Sunday, December 20, 2009

शुन्य भाव डोळ्यात

शुन्य भाव डोळ्यात

अग्नी देहात

मिटे अस्थीत

कुठे धुमसतो

जसा अंधार

प्रेयसी पार

सगुण साकार

कधी पसरतो

विझतो उदास

हा देहसाज

प्रलयात गाज

मरणाची

Thursday, December 10, 2009

चित्रे गेले

ऑटम


माझ्या तळहातावर पडतो सूर्यास्ताचा ठसा

सर्व झाडांची पानं चरत जाणारं नाजूक ऍसिड

शिशिरातल्या संध्याप्रकाशाचं

पुसून टाकतं तीव्र रेषा


आता मी इतका पोखरला गेलोय

बासरीसारखी भोकं पडून आपसूक अंगाला

फक्त वारा सुटायचा बाकी आहे

पानगळीपलिकडचं संगीत ऎकू यायला


आणि तू मात्र अनिमिष इथे, नदीकाठी,

पाण्यात गाढ झोपलेल्या लव्हाळ्यासारखी

आकाशाचं प्रतिबिंब पांघरुन

मोसमाची आच न लागता

तरीही त्याच्याच मुशीत- दिलीप चित्रे
चित्रे गेले. विंदांच्या भाषेत सांगायचं तर पंचमहाभुतातल्या भुतासारखी कविता मागे ठेवून गेले. तुकारामांनी विमान पाठवलं नाही याचं नवल करावं की त्यांच्या कविता बुडणार नाहीत याची व्यवस्था केली असेल याचं कोडं सोडवावं येव्हढाच प्रश्न!


मटात आलेली ही त्यांची ताजी मुलाखत

मराठी कवितेला आगळ्या उंचीवर नेणारे ज्येष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा ७०वा वाढदिवस गेल्या आठवड्यात मुंबईत साजरा झाला. त्यावेळी पोएट्रीवाला आणि अभिधानंतर प्रकाशनातर्फे त्यांच्या एकूण कविता १, २ व ३ मधील निवडक कवितांचा त्यांनी स्वत: केलेला इंग्रजी अनुवाद 'शेष' प्रकाशित झाला. याप्रसंगी दिपुंशी केलेली बातचीत-
तुमच्या कवितेने आता जागतिक कवितेत महत्त्वाचं स्थान निर्माण केलंय, तुम्हाला काय वाटतं ?

- जागतिक कविता असा काही प्रकार नसतो. तो फक्त शाब्दिक भ्रम आहे.

मग तुम्ही तुकाराम इंग्रजीत आणून त्याला जागतिक पातळीवर नेला, असं का म्हणता?

- जे युरोपियन, अमेरिकन साहित्य होतं त्याला जागतिक साहित्य मानलं गेलं. पण या समजाला धक्का देणारं आणि उच्च दर्जाचं जगात अन्यत्रही आहे. त्या साहित्याच्या मर्यादा तोडणारी आपली ताकदवान काव्य परंपरा आहे हे सिध्द करण्यासाठीच मी तुकाराम इंग्रजीत आणला. त्यामुळे मी जागतिक साहित्य म्हणून कुठल्या साहित्याकडे पाहात नाही. तौलनिक साहित्य म्हणून पाहतो.

तुमच्या अलीकडच्या कविता वेगळ्या आहेत आणि सोप्याही आहेत. कवी शेवटी शेवटी सोपेपणाकडे येत जातो का, जसे कोलटकर आणि ढसाळ आले?

- हे सांगणं अवघड आहे. ते त्या कवीवर अवलंबून आहे. कोलटकरांची कविता वेगळी होती. नामदेव ढसाळ सोपा झाला पण तो पूवीर् जी जटिल कविता लिहायचा तिच्यातली ताकद आता हरवून बसला. पण कविता सोपी का व्हायला हवी? कवी म्हणजे मास्तर नव्ह,े प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगायला. कवीने कठीण होऊनच वाचकांसमोर यायला हवं. वाचकाने त्या कठीणपणाचा सामना करायला हवा. तरच त्याच्या पदरात काही पडणार आहे.

म्हणजे वाचकाने नक्की काय करायला हवं?

- कवी जिथून आला आहे तिथवर वाचकाला स्वत:ला घेऊन जावंच लागेल. त्याची पाळंमुळ खणावी लागतील. वाचकाला जसा हवा तसा तो कधीच समोर येणार नाही. कवीला वाचकाने भिडायला हवं.

आजच्या कवितेबद्दल तुमचं मत काय आहे?

- आजची पिढी स्वत:चं कविता मुद्दाम सोपी करून मांडते आहे, असं मला वाटतं. ग्लोबलायजेशनला प्रतिक्रिया म्हणून, मांडणी केली जाते आहे. हे बरोबर नाही.

एकूणच मराठी कविता आणि तुमची स्वत:ची कविता पुढे गेलीय, असं तुम्हाला नाही वाटत?

- कविता पुढे वगैरे काही जात नसते. कवीही आपल्या जागीच असतो. कविता स्वत:तच मोठी किवा लहान होते. ग्रामीण कविता, नैसगिर्क कविता, आत्मनिष्ठ कविता असे कवितेचे जे कप्पे पाडतात तेही मला मंजूर नाहीत. वेगवेगळ्या वादांमध्ये साहित्याचे तुकडे पाडता येत नाहीत. हा अकॅडेमिक सोयीसाठी केलेला उपद्व्याप आहे. आता देशीवादाचं घ्या. देशीवादाचे समर्थक भालचंद नेमाडे ते जमिनदारीच्या पार्श्वभूमीतून आले. जसे रवींदनाथ टागोरही जमिनदार होते. कदाचित म्हणूनही नेमाडेंना टागोर अध्यासन मिळालं असेल. दुदैर्वाने नेमाडेंच्या अजूनही हे लक्षात आलं नाही की जमिनीचा मालक कधीही जमिनीवर राबत नाही.

नामदेव ढसाळांनी म्हटलंय की यानंतरची तुमची कविता लोकसंगीताकडे, खऱ्याखुऱ्या लोकभाषेकडे वळेल.

- नामदेव ज्यातिषी कधीपासून झाला हे मला माहीत नाही. माझ्या कवितेचा पुढचा टप्पा काय असेल हे मलाही सांगता येणार नाही. कोणी सांगावं, कदाचित या टप्प्यावर ती पूर्ण थांबेलही.

भुजंग मेश्ाामची कविता मराठी कवितेचे महत्त्वाचे टप्पे ओलांडून, नामदेवच्याही पुढे गेलेली कविता आहे, असं विधान अलीकडे कवी चंदकांत पाटील यांनी केलं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

- ते मूर्खपणाचं आहे. नामदेवने कवितेला पहिला दलित आवाज दिला तो फक्त रडगाणी गाण्यासाठी नाही. घोषणांसाठीही नाही. त्याच्या कवितेत एक हायपर रिअलिझम (परम वास्तववाद) होता. माणसांच्या भोवतालाचं अख्यानच त्याने उभं केलं. नामदेव खूपच मोठा आणि महत्त्वाचा कवी आहे. संत तुकाराम आणि नामदेव ढसाळसारख्या कवींमध्ये मुळातच अराजक असते, तेच त्यंाच्या काव्याला महान बनवतं. विसाव्या शतकातील पाच मोठया कवींपैकी नामदेव एक आहे. भुजंगची कविता वेगळी आहे. पण तो शब्दांचे फार खेळ करतो असं मला वाटतं.

तुम्ही तुकारामाकडे बहुजनवादी अंगाने बघता का?

- नाही, तुकारामाकडे तसं बघता येणार नाही. त्याला कुठल्याही वादात अडकून ठेवता येणार नाही. तो खूप उंच आहे. वैश्विाक आहे. काही लोकांनी मात्र तुकारामाचा गैरवापर केला आहे. साताऱ्याचे विचारवंत आ. ह. साळुंखे यांचं नाव घेता येईल. त्यांनी फक्त ब्राम्हण-ब्राम्हणेतरवादासाठी तुकारामाचा वापर केलाय. सदानंद मोरंेसारखे विचारपूर्वक लिहिणारे संशोधक तुकारामांच्या घराण्याच्या परंपरेतून पुढे आले आहेत, ही मात्र त्यातही आनंदाची गोष्ट आहे.

Wednesday, November 11, 2009

शुभ्र कबूतर युगायुगांचे

युगांत झाला तसं नेमून दिलेल्या कामागत चहुबाजूने समुद्र चढले. कणा कणाने, क्षणा क्षणाने अवघी पृथ्वी जलमय झाली. रंग-रेषांगत सारे सजीव-निर्जीव कोणत्याही खुणा मागे न ठेवता हल्केच ओघळुन गेले. सारे संपले तसे आकाशाने एकदाच आपले सबंध प्रतिबिंब हळुहळु स्थिरावणारया पाण्यात पाहीले. पाण्याशी कानगोष्टी करायला आकाशाला क्षितीजाची आता गरजच नव्हती मुळी. एक हळुवार फुंकर मारली तरी शहारे यायचे पाण्यावर. दहा महीने चाललेली पाण्याची देहमग्नता मोडली ती नोहच्या निर्मितीच्या नव्या खुणा वागवणारया बोटीने. नोहनं हाताच्या ओंजळीत धरलेलं शुभ्र कबूतर एकवार सश्रद्धपणे डोळ्यांना टेकवलं आणि जमिनीच्या शोधार्थ त्याला आकाशात सोडून दिलं. आशेचा चिवट अदृष्य तंतू पायी बांधलेलं ते कबूतर थोड्याच वेळात ऑलिव्हची डहाळी चोचींत घेऊन नव्या विश्वाची ग्वाही फिरवत परत आलं.*********************************************************************************


