Sunday, December 28, 2008

इडिपसाचे किंचित जुने वर्तमान


स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. नाटकाच्या वाचनाला स्टेजचा हट्ट करण्याची दोन कारणं; नाटक ही केवळ गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे ही दृष्टी आणि स्टेजचं असणं. तर, स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. अंड्यातल्या बलकासारखा कोवळा पिवळसर प्रकाश मध्याभागी ठेवलेल्या ३-४ खुर्च्यांवरुन ओसांडून वाहात असतो आणि अंधाराचं एक टोक पकडून मी स्टेजच्या एका कोपरयात बसलेलो. अंधाराचा अवकाश मोठा सुखद असतो. शरीराचे निर्बुद्ध प्रतल कुणाला वाचता येत नाही की डोळ्यांमधून उमटणारे अर्थांचे नाचरे बेबंद मोर कैद करावे लागत नाहीत. आरसा देखील झाकावा लागत नाही अस्सं माहेर भेटतं अंधाराच्या कुशीत. अंधाराच्या पल्याड अजून थोडा अंधार असावा तशी तू गर्द काळी शाल पांघरुन विरुद्ध अर्थाच्या कोपरयात बसलेलीस. काय करत असावीस? अनंत रिकामेपणात वैयक्तिक रिकामेपण मिसळलं की सीनर्जी होत असेल का निर्माण? कठीणपणे लपत होतं तुझं लख्ख लावण्य त्या काळ्या शालीत आणि तसे तुझे अट्टहासही नसावेत बहूदा. मी तुला निरपेक्षपणे पाहात राहातो.

समाधी मोडते कारण नाटकाचं वाचन सुरु होतं; राजा इडिपस!

इडिपस, लुई, जोकास्टा सारे पुस्तकातून जीवंत होताहेत. इडिपसाची शतकांवर पसरलेली शोकांतिका! जन्मजात अनैसर्गिक अशुभांचे भाकीत, बापाचा खुन, स्वतःच्याच आईशी लग्न, आणि शेवटी स्वतःचे डोळे फोडून परागंदा होणं ही थोडक्यात नाटकाची कथा. कथे पलीकडे जाऊन इडिपसाचे मानसशास्त्रीय, सामाजिक अर्थ शोधणं असा काहीसा प्रयत्न करायचा म्हणून संशोधकाच्या भुमिकेत मी. पण जिथे लिहीणं थांबतं तिथून पुढंच नाटक खरं उलगडत नेतो बाबा. बाबा म्हणजे नाटकाचा दिग्दर्शक.

बाबा स्वतःच इडिपसचे संवाद म्हणतोय. खर्जातल्या संथ कवितेसारख्या त्याच्या ओळी ऐकून संध्याकाळची भानामतीच होते...


"Aye, 'tis no secret. Loxias once foretold

That I should mate with mine own mother, and shed

With my own hands the blood of my own sire.

Hence Corinth was for many a year to me

A home distant; and I trove abroad,

But missed the sweetest sight, my parents' face."

टोकाच्या भावना पिढीच्या अंतराने उमटाव्यात तितपतच दबका हुंदका तुझ्या कोपरयातून आला पण माझे सारे तळ ढवळुन निघाले. बाबाला त्याची ऍन्टीगोनी मिळाली.

एखादं पात्र डेव्हलप करायचं म्हणजे ते पात्र वर्तमानात काय आहे या पेक्षा ते भविष्यात कसं असेल याचा विचार करायचा. बाबा फार छान प्रकारे सांगतो हे सारं समजावुन.

"मला वाटतं मी बाबाच्या प्रेमात पडलेय", समेवर आल्यागत तू म्हणालीस. दचकायचं नाही ठरवुन देखील मी दचकतो. "वयाच्या अंतराचं काही नाही. इडिपसचा कॉम्प्लेक्स उलटा झालाय समज. ऍन्टीगोनी इज इन लव्ह विथ इडिपस" बाबाला ऍन्टीगोनीचं पात्र असं डेव्हलप व्हावं असं कधीच वाटलं नसेल. नियती, अजाणतेपणी झालेलं पाप इ.इ. सारी कारणं देऊन मी थकलेलो असताना तुझा विमुक्त सवाल "तुला नाही आवडत मी?"

"तुला नाही आवडत ती?" बाबानी पुस्तकातुन डोक वर न करताच माझ्यात आरपार प्रश्नचिन्ह घुसवलं.

"मी खुप आळशी आहे" शहराला टाळून बाहेरुन जाणारया रिंगरुट सारखं माझं उत्तर. पात्रं जितकी अमुर्त, तितकी त्यातुन अर्थ सापडण्याची शक्यता जास्त.

बाबा सवय असल्यागत बोलतो "माझ्या वयाच्या किंचितही इंटलॅक्युअल माणसाच्या प्रेमात वीस-बावीस वर्षाच्या मुलीनं पडणं हे खुपच नैसर्गिक आहे. पण मेंदु आणि शरीराच्या गरजा प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या असतात. या दोन वेगळ्या गरजा एकत्र येतीलच याची खात्री किंवा अट्टहास का? आणि बाय द वे, ऍन्टीगोनी कॅन नॉट लव्ह इडिपस. ऍन्टीगोनीचे पात्र असं डेव्हलप होऊच शकत नाही फॉर द नोन रिझन्स. केवळ तुला लेखक म्हणून या चाळ्याचा एक खेळ करायचा असेल तर गोष्ट वेगळी. फक्त रुबीक क्युबच्या एका बाजुचे रंग जमवताना बाकीच्या पाच बाजु फिस्कटवु नकोस म्हणजे झालं"

"बाबा" मी निरुत्तर अवस्थेत वाद घालतात तसं बोलत राहातो " कधी नाटककाराला शोधत पात्र येतात. पण त्या पात्रांच्या त्वचेखाली हाडांमासांचा जो जीवंत माणूस असतो, तो फक्त तुला, एक दिग्दर्शक म्हणून, भेटु शकतो, मला नाही. ऍन्टीगोनीचे रंग उतरवल्यावर ती जी काही शिल्लक राहाते, तो जीव तुझ्यात गुंतलाय. त्याचं काय?"

पुर्णविरामाचं निश्चयी बळ पुरवत बाबानं भरतवाक्य उच्चारलं " जोकास्टाचा ब्रोश, कधी नैतिक, कधी सामाजिक आणि कधी अनुवंशीय अधिष्ठान बनतो. विविध कालात इडिपसाने स्वतःचे डोळे त्या ब्रोशने फोडून घेणं ही नियती आणि अपरिहार्यता देखील."

"Let the storm burst, my fixed resolve still holds,

To learn my lineage, be it ne'er so low.

It may be she with all a woman's pride

Thinks scorn of my base parentage. But I

Who rank myself as Fortune's favorite child,

The giver of good gifts, shall not be shamed.

She is my mother and the changing moons

My brethren, and with them I wax and wane.

Thus sprung why should I fear to trace my birth?

Nothing can make me other than I am."


Friday, November 28, 2008

मरा साले हो

मरा साले हो
मराच तुम्ही.
तुमची तीच लायकी आहे.
झाकलेत डोळे?
हां
आता मी गाणं म्हणतो
"कुणी तरी यावं, बॉम्ब टाकून जावं"
भ्याड आणि नामर्द येतं कुणी
आणि तुमच्या बरगडीत
(हो, त्याचीच कुणी शस्त्र केली होती कधी!)
बंदूक टोचून
टुचकवतं तुम्हाला
आणि तुम्ही कुत्र्या-मांजरासारखे
मरुन पडता
रस्त्यावर बेवारश्यासारखे.
तुम्ही हुतात्मे नाही झालात तरी मॄतात्मे व्हाल आणि
उदार मायबाप सरकार "सानुग्रह" मदत देईल तुम्हाला.
पण साले तुम्ही टुचकेच.
सानुग्रह मदत मिळण्यासाठीपण तुम्ही कुणालातरी पैसे चाराल आणि उरल्यासुरल्या भिकार तुकड्यांवर येडझव्यासारखे टॅक्स भराल.
टॅक्स म्हणजे कापुसकोंड्याची गोष्ट. विचारता त्याचं काय होतं ते?
टॅक्स मधून लोकांनी, लोकांसाठी, लोकांमधून निवडुन दिलेल्या सरकारची yz सिक्युरिटी येते. त्यांच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटत नाहीत, इन शॉर्ट, ते तुमच्या सारखे सामान्य आणि टुचके नाही राहात.
टॅक्स मधून तुरुंगात राहाणारया आणि सरकार नसून सरकार असणारया सोद्यांची सोय होते.
सोदे कंटाळले की बाहेर येतात आणि दिवाळी समजून पाच-पन्नास फटाके फोडतात.
आणि तुम्ही? तुम्ही नेमक्यावेळी नेमक्या ठिकाणी असल्यासारखे बरोब्बर मरुन पडता.
काय म्हणता? जिवंत आहात अजून? सुंदर!
आधी लोकल गाठा. काय माहीत, तुम्ही बापजन्मात कधी लोकलमधे खिडकीजवळ बसला नसाल. आज बसून घ्या आणि मुम्बैचं स्पिरीट वेगळंच यावर स्पिरीट मारुन आल्यासारखं बाईट द्या.
जिवंत आणि फट्टु दोन्ही एकाचवेळी आहात म्हणता?
स्वतंत्र, निर्भय लोकशाही देशात अजिबात बाहेर पडू नका.
सिनेमा, मॉल, बाग आणि तत्सम सार्वजनिक जागी जाणंच टाळा. हल्ली तिथेही हाडं आणि कवटीवाला वैधानिक इशारा असतो म्हणे.
घरात बसून टीव्ही बघा, पुस्तकं वाचा, कविता करा, नेक्स्ट जनरेशन फट्टू तयार करण्यासाठी काही करता आलं तर तेही करा.
पण तरीही तुम्ही मरा.

तुम्ही मरा
पेपरमधल्या ठळक मथळ्यातून
लाईवकव्हरेजच्या सुकल्या आणि ताज्या काळ्या लाल रक्तखुणातुन
मोबाईलमधून हिंडणारया हिंस्त्र किंवा बुळबुळीत मेसेजमधून
इंटरनेटवरल्या सहानुभुती आणि धमकीच्या चर्चांतुन
कपडे उतरवुन धर्म शोधणारया सहानुभुतीच्या भाषणांतुन
विविध रंगांच्या टोप्यांखालून उगवणारया चिथावणीखोर उचकवण्यातुन
मरा साले हो
मरा

आज सो कॉल्ड जिवंत असण्याचा पुरावा म्हणून ही कविता, अन्यथा
आम्ही=तुम्ही=आपण

Wednesday, November 19, 2008

आरसा आपुलिये/आंगी आपण पाहे/तरी जाणणें जाणों लाहे/आपणयातें

मुलभुत, उदाहरणार्थ हिंसा, सत्ता, निष्ठा किंवा व्यभिचार वगैरे वगैरे...
...

कॉलनीच्या ओसाड पटांगणात महाळुंग्यानं उगाच रिकाम्या फुटबॉलला लाथ घातली. पंधरा-वीस मिनीटांत निदान तीनवेळा तो वॉचमनला वेळ विचारुन आला होता. रवीवारी दुपारी काही केल्या दोनच्या पुढे घडाळ्याचा काटा काही सरकत नव्हता. या वेळी कुणाच्या घरी जाऊन खेळायचं म्हणजे फुकटात शिव्या खायच्या इतपत व्यवहार त्याला माहीत होता. रिकाम्या गोकर्ण्याचं तसं नव्हतं. तो येताना सगळ्या मित्रांची दार वाजवत आलेला. दार वाजवल्यावर ’कोण’ या प्रश्नाचं उत्तर देण्याइतपत पण रिकाम्या तिथे थांबला नव्हता. रिकाम्याला पाहून महाळुंग्याला उगीच बरं वाटलं. रिकाम्याचं भरुन वाहाणारं नाक आणि विटके कपडे यांच्या पलीकडेही महाळुंग्याला रिकाम्या आवडायचा. म्हणजे साहित्यीक भाषेत कसं इमानी वगैरे होता तो. महाळुंग्यानं प्रेमाच्या भरात आरोळी ठोकली "हैश्य्य्य्य्य्य्य्य." फुटबॉलला मनसोक्त तुडवून झाल्यावर रिकाम्यानं खिशातून मोर मारुन भरल्यासारखी निळीगर्द गोटी काढली आणि डोळ्याला लावून गंमत बघायला लागला. "च्यायला" मैदाच्या पोत्यासारखा भुस्स्स रिकाम्या, गोटीतून गरागरा इकडेतिकडे बघत म्हणाला "लै भारी दिस्तं बे यातून." ज्या अर्थी रिकाम्याला नाकातली लोळी सिंपली ग्रॅव्हीटी गुणगुणत खाली आलेली कळालं पण नाही त्या अर्थी खरंच त्या गोटीतून लैच भारी दिसत असणार हे महाळुंग्यानं ताडलं आणि रिकाम्याच्या हातातून ती गोटी जवळ जवळ हिसकावुनच घेतली. निळ्या गोटीतून खुपच वेळ निळंच दिसत या पलीकडे महाळुंग्याला त्यात काय लै भारी आहे हे कळत नव्हतं. "कायपण! नुस्तंच निळं" महाळुंग्यानं त्याचं कोपर रागारागात रिकाम्याच्या मांडीवर दाबलं. तितक्यात एक निळा मुलगा सायकल हाकत ग्राऊंडवर येताना महाळुंग्याला दिसला. महाळुंग्यानं दचकून डोळ्यावरची गोटी बाजूला केली. "मी, पिंगाक्ष. इथे नविन आलोय राहायला." स्वच्छ आवाजात तो स्वच्छ मुलगा बोलला. का ते कळालं नाही पण महाळुंग्या उगीच मनात खट्टु झाला. रंगीत खडुच्या बदल्यात वासाचा खोडरबराचा तुकडा अदला-बदल करुन मिळतो तसं काही तरी करुन पिंगाक्षाचं नाव, त्याचा स्वच्छ रंग, त्याच्या आजुबाजुला दरवळणारा पावडरचा ब्येष्टं वास सारं कश्याच्या तरी बदल्यात आपल्याला बदलून मिळावं असं महाळुंग्याला उगाच वाटलं.

