Thursday, June 19, 2008

पानांवर प्राण पखाली

पानांवर प्राण पखाली
शपथांचे नवे बहाणे
पाऊस कधीचा पडतो
उठवित निजली राने

या गावामध्ये असतील
चैतन्य भारले रावे
रक्ताला फुटणारे पण
गाणे कोणी गावे

पाऊस चिंब भिजलेला
गारांचा फसवा तिड धा
श्वासात तुझ्या भासांनी
विस्कटलेली राधा

तो मदमत्त मातीचा गंध
ते ओले गुणगुण पाते
हातातून क्षितीज हातांचे
पारयागत निसटुनी जाते

तू ये नां श्रावण बनूनी
झुलव्यांचा बहर कुणाला
हिरव्या गवतावर माझा
बघ श्वास मोडूनी गेला

Tuesday, June 10, 2008

ओ सुनी ओ मीरा

सुनी

मेंदुचे तळ ढवळले की हरवलेली माणसेही मिळतात हे माझे साधे गणित. तू आठवणींच्या कोणत्याही कप्प्यात नाहीस याची खात्री होत असतानाच हाक दिल्यासारखी तू भुतकाळातुन हळुच डोकावलीस सुनी आणि संभ्रमाची पिशाच्चे झाली. जशी तू, तश्याच तुझ्या आठवणीही मुकाट सोशीक.

सुनी, दिसायचीस तेव्हा कायमच काम करत असायचीस तू आणि विश्रांती म्हणून तुझ्या भावांना सांभाळायचीस फावल्या वेळात. आम्हाला खेळात एक गडी कमी पडला की तुझ्या साठी तुझ्या आयशीशी भांडायचो आम्ही म्हणून तुझी तात्कालिक सुटका आणि आमच्या ससंदर्भ स्वार्थाचं आता सुचणारं उदात्तिकरण.

पायात चप्पल नाही, आखीव वेणीला तेलाचं बोटं नाही अश्या अवस्थेत परकराचा ओचा खोचून दात ओठ खात तू सागरगोटे उंच उडवायचीस तेव्हा मंत्रावल्यासारखं व्ह्यायचं. वरच्यावर तू झेललेले सागरगोटे पाहावेत की दुसरया हाताने उचलेले जमिनीवरचे सागरगोटे हे कळायच्या आत डाव संपलेला असायचा. 'पहीलं दान देवाला' हे तुझं पालुपद आमच्यापैकी कुणी तरी जिंके पर्यंत सुरुच असायचं हे तेव्हा कधीच कळालं नाही.

चांदण्याच्या रात्री देवीचा गोंधळ असायचा. तेलाच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात त्या घुमणारया बाया भयंकर वाटायच्या. पोत घेऊन नाचणारा बुवा आपल्याच अंगात घुसेल या भितीने जीव थोडा थोडा व्हायचा. 'बोल बये' असं म्हणत बुवा डोळ्यासमोर पोत नाचवायचा तेव्हा मागे कधीतरी पोताच्या आचेने परकर पेटल्याची जुनी भिती तुझ्या डोळ्यात तरारुन यायची. पण 'त्येंच्या अंगात येतय' हे तुझं कातर आवाजातलं भाबडं स्पष्टीकरण ऎकून गच्च धरलेलं अंग सुटं सोडण्याची हिंमत व्हायची माझी.

मुला-मुलींचे खेळ वेगळे ही अक्कल फुटल्यावर एकदा तू भेटलीस. वाळुची रांगोळी घालून त्यात गुंजा लपवायचा खेळ खेळायचो आपण. जाताना जिंकलेल्या सारया लालभडक गुंजा माझ्या ओंजळीत रित्या केल्यास तू, तेव्हा तळहातावर निखारे ठेवल्यागत वाटलं मला. तसं बोलून दाखवलं मी तेव्हा रागारागात माझा हात वरच्यावर उधळलास. लालबुंद गुंजा वाळूभर पसरल्या. चिडके माझे वार तुझ्या हातावरचं गोंदण दिसलं तसे आपसुक थांबले. विचारलं तसं तुझ्या अश्राप डोळ्यात हिरवं चांदणं पडलं. सुनी, तुझं लग्न झालं तेव्हा आपलं जग वेगळं झालं होतं, तुझं नसणं न जाणवण्याइतकं वेगळं.