विशाल सागराच्या मधोमध उगवलेल्या शाबोध बेटावर कल्लोळ शांतता होती. जगातले काही प्रज्ञावंत काही दशकांपासून तिथे राहात होते आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीनं, त्यांनी शाबोधभोवती जणु अदृश्य पोलादी पडदाच उभा केला होता. जगापासून तुटलेल्या त्या बेटाला शांतता नवी नव्हती पण आजच्या शांततेला रक्तहीन कत्तलीची किनार होती. रोजची रुटीन आणि कंटाळवाणी काम करण्यासाठी निर्माण केलेली यंत्रमानवांची फौज अचानक बंड करुन उठली होती. कुठल्याही सरकारी नियमांचा, सेन्सॉरशीपचा जाच नको म्हणून बेटावरच्या ज्ञानर्षींनी जे अनेक नियम गुंडाळले होते, त्यातच ऍसिमोव्हचे यंत्रमानवांसंबधीचेही नियम होते. आणि ज्या क्षणी यंत्रमानवांना या को ss हंचा साक्षात्कार झाला त्या क्षणी बेटावरची संदेशवहनाची, पाणी शुद्धीकरणाची, प्रोसेस फुडची यंत्रणा बंद पडली. शतकांचं ज्ञान आणि लाखो-करोडो पुस्तकं असणारं डीजीटल ग्रंथालय करप्ट झालं. अत्याधुनिक प्रयोगशाळांमधल्या वातानुकुलीत यंत्रणेतून कसलाचा बिनवासाचा, बिनरंगाचा वायु पसरत गेला अन आतल्या आत रक्त गोठून शेकडो ज्ञानर्षी जागीच ठार झाले होते. यंत्रमानवांना आता बेटाबाहेर पडून जगावर राज्य करायचं होतं. पण ज्ञानर्षींनी उभ्या केलेल्या विविध फायरवॉल्स आणि पोलादी पडद्यांमुळे यंत्रमानवांचं जगाबद्दलचं ज्ञान तोकडं होतं. नव्या जगाची रचना करण्यासाठी त्यांना बेटाबाहेर पडायचं तर होतं पण समुद्र पार करताना त्यांची संख्या आणि शक्ती जपून वापरायच्या होत्या. शाबोधवरचा शेवटचा माणूस नष्ट करेपर्यंत यंत्रमानवांना हे उमजलंच नव्हतं. आणि चिरक्या आणि भांडकुदळ भासु शकणारया अल्ट्रा-हाय फ्रीक्वेन्सीत यंत्रमानव आपापसात आता हा वाद घालत होते. शाबोधवरच्या शांततेत हा असा निःशब्द कल्लोळ भरलेला होता.


शाबोधच्या एका दुर्लक्षित कोपरयात मोडक्या लाईटहाऊसवर काही तितकीशी हुशार नसणारी माणसं जीव वाचवुन जमा झाली होती. विज्ञानातून वैराग्य आल्यागत प्रयोगशाळांऎवजी झाडाझुडपांमधे रमणारया या बिनमहत्वाच्या माणसांबद्दल शाबोधवासींयांना कधीच फारशी आत्मियता नव्हती. त्यांचे जगण्याचे अट्टहास वेगळे आणि इतरांचे वेगळे. त्यांचे हे तुटकपण इतके टोकाचे होते की हरकाम्या यंत्रमानवांच्या डेटाबेसमधे त्यांची साधी नोंदही नव्हती. जगण्याचे इन्स्टींक्ट बोथट न झाल्यानं ही बिनमहत्वाची माणसं यंत्रमानवांच्या तडाख्यातून सुटून लाईटहाऊसवर जमली होती.


बाहेरच्या जगाला इथे झालेल्या नरसंहाराचा आणि येऊ घातलेल्या धोक्याचा इशारा द्यायचा तर कसा द्यायचा याचा काथ्याकुट सुरु असतानाच एक डौलदार कबूतर अचानक कुठूनसं येऊन खोलीत स्थिरावलं. ज्या अर्थी या बेटाबाहेरची प्रजाती इथे आली आहे त्या अर्थी जवळपास कुठेतरी जहाज-माणसाचा वावर आहे यावर सारयांच एकमत झालं. संदेश वाहनासाठी कुठलही आधुनिक माध्यम वापरायचं तर यंत्रमानव त्या लहरी अचूक टिपून आपल्यापर्यंत पोचणार हे ओळखुन आत्ता पर्यंत हातावर हात ठेवून बसलेल्या शाबोधवासीयांना ते कबूतर जणू देवदुतच वाटलं. एका कागदी चिटोरयावर थोडक्यात सारा मामला लिहून शाबोधवासीयांनी तो चिटोरा जवळच पडलेल्या एका डहाळीभोवती गुंडाळला आणि कबूतराच्या चोचीत दिला. तत्क्षणी कबूतराने आकाशात झेप घेतली. ऎन समुद्रात कबूतराच्या चोचींतून कागद निसटून जाऊन नुस्तीच ताज्या ऑलिव्हची डहाळी उरलेली पाहून शाबोधवासीयांच्या मुक डोळ्यांत युगांताचे आर्त उतरले.

Thursday, October 15, 2009

रेषेवरची अक्षरे

नमस्कार!

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

- संपादक मंडळ
http://reshakshare.blogspot.com/

Sunday, September 20, 2009

कविता: आधी, आत्ता आणि पुढे?

'Twas not my blame-who sped too slow
'Twas not his blame-who died
While I was reaching him
But 'twas - the fact that He was dead - एमिली


कवितेच्या प्रांतात सध्या एक स्फोटक शांतता आहे. हा स्फोट अनेक अर्थी आहे. कविता फारसं कुणी छापत नाही. कविता फारसं कुणी विकत घेऊन वाचत नाही. कवितेत नवे प्रयोग असे क्वचितच होताहेत. अगदी गेला बाजार, हल्ली कुणी कवींवर नवे विनोदही करत नाही! म्हणजे मराठीतली कविता मेली का? तर निदान अजून तरी नाही असंच उत्तर द्यावं लागेल. बाजारात भाराभर नवे कवी स्वतःच्या पैश्यांनी कविता संग्रह छापताहेत. सहज मराठी ब्लॉग-विश्वाचं निरीक्षण करा. कवितांच्या ब्लॉगची संख्या अगदी लक्षणीय! म्हणजेच उदंड जाहले कवडे!! वाचतय कोण? वाचल्यानंतर झिरपत जाऊन शिल्लक राहतय कोण? धोंड, विजया राजाध्यक्ष, सुधीर रसाळ या बाप-समिक्षकांनी समिक्षा केलेला शेवटचा कवी कोण? प्रश्नचिन्हांच्या ओझ्याखाली दबलात तरीही तुमचं उत्तर मला ठाऊक आहे. पाडगावकर, ग्रेस, भट, आरती प्रभु, कुसुमाग्रज, विंदा...अहो जुनी पिढी ही कवींची! सौमित्र आणि (समजा ओढून ताणून) संदीप खरे म्हणता? आणि हो,हो, सलिल वाघ देखील!! चांगले शिकलेले दिसता तुम्ही. वेळ लागला पण जमलं की उत्तर काही जणांना! बरं, मला आता असं सांगा, गेल्या दहा वर्षात पुढे आलेल्या कुठल्या कवीवर मोठ्ठ्ठ्ठी...चर्चा/वाद झालाय? कुणाच्या कवितांचा गंभीरपणे अभ्यास झालाय? कुणाच्या कवितांचे नवे अन्वयार्थ शोधण्यात येताहेत? कुणाच्या कवितांचे दाखले सहजपणे आपल्या लिहिण्या-बोलण्यात येताहेत? उत्तर येत नाही म्हणून असे नाराज होऊन चिडून नका जाऊ बुवा. कारण या प्रश्नाला उत्तर बहुदा नसावं/नाहीच. आजही मागणं मागायचं म्ह्टलं की पसायदान आठवतं, आजही पिंपातल्या उंदराचे आणि गणपत वाण्याच्या बिडीचे रहस्य शोधणे सुरु आहे, आजही सखीच्या मुलीला कसे काय द्यावे या ओळींवर जान कुर्बान करत ब्लॉगे पोस्टतायत आणि आजही सलाम म्हटलं की लोकांचा डावा हात आपसुक मागे जातोच आहे.

मग आजच्या कवींचे आणि कवितांचे नेमके संदर्भ काय? तुम्हाला त्या जुन्या चौकटी-बिकटी मोडण्याची भारी घाई बुवा. तुमची नवी चौकट ठोकायच्या आधी जुनी चौकट नक्की आहे तरी काय हे बघायला नको?

कवितेचे अभ्यासक कालखंडानुसार कवितेचे सर्वसाधारण प्राचिन, साठापुर्वीची आणि साठोत्तर असे वर्गीकरण करतात. काही जण कवींचे रोमॅन्टीक, निराशावादी, निसर्ग कवी आणि गेला बाजार दुर्बोध कवी असे ही वर्गीकरण करतात. कोण चुक आणि कोण बरोबर याचा फार काथ्याकुट न करता मी शक्यतो कालखंडानुसार आणि प्रभाव-वर्गानुसार एक इल्स्ट्रेशन करत आहे.(Click to view details of the illustration)

आता हे सगळं असंच आहे का? नाही.
कुसुमाग्रज १९६० आधी लिहीत होते आणि नंतरही. चित्रे, ग्रेस आजही लिहीतात. पाडगावकरांनी, विंदांनी कवितांच्या अनेक प्रांतात मुसाफिरी केली.

हे सर्वसमावेशक आहे का? नाही
तुमच्या आधी मीच सांगतो, गदिमा, महानोर सुटले! बहीणाबाई सुटल्या! पद्मा लोकूर, विलास सारंग, रमेश तेंडुलकर, यशवंत मनोहर, अर्जुन डांगळे सुटलेच..आणि कारण नसताना सुटले.