बघण्या-दाखवण्याचे अनेक कार्यक्रम पार पडून पिंगाक्ष अखेर रिकाम्याच्या शाळेत पडला अन पवित्र झाला. शाळा सुटे पर्यंत शिळा होत जाणारया रिकाम्याबरोबर बसण्यात खरंतर पिंगाक्षाला कसलाच रस नव्हता पण वर्षाच्या अध्येमध्येच वर्गात आल्यानं दुसरी कोणतीच जागा रिकामी नव्हती. आठवड्याच्या आतच पिंगाक्षाचा रिकाम्याविषयी शिसारी ते करुणा, कणव इ. इ. असा एक समृद्ध बुद्ध प्रवास झाला.

पिंगाक्ष रिकाम्याचं काय सुरु आहे हे बघतच राहीला. समोर बसणारया मुलाच्या बगळा शुभ्र शर्टवर रिकाम्यानं पेनचं टोक अल्लाद टेकवलं होतं. टिपूसभर निळा थेंब बघता बघता मोठाच मोठा होत जात होता. त्या निळसर बनत जाणारया ढगाकडे बघण्यात रिकाम्या इतका तल्लीन झाला होता की बाहेर आलेलं त्याचं जीभेचं टोक नाकाला लागेल की काय असं पिंगाक्षाला वाटलं. त्या दोघांची ही तंद्री मोडणारा एक मोठा आवाज झाला आणि रिकाम्याला वाटलं त्याच्या निळ्या ढगातून वीजचं पडली. पिंगाक्ष घाबरुन उभा राहीला तेव्हा कुठे रिकाम्याला पाठीत बसलेल्या गुद्याची जाणीव झाली. पुढे किती तरी वेळ, का कोण जाणे, पिंगाक्ष गोकर्णाच्या वागणुकीची हमी देत राहीला.

पिंगाक्षाच्या या अनपेक्षित मदतीची परतफेड रिकाम्यानं त्याला घरी जाताना सायकलवरुन डब्बलसीट नेऊन केली. रिकाम्याच्या आयुष्यात त्या सायकलचं जे काही महत्व होतं, त्या हिशोबानं त्यानं पिंगाक्षाचा सर्वोच्च सन्मान केला होता.

पिंगाक्ष आणि रिकाम्या हे नवं घट्ट समिकरण पाहून महाळुंग्याला काही तरी तुटल्यासारखं वाटलं आणि त्यापेक्षाही जास्त त्याला ते अपमानकारक वाटलं.

कुठल्याही सर्वसाधारण दर्जाच्या संध्याकाळसारख्यावेळी महाळुंग्याला मैदानावर अचानकच एकटा रिकाम्या दिसला. "जॉली आणि स्टॅच्यु" डोळ्यात जाईल इतपत अंतरावरुन बोट नाचवत महाळुंग्या जुनाच खेळ नव्यानं खेळला. रिकाम्या नेहमीप्रमाणेच कॅज्युअल. त्यानं हातावर निरखुन पाहीलं आणि स्वच्छतेच्या भलभलत्या भाषणापायी पिंगाक्षाला मनातल्यामनात शिव्या हासडल्या. त्याच्या हातावर जॉलीपुरताही शाईचा ठिपका नव्हता. त्यानं निराशेनं मान हलवली. कदाचित ती निळीशार गोटी महाळुंग्याला द्यावी लागणार होती. "जॉली आणि स्टॅच्यु एकदम. जॉली नसेल तर समोरच्या पाण्याच्या टाकीवर डोळे मिटून चढायचं आणि स्टॅच्यु असताना हलायच नाही" महाळुंग्यानं अप्रतिम गेम टाकला होता; एकाचवेळी हलायचं आणि हलायच नाही पण असं काही तरी. उंचचंउंच टाकीवर डगमगत्या शिडीवरुन चढायचं म्हणजे हातपाय मोडून घ्यायची खात्री. त्यापेक्षा स्टॅच्यु होऊन उभं राहावं असा सर्वमान्य विचार करुन रिकाम्या जॉली नसल्याबद्दल काय शिक्षा मिळणार याचा विचार करत उभा राहीला. स्टॅच्यु ओव्हर झाल्यावर महाळुंग्यानं दहा बचाबच बुक्के जीव खाऊन रिकाम्याच्या पाठीत घातले. रिकाम्याला वाटलं आपलं आतडंच उलटून पडेल. रिकाम्या कितीतरी वेळ आतल्या आत मोडत राहीला. दिवसाचा थोडा अंश घेऊन संध्याकाळ विझत गेली आणि भुकेल्या लांडग्याप्रमाणे रात्र स्वप्नांवर तुटून पडली. रात्र भर रिकाम्याला गर्गर फिरत पाठीत बसणारा महाळुंग्याचा हात आणि त्याच्या डोळ्यात पेटलेला सुर्य दिसत राहीला.

रिकाम्या महाळुंग्याच्या घरात भाड्याने राहातो ही बातमी पिंगाक्षाला फारशी मजेदार वाटली नसली तरी महाळुंग्याच्या पाठीमागे त्याचा जो उल्लेख होतो तो मात्र पिंगाक्षाला खचितच मजेदार वाटला. त्याचा अर्थ काय आहे हे माहीत नसलं तरी एक न केलेली गोष्ट करायला मिळते याच्या आनंदात पिंगाक्षाने त्याला ऎन मैदानात एकदा खच्चून "ए भाडखाऊ" अशी हाक मारली आणि आख्खं मैदान कचाकचा हसलं. मैदानावर पुढचे कितीतरी दिवसं हात लांब करुन गोलगोल फिरत छोट्या पोरी नवंच गाणं म्हणायच्या "साडे बाई माडे/कोणं खातो भाडे//भाड्याची बायको पळाली/गंगेमध्ये बुडाली!"

महाळुंग्याचं दोस्तांत मिसळणं हळुहळु कमी झालं. संध्याकाळभर तो डुगडुगत्या शिडीवरुन टाकीवर जाऊन बसायचा. रिकाम्या पाहात असायचा. महाळुंग्याला असा संपु द्यायचा नव्हता त्याला. वेळ संपल्यासारखा सुर्य एक दिवस घाई घाईत बुडाला तसं रिकाम्यानं हलकेच टाकीखालची शिडी काढून टाकली. रिकाम्याच्या दृष्टीनं भिडस्त सुडाची ती परिसीमाच होती. महाळुंग्याला कळेपर्यंत मैदान ओसाड पडलं होतं. त्याला असं वाटलं की त्याचं उरलेलं सारं आयुष्य त्या टाकीवरच जाणार. त्याच्या पोटातून आरपार कळ गेली. वॉचमननं त्याला बरयाच वेळानं खाली उतरवलं तेव्हा ओलेत्या कपड्यांमध्ये त्याचा स्वाभिमान विझु विझु झाला होता.

कुणी नाही बघून महाळुंग्यानं एक दिवस दुपारीच रिकाम्याची सायकल विस्कटून टाकली. सायकलचा एक एक सुटा भाग बघूनही रिकाम्या रडला नाही. चेंदामेंदा झालेला आपलाच माणूस अनोळखी वाटला तर शोक कसला करणार? रिकाम्यानं महाळुंग्याच्या दारावर त्वेषानं सायकलचे काही अवशेष फेकले आणि निग्रहाने रडू आवरत "भाडखाऊ" असा उद्धार करत चालता झाला.

अंगावरचे माराचे वळ मिटण्याआधीच रिकाम्यानं महाळुंग्याचं घर सोडलं आणि तेव्हाच कधी तरी महाळुंग्याचं आतलं एक टोक तुटलं ते तुटलंच.

सुर्य उगवतो आणि मावळतो ही किती मोठ्ठी गोष्ट आहे नां! क्षण, तास, दिवस, आठवडे इ. इ. सरत राहातात आपोआप.

जाणारया दिवसांसोबत मनात अढी ठेवून पोरं आढीत घातलेल्या आंब्यासारखी पिकत राहीली..Tuesday, November 11, 2008

देवी

देवी, नेसत्या आत्म्यानिशी भेटलेल्या स्त्रीयांची माणूस-रुपं. तीन वेगवेगळ्या कालखंडात (!?) लिहीलेल्या कविता, एकत्र जोडून काही अर्थपुर्ण होतय का ते बघतोय...देवी-१


//१//

बर्फ वितळतो मणक्यात माझ्या,

मरणगंध पुन्हा दरवळतो

त्याच्या अभिषेकात.

सांगा देवीजी,

तुमचं अस्तित्व एखाद्या अभिशापासारखं का भासतं?

माझे रंग, गंध, सूर, छंद

सारे कसे ओढून घेतात स्वतःला स्वतःतच

//२//

आज तुमच्या नावाचा गोंधळ देवीजी,

जागरणाला याल नां तुम्ही?

आमच्या उभ्या देहाचा

पेटलाय पोत,

त्यात मनाच्या गाभारयात घुमतं

तुमचं बोलणं उदासारखं.

घुसमटतो माझा प्राण.

आत्मव्देषाचा हा उत्सव

तुमच्याच आशिर्वादाने

पार पाडतोय मी.

तुम्ही दिलेल्या लक्ष लक्ष

जिव्हारजख्मा प्रत्येक क्षणात मरणाशी तडजोड करतात

कवितांच्या बोलीवर.

या कविताही तुमच्या व्रताचं उद्यापन

//३//

तुम्ही माझ्या?

मी मात्र सर्वस्वी तुमचाच.

माझ्याकडून बांधलेले संबंधांचे दोर

आणि तुम्ही तगवलेलं

नातं निव्वळ दुःखाचं सुंदर


देवी-२


//१//

देवी, तू जननी या शोधाची

आणि सनातन नात्याची आद्यकडी.

माझ्या रक्तातील पेशीपेशीत तुझं

अस्तित्व गडद

महान अद्वैतासारखं.

या प्रवासाची तू अपरिहार्य सुरुवात

//२//

वास्तव परिमाणात मोजली जातात नाती,

देवी, तुझ्या अनुग्रहानेच झाले हे दिव्य ज्ञान.

तू वास्तवाच्या स्पर्शाचा दाहक झल्लोळ

कल्लोळ नंतर केंद्रात.

देवी, कुठे फेडशील हे पाप?

मी कवी होणे हे विधीलिखित असेलही

पण तू झालीस निमित्तमात्र

//३//

देवी,

तुझ्याशिवाय अपूर्णच आयुष्याची प्रस्तावना.

खुपसं प्रेम आणि तीव्र द्वेषानंतर

निवळतेपणीही तरळते

फसवणुकीची तीच भावना साधार.

दुखावणारया तुझ्या प्रत्येक शब्दातून माझे

कवितेत रुपांतर झाले पण त्या आहेत

ऋणमुक्त.

देवी, ते ओझे तर मी फेडतो आहे

सदेह.

मला हवा आहे मात्र तुझाच आशिर्वाद की

मी नाकारु शकेन कण्याला पेलणारे

तुझे मायावी हात

//४//

अस्पष्ट आणि धुसर

उमटलाय तुझा चेहरा

तरीही दुःखाच्या प्रचंड क्षणी जाणवलं

पोटातून

देवी, सनातन नात्यातील तुच दुसरी कडी.

दुःखाच्या ज्या निसटत्या समांतर स्पर्शाचे

आपण भागीदार, तिथूनही तू

मला

उगवतीलाच ऒढतेस.

देवी, हेही तितकंच खरं,

मी अस्पर्श ठरेन

म्हणून पायरीवरुनच मी कृतज्ञ

//५//

सवयीने उमजत जातात पुरातन लिपीचे अर्थ.

ती पुरातन असते की आपणच मोठे

होतो ती समजण्याइतपत रोजच्या अगणित

श्वास घेण्याच्या जन्मजात सवयीतून?

त्यानंतर

देवी, तू मला, मी तुला वाचत जाणं

आपल्यातील पिढीच्या अंतराला जोखणं होतं

//६//

ऎन बहरात थबकून

एखाद्या समृद्ध स्वगतासारखी

वाट्याला आलीस.

मौनातील ठसठसते दुःख

तुझ्या एका स्पर्शासरशी

उमलुन यावे इतके अतूर होते?

देवी, तू सनातन नात्यातील

तिसरी कडी.

तू प्रेयसी होण्याआधी परावर्तित भासातील माझी

उमजही तितकीच खरी

//७//

देवी

अनंत..

आणि आदी सुद्धा


देवी-३


//१//

पोत विझले,

चंद्र निजले,

पहाटतारे हिर्व्या तळ्यात

विझत, जळत, उजळत राहीले.