डांबराच्या सुरेख गोळी सारखे दिवस उडाले. मग उगाच तुझी आठवण आली. विचारलं तर आजी चुप, तुझी आयशी चुप. तू जाळून घेतलस असं कुणी तरी सर्वसाधारण आवाजात म्हणालं. सुनी, हाऊ कॅन यू? पेटलेल्या पोताचे प्रतिबिंब तुझ्या टपोरया डोळ्यात मावायचे नाही म्हणून शरीरभर सामावुन घेतलेस? की बाईपणाचे भोगवटे तुला सहन नाही झाले? उधळल्या गेलेल्या रक्तलाल गुंजा वेचण्या एव्हढं धैर्य माझ्यात नाही सुनी. तुझ्या साठी बिनशपथांचे हे एक साधेच अवतरण.


मीरा

तुझ्या नावाचे ऎतिहासिक संदर्भ मरुभुमीतुन उगवलेले. ललाटरेखांचा लेखाजोखा कायमच धीट गडद होत जातो निसटत जाणारया काळाच्या पार्श्वभुमीवर. पण तुझेही लग्न राजवंशात झाले तेव्हा धानाच्या राशीवर सटवाईने रांगोळी घालताना तुझी सांगड कृष्णसखी मीरेशी घातली की काय असं उगाच वाटून गेलं.

एका बुडालेल्या संस्थानाचे अवशेष कोवळ्या वयात सांभाळताना तुझे खांदे वाकले असतीलही पण चेहरयावरच्या अकाल पोक्तपणात आणि डोळ्यातुन सांडणारया चुकार अल्लड हसण्यात कधीच ते लक्षातही आलं नाही.

मरुभुमीत ऋतुचक्राचे कौतुक कमीच पण निमित्तांचे गारुड उभे करुन आपल्यापुरते फितवता येतेच त्यांनाही. मीरा, तुझे डोहाळे एखाद्या कोड्यासारखे. पिठूर कॅनव्हासचे आरसे करावेसे वाटले तुला. तुझ्या कोवळ्या वयाला आणि वाढत्या देहाला रेखाटताना रंगही अपूरे पडत होते.

आईपणाचे सोहळे डोळ्यांतुन तुडूंब वाहात असतानाच पोटातील गर्भाची परिक्षा घेतल्यागत तू सहजपणे म्हणालीस "देखना, लडकाही होगा" ही भविष्यवाणी की शक्यता की भय, सांगणं कठीण होतं. तुझ्या राणाच्या पहील्या बायकोने गर्भ निसटल्याच्या भितीने जीव दिल्याची वंदता तुझ्या कानावर आली असेल का? राजवाड्यात कुजबुजींना पंख असतात.

अघटीताच्या भितीने तुझ्या जीवघेण्या आजारपणातही अर्धवट झालेलं पोर्ट्रेट्र पुर्ण करायचा हट्ट तुझ्या राणाचा. शुभाशुभांचे इतके दांडगे संकेत जर त्यांना मिळतात तर तुझा गर्भ पोटातच खचल्याचं त्यांना कसं नाही कळालं मीरा? आणि आज तू परत उभी असतेस अपूर्ण चित्र पुर्ण करायला एक अपुरेपण घेऊन.

"डॉक्टर आले म्हणून तुमचा जीव वाचला नाही तर त्या म्हातारया दाईने बाळासोबत तुमचाही जीव धोक्यात घातलाच होता" कॅनव्हासवरचे स्ट्रोक्स नव्याने आखत चित्रकार मान खाली घालून बोलला.

"सारंच खोटं आणि बेतून आणलेलं! मला शुद्ध येण्याच्या आत माझ्याच पान्ह्यात बुडवुन मारलं त्यांनी माझं बाळ, जीव गुदमरेस्तोर. राणांच्या वंशात मुली होत नसतात हे सत्य माझ्याहुन दाईला जास्त माहीत होतं."

मीरा, राणाच्या पहील्या बायकोचे सारेच धुसर संदर्भ क्षणात स्पष्ट झाले आज. मला तुझ्या शोकाचे आणि तुला जगण्याचे गहीरे शाप.

डोळे मिटले तरी स्वतःचेच प्रतलासारखे सपाट शरीर हातांनी चाचपुन पाहाताना दिसतेस मला तू मीरा. डोळे उघडले तर आतल्या आत धसणारया वाळुच्या किल्ल्यासारखे तुझे निव्वळ शारीर अस्तित्व.

Sunday, June 1, 2008

मसाज

"खुप खुप काम केलं की काय होतं म्हाराजा?"