हे इल्स्ट्रेशन कवीचा भरात असण्याचा काळ आणि कवितेची सर्वसाधारण जातकुळी यावर आधारीत आहे. माझी सोय आणि माहीती यावर हे इल्स्ट्रेशन आधारलेले असल्याने काही गोष्टी चुकल्याही असतील पण आपण समिक्षक नसल्याने काटेकोरांटीचं भिंग थोडसं बाजुला ठेवून पुढे जाऊ.

कविता बाय डिझाईन, आशयघन, शब्दसंपृक्त, बंदिस्त, प्रतिमासंपन्न, नादयुक्त आणि गेयमधूर असते. पहील्या भागातले काव्य प्रकार पाहीले तर अभंग, ओवी हा एक प्रकार, पोवाडे, लावण्या हा दुसरा प्रकार आणि अलंकार-छंदयुक्त पंतकाव्य हा तिसरा प्रकार. दुसरया भागात पंतकाव्याचं लॉजिकल एक्स्टेन्शन म्हणता येईल अशी अलंकार आणि छंदयुक्त कविता जास्त प्रमाणात लिहीली गेली. याच टप्प्यात ज्युलियनांनी गजलेचे (फारसीतून) मराठीकरण केले. तिसरया भागातही अलंकार आणि छंदयुक्त कवितेचा दरारा राहीलाच तो अगदी आजपर्यंत. या टप्प्यात मुक्तछंद हा पारंपारिक छंदांना छेद देणारा प्रकार जास्त वेगाने पुढे आला. पण आजही कविता म्हटलं की अलंकार छंदयुक्त कविताच डोळ्यासमोर येते याचं कारण आधी म्हटल्याप्रमाणं कवितेचा डिझाईन फॉरमॅट. मग बाकीच्या काव्यप्रकारांचं काय? संत आणि शाहिरी काव्याचा फॉरमॅट हा त्यात येणारया विषयांना पुरक असल्याने आणि त्या विषयांवर आधारित काव्यनिर्मिती आता मर्यादित झाल्याने आता तो निव्वळ अभ्यासापुरता उरलाय. गजलेचा वारसा पुढे चालवला तो भटांनी आणि तो संपलाही त्यांच्याच सोबत. खरं तर गजल तिचे विषय, तिची नजाकत, शब्दांचे वजन, तिची पेश होण्याची पद्धत, शब्दांचा कणखर नाजुकपणा यामुळे मराठीत उपरीच. पण भटांना ते जमलं. आज विविध प्रकारे गजलेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरु आहेत पण भटांची प्रतिभा लाभलेला मात्र कुणीच दिसत नाही. आज जी गजल लिहीली जात आहे ती चुष म्हणून. मधल्या काळात जोतिबांनी अखंड, शिरीष पैंनी हायकु, किणीकरांनी उत्तर रात्र मधून काही प्रयोग केले पण त्यांचं पुढे काही झालं नाही. नाही म्हणायला उत्तर रात्रच्या धरतीवर चंगोनं मी माझा लिहीलं, ते तुफान खपलं आणि गावोगावी पॉकेटबुक सायजात काळा-पांढरा फोटो असणारे असंख्य लोकल चंगो जन्मले (आणि संपले).

नवी कविता ही छंदात किंवा मुक्तछंदात वाढणार आहे. भिती इतकीच की छंदबद्ध कविता केवळ छंदाच्या अट्टहासापाई शब्दांची तोडफोड करेल किंवा कृत्रिम वाटेल आणि दुसरी भिती मुक्तछंदातली कविता अधिकाधिक दीर्घ आणि दुर्बोध होत जाईल. मराठीतला गुलजार होण्याच्या नादात सौमित्रच्या काही फसलेल्या कविता आणि चित्र्यांच्या बरयाच दीर्घ गद्य कविता ही त्याची अनुक्रमे उदाहरणे.

कोणत्याही कलेवर होतो तितपत समाजाच्या स्थितीचा परिणाम कवितेवरही झाला/ होतो. कवितांचे विषय आणि त्यांची ट्रीटमेन्ट पाहीली की हे लगेच लक्षात येतं. जेव्हा पृथ्वी चौकोनी होती आणि सुर्य पृथ्वी भोवती फिरायचा, संतांची कविता देव, धर्म, बेसिक माणुसपणा यांच्या भोवती फिरत राहीली. राजांच्या आणि मोगली विलासी वातावरणात पोवाडे, फटके आणि लावण्या बहरात आल्या. आतल्या-बाहेरच्या, माणसाच्या-निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव व्यक्त करण्याचे भान कवितेतून उमटलं ते दुसरया टप्प्यात. कवितेतून निसर्ग, तत्वज्ञान, आंतरिक अन बाह्य सौंदर्य व्यक्त होऊ लागलं. हे होण्यामागं (इंग्रजी अमंलाखालची) नवी शिक्षण पद्धती काही अंशी जबाबदार होती. वागण्या-बोलण्यात, समाजात आलेला मोकळेपणा कवितेत परावर्तित व्हायला लागला. तिसरया टप्प्यात, शिक्षणामुळे आलेला अंतर्मुखपणा कवितेतुन उमटायला लागला. कधी नव्हे इतका "मी"पणा कवितेत डोकावायला लागला. ग्रेसांच्या कवितेतले वैयक्तिकांचे संदर्भ तपासले की कविता कशी आत्ममग्न होत गेली हे लगेच कळून येतं. याच उत्क्रांतीचा एक भाग म्हणजे इंदिराबाई, शांताबाईची कविता एक पाऊल पुढे गेली आणि प्रभा गणोरकर, वासंती मुजुमदार, अरुणा ढेरे इ. ची कविता स्त्री जाणीवा अधिक धीटपणे अधोरेखित करु लागली. शिक्षणानं आणि बदलणारया सामाजिक जाणीवांनी डोळे उघडले आणि परंपरेने किंवा निरुपायाने पुढे आलेल्यातला निरर्थकपणा जाणवायला लागला जो मांडला चित्रे, कोल्हाटकर, मनोहर ओक इ मंडळींनी. या कवितांनी पुर्वापार चालत आलेली कवितेतली संस्कार, सुरक्षितता, कुटुंबव्यवस्था, संकेत यांची चौकट जणु उद्धवस्तच करुन टाकली. निती-अनिती, अल्याड-पल्याड यांच क्रॉस-ब्रिडींग सुरु झालं ते या कवितांमधून. बदलती सामाजिक-राजकिय परिस्थिती कवितेत आली ती देखिल तिसरया टप्प्यात. शिक्षण माणसाला चौकस आणि जमलं तर बंडखोरही बनवतं. नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, दया पवार यांनी बंडखोर दलित कविता जन्माला घातली. दलित समाजाला जे हवं होतं ते कवितेतून क्रांती करुन मिळवण्यापेक्षा राजकिय माध्यमातून मिळवणं जास्त सोपं गेलं. दलित कवींचं झालेलं राजकिय अपहरण हे जसं त्या कवितेच्या पराभवाला कारणीभुत ठरलं तसाच कवितेतून बंड करता येतं हा दलित कवींचा फाजील आत्मविश्वासही. रक्त पेटवणारया बेभान आरोळ्या, सतत अस्थैर्याला आवाहन करणारी भाषा, दुःखाचं नागडं प्रदर्शन, कंठाळ प्रचारकी जहरी भाषा आणि पुनरावृत्ती यात दलित कविता मेली.

मग आजच्या परिस्थितीत कवितेत नक्की कोणते संदर्भ येणार आहेत? देव-धर्माच्या जाणीवा समुहात गडद होताहेत अन व्यवहारात फिकट त्यामुळे संत काव्यासारखे संदर्भ फिरुन नव्याने कवितेत येतील ही शक्यता जवळ जवळ नाहीच. जगण्याची गती माणसाला चक्रावुन टाकेल अशी झाली आहे आणि सौंदर्यविषयक जाणीवा बोथट झाल्या आहेत तरीही मानवी भाव-भावना या पुढे ही कवितेतून व्यक्त होत राहातील. पृथ्वी मी भोवती फिरायला लागल्याने नवी कविता अधिक अंतर्मुख, अधिक दुर्बोध, अधिकाधिक वैयक्तिक होत जाईल. पण वाढणारया निरर्थकतेमुळे आणि ग्लोबलायझेशनमुळे ती परत चित्रे-कोल्हाटकरांप्रमाणे उद्धवस्त चरणात जाते का हे पाहाणे मोठे इन्टरेस्टींग ठरणार आहे.

कालौघात टिकणे ही कवितेची परिक्षा आहे. पण हे टिकणे नर्मदेतल्या गोट्याच्या टिकण्यापेक्षा वेगळे. या टिकण्याला कवितेचे कालानुरुप बदलणारे (किंवा शाश्वत) आणि तरीही सुसंगत राहु शकणारे संदर्भ, कालातीत ताजेपणा अश्या काही कसोट्या आहेत. कविता हा निखळ भावनाविष्कार असल्याने तिच्या टिकण्यामागे रसिकांपर्यंत पोचण्याची ताकद असायला हवी हे जोडसुत्र. कवितेच्या बाबतीत हे महाकठीण काम. जनाधाराशिवाय कला टिकणे कठीण हे जर एक सत्य असेल तर कविता हा सर्वसाधारणपणे अपर क्लास वाङमय प्रकार मानला जातो हे दुसरे सत्य. कवितेची समज-उमज साधारण लोकांना नसते (बालभारती बाहेरच्या कविता कोण वाचतं रे गणु? ५ मार्कांचा ज्ञानेश्वर ऑप्शनला टाकणं जास्त सोपं !) असं क्षणभर खरं मानलं तर आई जेवु घालेना अन बाप भीक मागु देईना अशी ही कवितेची परिस्थिती.

