स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. नाटकाच्या वाचनाला स्टेजचा हट्ट करण्याची दोन कारणं; नाटक ही केवळ गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे ही दृष्टी आणि स्टेजचं असणं. तर, स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. अंड्यातल्या बलकासारखा कोवळा पिवळसर प्रकाश मध्याभागी ठेवलेल्या ३-४ खुर्च्यांवरुन ओसांडून वाहात असतो आणि अंधाराचं एक टोक पकडून मी स्टेजच्या एका कोपरयात बसलेलो. अंधाराचा अवकाश मोठा सुखद असतो. शरीराचे निर्बुद्ध प्रतल कुणाला वाचता येत नाही की डोळ्यांमधून उमटणारे अर्थांचे नाचरे बेबंद मोर कैद करावे लागत नाहीत. आरसा देखील झाकावा लागत नाही अस्सं माहेर भेटतं अंधाराच्या कुशीत. अंधाराच्या पल्याड अजून थोडा अंधार असावा तशी तू गर्द काळी शाल पांघरुन विरुद्ध अर्थाच्या कोपरयात बसलेलीस. काय करत असावीस? अनंत रिकामेपणात वैयक्तिक रिकामेपण मिसळलं की सीनर्जी होत असेल का निर्माण? कठीणपणे लपत होतं तुझं लख्ख लावण्य त्या काळ्या शालीत आणि तसे तुझे अट्टहासही नसावेत बहूदा. मी तुला निरपेक्षपणे पाहात राहातो.
समाधी मोडते कारण नाटकाचं वाचन सुरु होतं; राजा इडिपस!
इडिपस, लुई, जोकास्टा सारे पुस्तकातून जीवंत होताहेत. इडिपसाची शतकांवर पसरलेली शोकांतिका! जन्मजात अनैसर्गिक अशुभांचे भाकीत, बापाचा खुन, स्वतःच्याच आईशी लग्न, आणि शेवटी स्वतःचे डोळे फोडून परागंदा होणं ही थोडक्यात नाटकाची कथा. कथे पलीकडे जाऊन इडिपसाचे मानसशास्त्रीय, सामाजिक अर्थ शोधणं असा काहीसा प्रयत्न करायचा म्हणून संशोधकाच्या भुमिकेत मी. पण जिथे लिहीणं थांबतं तिथून पुढंच नाटक खरं उलगडत नेतो बाबा. बाबा म्हणजे नाटकाचा दिग्दर्शक.
बाबा स्वतःच इडिपसचे संवाद म्हणतोय. खर्जातल्या संथ कवितेसारख्या त्याच्या ओळी ऐकून संध्याकाळची भानामतीच होते...
"Aye, 'tis no secret. Loxias once foretold
That I should mate with mine own mother, and shed
With my own hands the blood of my own sire.
Hence Corinth was for many a year to me
A home distant; and I trove abroad,
But missed the sweetest sight, my parents' face."
टोकाच्या भावना पिढीच्या अंतराने उमटाव्यात तितपतच दबका हुंदका तुझ्या कोपरयातून आला पण माझे सारे तळ ढवळुन निघाले. बाबाला त्याची ऍन्टीगोनी मिळाली.
एखादं पात्र डेव्हलप करायचं म्हणजे ते पात्र वर्तमानात काय आहे या पेक्षा ते भविष्यात कसं असेल याचा विचार करायचा. बाबा फार छान प्रकारे सांगतो हे सारं समजावुन.
"मला वाटतं मी बाबाच्या प्रेमात पडलेय", समेवर आल्यागत तू म्हणालीस. दचकायचं नाही ठरवुन देखील मी दचकतो. "वयाच्या अंतराचं काही नाही. इडिपसचा कॉम्प्लेक्स उलटा झालाय समज. ऍन्टीगोनी इज इन लव्ह विथ इडिपस" बाबाला ऍन्टीगोनीचं पात्र असं डेव्हलप व्हावं असं कधीच वाटलं नसेल. नियती, अजाणतेपणी झालेलं पाप इ.इ. सारी कारणं देऊन मी थकलेलो असताना तुझा विमुक्त सवाल "तुला नाही आवडत मी?"
"तुला नाही आवडत ती?" बाबानी पुस्तकातुन डोक वर न करताच माझ्यात आरपार प्रश्नचिन्ह घुसवलं.
"मी खुप आळशी आहे" शहराला टाळून बाहेरुन जाणारया रिंगरुट सारखं माझं उत्तर. पात्रं जितकी अमुर्त, तितकी त्यातुन अर्थ सापडण्याची शक्यता जास्त.
बाबा सवय असल्यागत बोलतो "माझ्या वयाच्या किंचितही इंटलॅक्युअल माणसाच्या प्रेमात वीस-बावीस वर्षाच्या मुलीनं पडणं हे खुपच नैसर्गिक आहे. पण मेंदु आणि शरीराच्या गरजा प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या असतात. या दोन वेगळ्या गरजा एकत्र येतीलच याची खात्री किंवा अट्टहास का? आणि बाय द वे, ऍन्टीगोनी कॅन नॉट लव्ह इडिपस. ऍन्टीगोनीचे पात्र असं डेव्हलप होऊच शकत नाही फॉर द नोन रिझन्स. केवळ तुला लेखक म्हणून या चाळ्याचा एक खेळ करायचा असेल तर गोष्ट वेगळी. फक्त रुबीक क्युबच्या एका बाजुचे रंग जमवताना बाकीच्या पाच बाजु फिस्कटवु नकोस म्हणजे झालं"
"बाबा" मी निरुत्तर अवस्थेत वाद घालतात तसं बोलत राहातो " कधी नाटककाराला शोधत पात्र येतात. पण त्या पात्रांच्या त्वचेखाली हाडांमासांचा जो जीवंत माणूस असतो, तो फक्त तुला, एक दिग्दर्शक म्हणून, भेटु शकतो, मला नाही. ऍन्टीगोनीचे रंग उतरवल्यावर ती जी काही शिल्लक राहाते, तो जीव तुझ्यात गुंतलाय. त्याचं काय?"
पुर्णविरामाचं निश्चयी बळ पुरवत बाबानं भरतवाक्य उच्चारलं " जोकास्टाचा ब्रोश, कधी नैतिक, कधी सामाजिक आणि कधी अनुवंशीय अधिष्ठान बनतो. विविध कालात इडिपसाने स्वतःचे डोळे त्या ब्रोशने फोडून घेणं ही नियती आणि अपरिहार्यता देखील."
"Let the storm burst, my fixed resolve still holds,
To learn my lineage, be it ne'er so low.
It may be she with all a woman's pride
Thinks scorn of my base parentage. But I
Who rank myself as Fortune's favorite child,
The giver of good gifts, shall not be shamed.
She is my mother and the changing moons
My brethren, and with them I wax and wane.
Thus sprung why should I fear to trace my birth?
Nothing can make me other than I am."