Friday, September 26, 2008

बोका


नवकथेतून आल्यासारखा बोका बराच वेळ रिकामा विचार करत बसला. रात्रीची झोप उत्तम झाली होती. सकाळी सकाळी ऊन खाऊन झालं होतं पण त्याचा काही केल्या आज मूड येत नव्हता. गल्लीतल्या चार-दोन उनाड आणि उथळ मांजरींनी त्याच्याकडे बघून शेपूट हलवली होती खरं पण त्याला अजिबातच रोमॅन्टीक वाटलं नाही. एका नॉर्मल बोक्यासाठी हे अतीच होतं नाही का? कोपरयातल्या लव्हबर्डच्या आवाजाने त्याची समाधी मोडली आणि स्मिताने ठेवलेल्या भांडंभर दुधावर त्याने रात्रभराचा उपास सोडायला सुरुवात केली.

स्मिताचं खरं नाव स्मिता नसून स्मिथा राव आहे हे बोक्याला नसलं तरी आपल्याला माहीती हवं. पण बोका आणि इतरही बरेच लोक स्मिथाला स्मिता, स्मित किंवा मिस राव अश्या अनेक नावांनी ओळखायचे. बोक्याशी तादादत्म्यता म्हणून आपणही स्मिताच म्हणू या.

स्मिताचं आयुष्य वेळापत्रकाचे रकाने असतात तसं चौकोनी; ऑफिस- ऑफिस-ऑफिस-आणि घर. पहाटे घर सोडण्यापुर्वी नाईलाजाने आरसा बघायचा आणि घाईघाईने ऑफिसच्या दिशेने गाडी हाकायची. एकदा का त्या स्वाईपिंग मशिन मधे ऍटेन्डन्स कार्ड घातलं की चरकातल्या उसाला होत नसेल तितका आनंद स्मिताला व्हायचा.

बाकीच्या बरयाच मुली ऑफिसात आल्या की चेहरयावर लिंपण क्रमांक २ करतात तेव्हा स्मिताचा दिवस पुर्ण जोरावर असतो. डिझाईन रिव्ह्यु करणं, आर्किटेक्चर मधे बदल सुचवणं हे सिनिअर आर्किटेक्ट म्हणून तिचं मुख्य काम. हाताखाली लोकांचा पिरॅमिड तयार करुन काम करवुन घेण्यापेक्षा तिला स्वतंत्र काम करणं जास्त आवडायचं. पण हल्ली पुर्वीसारखं गुलामांच्या संख्येवरुन श्रीमंती ठरवण्याची पद्धत फिरुन आली होती. नको नको म्हणताना कंपनीनं चार लोक तिच्या हाताखाली टाकलेच होते. तिचा कामाचा भार कमी करणे, हाताखालच्या लोकांना काम देणे, त्यांना मार्गदर्शन करणे या उदात्त हेतु पलीकडे कंपनीची तिच्यावर अवलंबुन असण्याची रिस्क कमी करणे हा ही एक हेतु होताच हे न कळण्याइतपत स्मिता लहान नव्हती. इतक्या वर्षांनंतरही कंपनीच्या दृष्टीनं आपण फक्त एक रिसोर्स आहोत हे जाणवुन स्मिता दुखावली गेली होती.

माळ्यावरुन बोक्यानं उडी मारली आणि चेहरयाची किंचित बिघडलेली इस्त्री सरळ केली. स्वतःची जैसे थे अवस्था बदलुन झाल्यावर त्याला स्मिताबद्दल वाईट वाटलं. जुने जाऊ द्या मरणा लागूनी हे गाणं शिट्टीवर वाजवायचा असफल प्रयत्न करत बोक्यानं घराबाहेर पावुल टाकलं.

केबिनच्या बाहेर झालेल्या टकटक आवाजाने स्मिता भानावर आली. तिचा एक नविन रिसोर्स बाहेर उभा होता.

संजीवनं स्मिताच्या केबिनमधे पाय ठेवला तेव्हा त्याच्या छातीत हजार ससे धडधडत होते. त्याला स्वतःच्या लायकीबद्दल नेहमीच खात्री होती पण आत्ता पर्यंत त्याचं काम वापरुन बरेच वामन वर गेले होते. स्मिताच्या विक्षिप्त वागणुकी बरोबरच तिची टेक्निकल हुकुमतही त्याला माहीत होती. थोडं दैव, नीटस काम आणि स्मिताची खुषमस्करी यांच्या बळावर यावेळी प्रमोशन मारायचंच असं त्यानं मनोमन ठरवलं आणि स्मिताकडे बघून एक छान हसु चिकटवुन टाकलं.