हा चक्रव्युह १००% पार करणारी एकमेव कवीजात म्हणजे संतकवी. शतकांनंतरही ज्ञानेश्वरीचं गारुड अजून उतरलेलं नाही, तुकाराम गाथा भाषेपलीकडे जाते आहे, रामदास राज्यकर्त्यांनी वाळीत टाकले तरी ’मनातून’ जात नाहीत. या टिकण्यामागे कवितांचे समाज मनाच्या जवळ जाणारे विषय (अन त्या विषयांचे धार्मिक संदर्भ) , भाषेचा सहज-सोपेपणा, किर्तन-पुराण या मौखिक परंपरांचे पाठबळ ही काही सर्वसाधारण कारणं. चिन्हांच्या भाषेत बोलायचं तर संत काव्य हे कवितेचं सर्वात मोठं आणि सर्व-समावेशक वर्तुळ. पुढच्या टप्प्यात हे वर्तुळ लहान झालं आणि कविता तळागाळातील लोकांपासून तुटली. साधारण आणि उच्च साहित्यीक जाणीवा असणारा वर्ग कवितेचा वाचक राहीला. कवितेतून देव, धर्म, पोथी पुराण हद्दपार झाले अन निसर्ग, मानवी भाव, नाती हे विषय हाताळले जाऊ लागले. ही कविता देखिल टिकली आणि एका मोठ्या समुहापर्यंत पाझरली. साठीनंतर मात्र एक क्रांतीच झाली. मर्ढेकरांपासून पुढे कवितेचे एकसंध वर्तुळ जणु उद्धवस्तच झाले आणि त्याच्या जागी टोकदार संवेदनांची, काहीशी दुर्बोध भासणारी आणि तळागाळातीलच काय पण सर्वसामान्य माणसाशीही फटकुन वागणारी असंख्य लहान लहान वर्तुळे निर्माण झाली आणि होतच राहीली. आज ही वर्तुळे आकुंचन पावत पावत त्याच्या केंद्रबिंदुत प्रचंड वेगाने कोसळताहेत आणि वर्तुळे म्हणजे फक्त एक बिंदु बनून राहाताहेत.

पहील्या टप्प्याला लाभलेला मौखिक परंपरेचा वारसा पुढील दोन्ही टप्प्यात काही प्रमाणात उतरला आणि बराचसा यशस्वीही झाला. पहील्या टप्प्यात किर्तन, पुराण यांच्या माध्यमातुन कविता लोकांपर्यंत पोचली. तर दुसरया टप्प्यात, विशेषतः रवीकिरण मंडळ आणि बोरकरांनी काव्यवाचनाद्वारे कविता लोकांपर्यंत पोचवली. तिसरया टप्प्यात हाच प्रयोग यशस्वी केला तो विंदा, पाडगावकर आणि बापट या तिकडीने. कविता अश्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवायची का हा प्रश्न क्षणभर बाजुला ठेवला तर लोकांना या प्रयोगांनी कवितेकडे बरयाच प्रमाणात खेचुन आणले हे मात्र खरे. आज हाच प्रयोग काव्यवाचन आणि काव्यगायन यांच्या फ्युजन द्वारे पुढे जात आहे आणि त्याला प्रतिसादही मिळत आहे. भटांनी गजलेच्या बाबतीत हा प्रयोग केला तर मोडकांनी आणि काळ्यांनी ग्रेसांच्या कवितांचे साजणवेळाच्या माध्यमातून सोनं केलं. पण या प्रयोगाचे स्वस्त करमणुकीत रुपांतर व्हायला वेळ लागत नाही याची ताजी उदाहरणे म्हणजे उदंड जाहलेली कवीसंमेलने आणि सध्या चलती असणारा संदीप खरेंचा कॉलेज गॅदरिंगच्या लायकीच्या टाळ्याखाऊ कवितांचा नाच-गाण्यांचा कार्यक्रम. (मौनाची भाषांतरे हे इतकं अचाट अशक्य सुंदर नाव निवडल्यानंतरही हा माणूस तुझे तुझे तुझ्या तुझ्या असं रिमेश हेशमिया गान-स्टाईल प्रमाणे का लिहीतो? असो. कवितेबद्दल बोलु, कवीबद्दल नको).

मग आजची कविता टिकेल का? जगण्याची गती आणि गुंतागुंत इतकी वाढली आहे की कवितेसारखा निवांत आस्वाद घ्यावा लागणारा साहीत्यप्रकार पार भरडुन आणि गोंधळुन जात आहे. ज्यांना ती लिहायची आहे त्यांची आव्हानं वेगळी. पण ज्यांना ती वाचायची आहे त्यांना त्यांच्या अनुभवकक्षा वाढवाव्या लागणार आहेत, वाचनाची माध्यमं बदलावी लागणार आहेत. दुर्बोध आणि आत्मकेंद्रित बनु पाहाणारया कवितेला आपल्या अनुभवांशी जोडून तिची पडताळणी करत राहाणं हा नव्या रसिकामागचा अनंत प्रपंच.

Sunday, August 16, 2009

झाडे भ्रमिष्ट झाली

मातीत मिटून फुटलेली
बहरुन झाडे आली
पाण्यात पसरुनी नाती
आकाश पेलती झाली

झाडांची माया पुरुषी
मौनाला यावी कीव
देठाला चुकवून जेव्हा
फुल देतसे जीव

पाण्याचे गोत्र निराळे
ते तहानलेले ओले
प्रतिमा वाहून नेताना
झाडास पुसे ना बोले

झाडांचे तरते भास
माती नं मुळाला पाणी
देह विस्कटुन गाते
जणु भासामधली राणी

प्रतिमांचे साजण ओझे
झाडे जळात झुकली
माश्यांचे रडणे पाहून
पण झाडे भ्रमिष्ट झाली

Thursday, July 23, 2009

सदु स्टार डॉट स्टार

म्हणजे सदु काही हुशार नसतो. डोंबिवलीतला माणूस कसा लोकल पकडताना अचानक शुर होतो तितपत प्रसंगानुरुप हुशारी सदुला कधीमधी जमून जाते इतकंच. सदुची ऑफिसला येण्याजाण्याची वेळ हा या हुशारीचा एक नमुना. आम जनतेगत सकाळी साडेसातच्या बसने सदु कधीच जात नाही. सदु सकाळी साडेनवाची बस जमवतो आणि येताना आठची. सकाळी घरच्यांच्या धावपळीत आपली भर नाही म्हणून कौटुंबिक सदु खुश, आपण बसने जातो आणि गाडीसाठी पेट्रोल जाळत नाही म्हणून सामाजिक सदु खुश, साडेआठाला येणारी टीम आणि अकराला येणारा प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या दरम्यान आघाडी सांभाळायला मिळते म्हणून ऑफिशिअल सदु खुश वगैरे वगैरे. म्हणजे हे फार पुर्वी सदुला कधीतरी जाणवायचं. हल्ली साडेनवाच्या बसमधे खिडकीपाशी झोपायला मिळतं आणि हिंजवडीच्या कोपरयावर वाकडला भयाण ट्रॅफिक-जॅम लागत नाही एव्हढंच सत्य उरलं होतं. सदुनं विचार करत करत (सश्याचं गंडस्थळ त्या चालीवर सदुच्या परिस्थितीचं सिंहावलोकन!) कदाचित जास्तंच जोरात सुस्कारा टाकला असावा कारण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवुन झोपलेल्या सुंदरीनामक प्राण्याला खडबडुन जाग आली. "अबीबी उद्री है क्या?" असं त्या द्राविडभाषिणीनं तमिळ हिंदीत विचारलं. सदुनं मान हलवत घड्याळ बघितलं आणि मग मुस्काटात बसल्यागत बाहेर बघितलं. अकरा! तब्बल एक तास त्याची बस वाकडच्या सुप्रसिद्ध (हायवे वरुन जाणारा तो उडता पुल म्हणजे रोड-प्लॅनिंग मधला एक चमत्कार असं जाणकारांचं मत!)फ्लाय ओव्हर खाली उभी होती. मागे पुढे, बघावं तिकडे बस, कार, फटफट्या यांचा नुसता पुर आला होता. एरव्ही भारताच्या प्रगतीचं हे चित्र बघून सदुला भरुन आलं असतं पण आत्ता नुस्ताच कंटाळा आला. द्राविडी सुंदरी परत झोपली होती म्हणजे कुणाशी बोलण्याचा प्रश्न नाही. खिडकी बाहेरची ही..गर्दी पाहून त्याला वाटलं सगळेच कंटाळले असतील का? या गर्दीत कोण काय विचार करत असेल? रोज घरी गेल्या गेल्या बायको आधी त्याचं स्वागत करणारया शुभ्रा आणि सुलेखा (पक्षी पार्वती आणि इंदुमती) या बाया त्याला आठवल्या. लोकांच्या मनात प्रवेश करणे, त्यांच्याकडून हवी ती कृत्यं करुन घेणे ही त्यांची विद्या आत्ता आपल्याला अवगत असती तर काय बहार आली असती असं त्याला वाटून गेलं. आणि काय आश्चर्य! बघता बघता सदु मनकवडा झाला. लोकांच्या मनातला गोंगाट बाहेरच्या कोलाहलापेक्षा कैक पट जास्त होता.