देवी,

तुझे कालातीत डोळे देखील

हळुहळू माणूस झाले

//२//

देवी,

चिमूटभर ओंजळीत

ओलेत्या आणभाका

घातल्या की

वारयावर वाहात येऊन

अंगभर रुजत जातात

हळदीच्या पिवळ्या हाका.


स्थिरावल्या की

तुझ्या ओटीपोटीत

नाळेच्या एका टोकाला

पेरतात

एखादा आश्वासक उखाणा

//३//

रांगा

रांगा

रांगा.

सरळ,

गोलंगोल

आणि वक्र रांगा.


माणसे,

माणसे,

माणसे.

स्थलांतरीत होत राहातात माणसे

एका रांगेतून दुसरया रांगेत

जसे जन्माचे फेरे


सात रांगा फिरुनही

गाभारा गिळत नाही मला.

श्रद्धा आणि सोय यांचे गणित

मांडत-विस्कटत असतानाच

प्रसादाचे केळे दह्यात मान टाकते

आणि घटीका भरल्यागत

देवी,

तुझे महाद्वार मज साठी उघडते


एका आत्ममग्न कसोशीने

टेकवतो मी कपाळभर तुझ्या माझे भाळ

आणि हातांवर एकरुप हात

करणी उलटवल्यागत.


ललाटरेषांच्या सामुदाईकीकरणाचा एक विस्फोटक प्रयोग

किंवा

तुझ्या दगडी देहावर

जीवाश्म होऊन अनंतकाळ उरण्याचे काही असंबद्ध प्रयत्न


देवी,

कोलाहल

नाही कानांना

स्पर्श

नाहीत शरीराला

आकार-विकार

नाहीत

देहभानाला


हळुहळु चंद्र चढतो माथ्यावर

आणि चांदण्यांचे आकाश डहुळत राहाते

हिर्व्या तळ्यात


कवड्यांची माळ घातलेला

येतो कुणी पोत

नाचवत तुझ्या अंगणात


देवी,

तुझे डोळे चमकतात पोताच्या अर्धवट प्रकाशात

काळजात खोचलेल्या षडजासारखे

शुद्ध आणि स्वच्छ

दैवी चांदीचे


Wednesday, October 22, 2008

रेषेवरची अक्षरे..०८

१९०९ मधे रघुनाथरावांनी दिवाळी अंकाची एक अनोखी प्रथा मराठीत सुरु केली आणि आज शताब्दी वर्षात या प्रथेला आमचा हा सलाम...
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/

Friday, September 26, 2008

बोका


नवकथेतून आल्यासारखा बोका बराच वेळ रिकामा विचार करत बसला. रात्रीची झोप उत्तम झाली होती. सकाळी सकाळी ऊन खाऊन झालं होतं पण त्याचा काही केल्या आज मूड येत नव्हता. गल्लीतल्या चार-दोन उनाड आणि उथळ मांजरींनी त्याच्याकडे बघून शेपूट हलवली होती खरं पण त्याला अजिबातच रोमॅन्टीक वाटलं नाही. एका नॉर्मल बोक्यासाठी हे अतीच होतं नाही का? कोपरयातल्या लव्हबर्डच्या आवाजाने त्याची समाधी मोडली आणि स्मिताने ठेवलेल्या भांडंभर दुधावर त्याने रात्रभराचा उपास सोडायला सुरुवात केली.

स्मिताचं खरं नाव स्मिता नसून स्मिथा राव आहे हे बोक्याला नसलं तरी आपल्याला माहीती हवं. पण बोका आणि इतरही बरेच लोक स्मिथाला स्मिता, स्मित किंवा मिस राव अश्या अनेक नावांनी ओळखायचे. बोक्याशी तादादत्म्यता म्हणून आपणही स्मिताच म्हणू या.

स्मिताचं आयुष्य वेळापत्रकाचे रकाने असतात तसं चौकोनी; ऑफिस- ऑफिस-ऑफिस-आणि घर. पहाटे घर सोडण्यापुर्वी नाईलाजाने आरसा बघायचा आणि घाईघाईने ऑफिसच्या दिशेने गाडी हाकायची. एकदा का त्या स्वाईपिंग मशिन मधे ऍटेन्डन्स कार्ड घातलं की चरकातल्या उसाला होत नसेल तितका आनंद स्मिताला व्हायचा.

बाकीच्या बरयाच मुली ऑफिसात आल्या की चेहरयावर लिंपण क्रमांक २ करतात तेव्हा स्मिताचा दिवस पुर्ण जोरावर असतो. डिझाईन रिव्ह्यु करणं, आर्किटेक्चर मधे बदल सुचवणं हे सिनिअर आर्किटेक्ट म्हणून तिचं मुख्य काम. हाताखाली लोकांचा पिरॅमिड तयार करुन काम करवुन घेण्यापेक्षा तिला स्वतंत्र काम करणं जास्त आवडायचं. पण हल्ली पुर्वीसारखं गुलामांच्या संख्येवरुन श्रीमंती ठरवण्याची पद्धत फिरुन आली होती. नको नको म्हणताना कंपनीनं चार लोक तिच्या हाताखाली टाकलेच होते. तिचा कामाचा भार कमी करणे, हाताखालच्या लोकांना काम देणे, त्यांना मार्गदर्शन करणे या उदात्त हेतु पलीकडे कंपनीची तिच्यावर अवलंबुन असण्याची रिस्क कमी करणे हा ही एक हेतु होताच हे न कळण्याइतपत स्मिता लहान नव्हती. इतक्या वर्षांनंतरही कंपनीच्या दृष्टीनं आपण फक्त एक रिसोर्स आहोत हे जाणवुन स्मिता दुखावली गेली होती.

माळ्यावरुन बोक्यानं उडी मारली आणि चेहरयाची किंचित बिघडलेली इस्त्री सरळ केली. स्वतःची जैसे थे अवस्था बदलुन झाल्यावर त्याला स्मिताबद्दल वाईट वाटलं. जुने जाऊ द्या मरणा लागूनी हे गाणं शिट्टीवर वाजवायचा असफल प्रयत्न करत बोक्यानं घराबाहेर पावुल टाकलं.

केबिनच्या बाहेर झालेल्या टकटक आवाजाने स्मिता भानावर आली. तिचा एक नविन रिसोर्स बाहेर उभा होता.

संजीवनं स्मिताच्या केबिनमधे पाय ठेवला तेव्हा त्याच्या छातीत हजार ससे धडधडत होते. त्याला स्वतःच्या लायकीबद्दल नेहमीच खात्री होती पण आत्ता पर्यंत त्याचं काम वापरुन बरेच वामन वर गेले होते. स्मिताच्या विक्षिप्त वागणुकी बरोबरच तिची टेक्निकल हुकुमतही त्याला माहीत होती. थोडं दैव, नीटस काम आणि स्मिताची खुषमस्करी यांच्या बळावर यावेळी प्रमोशन मारायचंच असं त्यानं मनोमन ठरवलं आणि स्मिताकडे बघून एक छान हसु चिकटवुन टाकलं.

बोका परत घरात आला होता. कंटाळा आपल्या पाचवीलाच पुजला आहे अशी दिवसंदिवस त्याची खात्रीच होत चालली होती. फॉर अ चेन्ज, त्याने लव्हबर्डच्या मोठ्या पिंजरया समोर बैठक मांडली. त्याचं अस्तित्व जाणवुन फडफडणारया सारया चिमण्या स्तब्ध झाल्या. एका कोपरयात बसून त्या बोक्याचा आणि बोका त्यांचा अंदाज घेत राहीले. मग बोका प्रसन्नपणे हसला. खाण्यापेक्षा करमणूकीसाठी या चिमण्या बरया होत्या. मनकवड्या चिमण्यापण एकदम रिलॅक्स होऊन मुक्तपणे गावु लागल्या.

संजीवशी होणारया "य"व्या मिटींगच्या आधी स्मितानं चेहरयावर पाण्याचा हबका मारला आणि आरश्यात निरखुन पाहीलं. डोळ्यांखालच्या रेषा मेंदुवरच्या वळ्यांशी स्पर्धा करत होत्या, केस आणि चेहरा यांनी रंग आपापसात कधीचेच बदलले होते. सुज यावी तसा शरीरावर मेद चढला होता. आपलं वय जाणवतय हे आरश्यात बघितल्यावरच कळावं याचं स्मिताला कुठेतरी वाईट वाटलं.

संजीव स्किमा समजावुन सांगत होता आणि भारावल्यासारखी स्मिता त्याच्या कडे बघत होती. दोघांमधे चिमूटभर आभाळाचं तर अंतर होतं आणि नव्हतही. त्याचे हात, त्याचे ओठ, त्याचे गंध तिच्या वर आदळुन आतच विरत होते. हे कसले कल्लोळ? आतच आत वादळाचे हे कसले संकेत? एक मोठा आवंढा गिळून निग्रहाने तिने डोळ्यातुन पावूस परतवुन लावला. तिने रुजवलेल्या आखीव चौकानात हा कोन कधी गृहीतच धरला नव्हता तिने. रात्री दहा-अकरा नंतर कधी तरी पलंगावर अंग टाकलं की शरीराला सुख म्हणजे फक्त झोपेचंच या समिकरणाची दुसरी बाजू तिने कधी तपासुनच पाहिली नव्हती. स्वप्नातही डोळ्यांसमोर तरळायचे ते अलगोरिथम आणि फ्लो-डायग्रामच. मनाचा कोरडेपणा शरीरावर आपसुकच प्रतिबिंबित झाला होता. पण आज देहभानानं नवंच बंड पुकारलं होतं. शरीराच्या गरजा अंगावर इतक्या आक्रमकपणे चालून या आधी कधीच तर आल्या नव्हत्या..

घराची घंटा वाजली की ग्लानीत भास झाला हे स्मिताला ठरवायला बराच वेळ लागला. तापामुळे जात असलेला तोल सांभाळत तिने दार उघडलं तर दारात संजीव उभा होता. नमस्कार चमत्कार झाले, ऑफिसच्या अल्याडपल्याडच्या गप्पा झाल्या आणि हळुहळु राखून ठेवलेले दुर्ग उधळायला लागले. आयुष्यातले एकेक पदर परक्यासमोर उलगडताना स्मिता ढासळत गेली. संजीवनं पुढं होऊन आधार दिला. किती विचित्र असतात गुंतण्याचे नियम!

नियम आणि बंड यांना जोडणारा सामाईक दुवा शरीर! स्मिताच्या अतृप्त स्पर्शांनां पुरता पुरेना संजीवचे अंगांग. स्पर्शाच्या, गंधाच्या, देहात उगवणारया अन मावळणारया देहाच्या इतक्या टोकदार संवेदना स्मिताला पेलवत नव्हत्या. तिने हलकेच डोळे मिटले..

बोका अवाक किंवा काहीच रिऍक्ट होत नाही. माळ्यावरच्या अंधारात त्याला कविता आठवत राहाते

रात्र काळी
पसरत जाते तुझ्या देहावर
देहाचेच आकार घेऊन

एखादा चंद्राचा तुकडा घेऊन
नव्याने करावी
द्वैत सुत्रांची मांडणी
इतकीही संदिग्धता नसते
हुंकारांच्या ओंकारात

मुठभर वेदना
आणि मिठीभर आनंद
यांच्यापलीकडे सत्य केवळ एकच
रात्र काळी
घागर काळी

रात्र काळी
घागर काळी


..तिने डोळे मिटले. काहीच क्षण आणि मिठीतले समुद्र मावळत गेले. तिच्या डोळ्यांसमोर परत तेच अलगोरिथम, डिझाईन स्टॅन्डर्ड्स आणि त्यांना लटकणारे कोड तरळत राहीले. ग्लानीतही तिला हे ओळखीचे स्वप्न जास्त जवळचं वाटलं.

बोका स्मिताच्या कुशीत शिरला. जे होतं ते पाहाण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नसतं.

काहीच दिवसांनी स्मिता दुसरा जॉब घेऊन पल्याड निघून गेली आणि तिच्या जागी संजीवला बढती मिळाली.

बोका बरयाच अंशी स्मितासोबत गेला। शिल्लक बोका रिकाम्या घरात पुढच्या स्मिताची वाट पाहात राहीला.

Friday, September 19, 2008

डॅड, डोन्ट किल सुपरमॅन

Hey Dad, तू कधीच कॉमिक्स आणून नाही दिलंस मला. विचारलं की म्हणायचास कल्पनाशक्ती झडते आणि मला ही ते नेहमी सारखं पटून गेलं! अधूनमधून हातात येणारया अमरचित्रकथा सोडल्या तर मधल्या काळात खानदानी पुस्तकं माझ्यात खोलवर रुजत गेलेली. पानांपानांवर उगवलेले शब्द आणि त्या शब्दांना लगडलेल्या अर्थांच्या कित्येक शक्यता यांनी मनावर गारुड घतलेलं. पण मग नवल झालं. जाळीफेक्या स्पायडी पुस्तकातून टीव्हीत घुसला. त्याचे अगम्य शत्रु पुराणकथांहून चमत्कारीक होते. त्याची अक्कल फा.फे.हून वेगळ्या कुळीची होती आणि त्याचं विश्व कदाचित विरधवलाहून चित्तथरारक होतं. मध्येच कधी तरी अर्चुनं सुपरमॅन, मॅन्ड्रेक आणि फॅन्टमशी ओळख करुन दिली आणि सुपरहिरोजची एक पंगतच माझ्या अंगणात झडली. नथिंग रॉन्ग आफ्टर अ पॉईन्ट ऑफ टाईम, यू सेड, खरं आणि खोट तुझं तुलाच कळेल! तू बरोबर होतास डॅड. चिरंतन सोबतीला कोणती पुस्तकं राहातील हे कळण्या इतपत शहाणा करुन सोडला होतास तू मला. नंतर कधी प्रकर्षानं कुठलाच सुपरमॅन नाही आठवला मला.