बोका परत घरात आला होता. कंटाळा आपल्या पाचवीलाच पुजला आहे अशी दिवसंदिवस त्याची खात्रीच होत चालली होती. फॉर अ चेन्ज, त्याने लव्हबर्डच्या मोठ्या पिंजरया समोर बैठक मांडली. त्याचं अस्तित्व जाणवुन फडफडणारया सारया चिमण्या स्तब्ध झाल्या. एका कोपरयात बसून त्या बोक्याचा आणि बोका त्यांचा अंदाज घेत राहीले. मग बोका प्रसन्नपणे हसला. खाण्यापेक्षा करमणूकीसाठी या चिमण्या बरया होत्या. मनकवड्या चिमण्यापण एकदम रिलॅक्स होऊन मुक्तपणे गावु लागल्या.

संजीवशी होणारया "य"व्या मिटींगच्या आधी स्मितानं चेहरयावर पाण्याचा हबका मारला आणि आरश्यात निरखुन पाहीलं. डोळ्यांखालच्या रेषा मेंदुवरच्या वळ्यांशी स्पर्धा करत होत्या, केस आणि चेहरा यांनी रंग आपापसात कधीचेच बदलले होते. सुज यावी तसा शरीरावर मेद चढला होता. आपलं वय जाणवतय हे आरश्यात बघितल्यावरच कळावं याचं स्मिताला कुठेतरी वाईट वाटलं.

संजीव स्किमा समजावुन सांगत होता आणि भारावल्यासारखी स्मिता त्याच्या कडे बघत होती. दोघांमधे चिमूटभर आभाळाचं तर अंतर होतं आणि नव्हतही. त्याचे हात, त्याचे ओठ, त्याचे गंध तिच्या वर आदळुन आतच विरत होते. हे कसले कल्लोळ? आतच आत वादळाचे हे कसले संकेत? एक मोठा आवंढा गिळून निग्रहाने तिने डोळ्यातुन पावूस परतवुन लावला. तिने रुजवलेल्या आखीव चौकानात हा कोन कधी गृहीतच धरला नव्हता तिने. रात्री दहा-अकरा नंतर कधी तरी पलंगावर अंग टाकलं की शरीराला सुख म्हणजे फक्त झोपेचंच या समिकरणाची दुसरी बाजू तिने कधी तपासुनच पाहिली नव्हती. स्वप्नातही डोळ्यांसमोर तरळायचे ते अलगोरिथम आणि फ्लो-डायग्रामच. मनाचा कोरडेपणा शरीरावर आपसुकच प्रतिबिंबित झाला होता. पण आज देहभानानं नवंच बंड पुकारलं होतं. शरीराच्या गरजा अंगावर इतक्या आक्रमकपणे चालून या आधी कधीच तर आल्या नव्हत्या..

घराची घंटा वाजली की ग्लानीत भास झाला हे स्मिताला ठरवायला बराच वेळ लागला. तापामुळे जात असलेला तोल सांभाळत तिने दार उघडलं तर दारात संजीव उभा होता. नमस्कार चमत्कार झाले, ऑफिसच्या अल्याडपल्याडच्या गप्पा झाल्या आणि हळुहळु राखून ठेवलेले दुर्ग उधळायला लागले. आयुष्यातले एकेक पदर परक्यासमोर उलगडताना स्मिता ढासळत गेली. संजीवनं पुढं होऊन आधार दिला. किती विचित्र असतात गुंतण्याचे नियम!

नियम आणि बंड यांना जोडणारा सामाईक दुवा शरीर! स्मिताच्या अतृप्त स्पर्शांनां पुरता पुरेना संजीवचे अंगांग. स्पर्शाच्या, गंधाच्या, देहात उगवणारया अन मावळणारया देहाच्या इतक्या टोकदार संवेदना स्मिताला पेलवत नव्हत्या. तिने हलकेच डोळे मिटले..

बोका अवाक किंवा काहीच रिऍक्ट होत नाही. माळ्यावरच्या अंधारात त्याला कविता आठवत राहाते

रात्र काळी
पसरत जाते तुझ्या देहावर
देहाचेच आकार घेऊन

एखादा चंद्राचा तुकडा घेऊन
नव्याने करावी
द्वैत सुत्रांची मांडणी
इतकीही संदिग्धता नसते
हुंकारांच्या ओंकारात

मुठभर वेदना
आणि मिठीभर आनंद
यांच्यापलीकडे सत्य केवळ एकच
रात्र काळी
घागर काळी

रात्र काळी
घागर काळी


..तिने डोळे मिटले. काहीच क्षण आणि मिठीतले समुद्र मावळत गेले. तिच्या डोळ्यांसमोर परत तेच अलगोरिथम, डिझाईन स्टॅन्डर्ड्स आणि त्यांना लटकणारे कोड तरळत राहीले. ग्लानीतही तिला हे ओळखीचे स्वप्न जास्त जवळचं वाटलं.

बोका स्मिताच्या कुशीत शिरला. जे होतं ते पाहाण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नसतं.

काहीच दिवसांनी स्मिता दुसरा जॉब घेऊन पल्याड निघून गेली आणि तिच्या जागी संजीवला बढती मिळाली.

बोका बरयाच अंशी स्मितासोबत गेला। शिल्लक बोका रिकाम्या घरात पुढच्या स्मिताची वाट पाहात राहीला.