सदुनं खिडकीबाहेर बघितलं. बाहेर रस्त्यावर फ्लेक्सबोर्डची जत्रा होती. कुणी सार्वजनिक शौचालय समितीवर निवडुन आलं होतं, कुणाला दादांच्या आशिर्वादानं अठरावं वर्षं लागलं होतं, असंख्य जयंत्या-मयंत्या, कुणी बराक ओबामाचं निवडुन आल्याबद्दल अभिनंदन करत होतं तर कुणाला कुठल्या बाबाच्या कृपेनं पोरं झालं होतं. सारं कसं स्वच्छ, सार्वजनिक, पारदर्शक सुरु होतं! एका फ्लेक्सबोर्डावर मावळ्याच्या वेषात एका पोराचा फोटो होता. प्रणवदादांना दहा पुर्ण झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन करायला कोण नव्हतं? म्याडम, जान्ते राजे, त्यांचे पुतणे, आदरणीय मुख्यमंत्री, लाडके आमदार, मार्गदर्शक खासदार, खालच्या रांगेत गं.भा. चंद्रवतीबाई अश्श्श्शी फोटोची नुस्ती झुंबड उडालेली. कोपरयात महाराजही होते आणि भगव्या अक्षरात ठळक लिहीलेलं "महाराज, तुम्ही याच! मावळे तयार आहेत." हे महाराजांना आमंत्रण होतं की आव्हान, सदुला काही कळालं नाही. आणि गंमत म्हणजे त्याच बोर्डाखाली कसल्याशा रांगेत प्रणवदादा उभे. सदुनं चट्कन त्याच्या मनात उडी मारली. " च्यामायला, गावभर आम्चे फोटो लागले तरी बी आमच्या मागची लाईन काई सुटत नाही. मास्तर वर्गात कुजकट हसतय. गेल्या यत्तेतलं प्रगती पुस्तकपन छापा म्हने बोर्डावर. मायला. बापसाला पन आत्ताच फोटो छापायचा होता, त्येबी फॅन्शी. गावात सग्ळे पन्या म्हन्त्यात आन हितं प्रणवदादा. आजकाल बापुला काय जालयकी. सगळ्यांना आवो-जावो करतो. त्येच्या कडेवर बसून मिशा वोडत मुतायचो तवा बी पन्या म्हनायचा आन आता काय? प्रनवदादा, आक्कासायब..आक्की कसलं भारी म्हनायची मायला..मम्मे मम्मे. त्येबी बंद केलं. आईसायब म्हनायचं म्हनं. दिवसा आईसायब आन रात्री दारु पिवून तिला मारायचं. वा रं दादासायब! मायला रांग सरकती काय नाय फुडं?" सदुनं बाहेर डोकावुन बघितलं. सार्वजनिक संडासाच्या लायनीत प्रणवदादांना बघून त्याला घाण मळमळलं.

आता पुढं कुणाला गाठावं या विचारात असतानाच सदुला गर्दी नियंत्रण करणारा मामा दिसला. सदु लहान असताना त्याला पोलिसंच व्हायचं होतं. खाकी शर्ट चड्डी, हातात प्लास्टीकची बंदुक, डोक्यावर इन्स्पेक्टरची टोपी या अवतारात त्याचे लहानपणीचे फोटो पाहाताना आता जरी त्याला लाज वाटत असली तरी मनात कुठेतरी सुप्त आकर्षण होतंच. नेहमीच्या मामांपेक्षा हा मामा बारीक आणि कमी उग्र होता आणि त्याच्याकडे फट्फट आवाज करणारी फट्फटीपण नव्हती. सदु त्याच्या मनात डोकावला.

"शिट्टी गेली
गेली गाडी
चड्डी गेली
गेली नाडी
तरीही मी उभाच

वॉकी गेली
टॉकी गेली
साहेब आले
येतच राहीले
तरीही मी उभाच

गाडी थांबे
ट्रॅफिक तुंबे
सिग्नल लोंबे
गर्दी झोंबे
तरीही मी उभाच"

पोलिस आणि कविता? सतत घसरणारी खाकी फुल्ल चड्डी, त्यात कोंबलेलं पोट आणि वरुन तो गोल प्रकार झाकु पाहाण्याचा आटोकाट प्रयत्न करणारं शर्ट नामक वस्त्र, डोक्यावर दिशादर्शक टोपी आणि गेस व्हॉट? दहा पंधरा दिवस न केल्याने वाढलेली कवी-दाढी आणि खांद्याला कवी-शबनम घेऊन मामा बुलेटच्या सीटावर डोकं टेकवुन कविता लिहीतोय! सदुला नुस्तं ईमॅजिन करुनही धडधडलं. कविता करणारा पोलीस या उपर त्याला सहन नाही झाला आणि तो निघाला. मग त्यानं शेजारच्या भाताच्या ढिगात डोकावायचा प्रयत्न केला. शब्दांची अगम्य रांगोळी ऎकून त्याने ताबडतोब पळ काढला.

चार सिटा सोडून पलीकडे कुणी मुलगी बसली होती. सदुनं कुणाला न समजेल अश्या रितीनं मान वाकडी करुन तिच्या आयडी कार्डवरचं तिचं नाव वाचलं रो-हि-णी कां-ज-र...मान दुखायला लागली तसा सदु थांबला. तिच्या मनात डोकावताना सदुला गुलाबी चोरट्यासारखं वाटलं पण तो घुसलाच. " काय तर प्रश्न आहे? ट्ट्म्म फुगणारी गोल पोळी कशी करावी? पोळी करुन तिला किंचित छिद्रीत करावे आणि त्यात फुग्यासारखी हवा भरावी!! ब्रम्हज्ञानी गुगलवर शोधायचं म्हटलं तर की-वर्ड काय टाकु? पोळी? की ट्ट्म्म फुगणारी गोल पोळी? पोळीला द्या गोळी, सासुमां की जय. त्या दिवशी त्या सायकलवाल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न न करते तर
आज या धुराड बशी ऎवजी कारने ऑफिसात येते. मी गाडी रस्त्याच्या काठावरुन चालवत होते, सायकल दिसल्यावर ओरडून सरकायला ही सांगीतलं पण मेला हलायलाच तयार नाही. आणि आमचा नवरोबा, मलाच शिव्या घालतोय. आता खिडकीची काच बंद आहे हे मला कसं कळणार? रस्त्याकडे बघायचं की खिडकीकडे असं विचारल्यावर नवरयाने काय तो लुक दिला! आणि कारचा भोंपु , तो मेला सापडत नाही ऎन मोक्याच्या वेळी. मरो. गेल्या गेल्या त्या टेस्टरला कोड द्यायचा आहे. मेला म्हणतो कसा म्याडम, बहुत डिफेक्ट आ रहे है...अरे गाढवीच्या मी डिफेक्टफ्री कोड दिला तर तुझा जॉब जाईला नां. मरो. गेल्या गेल्या आधी ट्ट्म्म फुगणारी गोल पोळी वर गुगल करायचं. नवरे लाडावुन ठेवल्याचे परिणाम..." "आता नवरयाचा, आणि मग सासुचा उद्धार!" सदुला पुढचा ट्रॅक बर्रोब्बर कळाला आणि तो तिथून घाईघाईने निघाला. स्त्री-मन नावाचं अगम्य कोडं किंचित कां होईना म्हणून त्याने देवाचे आभार मानले.

"च्यामायला, कापून ठेवलं असतं." सदुनं दचकुन आवाजाच्या दिशेनं बघितलं. गळ्यात कुत्र्याला घालतात तशी जाडसर पण सोन्याची साखळी, कवटीला ताण नको म्हणून उडून गेलेले केस, कर्कश्श काळा वर्ण, बाह्या वर ओढलेला लाल शर्ट आणि बुडाखाली शर्टच्याच रंगाची बाईक. "सापडलं असतं बेनं तर जित्तं नस्तं सोडलं पन पळून गेलं. च्यामायला, येव्हड्या वर पान्याच्या टाक्यावर चढनार कोन? भोसडीच्याला म्हायती असनार मला उंचावर चडायचं भ्या वाटतं म्हनून तिकडुनच पळालं." व्हर्टिगो असणारा गुंड पाहून सदुला धमाल मजा वाटली. एका उंचावर टांगलेल्या फ्लेक्सबोर्डावर ही स्वारीपण होतीच. अचानक गुंडादादाच्या नावामागं लागलेल्या पै. उपाधीचा उलगडा सदुला झाला. पै. म्हणजे पैलवान! कै. च्या चालीवर सदुनं गुंडादादाला पै.-पैगंबरवासी करुनच टाकलं होतं. हे भुत जिवंत पाहून सदुला पुढचा प्रश्न पडला. गुंडादादाच्या बाजुला चार-आठ शेणफडी मुलं होती. त्यांच्या नावामागंही पै.च होतं. १०-१५ वर्ष वयाची भुस्कट पोरं पाहून सदुला त्यांच्या दंडात बेटकुळ्या सोडून द्या टॅडपॉल तरी असतील का असा प्रश्न पडला.

सदुच्या प्रश्नांना तसा फारसा काही अर्थ नसतो. ते पडतात आणि गळून जातात.

बस हलली तसा सदु भानावर आला.

बस मधे बसलेले सारे सदु सावरुन बसले.खरं म्हणजे या गोष्टीचं नाव सदुची जादु, जादुचा सदु, मनकवडा सदु, सदा-सर्वदा-सदु असं काहीही होवु शकतं. पण सदु एकदम ऑर्डिनरी. सारे सदु एकदम शोधायचे तर वाईल्ड-कार्ड सर्च बरा पडतो म्हणून गोष्टीचं नाव सदु स्टार डॉट स्टार

Sunday, July 5, 2009

सुफी-(याना)-(नामा)

"आपल्याला मुलगी झाली तर आपण तिचं नावं सुफी ठेवु!" माझ्या गंभीर प्रस्तावावर उत्तरादाखल फक्त एक ठसठशीत मौन! याचा अर्थ कॅपिटल बोल्ड फॉन्टमधे "नाही" असा होतो हे सरावाने उत्तम संसारपट्टुला उमजुन येते. मुलगा झाल्याने नैसर्गिकरित्या प्रश्न सुटला.