पण आज, जेव्हा मी तीन, तेरा किंवा तीस कुठल्याही वयाचा असू शकतो, मला सुपरमॅन कुठे तरी असावासा वाटतो. उन्मळुन पडणारी माणुसकीची मुळं, श्रद्धांचे आंधळे अतिरेकी अविष्कार आणि यंत्रवत निस्तेज आमची जात यांचे ओझे घेऊन युगाची पावले फार लांब नाही चालु शकणार आता. एका विकृत करणी सरशी होत्याचे नव्हते होईल तर कुणी थांबवायचे ते विनाशी तांडव?

'सुपरमॅन हे करेल?' असं विचारण्याआधी थोडं थांब डॅड. सत्याला नागडं न करता माझ्या विश्वासाला आंधळेपणानं लिंपता येणार असेल, तर प्लीज डॅड, डोन्ट कील सुपरमॅन

Sunday, September 7, 2008

किनारे

सखीचे किनारे
असे पावसाळी
जसा बुद्ध
डोळ्यातुनी हासला

कुठे नीज तारे
कुठे शुभ्र अश्व
तुझा थेंब थेंब
देह चित्रावणे

विरक्तात का रे
नभांचे आरक्त
आणि पावसाळाही
ओला झरे

सखीचे किनारे
असे भासशाली
जणू श्वास
श्वासातुनी वाकले

गोदोसाठीची कविता: ऍज इज आणि टू बी

ऍज इज..

थंड काचा
भावनाविरहीत
आणि मध्येच उभ्या केलेल्या
पुठ्ठ्यांच्या चंचल भिंती,
हवी तेव्हा पाचर मारता येते
अन
हवी तेव्हा काढता ही येते
पण त्याचं काय?
अल्याड-पल्याड तीरावरची माणसं
गुमान पणे
यंत्रातुन बोलत राहातात
यंत्रवत
किंवा गुहेत त्यांच्या बापजाद्यांनी काढलेल्या चित्रांसारख्या
जुन्याच खुणा
नव्याने वापरु लागतात

तारखांनुसार
देयकांची कोष्टकं
फळ्यांवर डकवलेली
आणि आकड्यांचे जादुयी
अनेक आलेख
विस्कटुन फिस्कटुन
जमिनीच्या सात बोटं वर
तरीही नशिबाचेच लेख
मग दिवसांच्या बदल्यात
माणसांचे आदीम सौदे
अमुक दिवस = तमुक माणूसकाम
काम झालंच तमाम!
नवे मंत्र, नवेच परवचे
एफर्ट.. शेड्युल..
डब्लुबीएस..आणि मॅनमन्थ

...टू बी?

सुख-दुःख
अर्थ-निरर्थ
लिहीणं- न लिहीणं
असणं-नसणं
आणि असं फालतु, बाष्कळ बरंच काही
गोदोसाठी सारं अर्थाअर्थी समानार्थी
गोदोला रुढार्थानं सुखी म्हणता मग?
आपण तरी ही गोदो होणार नसतो
आपण फक्त गोदोची वाट पाहायची

उपद्व्याप आणि अट्टहास
याच्या अध्यातमध्यात
गोदोच्या शोधाचे सुवर्णमध्य
मॉल, नाटकं, सिनेमे
कथा आणि हो
कवितात देखिल

Sunday, August 24, 2008

अदृष्यांच्या भेटींचे दृष्टांत

बेटां-बेटांनी बनलेली असतात माणसं. प्रत्येक ओळखी साठी एक नवाच कप्पा, एक नवंच बेट. वाहात बेटे जवळ आली तर माणसांचं जंगल होईल याची भिती. पूर आलाच तर काही बेटांना बुडवुनही पुराणकालीन नोहा सारखी बाकीची बेटे वागवत मानवजातीचं अस्तित्व मिरवत पुढे जायचं आपण. पण आता हे वेगळं. आता हे वेगळं, कारण मी स्वतःच स्वतःला तुझ्या बेटावर पुनर्वसित करत आहे. फाळणीसारख्या काही खुणा, किंचित कत्तलींचे इतिहास आणि आठवणी साठवणारया मेंदुंच्या काही पेशी मागे सोडून मी आज तुझ्या वसतीला आलोय. रंगांचे काही तलाव होते माझ्या बेटावर, तिथून तुला आवडणारे करडे, तपकिरी, काळपट रंग आणलेत मी. तश्याच काही विराण्या रागदारीतून अन शुष्क, विराण, बेभान ऋतु सोबतीला. तू म्हणालीस एकट्या माणसाला इतकं पुरेसं असतं.

मी तुझ्या वसतीला आलो आणि मी हे लपवले नाही. मी काहीच लपवत नसतो पण माझ्या आगमनाचे उत्सवही तू किंवा मी साजरे केले नाहीत. किंबहुना आता नवेच पाठशिवणीचे खेळ सुरु झाले आहेत. तुझ्या शहरात राहायचं आणि तुलाच टाळायचं. हे खेळाचे नियम की आपल्या संबंधांचे तोल सांभाळण्याचे आटोकाट प्रयत्न; मला कळत नसतं. तुझ्या असंख्य चेहरयातला एक आर्टी चेहरा मी निवडला. आणि तोच माझा झाला. तुझ्या कविता बेसावधपणे उलगडत गेल्या आणि माझ्याच झाल्या. तुझे शब्द, माझे झाले, तुझे आर्त, माझ्या उरी इतरले, तू म्हणजेच मी झालो; अपरंपार श्रद्धेचा एक उखाणा! घात झाल्यागत तुला एक पत्र आणि तेव्हा पासून माझे अस्तित्व तुझ्या प्रतिभासाधनेपुरतेच मर्यादित. माझ्या अनुभवांचे टोक, तुझ्या लेखणीला जोडलं अन तुझे चष्मे घट्ट माझ्या डोळ्यांवर (उचकटले तर डोळे ही सोबत निघतील असं तुला कधी वाटत नाही?). काचेच्या घरात राहात असल्यागत जगण्याचे सारे सोस तू इतरांसमोर उलगडत गेलीस, अन मी? मी, माझा हरेक श्वास, अस्तित्वाचे ताण, सुक्ष्मदर्शकाखाली ठेवून तुझ्या हवाली केले. मला भोगत, स्वतःचे भोग चढवण्याची कोण ही लगबग प्रिय!

बेटे जवळ आली की माणसांची जंगलं होतात. ओळखं, झाड म्हणून; रंग, एकजात हिरवा; सारी मुळे आपापसात हेवेदावे असल्यागत एकाच ठिकाणाहून पाणी शोधणारी. तस्संच होतय तुझ्या शहरात आल्यापासून. किंवा कसं, जणू कॅमेराची लेन्स झुम करत करत तुझी ओळख जवळ येत अस्पष्ट व्हावी तसं. तद्रूप, चिद्रूप, विद्रूप सारी तुझी विविध रुपे इथे, तुझ्याच शहरात उलगडत गेली. तुझ्या कवी असण्यापलीकडचे संदर्भ नकोच होते मला. माणूस म्हणून, प्रेयसी म्हणून, अमूक आणि तमूक म्हणून तू कशी असशिल याची भितीयुक्त उत्सुकता होतीच पण माझ्या मनातल्या प्रतिमांचं हसंही होवु द्यायचं नव्हतं मला आणि म्हणूनच तुला तोंडातोंडी सामोरी येण्याची सार्थ भिती.

या डोळ्यांतून त्या डोळ्यांत वाहाताहेत बेटं पण सामोरी कधीच येणार नाहीत. आपली ओळख, कवितेपासून कवितेपर्यंत आणि भेटींचे दृष्टांत कायमच अदृष्य.

Wednesday, August 20, 2008

आवडलेले थोडे काही

मित्रांनो, खुप दिवसांनी एक नवा खो-खो सुरु करतोय. विषय तसा बहुतेक सगळ्यांच्या आवडीचा आहे त्यामुळे मझा यावा हीच (श्रींची!) ईच्छा.

कविता जश्या बालभारतीच्या तावडीतुन मुक्त झाल्या, तुम्हा-आम्हाला त्या (अचानकच?) आवडायला लागल्या. त्या आवडीनिवडीतही जिवाच्या जवळ असणारया काही कविता असतातच. हा खो खो अश्याच कवितांसाठी.

यावेळी खेळाचे नियम जssरा बदलतोय.

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही

५. अजून नियम नाहीत :)

--------------------------- XXXXXXXXXXXXXXX- -----------------------

सखीची मुलगी- कवी ग्रेस (निवडक कडवी)

सखीच्या मुलीला कसे काय द्यावे
उन्हांतील हे भव्य शब्दांगण?
इथे चंद्र नाही इथे सूर्य येतो
स्वतः सावलीचा मुका साजण...

जळातील चांदीत मासा रडावा
तसा मेघ येतो सखीच्या घरी
घराच्या भयाने उभा श्वास तोलून
धरावी मुलीने पुन्हा बासरी?

तिने जीव द्यावा असा जीव न्यावा
पुढे सर्व हो कांचनाचे धुके
लिलावात वाटणे संभवे ना
अशाने सखीला कधी पोरके.

--------------------------- XXXXXXXXXXXXXXX- -----------------------

दु:ख- कवी ग्रेस

//१//
निर्वंश समुद्रावरील वाळवंटात उभे
राहिले की मला ऎकू येतात
माझ्या कविता.
एखाद्या प्राचीन साम्राज्याचा निखालसपणे
खचलेला भूभाग.
मावळत्या मिठीतील काळा करंद मोर...
दुःख सांगितले की हलके होते.
आकर्षक होते जगून दाखविले की.
मरुन दाखवल्यावर
दुःख मिटते?

//२//
स्वप्नलिपी वाचणारया प्रेषिताच्या खांद्यावरुन
ढळलेला पक्षी थेट पडला
तो काळोखातच.
डहाळ्यांवर फार दिवसांच्या सुकलेल्या
चांदण्यांचे तेजस्वी व्रण होतेच.
आणि मग उशीरा रात्रीपर्यंत शहरातून
निर्घूण कत्तलीच्या बातम्या
येतच राहिल्या.

//३//
आवड तरी कशी? दुःखद नक्षीची कविता,
प्रिय व्यक्तीचे प्रदीर्घ चुंबन;
ज्या खेड्यांत प्रार्थना भरत होती
तिथल्या विहिरीचे काळे पाणी;
उशीर झाला म्हणून लिलावात विकलेले
घर. मनाचे आणखी कोणते धर्म असतात?
रडून थकले की सगळेच जीव झोपी जातात.


--------------------------- XXXXXXXXXXXXXXX- ---------

माझा खो मेघना आणि क्षिप्राला...

Wednesday, August 13, 2008

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी


खुप आधी नाटकांविषयी लिहीलं होतं. नाट्यगीतांविषयी न लिहीतो तर कुठे तरी आत रुखरुख लागली असती.

मराठी गाण्यांची पहीली आठवण म्हणजे भावनातिरेकाने मळमळणारी करुण, दारुण भावगीते. रस्त्यावरची भिकारीण असो की कॉलेजात जाणारी चंपट पोरं असो, सारी आळवुन आळवुन शुद्ध, दाणेदार, स्वच्छ, सुमधुर आवाजातच गाणार. ते खोटे शब्द, खांडेकरी आदर्शांचा काव्यगुळ यात खरं तर मराठी गाण्यांचा आमच्या पुरता मुडदाच पडला असता पण..

..पण वसंतराव भेटले. वसंतराव म्हणजे बाप-माणुस. आधी नुस्तंच "घेई छंद मकरंद" आवडायचं कारण त्यातली तानांची भराभरा उलगडणारी भेंडोळी. "घेई छंद" चं विलंबित व्हर्जन मिळमिळीत वाटायचं आणि तडफदार वसंतरावांबद्दल आदर द्विगुणित व्हायचा. तेव्हा उत्तुंग नाट्यशिल्प (कदाचित) दुसरया कुठल्या तरी नावाखाली कॅसेटच्या स्वरुपात मिळायचं. कान जरा सेट झाल्यावर "घेई छंद" च्या विलंबित लयीची पण मजा कळायला लागली. तो पर्यंत वसंतराव नुस्ते छा गये थे. "मृगनयना रसिक मोहीनी" सारखं तलावातल्या चांदण्यासारखं संथपणे पसरत जाणारं गाणं असो की "सुरत पिया की" सारखी दमसाजाची परिक्षा घेणारं, प्रचंड चढं-उतार असणारं गाणं असो किंवा "तेजोनिधी लोहगोल" सारखी सर्वांगसुंदर प्रार्थना असो, वसंतराव वॉज अनबिटेबल. म्हटलं तर सारीच नाट्यगीते आणि म्हटलं तर प्रत्येक गीताची जातकुळी वेगळी. वसंतरावांनी सर्वच प्रकार लिलया हाताळले. वसंतरावांची तान न तान सुस्पष्ट, स्वच्छ, शब्दांची आब राखणारे उच्चार आणि रंगमंचावर अपेक्षित असणारी स्वरांची जबरदस्त फेक असा साराच अफलातुन मामला. वसंतरावांचा मोठेपणा इथेच संपत नाही. डबक्यातल्या पाण्याला वाट नाही मिळाली तर त्याला कुजका वास यायला लागतो. नाट्यसंगीताला वसंतरावांनी वास येण्याआधीच नवी वाट काढून दाखवली. बालगंधर्व, दिनानाथ यांच्या (ऎकिव)सुवर्णयुगानंतर पुढची पिढी जुनेच सुर आळवत होती. नाविन्याच्या अभावापायी महाराष्ट्राची एकमेव प्रेझेन्टेबल कला मरते की काय असं वाटत असतानाच वसंतरावांनी समर्थपणे ती परंपरा पुढे नेली.