Friday, September 19, 2008

डॅड, डोन्ट किल सुपरमॅन

Hey Dad, तू कधीच कॉमिक्स आणून नाही दिलंस मला. विचारलं की म्हणायचास कल्पनाशक्ती झडते आणि मला ही ते नेहमी सारखं पटून गेलं! अधूनमधून हातात येणारया अमरचित्रकथा सोडल्या तर मधल्या काळात खानदानी पुस्तकं माझ्यात खोलवर रुजत गेलेली. पानांपानांवर उगवलेले शब्द आणि त्या शब्दांना लगडलेल्या अर्थांच्या कित्येक शक्यता यांनी मनावर गारुड घतलेलं. पण मग नवल झालं. जाळीफेक्या स्पायडी पुस्तकातून टीव्हीत घुसला. त्याचे अगम्य शत्रु पुराणकथांहून चमत्कारीक होते. त्याची अक्कल फा.फे.हून वेगळ्या कुळीची होती आणि त्याचं विश्व कदाचित विरधवलाहून चित्तथरारक होतं. मध्येच कधी तरी अर्चुनं सुपरमॅन, मॅन्ड्रेक आणि फॅन्टमशी ओळख करुन दिली आणि सुपरहिरोजची एक पंगतच माझ्या अंगणात झडली. नथिंग रॉन्ग आफ्टर अ पॉईन्ट ऑफ टाईम, यू सेड, खरं आणि खोट तुझं तुलाच कळेल! तू बरोबर होतास डॅड. चिरंतन सोबतीला कोणती पुस्तकं राहातील हे कळण्या इतपत शहाणा करुन सोडला होतास तू मला. नंतर कधी प्रकर्षानं कुठलाच सुपरमॅन नाही आठवला मला.

पण आज, जेव्हा मी तीन, तेरा किंवा तीस कुठल्याही वयाचा असू शकतो, मला सुपरमॅन कुठे तरी असावासा वाटतो. उन्मळुन पडणारी माणुसकीची मुळं, श्रद्धांचे आंधळे अतिरेकी अविष्कार आणि यंत्रवत निस्तेज आमची जात यांचे ओझे घेऊन युगाची पावले फार लांब नाही चालु शकणार आता. एका विकृत करणी सरशी होत्याचे नव्हते होईल तर कुणी थांबवायचे ते विनाशी तांडव?

'सुपरमॅन हे करेल?' असं विचारण्याआधी थोडं थांब डॅड. सत्याला नागडं न करता माझ्या विश्वासाला आंधळेपणानं लिंपता येणार असेल, तर प्लीज डॅड, डोन्ट कील सुपरमॅन

Sunday, September 7, 2008

किनारे

सखीचे किनारे
असे पावसाळी
जसा बुद्ध
डोळ्यातुनी हासला

कुठे नीज तारे
कुठे शुभ्र अश्व
तुझा थेंब थेंब
देह चित्रावणे

विरक्तात का रे
नभांचे आरक्त
आणि पावसाळाही
ओला झरे

सखीचे किनारे
असे भासशाली
जणू श्वास
श्वासातुनी वाकले

गोदोसाठीची कविता: ऍज इज आणि टू बी

ऍज इज..

थंड काचा
भावनाविरहीत
आणि मध्येच उभ्या केलेल्या
पुठ्ठ्यांच्या चंचल भिंती,
हवी तेव्हा पाचर मारता येते
अन
हवी तेव्हा काढता ही येते
पण त्याचं काय?
अल्याड-पल्याड तीरावरची माणसं
गुमान पणे
यंत्रातुन बोलत राहातात
यंत्रवत
किंवा गुहेत त्यांच्या बापजाद्यांनी काढलेल्या चित्रांसारख्या
जुन्याच खुणा
नव्याने वापरु लागतात

तारखांनुसार
देयकांची कोष्टकं
फळ्यांवर डकवलेली
आणि आकड्यांचे जादुयी
अनेक आलेख
विस्कटुन फिस्कटुन
जमिनीच्या सात बोटं वर
तरीही नशिबाचेच लेख
मग दिवसांच्या बदल्यात
माणसांचे आदीम सौदे
अमुक दिवस = तमुक माणूसकाम
काम झालंच तमाम!
नवे मंत्र, नवेच परवचे
एफर्ट.. शेड्युल..
डब्लुबीएस..आणि मॅनमन्थ

...टू बी?

सुख-दुःख
अर्थ-निरर्थ
लिहीणं- न लिहीणं
असणं-नसणं
आणि असं फालतु, बाष्कळ बरंच काही
गोदोसाठी सारं अर्थाअर्थी समानार्थी
गोदोला रुढार्थानं सुखी म्हणता मग?
आपण तरी ही गोदो होणार नसतो
आपण फक्त गोदोची वाट पाहायची

उपद्व्याप आणि अट्टहास
याच्या अध्यातमध्यात
गोदोच्या शोधाचे सुवर्णमध्य
मॉल, नाटकं, सिनेमे
कथा आणि हो
कवितात देखिल