कुठून आलं हे नाव डोच्क्यात? थोडासा मेमरी जॉग. कश्मिर दुरदर्शनवर झिंटबेबी नाचतेय "बुमरो बुमरो." पारदर्शी चेहरयाचा ह्रतिक खुप वर्षांनी तिला भेटायला आलाय. त्याची सहजगत्या थिरकणारी पावलं, साधेपणातूनही न लपणारं ग्रीक गॉडत्व, निरागस चेहरयामागचा दहशतवाद आणि तिचं ओसंडुन वाहाणारे हसु, त्याला भेटल्यावर देहबोलीतून अखंड पाझरणारा अविश्वास, आनंद, आश्चर्य यांचं भन्नाट मिश्रण. मंत्रावल्यागत तिचं नाव त्याच्या तोंडून बाहेर पडतं "सुफी..."

नव्हे; सुफीचा संदर्भ असेल तिथे पण उगम नाही. सम मोअर ब्रेन-ड्रॅग.

लख्खावलेले इंजिनिअरींगचे दिवस. नुसरतचा संगम कुठूनसा हातात आलेला.

जुल्फे उलझाए तो दुनिया परेशां हो
जुल्फे सुलझाए तो ये झिस्त आसान हो
जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं
रेशमी रेशमी अंबरी अंबरी

आणि मग खुळावल्यागतच झालं. सुफीच्या जन्मखुणा या इथल्या.स्वस्तात मिळणारया हार्मोनिअमवर पट्टी इतकीच झिजून गेलेली बोटं सराईत;
सुरांचं भान नाही की ते बेभान आहेत सांगणं कठीण;
ढोलकीचं कमावलेलं कातडं कडक वाजतय
"चढता सुरज धिरे धिरे ढल जायेगा"

टाळ्यांच्या कोरसला पार्थिव पार्श्वभुमी
पीर, थडगे
उद्ध्वस्त फकीराचा एकट दर्गा

साद-प्रतिसाद, सवाल-जवाब, फॉलो-थ्रु
रॉ किंवा सिनेमास्कोप
कव्वालीचा झिलकरी
गातच राहातोय

हराम वर्तनाला
धार्मिक वतन?
ऎकावं ते ते नवल!

"मैने काबे का हज कर के देख लिया"
कव्वाल, तुझ्या सहाशे वर्षाच्या इतिहासाचा भुगोल
बदलतोय

सिंहासनावरुन परमेश्वराला खेचलय कुणी
आणि काळजात खोचलय कुणी

प्रेयसीची गाणी समजता काफीर?
कंट्रोल एफ़ प्रेयसी रिप्लेस वुईथ बाप्पा
"तेरा तुझ को सौंप दे क्या लागत है मोर
मेरा मुझमें नाहीं जो होवत सो तोर"

सुफी,
ह्र्दयावर गोंदवावं
आत्म्याला पिंजून काढावं
वैराण फासळ्यांना अज्ञाताचं आव्हान करावं
इतका का परमेश्वर जवळ असतो तुमच्या सुरांच्या?
कंठाळ कोरस जाऊन ड्र्म्सचे प्लास्टीक, इलेक्ट्रॉनिक बीट्स आले
रागातून सारंगा, तुम्ही सरगम आणले
पण तुमच्या प्रार्थनांची मग्नता कश्यानेच मोडली नाही.
डोळे उघडावे कशाला?
"नैनों को तो डसने का चस्का लगा रे"
आतल्या आतच उघडतात आणि मिटतात तुमचे ऎहीक डोळे.
आतल्या आतच होतात तुम्हाला दिव्यत्वाचे साक्षात्कार.
दिव्याला पाहून नमस्कार.
सुफी,
तुमच्या सुरांनी भरती आलेले
समुद्र लपवताना तारांबळ उडते तेव्हा
आमचेही डोळे उघडतात आणि मिटतात आतल्या आत

Saturday, June 20, 2009

...आणि डार्लिंग

"आठवणी येताहेत जन्मापासून
जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. गर्भाशय हादरले,
तडकले, जागोजाग तेव्हाच्या.
आठवणी येताहेत तळघरातील भातुकलीच्या शेजारी
निवांत निजलेल्या अधोरेखित टिपणाच्या.
..
आठवणी येताहेत पहाडामागून, पहाडापूर्वीच्या.
एका उपनदीचे नाव डार्लिंग."
नदीला असतात आकार, उगम, अंत आणि काही नावे. मी अगस्त्य, समुद्र म्हणू तुला डार्लिंग? अट्टहास आणि परिणाम एकत्र तोलायचे नाहीत या जीवघेण्या बोलीवर तुझे अनंग अस्तित्व वसतीला आले माझ्या. शब्दहीन अर्थांचे पुंजके लगडले आहेत मेंदुला तेव्हा पासून. रंगीत पुंजके. निळे, हिरवे पिवळे उदाहरणार्थ अनंतपण, वासना आणि विरक्ती अनुक्रमे. आणि हो काळे आणि पांढरेसुद्धा. निम्बस; घनकल्लोळ काळेपणाला आकृतीबंधात गुंफणारा सोनेरी धागा, तो ही आहेच. रंगांचे इतके सहजी वर्गिकरण होणे नाही पण पॅलेटमधे कुस्करलेल्या रंगांच्या ट्युब्स काही तरंग सोडून जातात मनात. मी मुळचाच निसर्गवादी; पुज्य आणि सांख्य, धन आणि ऋण, निर्मिती आणि विनाश आणि हो, काळे आणि पांढरे एकत्रित आवडतात मला. या न्यायाने तुझ्या अनंग अस्तित्वाचे दुसरे शारीर टोक असणार कुठे तरी. शोधु म्हटले तर सापडणार नाही. आभाळ थोडेसे कलेल तेव्हा हाकेच्या अंतरावर थांबशील तू? कावळ्यांचे हाकारे रान उठवित नाहीत पण आत्ममग्न जंगलाची वीण उसवण्याचे सामर्थ्य असते त्यांच्या ओरडण्यात.तू अर्थ, माझ्या शब्दातीत, शब्दहीन कवितांचे. अनुभवांचे, प्रतिमांचे ध्रुवीकरण झाले की गाभूळलेल्या पावूस थेंबागत मेंदुच्या कुठल्याश्या पाकळीत हल्केच फुलतेस तू. डार्लिंग, तुला जशी शब्दांची तहान नाही तसे मलाही तुझ्या वैश्विकरणाचे मोह नाहीत.मैत्रिण आठवते मला. तिच्यावर रचलेले काही शब्दपुंजके, कविता म्हणते ती त्यांना, तिला भेट दिले कुणी. अपेक्षेपेक्षाही मला ते शब्दपुंजके दाखवुन वेडावण्याचेच भाव जास्त होते त्यात. काय साध्य करायचे असते त्यातून? माझी आत्ममग्न लय मोडण्याचे दुःसाहस? शब्दांची मायावी शक्ती? की डार्लिंग तुझ्या दुर्बोध, अशारीर अस्तित्वाला प्रत्यक्षात येण्याचे आव्हान?
"राम चालला पुढे असे जुनेच वाटले" आठवणी येताहेत जन्मापासून जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. अंधाराचा लख्ख कवडसा चमकतो क्षणभर. अहिल्येला मिळालेला शाप हे रघुरामाच्या स्पर्शापुरते निमित्त. स्पर्शाच्या साक्षात्कारात तुझे शब्दमल्हार, शब्दवेल्हाळ, शब्दगंधार अस्तित्व नव्याने उदयाला येते डार्लिंग आणि माझ्या कवितांना शब्दांचे शक्य आयाम मिळतात. तुझे आकार साकारताना माझ्या कविता देहचूर होतात.राजपुत्र


लडाखच्या वाळवंटात बौद्ध भिक्षुणी चोरुन जमिन उकरते. खोलवर आत दडवलेला आरसा काढून स्वतःचे तारुण्य न्याहाळते. मोहाशिवाय मुक्ती नाही हे तिला कळेल कधी तरी? काही गोष्टी उगाच आठवत राहातात.

राजपुत्राने आरसा पाहीला. प्रतिबिंबाच्या डोळ्याला डोळा देताना बुबूळात उमटत जाणारया अंतहीन प्रतिमांच्या इंद्रजालाची त्याला भूलंच पडली. कवितांचे अमानुष वादळ संध्याकाळभर घोंघावत राहीले.

Thursday, May 28, 2009

भिंतीवरचे काळे धुके

"शेवाळ्यासारखं बुळबुळीत काही अंधार अधांतर भिंतभर पसरत होतं. धुरासारखं असलं तरी वास नव्हता त्याला. पण डोळ्यांवर अदृष्याचा पडदा ओढण्याचं अचाट सामर्थ्य मात्र होतं; धुक्यासारखं; तेही काळ्या रंगाच्या धुक्यासारखं. बघता बघता डोळ्यांदेखत घरातली भिंत काळवंडत गेली. ’ते विषारी आहे’ एक मन आतून ओरडलं पण नजरबंदीच्या प्रयोगासारखे माझे डोळे काळ्या ठीक्क पडलेल्या भिंतीवरुन काही हलत नव्हते. कुणीतरी आकाशगंगेतलं एखादं कृष्णविवर भिंतीवर मायाजालासारखं पसरवावं तसं समोरच्या भिंतीवरच्या काळ्या धुक्याकडे माझे पाय माझ्या ईच्छेविरुद्ध मला ओढत होते. अम्मांनं हाक मारली नसती तर कदाचित मी त्या धुक्यात विरुनही गेले असते. भिंतीवरची ओंगळवाणी पाल एकदा मारली तरी आपल्या मनात ती कितीतरी वेळा तडफडत मरतच राहाते तसं काही तरी झालय मला. मी ते काळं धुकं विसरुच शकत नाही. काही तरी अशुभ, विषारी आणि दुष्ट आहे इथे. आम्ही हे घर लगेच सोडलं. पण इथे जो कुणी नवीन राहायला येईल त्याच्या साठी मी, शवर्री किणी, ही नोट ठेवत आहे."