याच पालखीचा पुढचा समर्थ भोई म्हणजे अभिषेकीबुवा. गायक म्हणून अभिषेकी थोर होतेच पण एक कॉम्पोजर म्हणून मला त्यांच्या बद्दल जास्त आदर आहे. "सर्वात्मका सर्वेश्वरा" सारखं आधुनिक पसायदान असो की "अबिर गुलाल" सारखा कल्लोळ कल्लोळ अभंग असो, बुवांचं गाणं टू द पॉंईंट असायचं, कुठेही फापटपसारा नाहीच. कट्यार काळजात घुसली हे जसं वसंतरावांचंच नाटक होतं तसं धाडीला राम तिने का वनी, मीरा मधुरा ही बुवांची नाटकं होतं. कैकयीचा त्रागा व्यक्त करणारं "मी झाले अवमानिता" असो की "कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला" मधलं भरताचा आर्त असो, त्या गाण्यांमधले भाव कॉम्पोजिशन मधे पुरेपुर उतरलेले. "लेवु कशी वल्कला" या आशा खाडीलकरांनी म्हटलेल्या गाण्यात तर वनवासातील सीतेचे फुटप्रिन्ट्स इतके ठळक आहेत की जेव्हा सीता गाते "नीट नीरीची गाठ न जुळते/नीरी वरती नीरी न जुळते//कटी वरुनी झरते, ओघळते मेखला" (शब्दांची चु.भु. दे. घे.), डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त गोंधळलेली, बावरलेली सीताच येते. आणि बाईंनी की ते गाणंही अश्या काही झोकात गायलय की तोंडून नुस्तं "वा!" असंच बाहेर पडावं. "हे सुरांनो चंद्र व्हा" बद्दल तर काय बोलावं? कुसुमाग्रजांनी जणु नवं मेघदुतच लिहीलय असं वाटतं.

या दोन महाविरांव्यतिरिक्त रामदास कामत, प्रभाकर कार्येकर, बकुळ पंडीत, अजीत कडकडे असे असंख्य जण गाऊन गेले. तरीही..

..तरीही ही परंपरा सायनोसायडल लयीसारखी खाली-वर होत राहीली. का? प्रतिभावंतांचा अभाव, गायक-नटांचा अभाव, प्रसंगाशी विसंगत कोंबलेली गाणी, काळाचा महिमा ..ही यादी अजूनही लांबवता येईल. पण उपयोग काय? आज काही छोटे मोठे अपवाद सोडले तर दामलेबुवांव्यतिरिक्त गाणारं आणि लोकांना नाट्यगृहाकडे आकर्षित करु शकणारं कोणीच नाही. लेकुरे उदंड झाली सोडली तर त्यांनी ही गाणं फार गंभीरपणे घेतलं नाही हा जरासा आपल्याच नशिबाचा वाईट भाग म्हणावा

केरळात कथक्कली, कुठेतरी भरतनाट्यम, कुठे कुचिपुडी असे विविध वारसे विविध संस्कृतींना लाभले. महाराष्ट्राला मात्र दगडांच्या देशा गाण्यागत लावणी, तमाशे, शाहीरी असे रफ-टफ प्रकार वाट्याला आले. सुस्कांरीत म्हणावा असा नाट्यगीत हा एक ठेवा या मातीला लाभलेला पण तो ही कालौघात मिटत जातोय. सध्या सारेगमात छोटी छोटी पोर ज्या तडफेने नाट्यगीतं म्हणताहेत, ते ऎकलं की उम्मीद पे दुनिया कायम है चा अनुभव येतो हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

Tuesday, August 5, 2008

भरल्या पोटीचा न-अभंग

कोंबड्यागत फोनाचे आरविणे-मेलाचे फोनातच चेकविणे
स्वप्नांच्या बुडावर लाथविणे-आपणची आपुल्या

निग्रहाने पुस्तक मिटणे-एमओएमांमागे जीवा पळविणे
पापण्यांना तिष्ठविणे-भरल्या पोटी

कळफलकावर कळा काढिणे-दुसरयांच्या घाणी निस्तरणे
आपुल्या खालचे जळणे-कोणा न दिसे

सश्याचे आतची धडधडणे-श्वासांचे येणे अन रेंगाळणे
सुरांचे आर्त आळविणे-मनयोगासाठी

शब्दांचे अर्थहीन बुडबुडणे-सुखासुखी सुख बोचणे
त्रासाला करवुन घेणे-याचा उपाय नसे

Sunday, July 20, 2008

काळेकुट्ट सर्पगार काही

//१//

दिवाभीत काळोखात देखील त्याला मानेवरुन पाठीकडे सरकणारे सर्पगार स्पर्श जाणवले. क्षणापुर्वी थोड्या अंतरावर झालेल्या कारच्या स्फोटाने त्याचे हात अजूनही थरथरत होते. चार फौजी ऑफीसर वाळुच्या किल्ल्यासारखे विस्कटुन गेले होते. कुणाचं काय कुठं होतं हे न ओळखु येण्याइतपत विस्कटलेले! त्याला मौलाना आठवले. ज्या विश्वासाने त्यांनी त्याच्यावर ही कामगिरी सोपविली होती, तितक्याच सफाईने त्याने ती पार पाडली होती. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या असंख्य अपमानित बांधवांचे मळलेले पण आज हसणारे चेहरे तरळत होते. एमआयटीतला केमिकल इंजिनिअर ते धर्मयोद्धा, एक कठीण अंतर केवळ श्रद्धेपोटी त्याने पार केले होते. मौलाना भेटले नसते तर आजही तो एमआयटीच्या लॅबमधे प्रयोग करत बसला असता. एमआयटीच्या आठवणीसरशी त्याला तिथेच भेटलेली अबिदा आठवली. त्याच्या डोळ्यात तिचे उष्ण श्वास उतरले पण जाणवलेच नाहीत. मात्र मणक्यावरचे सर्प आता अधीकच धीट झाले होते. त्याने स्वतःची पाठ चाचपून बघीतली, रक्ताचा एक काळसर लाल ओघळ गडद होत जात होता. कदाचित बॉम्बचा एखादा तुकडा उडून त्याच्या पाठीत रुतला होता. विषारी मृत्युची चाहूल त्याच्यातल्या इंजिनिअरला आधी लागली. "तो तर त्याच्या धर्मासाठी लढत होता. मग त्याच्या अस्तित्वासाठी कोणीच का नाही लढलं?" प्रश्नचिन्हांच्या फेरयात मौलानाचे धार्मिक प्रचार विरत गेले. "त्याच्या नंतर अबिदाचं काय? त्याच्या दोन मुलांचं काय?" पापण्यांना झोप पेलवत नव्हती तरी प्रश्न संपत नव्हते. ग्लानी भरल्या डोळ्यांसमोर एमआयटीचा कॅम्पस आला, त्याचे मित्र आले,भुतकाळातून त्याचं गाव, शाळा, त्याचे अर्धशिक्षित अब्बु-अम्मी आठवत राहीले. आठवणींच्या भोवरयातून परत अबिदा उगवली. पण तिचे स्पर्श त्याला अलिप्त, श्वास शिळे आणि डोळे धुके भारले वाटले. मेंदुची एकेक पाकळी गळत असताना त्याला त्याच्या धर्म आणि देवापेक्षा अबिदाची जास्त गरज वाटत होती. या विचारांसरशी दचकण्याइतपतही त्राण त्याच्यात आता उरलं नव्हतं. अबिदा जिंकली होती. त्याने शांतपणे तिचा विजय मान्य केला आणि डोळे मिटले. कुठेतरी खोल त्याला तिचे हात जाणवत होते, त्याच्या केसांतुन फिरणारे, त्याला समजवणारे, त्याला शांत करणारे. त्याच्या पापण्यांवर कुणीतरी आभासांची फुंकर घातली आणि तो शांतपणे झोपी गेला.

//२//

भिंतीला डोके टेकवुन अबिदा किती वेळ बसून होती माहीत नाही. विचार करुन मेंदु थकला तरी डोळ्यांना आवर नव्हता. गेल्या सहा आठ वर्षात तिने तिच्यापुरतं जग बदलताना पाहीलं होतं. कुण्या धार्मिक नेत्याच्या सहवासात तिचा हसरा फारुख कधी केमिकल फारुख झाला आणि एका अनंत धर्मयुद्धात सामिल झाला तिला कळाले पण नव्हते. अमेरिकेने अघोषित धार्मिक-आणिबाणी लादली आणि फारुखने अफगाणिस्तानला परतण्याचा निर्णय घेतला. अमेरिका ते अफगाणिस्तान हा फक्त भौगोलीक प्रवास कधीच नव्हता. त्याचे कपडे, त्याचं दिसणं, त्याचे विचार, त्याचं वागणं सारं बदलत गेलं. नौकरी करणारी, उच्च शिक्षित अबिदा त्याच्या एका निर्णयासरशी सामान्य होऊन बसली. तिच्यासाठी धर्म म्हणजे जगण्याची फक्त एक पद्धत होती. चार लोकांच्या चार वेगळ्या पद्धती आणि म्हणूनच चार वेगळे धर्म असु शकतात हे तिला कळत होते. पण कोणती तरी एकच पद्धत खरी आणि म्हणून माझाच धर्म श्रेष्ठ हा अट्टहास तिला कळत नव्हता. पवित्र धर्मग्रंथांचे नव्याने लावले गेलेले अर्थ तिला उमगत नव्हते. एका विशिष्ट काळात लिहील्या गेलेल्या धर्मग्रंथांना काळाच्या तराजुत न तोलता काळच मागे नेण्याचे अजब साहस कोणी वेडे करत होते आणि त्यांच्यातच एक तिचा फारुखही होता. आपल्यास सख्ख्या माणसाबद्दल असं भुतकाळी वाक्यं बोलून अबिदा शहारली. सत्य कधी बदलत नाही फक्त सत्याचे अर्थ नव्याने उलगडत जातात. केमिकल फारुख ठार झाला, फारुख शहीद झाला, माय फारुख इज नो मोअर! विविध प्रकारे सत्याचे पडसाद उमटत राहीले.

//३//

मौलाना किती तरी वेळ शुन्य नजरेने बाहेर चाललेला मुलांचा खेळ पाहात होते. त्यांचं मन भलतीच कडे होतं. यांच्या लपण्याच्या ठिकाणापासून जवळच एक मोठी सैनिकी तुकडी आली होती. तिला जर उडवता आलं असतं तर एक मोठा विजय प्राप्त होणार होता, अनेक हत्यारं आणि गाड्याही मिळाल्या असत्या. पण पहारा मोठा कडक होता. तिथं पर्यंत पोचणं हेच मुळी आव्हान होतं. एक प्रदीर्घ श्वास घेऊन ते परत मुलांचा खेळ पाहु लागले. जमातीचे उद्याचे सैनिक, उद्याचं भविष्य! किती तरी वेळ तो राज्य आलेला मुलगा त्याचं राज्य वाचवुन होता. मध्यभागी ठेवलेल्या डब्ब्याभोवती तो एखाद्या सिंहासारखा पहारा देत होता. अचानक धुळ उडवत शाद आला. गुडघ्याच्या खालपर्यंत आलेला कुर्ता, त्याच्याही खाली लोंबणारा पायजम्याचा नाडा, एका हातात तलवारीसारखी उभी धरलेली छ्डी आणि पाठीमागे कुण्या वात्रट पोरांनी लावलेली डब्याची माळ अश्या अवतारात शाद खिदळत खिदळत आला. त्याच्यामागे लावलेली भली मोठी डब्याची माळ त्याच्या सारखी पायात येत होती, दगडांवर आपटत होती आणि त्यातुन चित्रविचित्र आवाज येत होते. राज्य आलेल्या पोराचं क्षणभर लक्ष विचलित झालं, क्षणभरच; पण तेव्हढ्यात बाकीच्या भिडुंनी "ह्येयेये डब्बा गुल्ल" असा गजर करत डबड्याला लाथ घातली. मौलाना पोरांच्या हुशारीवर मनोमन हसले. राज्य आलेला भिडु शादला बुकलुन काढत होता. मौलानांनी सहजपणे त्याला बाजुला केले आणि शादच्या मागची डब्यांची माळ काढत त्याच्या धुळभरल्या केसांचा मुका घेतला. उद्याचा सैनिक! त्यांना आज सापडला होता.

