही अपवाद सोडले तर स्मिताची बहुतेक characters तिच्यातील स्वतंत्र स्त्री represent करायचे.
स्मिता म्हटलं की सगळ्यात आधी मला आठवतात ते डोळे. टपोरे, हरीणासारखे वगैरे विशेषणं आपण वापरुन पार चोथा केली आहेत. स्मिताचे डोळे पाहीले की भावगर्भ या शब्दाचा अर्थ कळतो. She can speak a thousand words without saying a single line. Her eyes will do that for her. काळजाला भिडणारी दुसरी identity म्हणजे तिचा आवाज.औरंगाबादच्या Engg College ला SE ला पहील्यांदा बाजारची cassate ऎकली. सुरुवातीलाच "कौन हो वो.." चा स्मिताच्या आवाजातला तुकडा ऐकला आणि सटपटलोच. Dialoge delivery can be so powerful? I was dead!
माझ्या खोलीत एक दगड बसला होता. माझ्या चेहरया वरचे विलक्षण भाव बघून माझा चालता माणूस त्याने कानात खुपसला. "काय आवाज आहे!" दगड काही मिनीटांसाठी माणसात आला होता.
स्मिताचा मुलगा ज्या कार्यक्रमात आला होता त्यात शबानानं एक भाषण ठोकलं. तिच्या पुर्ण भाषणाचा gist एका शब्दात तिनेच सांगीतला: "Smita was my SOULSISTER" या एका वाक्यासाठी शबानाने अर्थ मधे स्मिताचा जो चुरा केला होता त्यासाठी तिला माफी दिली.
सिनेमा शिवाय स्मिता कायम तुकड्या तुकड्यात भेटली.
मागे म.टा.त (जेंव्हा मटा ला इंग्रजी पुरवणीचं ठीगळ नसायचं तेंव्हा) सोनालीनं "स्मितानं लावलेलं झाड" असा अफलातून लेख लिहीला होता. खुप साध्या भाषेत आणि भारावलेल्या अवस्थेतला लेख. सोनालीला दरवेळी पडद्यावर पाहाताना उगीचच त्या झाडाचे संदर्भ ताजे होतात.
नंतर एकदा सुभाष अवचटांची E-TV वर एक सुंदर मुलाखत झाली होती. सुभाष आणि स्मिता खुप चांगले मित्र असल्याचे बरेच उल्लेख होते. पण सुभाषनं काही फार अफलातून आठवणी सांगीतल्या. सुभाषच्या पहील्या प्रदर्शनाच्या वेळी त्याच्याकडे चांगला शर्ट नव्हता तर स्मिताने तो आणून दिला. आणि सगळ्यात touching आठवण होती स.प. च्या कट्ट्यावरची जेंव्हा दोघेही भविष्याची स्वप्न बघायची. "सुभाष आपण पुढे जायला पाहीजे रे असं म्हणता म्हणता स्मिता खरच खुप पुढे निघून गेली"

Wednesday, April 4, 2007

वास्तुपुरुष

फ्लॅटमधे राहाणारया आपण मंडळींनां वास्तुपुरुष ही संकल्पना माहीत असण्याचं काही काम नाही. कदाचित शब्दःश अर्थ माहीत असेलही पण त्याची intensity कळायचं काही कारण नाही. सिनेमे बघुन असं काही जाणवू शकेल हे मला काही वर्षांपुर्वी सांगीतलं असतं, तर मी खुप हसलो असतो. पण सुमित्रा भावेंचा वास्तुपुरुष पाहीला आणि संदर्भाच्या सारया चौकटीच बदलुन गेल्या.

सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याची चर्चा ऎकली होती की रिलीज डेट मुळे कसलंसं award हुकलं वगैरे (असं काही ऎकलं की मला या सगळ्याशी जी एं चा काही काळीजबंध असेलसं नेहमीच वाटतं.) हे तितकसं महत्वाचं नाही. Star Attraction होते एलकुंचवार! त्यांच्या लिखाणावर (नंतर मौनरागात त्याचे बरेच संदर्भ सापडले) पिक्चर, शिवाय त्यांनी त्यात काम केलेलं.

सिनेमाची स्टोरी मोठी touching आहे आणि साधीही. बडा घर पोकळ वासा असं वतनदार देशपांडेंच घर, गांधी भक्तीत वाया गेलेला निकम्मा बाप, छंदी-फंदी, पीळ न गेलेला पण प्रेमळ काका, प्रेमात पारच फसलेला भाऊ आणि शिक्षणासाठी सर्वस्व त्यागु शकणारी भास्करची आई. पुर्ण सिनेमा भास्करची तगमग, खचलेल्या घराला बाहेर काढण्याचा ताण आणि आईचा सिनेमाव्यापून उरणारं माणूसपण यांच्या भोवती फिरत राहातो.

अप्रतिम दिग्दर्शन, intellgent photography, amazing editiing आणि सहज सुंदर अभिनय या मुळे हा सिनेमा is must see! छोटा भास्कर ते मोठा भास्कर (एलकुंचवार) यांचा गोष्ट पुढे नेण्यासाठी जो to and fro होणारा वापर सिनेमात केलेला आहे तो अप्रतिम आहे.

नंतर आईशी बोलताना जाणवलं की खर तर ही गोष्ट शिक्षणाची तळमळ असणारया स्वातंत्र्यानंतर लगेचच्या कोणत्याही ब्राम्हण कुटुंबाची आहे, भास्कर फक्त त्यांचं प्रतिनिधीत्व करतोय. कोणा कोणाच्या हाकांना ओ देऊन शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्यलढ्यात सामिल झालेली एक आख्खी पिढी, प्रचंड वेगाने बदललेली परिस्थिती आणि झालेला अपेक्षाभंग, बुडलेल्या वतनदारी याची ही गोष्ट आहे. या सगळ्या निराशाजनक परिस्थितीला एक लखलखती किनार आहे ती शिक्षणाच्या तळमळीची.