"दमायला होतं पण मज्जा येते बुवा"

"म्हाराजा, षडरिपुंबद्दल नाही, आपण हापिसाबद्दल बोलत आहोत. आता परत सांगा, खुप खुप हापिस केलं की काय होतं म्हाराजा?"

"बुवा, तुमी तर लाजिवलंच पार. हापिस करुन कुणाला काय मजा येते व्हय? पण त्यातुन काय कुणाची सुटका नाही बघा बुवा"

"म्हाराजा, विनु-मिनु तुमच्याच सारखे प्रपंचाच्या पापात अडकलेले. त्यांनी या हापिसाच्या व्यापातुन वेळ काढून मोक्षाच्या दिशेने कशी वाटचाल केली याची ऎका ही गोष्ट"

"जी बुवा"

"विनु-मिनु सख्खे शेजारी. आटपाट नगरात त्यांचं देवाच्या दयेने उत्तम सुरु होतं. देवासमोर जसा नंदादिप जळत असतो तसे ते हापिसात जळायचे. त्याला आंग्लभाषेत बर्नाआऊट म्हणतात. दिव्यातलं तेल जसं कमी झालं तसं त्यांनी देव-भुमीला सहल काढायची ठरवली."

"बुवा , म्हन्जे स्वर्गात?"

"म्हाराजा, काय हे अज्ञान...तुम्ही सुखी होण्याची पहीली पायरी म्हणून जरा टीव्ही पाहात चला म्हाराजा. टिव्ही पाहाताना डोळे दिपून जातात. डोकं कसं सुन्न होऊन जातं. खाण्यापिण्याची शुद्ध राहात नाही. मन उन्मन अवस्थेत जातं. त्या परमेश्वराशी भेट होण्याची हीच ती पहीली पायरी म्हाराजा. तर या महानुभव टिव्ही वर हिंदोस्ता का दिल देखो सारख्या राष्ट्रभक्ती चेतवणारया जाहिराती येतात. त्यातुन तुम्हाला कळेल की देव-भुमी म्हणजे दक्षिणेकडचं केरळ नावाचं एक राज्य. निसर्गानं दिलदारपणे तिथे सौंदर्य उधळलं आहे."

"बुवा रंगात आले जनु"

"अरे अज्ञ बालकांनो मी तिथला समुद्र, झाडं, मंदिरं यांच्या बद्दल बोलत आहे. तर मी सांगत होतो की विनु-मिनुनं केरळात जायचं ठरवलं. केरळ म्हंजे काय सांगायचं म्हाराजा"

"काय तरी सांगाच बुवा"

"केरळ म्हंजे नारळाची कंचं झाडं, उलटा फिरणारा समुद्र, रंगांचे नैवेद्य दाखवलेल्या रानफुलांचं गाव"

"वा बुवा! लयी मजा येतं असलं नव्हं? पण मुद्द्याचं बोला की. त्ये विनु-मिनुला नंदा का काय म्हणालात त्या दिव्यात घालायला तेल मिळालं का तिथं? नाही, तुम्ही म्हटलात तिथं नारळाची झाडं आहेत म्हंजे खोबरेल तेल तर मिळालंच असेन नव्हं?"

"म्हाराजा, तुमचा हाच भोळेपणा देवाला आवडत असणार बघा. पण तुम्ही खरं बोललात. केरळात पाय टाकल्यापासून विनु-मिनुला सगळीकडे तेल-मसाजच्या जाहिराती दिसत होत्या. तन-मनात चैतन्य जागवणारा तेल-मसाज!"

"बुवा, आपला सदु-सलूनवाला पन तर करतो मालिश. त्येच्यासाठी त्ये तिक्डं पार देवाच्या भुमी पर्यंत कशाला जायचं?"

"अविश्वास करतो सत्यानाश म्हाराजा. मालिश आणि मसाज यात जमिन-अस्मानाचा फरक असतो. विनु-मिनुला मसाजच्या जाहिराती दिसत होत्या, चंपी-मालिशच्या नव्हे. सुंदर स्त्री-पुरुष पाठमोरे झोपले आहेत, अंगावर वस्त्र केवळ लज्जा रक्षणापुरतंच आणि अप्सरागत दिसणारया केरळी सुंदरया पाठीवर पंचकर्म तेल आणि धृताच्या धारा लावून मर्दन करताहेत. म्हाराजा, इंद्रदेवाच्या दरबारात याहून वेगळं काय घडत असणार?"