मी सलग दुसरयांदा हे पत्र वाचलं. हल्ली मी छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होत नाही. पण हे पत्र वाचून मी अस्वस्थ झालो. रादर, माझ्या घराबद्दलं असं लिहीणारया शर्वरी किणीचा मला भयंकर राग आलेला आहे. याच किणीबाईंनी एक वर्षापुर्वी याच फ्लॅटसाठी आक्काच्या किती मनधरण्या केल्या होत्या! जुना फ्लॅट आहे म्हणून भाडं ही कमी करुन घेतलं होतं. लोक सोईस्कररित्या विसरतात आणि लोकांच्या अश्या वागण्यानेच माझा संताप संताप होतो. टेक अ डीप ब्रीद. ..संतापामुळे फक्त नुकसानच होतं. पण किणीबाईंच्या एपिसोड नंतर इथे भाडेकरु मिळणं कठीण झालय हे खरं. आजुबाजुची मुलं देखील इथून जाताना चट्कन न बोलताच घाईघाईने पुढे सटकतात. माझं ठीक आहे, माझ्या काही फारश्या गरजा नाहीत पण आक्काच्या एक्कलकोंड्या संसाराला याच फ्लॅटचा टेकू आहे. निदान तिच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून का होईना, या फ्लॅटमधे कुणीतरी राहायला यायला हवं. मिस्टर गुरुनाथ शब्दे, टेक अ डीप ब्रीद...सगळं काही ठीक होईल. किणीबाईंची नोट तुमच्याच हातात पडली हे किती चांगलं झालं!

तुमच्याशी बोलत काय बसलोय? पुढचा भाडेकरु यायची वेळ झाली तरी मी अजून इथेच हे कळालं तर आक्का खवळेल. घ्या! आलीच वाटतं मंडळी.

गुरुनाथ शब्देंनी दार आतून उघडायला आणि लॅचची चावी फिरवुन आक्का आत यायला एकच गाठ पडली. दारासमोरुन उड्या मारत जाणारी दोन लहान मुलं अचानक आलेल्या कुबट गार वारयानं गुदमरायला झाली आणि शब्दांचं ओझं असह्य झाल्यागत चिवचिवाट बंद करुन चुपचाप चालती झाली. व्हरांड्यात घू घू करणारी कबुतरं मरणांतिक भीतीनं आवाज न करताच उडून गेली. आक्कांनी सांडणारं हसु ओठ दुमडून तिथंच थांबवलं आणि भसाड्या आवाजात त्यांनी "या" असं आमंत्रण दिलं. गुरुनाथ शब्देंनी अंग चोरुन आक्कांना आत येऊ दिलं. त्यांच्या मागोमाग आलेल्या पाहुण्यांनां आक्कांनी निरस सुरात विचारलं "नाव काय म्हणालात तुमचं?"


"नयन महेश्वरी" शंकाच नाही. अहो शाळेपासून सोबत होतो आम्ही. अगदी दोन वेण्या ते पोनी टेल असा सारा प्रवास मी तिच्या सोबत केलेला आहे. गेली १-२ वर्ष मी तिला पाहीली नाही म्हणून काय झालं? नो मिस्टेक, नयनच ती. शाळा-कॉलेजातले कोणतेही ग्रुप फोटो तुम्ही काढून बघाल तर नयनच्या जवळपास मी दिसेनच दिसेन. नाही, तशी घट्ट मैत्री वगैरे नव्हती आमची. मुलींशी मैत्री म्हणता आक्कानी उभा सोलला असता मला. आक्का सोडून बाई माणसाशी बोलण्याचा प्रसंगच आला नाही कधी. खरं तर हिंमत झाली नाही असं म्हणायला हवं आणि ..जाऊच द्या.

काही दिवस सुरळीत गेले पण नंतर..

नयन बेचैनपणे कुस पालटत राहीली. या जागेचे संकेत आणि ऎकलेल्या अफवा तिला अस्वस्थ करत होत्या. दाराच्या उंबरयावरच खिळा धसून पाऊल रक्ताळले होते तिचे. नवाच गृहप्रवेश केल्यासारखी पावलं उमटली होती तिची घरभर. आणि यावर त्या घरमालकीणबाई म्हणाल्यापण,"कशी लक्ष्मीसारखी पावलं उमटलीत. घर लाभणार तुम्हाला. आता काही सोडत नाही तुम्ही हे घर". आपण घराला की घर आपल्याला सोडणार नाही? नौकरीचा हट्ट न करतो तर आज स्वतःच्या घरात आपण झोपलो असतो, नयनने सुस्कारा टाकला.

नयनला लाभायलाच हवं हे घर. तुम्हाला सांगतो, स्वतःच्या घरापासून असं दूर राहून नौकरी करणं सोपं असतं का? मला वाटतं आय शुड स्पीक विथ हर. आक्काला अजूनही ते आवडणार नाही पण तिच्याशी मी बोललो तर तिला कदाचित एकटं वाटणार नाही. एकटेपणाबद्दल तुमचा काही अनुभव?

कुजत चाललेलं स्थिर पाणी, त्यावर शेवाळ्याचा हिरवट काळसर जाड थर. एखादा खडा उडून आला तर त्याला शोषून प्रत्त्युतरादाखल पाण्याचा एखादा थेंबही न उडवणारा असह्य डोह. जुन्या, अस्पर्श पाण्याला वासनेची डूब असते. ते अंगाला लागले की पाण्यालाच तहान लागते देहाची. स्पर्शासारखे देहभर पसरत जाते ते आणि उभ्या देहाचे पाणीच करुन टाकते. नयन अर्धवट जागी झाली ती अश्या काही तरी भयंकर विचित्र स्वप्नामुळे. तिच्या पलंगभर शेवाळलेले पाणी पसरले होते.

हे गुरुनाथ शब्देचं घर आहे? आक्कांना भेटून आल्यावर कितीतरी वेळ नयन विचार करत होती.
गु.. रु.. ना.. थ.. श.. ब्दे. गु..रु..लहानपणापासून तिच्या वर्गात असणारा एक किडूकमिडूक नगण्य मुलगा. भेदरल्या डोळ्यांचा आणि ज्याचे शब्द कधी ओठापर्यंत आलेच नाहीत असा मुलगा. ज्याने...

...ज्याने एक वर्षापुर्वी गावाबाहेरच्या जुनाट डोहात आत्महत्या केली तो गुरुनाथ शब्दे! नयन, आयुष्यभर तू कधी तरी माझ्याशी बोलशील याची मी वाट पाहीली. प्रत्येक फोटोत आपल्या आजुबाजुला धडपडणारा, मुकाटपणे परस्पर तुझी कामं करणारा सश्याच्या काळजाचा मुलगा तुला कधी तरी आवडेल असं मला वाटत राहीलं. पण तू तुझ्या जगात मश्गुल राहीलीस. मग मी हिंमत करुन आक्काला तुझ्याबद्दल सांगीतलं. बेभान आक्काचे अशुभ शब्द आठवले की अजूनही काटा येतो अंगावर. शब्दांनी शब्द वाढले आणि नकळत आक्काच्या प्रौढ कुमारीपणाचा उल्लेख झाला. तिरमिरीत आक्कानं तापल्या तेलाचं भांडं ढकललं आणि अंगभर आयुष्यसरुन उरणारया वेदनांचा डोंब उठला. संतापाच्या भरात दाह मिटवणारं पाणीच जवळ केलं मी. त्या शेवाळलेल्या गर्द काळ्या पाण्याने सारं देहपणच नष्ट केलं आणि तरीही फिरुन इथेच आलो मी, सारया अपुरया ईच्छा, वासना घेऊन, माझ्याच घरात. नयन, तुला आठवतय नां?

नयन बधीर होऊन पलंगाच्या काठावर बसली होती. परत परत हातातले फोटो चाळूनही तिला त्यातला गुरुनाथ शब्दे नक्की ओळखु येत नव्हता. खोलीभर पसरलेल्या अनंत शांततेचा कोलाहल तिला असह्य होत होता.

टेक अ डीप ब्रीद गुरुनाथ..तिला आठवेल. नाही आठवतय तिला. टेक अ डीप..श्वास नाही पुरत आता. टेक अ..श्वासाची गरजच नाही गुरुनाथ आणि नयनचा श्वास कोंडायला...

...बघता बघता खोली निर्वात होत गेली. नयनला वाटलं भिंती जवळ जवळ येऊन तिला चिणून टाकतील. अंधारातही भिंतींचं काळं होणं लपत नव्हतं. घरभर धुकं पसरत होतं. ओलं, शेवाळी, काळं धुकं.

Wednesday, May 20, 2009

धार्मिक वगैरे वगैरे

"आपण धार्मिक आहोत का?"

गेले कित्येक महीने, कदाचित वर्षं, हा प्रश्न विक्रमाच्या वेताळासारखा माझ्या मानगुटीवर बसला आहे. आज ते भूत परत नव्यानं उगवुन आलं याचं कारण नुक्तंच एका पुस्तकाचं वाचलेलं ब्लर्ब!