भीक मागा, माधुकरी मागा, वार लावा हवं ते करा पण शिका, भास्करची आई मनापासून सांगते. भास्कर परत वाड्यात आलाय ते वास्तुपुरुषाची शांत करायला आणि तिथेच राहून आईचं स्वप्न पुर्ण करायला. या नोट वर सिनेमा संपतो. पडद्याआडून उमराणीकरांचा वास्तुपुरुषावरचा एक संस्कॄत piece आपल्याला भारुन टाकत असतो.

Monday, April 2, 2007

मुकुल शिवपुत्र कोमकली

मुकुल शांतपणे विलंबित लयीत गाणं सुरु करतो, तब्येतीत.

राग: बागेश्री
स्थळ: अजीबातच महत्वाचं नाही (घर, कार; जिथे शांतता असेल ते कोणतही).

पहीली पाच एक मिनीटं तो कुमारांचा मुलगा आहे वगैरे मनावर ठसवण्यावर जातात (आपणच आपल्याच मनावर रे). पुढची अजून काही मिनीटं त्याची कुमारांशी तुलना करण्यात जातात, त्याचा आवाज किती कुमारांसारखा आहे नै, पण कुमारांसारखा मोकळा गात नाही वगैरे टिपीकल सवाई गंधर्व महोत्सवी कळाहीन कॉमेंट्स नोट करण्यात जातात, आपण बिल्कुल लक्ष नाही द्यायचं. मुकुल गातच असतो.

मुकुल गात नसतो, मुकुल सुटलेला असतो.

मुकुल अप्रतीम सहजतेने रागाची मांडणी करतो, तानांची भेंडोळी उलगडणं वगैरे फालतु लाडच नाहीत, आरोह-अवरोहं सारं शिस्तीत. स्पष्ट उच्चार, अफाट effortless पणे रागाची मांडणी; मुकुल माझ्या अंगांगात भिनतो, या बाबतीत डिट्टो कुमार! मध्येच कधीतरी लक्ष्यात येतं त्याच्यावरच्या कर्नाटकीचे संस्कार, कुमारतर आहेतच पण तरीही याची अशी एक शैली आहे. शरीराला सहन न होणारा वेग - मग अचानक थांबणं - काही कळायच्या आधीच परत हा माणूस त्याच गतीतून प्रवास करत असतो, भौतिकशास्त्राचे सारे नियम खुंटीवर टांगून! मध्येच अंगावर येणारी एखादी तान; "ग म नि गा..ग म नि सा.." मला तर ऎरावतावरुन जाणारा एखादा राजाच आठवतो! कधी सुरांना अत्यंत लडीवाळपणे, तर कधी सरळ पणे भिरकावून देणारा राजा..."आवोजी लाला घर बिठलाऊ...रितू बसंत"

मुकुलनं आता माझा पुर्णपणे कब्जा घेतलेला असतो.

आता थोडा फ्लॅशबॅक..

२००७ च्या फेब्रुवारीत मी एक चक्कर मुंबईला मारली होती ती फक्त काही पेंटीग आणि चांगल्या CDs मिळतात का ते बघण्यासाठी. या वेळी सगळ्या नातेवाईकांना टांग मारायची असं ठरवलच होतं. फक्त आणि फक्त CST ते जहांगीर असेच दिवसभर हिंडायचे ठरवून आम्ही शेवटी जहांगीर समोरच्या म्युझीक शॉप मधे मुक्काम ठोकला. आणि अचानक मुकुलची CD दिसली. कोणत्याही कलाकाराच्या खाजगी आयुष्याशी त्याच्या कलेचा संबंध जोडायचा नाही या माझ्या नियमानुसार मी कधीच कुमारांचा family tree follow केला नव्हता. मला फक्त कलापिनीच माहीत होती. त्यामुळे मुकुल हे मला नविन find होतं.

पुण्याला आल्याआल्या धडधडत्या अंतःकरणाने मी कारच्या डेकमधे CD सरकवली; शिगेला पोचलेली उत्सुकता, भिती, आनंद असल्या काहीतरी विचित्र भावना मनात होत्या जणू माझीच मैफील होती! By the time Mukul completed his first few minutes, I was knowing, मुकुलनं मला झपाटलेलं आहे.

ताबडतोब सागर आणि आनंदला मेल टाकले; मुकुल ऎकला नसेल तर आयुष्य व्यर्थ आहे म्हणून. सागर काही बाबतीत आपलं बारसं जेवलाय माहीत असून मी बरयाच वेळा हा गाढवपणा करतो. काही मिनीटांनी सागरचा (नेहमी प्रमाणेच) शांतपणे मेल आला; आत्ता ऎकतोय हो लेका? अरे जबरा प्रकार आहे, गात राहीला तर कुमारांच्या पुढे जाईल असं वसंतराव म्हणायचे! काही हरकत नाही..मी मनाशी बडबडलो..आपण आपलं काम केलं. आनंदन काही ऎकलं नव्हतं हा त्यातल्या त्यात दिलासा :). घरी आल्या आल्या त्याला ऎकवला. तोही खलास.

नेहमीच्या प्रथेनुसार मुकुल अजून काय काय गायलाय शोधतोय, ईशा मिळालीय कदाचित कॄष्णा नावाची पण एक CD आहे. पुण्यात कुठे मिळेल?
Please अलुरकरांचा संदर्भ नको...पुण्यासंबधी ज्या काही अफवा आहेत, अलुरकरही त्यातलीच एक अफवा आहे...