//४//

अबिदा वेड्यासारखी शादला शोधत होती. शाद, वय दहा-अकरा वर्षे, मानसिक वय? कदाचित दोन किंवा तीन. आणि ते आयुष्यभर तेव्हढच राहाणार होतं. विविध प्रकारे टोच्या मारणारया पोरांपासून ती शादला प्राणपणाने जपायची. तरी ही पोरं कधी शादच्या मागे डबड्यांची माळ लावायचे तर कधी त्याचे कपडे फाडून टाकायचे. वाळुतल्या कोरड्या युद्धखोर वातावरणात शाद एक करमणुकीचं करुण साधन बनून उरला होता. नाश्या आधी सतत शाद सोबत असायची पण जेव्हा ती बारा वर्षांची झाली होती, मौलानांच्या आदेशावरुन फारुखनं तिचं घराबाहेर खेळणं बंद केलं होतं. फारुखच्या जाण्यानंतर वेगळ्या अर्थानं अबिदाला ते बरंच वाटत होतं. तिच्या स्वतःच्याच सुरक्षिततेची जिथे खात्री नव्हती, तिथे नाश्याच्या कोवळ्या तरुणाईबद्दल ती सतत धास्तावलेली असायची. नाश्याचा हात घट्ट धरुन ती अंधारया गल्लीत शादला हाका देत होती. स्वतःचं नाव कसंबसं सांगु शकणारया शादबद्दल तिच्या मनात भलतेसलते विचार यायला लागले तसं मात्र तिचं अवसान गळालं. नाश्याला मौलांनांच नवं ठिकाण माहीत होतं. सकाळ झाली की तिनं त्यांना शादबद्दल सांगायचं असं ठरवुन न संपणारया रात्रीच्या कुशीत माय-लेकी परतल्या.

//५//

मौलानांसोबत शाद मजेत होता. त्याचे अब्बु जसे त्याच्याबरोबर तासंतास खेळायचे तसेच मौलाना आणि त्यांचे मित्र शादशी खेळत होते. त्याला त्रास देणारया मुलांना मघाशीच मौलानांनी शिक्षा केली होती त्यामुळे शादला त्यांच्याबद्दल विलक्षण उमाळा दाटून आला होता. जसा लाडात आला की तो त्याच्या अब्बुंना डोक्याने ठो द्यायचा, तसाच ठो मौलानांना द्यायचा हे त्याच्या बालमनाने कुठेतरी ठरवुन टाकलं होतं. "इतक्या लहान वयात धर्मसैनिक होण्याची संधी सर्वांनाच मिळते असं नाही. फारुख महान आत्मा होता हेच खरं. याचं भाग्य थोर म्हणून देवानं याला इतकं विशेष बनवलय. मोठा झाला तरी याच्या मनाचा निर्मळपणा कधीच हरवायचा नाही." मौलाना शादच्या डोक्यावर हात ठेवून मनाशीच पुटपुटले. मौलानांचे साथीदार भराभर शादचे कपडे बदलत होते. त्याच्या कुर्त्याखाली त्यांनी एक कापडी पट्टा बांधला. त्यावर घड्याळासारखी एक तबकडी टिकटिक करत होती. मौलानांनी पवित्र मंत्र उच्चारल्यासारखे काही तरी केलं आणि स्वतःच्या घड्याळाकडे बघत पट्यावर एक वेळ नक्की केली. फारुखनं बनवलेला एक शक्तिशाली टाईमबॉम्ब उद्या अमेरिकन तुकडी उडवणार होता. मौलानांना पुरतं माहीत होतं की या वेडसर मुलाबद्दल जसं थोड्यावेळापुर्वी खेळणारया मुलांना संशय आला नव्हता तसाच तो उद्या सैनिकांनाही येणार नव्हता. अकरा वर्षांचा मानसिक रुग्णाईत सुसाईड-बॉम्ब मौलानांनी योग्य जागी पोचवण्याची व्यवस्था केली

//६//

टिकटिकटिकटिक
शांतता
प्रकाशाचा दिव्य झल्लोळ
अन नंतर कल्लोळ काही
परत शांतता
स्मशानशांतता

//७//

फारुख वॉज अ जिनिअस. त्याचे केमिकल्स कधीच चुकत नाहीत
फारुख वॉज अ गॉडमॅन. त्याचा मुलगाही त्यावेळी चुकला नाही

//८///

अबिदा-शोकाचं झाडं
अबिदा-सुडाचं वर्तमान
अबिदा-अधर्माचा धर्म
अन
धर्माचा अधर्म देखील

//९//

नाश्याला अनंताची झोप झोपवुन अबिदा मुक्तपणे घराबाहेर पडली. मौलानाचा नवा पत्ता घेऊन तिला अमेरिकन सैन्याकडे पोचायचं होतं.

Wednesday, July 2, 2008

बिनबुडाची टिपणं


काही टिपणं फार विक्षिप्त असतात. त्यांना ना बुड ना शेंडा पण त्यांचं अस्तित्व काही नाकारता येत नाही. बरं दोन टिपणांमधे काही साम्य असावंच असा ही नियम नाही. पारयासारखी ही टिपणं मनाला येईल तेव्हा एकत्र होतात आणि मनाला येईल तेव्हा परकी होतात. पण म्हणून लिहीलं नाही तर उरावरही बसतात

आमच्या सोसायटीकडून डहाणुकरला जाताना स्मृतीवन लागतं. किंचित जंगल म्हणता येईल इतपतच झाडांची दाटी आहे तिथे. सवयीने तिथली झाडे शिळी झालेली. हल्ली साधं लक्षही जात नाही तिकडे. परवा अखंड पाऊस पडत होता आणि अचानकच हिर्व्या रंगाचं काहूर माजलेलं दिसलं स्मृतीवनात. जुनीच कविता आठवली

झाडे
शांत रात्रीच्या येण्यानंतरही
स्तब्धतेची शाल पानांआडून
सावरुन किंचितशी दमल्यासारखी

झाडे
सारे ऋतु पानगळ मनात
असून नसल्यासारखी अलिप्त
खोल मुळे गाडून घट्ट उभी राहील्यासारखी

झाडे
माणसांवर कलम होतात कधी
स्वतःच्याही नकळत रुजून जातात
झाडे, मात्र वाटतात कधी कधी झाडांसारखी


झाडांची आठवण निघावी आणि फुलांचे ऋतु आठवु नयेत म्हणजे शुद्ध क्रुरपणाच. काय गडबड आहे मेंदुत माहीत नाही पण मला कधी गुलाबाचा वासच येत नाही. सुगंध म्हटलं की आधी माठातल्या पाण्यात तरळणारा मोगरा आठवतो. चिकाटीने दर ऋतुत आणलेल्या आणि तितक्याच चिकाटीने रुजलेल्या निशीगंधाच्या लांबसडक दांड्या आठवतात. लताच्या परिपुर्ण तानेसारखा टपोरा सोनचाफा आठवला तरी डोळे भरुन येतात आजही. माझ्या खोलीच्या काठावर रातराणी होती. भरती-ओहोटीच्या कोणत्याच नियमांना न जुमानता रोजचं चांदणं लगडायचं तिच्या हरेक डहाळीवर. लेकुरे मधे किती गोड गोड बाळ जसे या गाण्यात कुंदाच्या उगवाया लागल्या कळ्या असा सुरेख संदर्भ आहे. पोरीबाळी एकच गर्दी करायच्या कुंदाचा बहर वेचायला पण दिलदार फुलं कधी कमी नाही पडली. देठाकडून केसर पेरत जाणारा पारिजात जवळ जवळ वर्षभर दाराशी फुलांच्या पायघड्या घालायचा. रात फुलों की बात फुलों की गाणं नुस्तं लहडलेलं असतं आठवणीं मधून.

मंद, पिवळसर पांढरया फुलांचे ऋतु मावळले. रात्री कधी तरी जाग येते तर खिडकी बाहेर गुल्मोहर पेटलेला असतो. रस्ते किंचित ओले आणि दमट पिवळा प्रकाश. काळजात ताज्या कवितेचे काही अवशेष विखुरलेले असतात.

रात्रीचं आरंभशुर चांदणं मावळलं की
हवासाच असा तो अंधार
पडतो अन
शब्दहीन क्रांतीच्या उंबरठ्यावर
कविता झरते.
वेचावी तर
खिडकीच्या तंद्रीदार चौकटीच्या काठावर
मी डोळे सोडून दिलेले.
आत्म्यासारखे आकारहीन अर्थ
शब्दावाचून वाहात राहातात.

चांदण्यांनी अंधार ओढून घ्यावा असा
विलक्षण काळोख
मंद्र लयीतून पाझरणारा पावूस झेलत
मान खाली घालून उभी असणारी झाडे
तरी ही डोळ्यात उगवत असतात
माझ्या

Thursday, June 19, 2008

पानांवर प्राण पखाली

पानांवर प्राण पखाली
शपथांचे नवे बहाणे
पाऊस कधीचा पडतो
उठवित निजली राने

या गावामध्ये असतील
चैतन्य भारले रावे
रक्ताला फुटणारे पण
गाणे कोणी गावे

पाऊस चिंब भिजलेला
गारांचा फसवा तिड धा
श्वासात तुझ्या भासांनी
विस्कटलेली राधा

तो मदमत्त मातीचा गंध
ते ओले गुणगुण पाते
हातातून क्षितीज हातांचे
पारयागत निसटुनी जाते

तू ये नां श्रावण बनूनी
झुलव्यांचा बहर कुणाला
हिरव्या गवतावर माझा
बघ श्वास मोडूनी गेला

Tuesday, June 10, 2008

ओ सुनी ओ मीरा

सुनी

मेंदुचे तळ ढवळले की हरवलेली माणसेही मिळतात हे माझे साधे गणित. तू आठवणींच्या कोणत्याही कप्प्यात नाहीस याची खात्री होत असतानाच हाक दिल्यासारखी तू भुतकाळातुन हळुच डोकावलीस सुनी आणि संभ्रमाची पिशाच्चे झाली. जशी तू, तश्याच तुझ्या आठवणीही मुकाट सोशीक.

सुनी, दिसायचीस तेव्हा कायमच काम करत असायचीस तू आणि विश्रांती म्हणून तुझ्या भावांना सांभाळायचीस फावल्या वेळात. आम्हाला खेळात एक गडी कमी पडला की तुझ्या साठी तुझ्या आयशीशी भांडायचो आम्ही म्हणून तुझी तात्कालिक सुटका आणि आमच्या ससंदर्भ स्वार्थाचं आता सुचणारं उदात्तिकरण.

पायात चप्पल नाही, आखीव वेणीला तेलाचं बोटं नाही अश्या अवस्थेत परकराचा ओचा खोचून दात ओठ खात तू सागरगोटे उंच उडवायचीस तेव्हा मंत्रावल्यासारखं व्ह्यायचं. वरच्यावर तू झेललेले सागरगोटे पाहावेत की दुसरया हाताने उचलेले जमिनीवरचे सागरगोटे हे कळायच्या आत डाव संपलेला असायचा. 'पहीलं दान देवाला' हे तुझं पालुपद आमच्यापैकी कुणी तरी जिंके पर्यंत सुरुच असायचं हे तेव्हा कधीच कळालं नाही.

चांदण्याच्या रात्री देवीचा गोंधळ असायचा. तेलाच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात त्या घुमणारया बाया भयंकर वाटायच्या. पोत घेऊन नाचणारा बुवा आपल्याच अंगात घुसेल या भितीने जीव थोडा थोडा व्हायचा. 'बोल बये' असं म्हणत बुवा डोळ्यासमोर पोत नाचवायचा तेव्हा मागे कधीतरी पोताच्या आचेने परकर पेटल्याची जुनी भिती तुझ्या डोळ्यात तरारुन यायची. पण 'त्येंच्या अंगात येतय' हे तुझं कातर आवाजातलं भाबडं स्पष्टीकरण ऎकून गच्च धरलेलं अंग सुटं सोडण्याची हिंमत व्हायची माझी.

मुला-मुलींचे खेळ वेगळे ही अक्कल फुटल्यावर एकदा तू भेटलीस. वाळुची रांगोळी घालून त्यात गुंजा लपवायचा खेळ खेळायचो आपण. जाताना जिंकलेल्या सारया लालभडक गुंजा माझ्या ओंजळीत रित्या केल्यास तू, तेव्हा तळहातावर निखारे ठेवल्यागत वाटलं मला. तसं बोलून दाखवलं मी तेव्हा रागारागात माझा हात वरच्यावर उधळलास. लालबुंद गुंजा वाळूभर पसरल्या. चिडके माझे वार तुझ्या हातावरचं गोंदण दिसलं तसे आपसुक थांबले. विचारलं तसं तुझ्या अश्राप डोळ्यात हिरवं चांदणं पडलं. सुनी, तुझं लग्न झालं तेव्हा आपलं जग वेगळं झालं होतं, तुझं नसणं न जाणवण्याइतकं वेगळं.

डांबराच्या सुरेख गोळी सारखे दिवस उडाले. मग उगाच तुझी आठवण आली. विचारलं तर आजी चुप, तुझी आयशी चुप. तू जाळून घेतलस असं कुणी तरी सर्वसाधारण आवाजात म्हणालं. सुनी, हाऊ कॅन यू? पेटलेल्या पोताचे प्रतिबिंब तुझ्या टपोरया डोळ्यात मावायचे नाही म्हणून शरीरभर सामावुन घेतलेस? की बाईपणाचे भोगवटे तुला सहन नाही झाले? उधळल्या गेलेल्या रक्तलाल गुंजा वेचण्या एव्हढं धैर्य माझ्यात नाही सुनी. तुझ्या साठी बिनशपथांचे हे एक साधेच अवतरण.