"बुवा, कारळला कसं जायचं व्हो?"

"भावना आणि जीभ आवरा म्हाराजा. विनु-मिनु लग्नाळलेले होते."

"अरारारा. एव्हढा सोन्यासारखा चानस आलेला घालवलाच म्हनायचा बुवा"

"विनु-मिनुनं मसाज तर करुन घ्यायचा ठरवला पण बाबाच्या हातनं. बाबा परम ज्ञानी, आयुर्वेद, मसाज यात तज्ञ. बाबांनीच तसं सांगीतलं होतं विनु-मिनुला. मसाजच्या आदल्या रात्री हलका आहार करुन विनु-मिनु शांतपणे झोपी गेले. भल्या पहाटेच बाबांनी त्यांना आवाज देऊन उठवलं. म्हाराजा, ह्याला म्हणतात त्याग. सुट्टीत पहाटे उठायचं म्हणजे काय चेष्टा आहे कां? पण ध्येयावर डोळा ठेवला की असाध्य ते साध्य होतं म्हाराजा."

"बुवा, लांबड नका की लावु"

"अरे हो हो. पहाटेच्या अंधारात विनु आणि मिनु स्वतंत्रपणे बाबांना भेटले. मसाजची खोली तेल-धुपाच्या वासाने भारली होती. एक मोठ्या लाकडी ढलपीचा पलंग केला होता. तेल पिवून पिवून त्याच्या अंगाला तकाकी आली होती. कोपरयात एका बंबात पाणी उकळत होतं. विनु/मिनु विस्फारलेल्या डोळ्यांनी ते दृष्य बघत असतानाच बाबा तिथे आले. बाबांनी फक्त लुंगी गुंडाळलेली होती. बाबांनी विनुला सगळे कपडे काढून ठेवायला संगीतले आणि अंगाभोवती गुंडाळायला एक वस्त्र दिले. विनु बाबांसमोर ते वस्त्र नाचवित म्हणाला "बाबा, या वस्त्राने दुसरे काहीही झाकणे शक्य नाही. या चिंधीने तुमचे डोळे झाकायचे आहेत का?" म्हाराजा काय प्रसंग होता बघा. आत्म्याला वस्त्राची गरज नसते. वस्त्राची गरज या मर्त्य शरीराला असते. पण हे विनु-मिनु तुमच्याच सारखे प्रपंचात अडकलेले"

"हाव बुवा. पण फुडं काय झालं?"

"बाबा विनुला म्हणाले, "मुला, याला लंगोट म्हणतात आणि हे वस्त्र कटी भोवती गुंडाळतात" म्हाराजा, काय बिकट प्रसंग होता बघा. विनु-मिनुला त्या वेळी द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट आठवली असणार. पण इथलं वस्त्रहरण पैसे देऊन त्यांनी पदरी पाडून घेतलं होतं. कटीभोवती लंगोट नावाचं ते साजिरं वस्त्र लेवून विनु-मिनु त्या लाकडी ढलप्यावर शयनस्थ झाले. बाबांनी तिळाच्या तेलाने त्यांचे मर्दन सुरु केले. मसाज करत करत बाबाचे हात विनु-मिनुच्या शरीरावरुन ज्या सढळपणे फिरत होते ते पाहून विनु-मिनुला मसाजसाठी बाई ऎवजी बुवा निवडल्याचा काय थोर आनंद झाला म्हणून सांगु म्हाराजा. तास-दीडतास हा मसाज सुरु होता पण विनु-मिनुचे गात्रात चैत्र काही फुलत नव्हता. त्यांच्या पुण्यनगरीतला सलूनवाला लाल रंगाचं तेल लावून जे मालिश करायचा त्याने सुद्धा याहून जास्त हलकं वाटायचं"

"म्हंजे पैशे गेले म्हनायचे का वाया बुवा?"

"हाच प्रश्न त्यांनी बाबाला विचारला म्हाराजा. तर बाबा म्हणाले की हा आयुर्वेदिक मसाज आहे. तुमचं विमान दोन-तीन दिवसांनी हवेत उडेल. म्हाराजा, विनु-मिनुचं विमान प्रत्यक्षात हवेत उडालं पण बाबा म्हणाला होता तसा मसाजने त्यांचं चैतन्य वापस नाही आलं"

"वा बुवा! इतका गुळ काढलात राव पण हा असला सप्पक शेपू शेवट? ट्रेलरमधी एक आन शिणेमात वेगळं असंच झालं हे"