मीरा

तुझ्या नावाचे ऎतिहासिक संदर्भ मरुभुमीतुन उगवलेले. ललाटरेखांचा लेखाजोखा कायमच धीट गडद होत जातो निसटत जाणारया काळाच्या पार्श्वभुमीवर. पण तुझेही लग्न राजवंशात झाले तेव्हा धानाच्या राशीवर सटवाईने रांगोळी घालताना तुझी सांगड कृष्णसखी मीरेशी घातली की काय असं उगाच वाटून गेलं.

एका बुडालेल्या संस्थानाचे अवशेष कोवळ्या वयात सांभाळताना तुझे खांदे वाकले असतीलही पण चेहरयावरच्या अकाल पोक्तपणात आणि डोळ्यातुन सांडणारया चुकार अल्लड हसण्यात कधीच ते लक्षातही आलं नाही.

मरुभुमीत ऋतुचक्राचे कौतुक कमीच पण निमित्तांचे गारुड उभे करुन आपल्यापुरते फितवता येतेच त्यांनाही. मीरा, तुझे डोहाळे एखाद्या कोड्यासारखे. पिठूर कॅनव्हासचे आरसे करावेसे वाटले तुला. तुझ्या कोवळ्या वयाला आणि वाढत्या देहाला रेखाटताना रंगही अपूरे पडत होते.

आईपणाचे सोहळे डोळ्यांतुन तुडूंब वाहात असतानाच पोटातील गर्भाची परिक्षा घेतल्यागत तू सहजपणे म्हणालीस "देखना, लडकाही होगा" ही भविष्यवाणी की शक्यता की भय, सांगणं कठीण होतं. तुझ्या राणाच्या पहील्या बायकोने गर्भ निसटल्याच्या भितीने जीव दिल्याची वंदता तुझ्या कानावर आली असेल का? राजवाड्यात कुजबुजींना पंख असतात.

अघटीताच्या भितीने तुझ्या जीवघेण्या आजारपणातही अर्धवट झालेलं पोर्ट्रेट्र पुर्ण करायचा हट्ट तुझ्या राणाचा. शुभाशुभांचे इतके दांडगे संकेत जर त्यांना मिळतात तर तुझा गर्भ पोटातच खचल्याचं त्यांना कसं नाही कळालं मीरा? आणि आज तू परत उभी असतेस अपूर्ण चित्र पुर्ण करायला एक अपुरेपण घेऊन.

"डॉक्टर आले म्हणून तुमचा जीव वाचला नाही तर त्या म्हातारया दाईने बाळासोबत तुमचाही जीव धोक्यात घातलाच होता" कॅनव्हासवरचे स्ट्रोक्स नव्याने आखत चित्रकार मान खाली घालून बोलला.

"सारंच खोटं आणि बेतून आणलेलं! मला शुद्ध येण्याच्या आत माझ्याच पान्ह्यात बुडवुन मारलं त्यांनी माझं बाळ, जीव गुदमरेस्तोर. राणांच्या वंशात मुली होत नसतात हे सत्य माझ्याहुन दाईला जास्त माहीत होतं."

मीरा, राणाच्या पहील्या बायकोचे सारेच धुसर संदर्भ क्षणात स्पष्ट झाले आज. मला तुझ्या शोकाचे आणि तुला जगण्याचे गहीरे शाप.

डोळे मिटले तरी स्वतःचेच प्रतलासारखे सपाट शरीर हातांनी चाचपुन पाहाताना दिसतेस मला तू मीरा. डोळे उघडले तर आतल्या आत धसणारया वाळुच्या किल्ल्यासारखे तुझे निव्वळ शारीर अस्तित्व.

Sunday, June 1, 2008

मसाज

"खुप खुप काम केलं की काय होतं म्हाराजा?"

"दमायला होतं पण मज्जा येते बुवा"

"म्हाराजा, षडरिपुंबद्दल नाही, आपण हापिसाबद्दल बोलत आहोत. आता परत सांगा, खुप खुप हापिस केलं की काय होतं म्हाराजा?"

"बुवा, तुमी तर लाजिवलंच पार. हापिस करुन कुणाला काय मजा येते व्हय? पण त्यातुन काय कुणाची सुटका नाही बघा बुवा"

"म्हाराजा, विनु-मिनु तुमच्याच सारखे प्रपंचाच्या पापात अडकलेले. त्यांनी या हापिसाच्या व्यापातुन वेळ काढून मोक्षाच्या दिशेने कशी वाटचाल केली याची ऎका ही गोष्ट"

"जी बुवा"

"विनु-मिनु सख्खे शेजारी. आटपाट नगरात त्यांचं देवाच्या दयेने उत्तम सुरु होतं. देवासमोर जसा नंदादिप जळत असतो तसे ते हापिसात जळायचे. त्याला आंग्लभाषेत बर्नाआऊट म्हणतात. दिव्यातलं तेल जसं कमी झालं तसं त्यांनी देव-भुमीला सहल काढायची ठरवली."

"बुवा , म्हन्जे स्वर्गात?"

"म्हाराजा, काय हे अज्ञान...तुम्ही सुखी होण्याची पहीली पायरी म्हणून जरा टीव्ही पाहात चला म्हाराजा. टिव्ही पाहाताना डोळे दिपून जातात. डोकं कसं सुन्न होऊन जातं. खाण्यापिण्याची शुद्ध राहात नाही. मन उन्मन अवस्थेत जातं. त्या परमेश्वराशी भेट होण्याची हीच ती पहीली पायरी म्हाराजा. तर या महानुभव टिव्ही वर हिंदोस्ता का दिल देखो सारख्या राष्ट्रभक्ती चेतवणारया जाहिराती येतात. त्यातुन तुम्हाला कळेल की देव-भुमी म्हणजे दक्षिणेकडचं केरळ नावाचं एक राज्य. निसर्गानं दिलदारपणे तिथे सौंदर्य उधळलं आहे."

"बुवा रंगात आले जनु"

"अरे अज्ञ बालकांनो मी तिथला समुद्र, झाडं, मंदिरं यांच्या बद्दल बोलत आहे. तर मी सांगत होतो की विनु-मिनुनं केरळात जायचं ठरवलं. केरळ म्हंजे काय सांगायचं म्हाराजा"

"काय तरी सांगाच बुवा"

"केरळ म्हंजे नारळाची कंचं झाडं, उलटा फिरणारा समुद्र, रंगांचे नैवेद्य दाखवलेल्या रानफुलांचं गाव"

"वा बुवा! लयी मजा येतं असलं नव्हं? पण मुद्द्याचं बोला की. त्ये विनु-मिनुला नंदा का काय म्हणालात त्या दिव्यात घालायला तेल मिळालं का तिथं? नाही, तुम्ही म्हटलात तिथं नारळाची झाडं आहेत म्हंजे खोबरेल तेल तर मिळालंच असेन नव्हं?"

"म्हाराजा, तुमचा हाच भोळेपणा देवाला आवडत असणार बघा. पण तुम्ही खरं बोललात. केरळात पाय टाकल्यापासून विनु-मिनुला सगळीकडे तेल-मसाजच्या जाहिराती दिसत होत्या. तन-मनात चैतन्य जागवणारा तेल-मसाज!"

"बुवा, आपला सदु-सलूनवाला पन तर करतो मालिश. त्येच्यासाठी त्ये तिक्डं पार देवाच्या भुमी पर्यंत कशाला जायचं?"

"अविश्वास करतो सत्यानाश म्हाराजा. मालिश आणि मसाज यात जमिन-अस्मानाचा फरक असतो. विनु-मिनुला मसाजच्या जाहिराती दिसत होत्या, चंपी-मालिशच्या नव्हे. सुंदर स्त्री-पुरुष पाठमोरे झोपले आहेत, अंगावर वस्त्र केवळ लज्जा रक्षणापुरतंच आणि अप्सरागत दिसणारया केरळी सुंदरया पाठीवर पंचकर्म तेल आणि धृताच्या धारा लावून मर्दन करताहेत. म्हाराजा, इंद्रदेवाच्या दरबारात याहून वेगळं काय घडत असणार?"

"बुवा, कारळला कसं जायचं व्हो?"

"भावना आणि जीभ आवरा म्हाराजा. विनु-मिनु लग्नाळलेले होते."

"अरारारा. एव्हढा सोन्यासारखा चानस आलेला घालवलाच म्हनायचा बुवा"

"विनु-मिनुनं मसाज तर करुन घ्यायचा ठरवला पण बाबाच्या हातनं. बाबा परम ज्ञानी, आयुर्वेद, मसाज यात तज्ञ. बाबांनीच तसं सांगीतलं होतं विनु-मिनुला. मसाजच्या आदल्या रात्री हलका आहार करुन विनु-मिनु शांतपणे झोपी गेले. भल्या पहाटेच बाबांनी त्यांना आवाज देऊन उठवलं. म्हाराजा, ह्याला म्हणतात त्याग. सुट्टीत पहाटे उठायचं म्हणजे काय चेष्टा आहे कां? पण ध्येयावर डोळा ठेवला की असाध्य ते साध्य होतं म्हाराजा."

"बुवा, लांबड नका की लावु"

"अरे हो हो. पहाटेच्या अंधारात विनु आणि मिनु स्वतंत्रपणे बाबांना भेटले. मसाजची खोली तेल-धुपाच्या वासाने भारली होती. एक मोठ्या लाकडी ढलपीचा पलंग केला होता. तेल पिवून पिवून त्याच्या अंगाला तकाकी आली होती. कोपरयात एका बंबात पाणी उकळत होतं. विनु/मिनु विस्फारलेल्या डोळ्यांनी ते दृष्य बघत असतानाच बाबा तिथे आले. बाबांनी फक्त लुंगी गुंडाळलेली होती. बाबांनी विनुला सगळे कपडे काढून ठेवायला संगीतले आणि अंगाभोवती गुंडाळायला एक वस्त्र दिले. विनु बाबांसमोर ते वस्त्र नाचवित म्हणाला "बाबा, या वस्त्राने दुसरे काहीही झाकणे शक्य नाही. या चिंधीने तुमचे डोळे झाकायचे आहेत का?" म्हाराजा काय प्रसंग होता बघा. आत्म्याला वस्त्राची गरज नसते. वस्त्राची गरज या मर्त्य शरीराला असते. पण हे विनु-मिनु तुमच्याच सारखे प्रपंचात अडकलेले"

"हाव बुवा. पण फुडं काय झालं?"

"बाबा विनुला म्हणाले, "मुला, याला लंगोट म्हणतात आणि हे वस्त्र कटी भोवती गुंडाळतात" म्हाराजा, काय बिकट प्रसंग होता बघा. विनु-मिनुला त्या वेळी द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट आठवली असणार. पण इथलं वस्त्रहरण पैसे देऊन त्यांनी पदरी पाडून घेतलं होतं. कटीभोवती लंगोट नावाचं ते साजिरं वस्त्र लेवून विनु-मिनु त्या लाकडी ढलप्यावर शयनस्थ झाले. बाबांनी तिळाच्या तेलाने त्यांचे मर्दन सुरु केले. मसाज करत करत बाबाचे हात विनु-मिनुच्या शरीरावरुन ज्या सढळपणे फिरत होते ते पाहून विनु-मिनुला मसाजसाठी बाई ऎवजी बुवा निवडल्याचा काय थोर आनंद झाला म्हणून सांगु म्हाराजा. तास-दीडतास हा मसाज सुरु होता पण विनु-मिनुचे गात्रात चैत्र काही फुलत नव्हता. त्यांच्या पुण्यनगरीतला सलूनवाला लाल रंगाचं तेल लावून जे मालिश करायचा त्याने सुद्धा याहून जास्त हलकं वाटायचं"

"म्हंजे पैशे गेले म्हनायचे का वाया बुवा?"

"हाच प्रश्न त्यांनी बाबाला विचारला म्हाराजा. तर बाबा म्हणाले की हा आयुर्वेदिक मसाज आहे. तुमचं विमान दोन-तीन दिवसांनी हवेत उडेल. म्हाराजा, विनु-मिनुचं विमान प्रत्यक्षात हवेत उडालं पण बाबा म्हणाला होता तसा मसाजने त्यांचं चैतन्य वापस नाही आलं"

"वा बुवा! इतका गुळ काढलात राव पण हा असला सप्पक शेपू शेवट? ट्रेलरमधी एक आन शिणेमात वेगळं असंच झालं हे"

Wednesday, May 28, 2008

मोरल ऑफ द स्टोरी?

मॅन्चेस्टरच्या एका शांत कोपरयात त्याहूनही शांत असं ते छोटंस रेस्तॉंरॉ होतं. वेगात बुडणारया ब्रिटीश परंपरेच्या शेवटच्या अवशेषांपैकी एक. रेस्तॉंरॉचं नाव टी-क्लब असलं तरी चार रिकामटेकडी म्हातारी सोडली तर तिथे क्वचितच कुणी दिसायचं. अर्थात कुणी यावं असं तिथं काही नव्हतंच. सजावटीच्या नावाखाली कधी काळी तेलपाणी झालेलं जुनाट लाकडी छत, त्यावर कोरलेली रेशीम काढण्याच्या मॅन्चेस्टरच्या जुन्या प्रथेची आताच अर्वाचिन भासणारी चित्रं, पायाखाली करकरणारं लाकडी फ्लोरिंग आणि टेबलावर छोट्या चौकानाचौकानांचं डिजाईन असणारं टेबलक्लॉथ या पलीकडे तिथे आणखी काही ही नव्हतं. पेप्सी, कोक, कॉफी, बर्गरवर वाढणारया नव्या पिढीला तिथे मिळणारया कुकीज आणि चहात कणभरही स्वारस्य नव्हतं. किंचित बहीरा, बराचसा विक्षिप्त आणि अस्सल शिष्ट इंग्रज म्हातारा तो टी-क्लब चालवायचा. दिवसभरात मोजून १५-२० लोक तिथे यायचे तरी म्हातारयाचं बरं चालायचं. आलेल्या लोकांना न हसता अभिवादन करण्याचा त्याचा रोजचा शिरस्ता मोडायचा तो फक्त महीन्याच्या शेवटच्या रविवारी जेव्हा त्या चार व्यक्ती एकत्र यायच्या तेव्हाच. त्याला कारणही तसंच होतं. ती चारही टाळकी अस्सल ब्रिटीश वागणुकीची होती. त्यांचे रविवारचे कपडे, आल्या आल्या हॅट काढून ठेवण्याची खानदानी रीत, चिरुटांच्या धुराड्यातून तासंतास त्यांचं ते पेशन्स खेळणं आणि जाताना घसघशीत टीप..सारंच कसं खानदानी होतं. म्हातारा त्यांना कुणाचा त्रास नको म्हणून कोपरयातला एक टेबल खास त्यांच्यासाठी राखून ठेवायचा. म्हणजे रिकाम्या रेस्तॉंरॉमधे एकाच टेबलावर "रिजर्व्ड" अशी पाटी ठेवून द्यायचा!

त्या रविवारी, कोण जाणे कसा, पण म्हातारा कोपरयाताला तो टेबल रिजर्व्ह करायचा विसरला आणि नेमका त्याच टेबलवर एक पोरगेलासा तरुण येऊन बसला. आल्या आल्या त्या पोराने कुकीजचा आख्खा डबाच उचलला आणि कीप द चेंजच्या उर्मट स्वरात म्हातारयाच्या कपाळावरच्या आठ्या विरुन गेल्या. पण जवळजवळ एकाच वेळी त्या रेस्तॉंरॉमधे आलेल्या त्या चौघांच्या डोक्यात तो पोरगा एकदमच गेला. कुणी काही म्हणायच्या आतच तो पोरगा जागेवरुन उठून त्यांच्या जवळ आला. "हाय" बाटग्या अमेरिकन इंग्रजीत त्याने त्याचं नाव सांगीतलं 'माझं नाव डेव्हीड. बॉसने पाठवलय मला"

चौघांचाही त्यावर विश्वास बसणं शक्य नव्हतं. आत्ता पर्यंत बॉसनं त्या चौघांव्यतिरीक्त कुणालाच काम सांगीतलं नव्हतं. पण त्याच वेळी बॉसच्या शब्दावर अविश्वास दाखवण्याचं धाडसही त्यांच्यात नव्हतं.

रुडी, विल्यम, डेव्ह आणि चॅंग, सगळ्यांनी डेव्हीडला अपादमस्तक न्याहाळलं. जेमतेम तिशीत असणारा अट्टल अमेरिकन दिसत होता तो. बॉसनं त्यात काय पाहीलं हे त्या चौघांना अजूनही उमगत नव्हतं.

"आम्ही इथे जमून काय करतो याची काही कल्पना?" रुडीनं सावधपणे विचारलं. "तुम्ही इथे जमून बहूदा नेहमीच चहा घेता. पण मी कॉफी घेईन" डेव्हीडनं गंभीरपणे उत्तर दिलं पण त्याला ते बेअरिंग फार वेळ घेता आलं नाही आणि तो हसत सुटला. चॅंगनं त्याचे मिचमिचे डोळे अजूनच बारीक करुन त्याच्या कडे रोखून पाहीलं. "कालच टरबुजासारखं फटकन एकाचं डोकं फुटताना बघितलय मी. तुझ्याच वयाचा होता आणि अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत अस्साच हसत होता, तुझ्यासारखा" भावनाहीन आवाजात चॅंग डेव्हीडला डोळ्यांनी तोलत बोलला. "चॅंगकाका, तुमचा चुकून धक्का लागला असेल नां त्याला?" डेव्हीडच्या आवाजात अजूनही मिश्कीलपणा होता. "ओके, ओके" विल्यमनं समजुतीच्या स्वरात तडजोड केली "डेव्हीड, जरा स्पष्ट बोलुया का आपण?" "अर्थात, विल्यम. नक्की काय सुरु आहे हेच मला समजुन घ्यायचं आहे. आपण चहा घेत बोललो तर चालेल नां?" डेव्हीडचा स्वर आता अगदी सहज येत होता. कुणी हो/नाही म्हणायच्या आधी डेव्हीड चहा आणायला गेला सुद्धा, खास अमेरिकन घाणेरडी पद्धत, सेल्फ-सर्व्हिस!

हवेतला गारठा वाढला होता. बाहेर कदाचित बर्फ भुरकत होता. चहा आणता आणत डेव्हीडनं रेस्तॉंरॉचं दार लोटलं तेव्हढ्यानं सुद्धा वातावरणात उब आली.

"येस विल्यम" डेव्हीड खुर्ची ओढत म्हणाला "मी एक व्यावसाईक-शुटर आहे. अचानक मला एक दिवस फोन येतो, समोरचा माणूस त्याची ओळख, फक्त बॉस, एव्ह्ढीच देतो आणि मी आत्तापर्यंत ऎकले नसतील एव्हढे पैसे मला देऊ करतो. बदल्यात काय करायचं? मला माहीत नाही. बॉस कोण? मला माहीत नाही. पैसे घेऊन काम करत असलो तरी मी खुनी नाही. एक असा माणूस ज्याला इच्छा असूनही समोरच्याला मारता येत नाही, भितीमुळे म्हण किंवा अजून काही अडचणीमुळे, त्याला मी फक्त मदत करतो. माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ त्यात नसतो. अश्या सगळ्या परिस्थितीत हा न दिसणारा बॉस मला फोन करुन या भिकारचोट जागी तुम्हाला भेटायला पाठवतो. मी यातून काय समजायचं?"

"मी डेव्ह" डेव्हनं सुरुवात केली "तू समजतोस तसे आम्ही खुनी नाहीत. किंवा तुझ्यासारखं कुठल्या अडचणीतल्या माणसाला मदत म्हणून सुद्धा आम्ही कुणाचा खुन करत नाही. आम्ही एक एस.पी.जी. आहोत; स्पेशल पर्पज ग्रुप. तुला कदाचित माहीत नसेल पण हल्ली या भागात दहशतवाद्यांचा भयंकर सुळसुळाट झालाय. कायद्याच्या चौकटीत ही कीड आपण साफ करु शकत नाही म्हणून रॉयल ब्रिटीश इन्व्हेस्टीगेशन एजन्सीनं हे काम आमच्यावर सोपवलय. त्यांचाच एक माणूस, बॉस, ज्याला आम्ही पण पाहीलं नाही, आमच्याशी बोलतो आणि त्याच्या सांगण्यावरुन आम्ही आमची कामं करतो. आम्ही सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलो आहोत आणि आमची वयं आणि कार्यक्षेत्रं अशी आहेत की आमच्यावर कुणी संशय घेणार नाही. केवळ देशासाठी म्हणून आम्ही एकत्र येऊन हे काम करतोय"

"ओहो, सगळी देशभक्तांचीच टोळी म्हणायची ही!" डेव्हीड नाक खाजवत बोलला "इथे येण्याआधी तुमच्या कुंडल्या मी वाचल्या आहेत. चॅंगचं आयुष्य चिनी वस्तीत मारामारी करण्यात गेलय. रुडी बेकायदेशीर हत्यारं विकण्यासाठी अनेक वेळा जेलमधे गेलाय. विल्यमनं पावडरी विकणे ते भडवेगिरी असे सगळे उद्योग करुन पाहीलेत आणि तू, डेव्ह, तुझ्या बद्दल मला फार माहीती नाही पण ज्या अर्थी तू यांच्या सोबत आहेस, तू काही फार वेगळं करत असशील असं मला वाटत नाही. पण आता तुमच्यांच सारखं मलाही देशासाठी काही करावं वाटतय, विशेषतः इतके पैसे मिळत असतिल तर नक्कीच."

"ओके" रुडीनं हात वर करत पांढरा बावटा फडकवला "मान्य, आम्ही काही हिरो नाहीत पण आम्हाला असं वाटतं की ही कामं करुन आम्ही देशाची मदत करतो आहोत."

"हो नां" चॅंगचे डोळे बोलताना चमकत होते "नाही तर कुणाला नुस्त्या हातांनी मारताना मजा थोडीच येते?"

"हिंसेचं तत्वज्ञान करताय तुम्ही लोक!" डेव्हीडनं बेफिकीरपणे खांदे उडवले "पण हल्ली तुमचे नेम चुकताहेत. तुमचे प्लॅन फसताहेत. देशाच्या शत्रुचा गळा आवळताना तुमचे हात थरथर कापताहेत. तुमच्या चालण्यातुन, वागण्या-बोलण्यातुन तुमचं वय दिसतय. आणि म्हणूनच मला बॉसनं आज इथे पाठवलय, त्याचा निरोप घेऊन."

डेव्हीड ताडकन त्याच्या खुर्चीवरुन उठला. रुडी आणि गॅन्गच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह वाचत तो मजेनं म्हणाला "तुमच्या चहात एक जहाल विष टाकलय मी. खरं नाही वाटणार पण हळुह्ळु तुमची मज्जासंस्था निकामी होईल. चॅंग, उठायचा प्रयत्न करायच्या आधी तुझ्या हाताची बोटं बघं लख्खं निळी पडलीत ती. माझा गळा आवळण्याइतपत शक्ती नाही उरली तुझ्यात आता"

चॅंग तरीही धडपडत उठला पण तोल जाऊन टेबलावरच पडला. काही तरी गडबड सुरु आहे हे लक्षात येऊन रेस्तॉंरॉंचा म्हातारा जमेल तेव्ह्ढ्या लगबगीनं त्यांच्या टेबलकडे येत होता. डेव्हीडनं अचानकच म्हातारयाच्या खांद्यावर हात दाबला आणि रिकाम्या खुर्चीत त्याला कोंबला. "बॉस" त्याच्या कानाशी लागून डेव्हीड आदबीनं मवाळ आवाजात म्हणाला "तुम्ही सांगीतल्यासारखी ही म्हातारी बिनकामी खोंडं आपण निवृत्त करतो आहोत." रुडी, विल्यम, डेव्ह आणि चॅंगच्या डोळ्यात बॉसला भेटल्याचं कुतुहल होतं की मरणाचे गंध, सांगणं कठीण होतं. म्हातारयाचा चेहरा कोरडा होता. "ओके. पण हे काम इथेच करणं आवश्यक होतं का? उद्या नवी माणसं नेमायची झाली तर हीच जागा वापरायची आहे आपल्याला. माझा बॉस पोलीसांच्या कटकटीपासून वाचवेल आपल्याला पण ही घाण आता साफ कोण करेल?" म्हातारा तोलून मापून बोलत होता.

"बॉस" डेव्हीड अजूनही म्हातारयाच्या मागे उभा राहून मान खाली घालून बोलत होता "आपण हे काम थांबवतोय. रॉयल ब्रिटीश इन्व्हेस्टीगेशन एजन्सीनं तसं सांगीतलय मला. मानवी हक्कवाली मंडळी आपल्या मागे हात धुवून लागली आहेत"

"असं कसं थांबवु शकतात ते? कायद्याच्या चौकटीत राहून हा देश साफ कसा करणार आपण? मला बॉसशी बोललच पाहीजे" म्हातारा तावातावाने उठतच होता की "मग बोला नां" डेव्हीडचा अस्सल ब्रिटीश स्वर घुमला. म्हातारया समोर खुर्ची ओढत डेव्हीडनं शांत पणे छोटं पिस्तुल काढलं. "तुला मी किती वेळा सांगीतल होत की ही जोखमीची काम, भरवश्याच्या माणसांना दे. पण तू तुझ्या भुक्कड रेस्तॉंरॉंमधे येणारया त्याहूनही भुक्कड माणसांकडे ही काम दिलीस." बोलता बोलता डेव्हीडनं हलकेच रुडीच्या गालावर चापट मारली "आणि सगळं मिशन बर्बाद केलसं. म्हणून आम्ही हे मिशन आणि त्यावर काम करणारी मंडळी ऍबॉर्ट करत आहोत"

डेव्हीडनं म्हातारयाच्या कानशीलावर पिस्तुल लावलं आणि 'फट' असा छोटा आवाज झाला. जाता जाता त्यानं थोडीशी धुगधुगी असणारया डेव्हकडे बघून मजेत डोळा मारला "म्हटलं होतं नां, मलाही देशासाठी काही तरी करावं वाटतं म्हणून!"

सरकार अदृष्य तरीही सर्वत्र
सरकार शासक आणि अट्टल गुंड
सरकार अपंरपार शांतता आणि अदभुत हिंसा
सरकार साकार आणि निराकार
सरकार माणसाहूनही माणूस आणि डोळ्यात दाटलेला गच्च परमेश्वर