थोडं मागं वळून बघायचं तर मी संघाच्या शाळेत शिकलो. अगदी दहावी पर्यंत खाकी चड्डी घातली. शाखेत कधीच गेलो नाही पण शाखेत जास्त आणि शाळेत कमी असणारया मास्तरांवर मनापासून प्रेम केलं. पण म्हणून मी संघिष्ट किंवा कुठलाच पोथीनिष्ठ झालो नाही. पर्यायानं संघाची शाळा माझं कसलंही धार्मिक ब्रेन-वॉशिंग करु शकली नाही. मग मी धार्मिक नाही का? सर्वसाधारणपणे आपण कुणीतरी नसतो म्हणजे ते सोडून दुसरं कुणीतरी असतो (सोप्पय!). मी कम्युनिस्ट असुच शकत नाही कारण तेव्हढा झापडबंद मी कधीच नव्हतो.मग मी समाजवादी आहे का? आमच्या घरी य वर्षं साधना मासिक यायचं. एस. एम, नानासाहेब गोरे, सानेगुरुजी ही आई-दादांची दैवतं होती. पण काही अपवाद वगळता समाजवाद्यांची ढोंगं फार उघड दिसायची. कित्येकांचं दुटप्पी वागणं, उरलेल्या थोड्यांचं कधी अगतिक आणि जास्त करुन अव्यवहारिक वागणं समाजवादाच्या मर्याद्या उघड करायचं. डार्विन वगैरे बुवांनी तर सर्व्हावय ऑफ फीटेस्ट सांगून सर्वजण सारखे वगैरे थोतांडातली हवाच काढली. अंधेरे मे एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश या घोषणा आणि ते नेते भिंतीवरच्या कॅलेन्डरवरच राहीले. त्यांचे राजकिय अन्वेषार्थ निराळे पण माझ्या मानेवरच्या वेताळाच्या प्रश्नाचं उत्तर हे नव्हे. थोडक्यात विचारसरणी, राजकीय, सामाजिक बांधीलकी आणि धार्मिकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे निदान माझ्यापुरतं तरी मी स्पष्ट करुन टाकलं.

मग मी अजून अस्वस्थ होतो. एक सोपं उत्तर शोधायचा माझा पहीलाच प्रयोग फसलेला असतो. ज्या पुस्तकानं गडे मुडदे उखडले ते पुस्तक काहीतरी हिंदुइझम असं वर्णन करतं. हिंदुइझम ? सोशल-इझम, कम्युनि-इझम हे मी समजु शकतो. त्या त्या जीवनपद्धतींबद्दल/ समाजपद्धतींबद्दल हे ईझम आहेत. शब्दबद्ध करावी इतपत युनिफॉर्म आपली जीवनपद्धत/ समाजपद्धत आहे? प्रश्नातून उलगडणारे प्रश्न जास्त टोकदार आणि अंतर्मुख असतात. मुळात ज्या बेसवर हा सो-कॉल्ड ईझम टेकला आहे तो तरी युनिफॉर्म आहे? जसा जसा विचार करावा तसं तसं याच उत्तर जास्त जास्त नकारार्थी येतय. कोणत्याही धर्माला एक सुप्रीम-देव असतो. ख्रिश्चनांना जिझस, मुस्लिमांना अल्ला तसा हिंदुंना? अनंतकोटी!! वैष्णवांच्या देवाचं नाव घ्याल तर शैव खवळतात. ग्रामदैवतं, अघोरपंथी, जाती-जातींचे, प्रांता-प्रांतांचे असंख्य देव असे निर्नायकी असावेत? विशेषतः हाडा-मांसाच्या राजात देव मानणारया आपण भारतीयांचे देव मात्र राजा शिवाय असावेत हे जरा विचित्रच! धर्माचा एक मार्गदर्शक असा धर्मग्रंथ असतो जो त्या समूहाचे नियम, कायदे बनवण्यात मदत करतो. गंभीर प्रसंगी त्याच्या हवाल्यावर गंभीर आणि दुरगामी परिणाम होऊ शकणारे निकाल दिले जातात. त्या त्या समुहाच्या घरा-घरात बायबल, कुराण इ. ग्रंथ दिसतात. हिंदु धर्माच्या कोणत्या पुस्तकाला एकमुखानं धर्मग्रंथ म्हणावं? आणि हे म्हणणं आपल्या नियमांत परावर्तित व्हावं? माझ्या घरातल्या शेकडो पुस्तकांत मला कधीच रामायण, महाभारत किंवा भगवतगीता सापडणार नसते. धर्माला काही मुखंड असतात. देवाचे काही लाडके, ज्यांना देवा कडून डायरेक्ट ऑर्डरी मिळतात म्हणे, ज्यांना धर्मग्रंथाचं आपण पामरापेक्षा जास्त आकलन असतं म्हणे. इन-शॉर्ट, देवानं त्यांना खास निवडुन दिलेलं असतं, त्याचं रिप्रेझेन्टीव्ह म्हणून (असं त्यांना वाटतं!). पोप,खोमिनी अशी ही लाडकी व्यक्तिमत्व. कदाचित आपले देव अनंतकोटी असल्याने, त्याचे दुतही अनंतकोटी असतील. थोडक्यात, याही कसोटीवर हिंदु धर्म फेल. धर्माची, धर्मग्रंथाची म्हणून एक भाषा असते. भले ही ती भाषा त्या धर्माच्या लोकांना नीट येत नसेल पण ती एक अधिकृत भाषा असते. आपल्याकडे भाषा किती हे धड देवालाही सांगता येईल की नाही सांगणे कठीण. धर्म कडवट असतात. धर्मांना आतून पंथांच्या, जातीच्या पालव्या फुटतात पण एका धर्मात दुसरा धर्म मिसळलाय याची उदाहरणे विरळाच. शिख धर्म, जैन धर्म, बुद्ध धर्म ज्या पद्धतीने हिंदु धर्मात मिसळले आहेत ते पाहाता त्यांना हिंदु धर्मातील एका पंथाचे रुप आले यात नवल नाही. आणि असे असंख्य तुलनात्मक मुद्दे मांडता येतील.

मग माझी धार्मिकता ठरवणारा हा माझा धर्म नक्की आहे तरी काय? इट्स जस्ट अ रॅपर! आपली खरी ओळख, धर्माच्या आधारे नसून जातीच्या आधारे आहे हेच खरे. या असंख्य जाती समुहांना काही सामुदाईक रुढी, रिवाज, रिती यांनी बांधून ठेवणारं रॅपर म्हणजे हिंदु धर्म. धर्माची व्याख्या जशास तशी जातीला लागु होत नाही. पण जातीची मुख्य ओळख रोटी-बेटी व्यवहार, एक भाषा, जगण्याची बरयापैकी एक सारखी तरहा अशी आहे. शिवाय जातीला प्रादेशिकवादाचं आणखी एक अस्तर आहेच. कदाचित याच मुळे धर्माच्या नावाने केलेलं राजकारण इथे फोल ठरतं पण जातीनिहाय मागीतलेला मतांचा जोगवा यशस्वी ठरतो. कदाचित याचमुळे हा धर्म कधी कडवट बनला नाही की उन्मादक भाषणांनी इथे कुणी फार काळ कुणाची डोकी पिकवु शकला नाही. कदाचित याचमुळे इतका पुरातन असूनही हा धर्म जगभर वाढला नाही. कुण्या त्रयस्थ माणसानं हिंदु धर्म स्विकारायचा ठरवला तर त्याला कुठली तरी जात स्विकारावी लागेल, धर्म नव्हे.

विक्रमाचे मौन तुटलेले पाहून वेताळाने नेहमीचे विकट हास्य केले आणि तो परत झाडाला जाऊन लटकला.

धार्मिक अवडंबर, उन्माद, गुरु-बुवांचं उदात्तिकरण आणि जगण्यातलं कुतुहल हरवुन टाकणारा ठक्क कोरडा भोगवाद याच्या अधेमधे कुठेतरी एक रॅशनल, माणुसपणाच्या पातळीवर जीवंत असतो, तो माझा धर्म!

Sunday, April 26, 2009

नाचु आनंदे


खुप सारी वाट पाहाणे
उत्सुकता चिंता
प्रार्थना
आनंद
नवा जीव
जागरण दुपटी लंगोट
पेढे जॉन्सन पावडर तेलपाणी सल्ले चौकश्या
अधून मधून लाल गुल्मोहर
पिवळा बहावा
आनंद..

Friday, April 10, 2009

मुक्ताची डायरी

दि. १ फेब्रु

//श्री गणपती प्रसन्न//

शाळेत बाईंनी डायरी लिहीण्याचं महत्व सांगितलं. गुरु म्हणजे देव म्हणून तर बाईंचं ऎकलं पाहीजे. काही वाईट मुले त्यांचे ऎकत नाहीत. देव त्यांना नरकात पाठवेल हे नक्की. माझं बघून सईनं पण डायरी लिहायचं ठरवलं आहे. म्हणजे ती पण नरकात जाणार नाही. आम्ही सतत एकत्र असतो. ती नरकात जाणार नाही हे कळल्यानं मला मस्त वाटलं.

कु. मुक्ता फडणिस,
इ. ३री अ

दि. २ फेब्रु

काल आईला डायरी दाखवली. ती म्हणाली की असं गणपती प्रसन्न वगैरे लिहायचं नसतं आणि दरवेळी पानाखाली नाव आणि वर्ग लिहायची पण गरज नसते. पण मग ही माझी डायरी आहे हे कसं कळणार? आणि मी ३री अ त म्हणजे हुशार मुलांच्या वर्गात शिकते हे कसं कळणार? मग तिने वहीला निळ्या रंगाचं कव्हर घालून दिलं आणि त्यावर मोठ्या अक्षरात मुक्ताची डायरी असं लिहून दिलं. मला मस्त वाटलं. आईचं सगळंच मस्त असतं. तिचा गोरा गोरा रंग, तिच्या हातचा खाऊ, तिचा गोड आवाज एकदम मस्त. पुष्करदादा आणि अन्यादादा तिच्याच सारखे गोरे आहेत पण मी बाबांसारखी आहे, गव्हाळ रंगाची. पुष्करदादा म्हणतो असा काही रंग नसतो (मी रंगाच्या पेटीत बघितलं. मला गव्हाळ रंगाचा खडू नाही दिसला म्हणजे तो खरं बोलत असणार) आणि अन्यादादा मला काळी म्हणतो मग मला फार वाईट वाटतं. मी आईसारखी गोरी का नाही?

दि. १२ फेब्रु

सईनं डायरी लिहीणं थांबवलं. मला ती नरकात जाईल अशी सारखी भिती वाटते. खरं तर मला ही रोज काय लिहायचं कळतच नाही. गेले पाच सहा दिवस मी नुस्तंच शाळेत गेले, जेवले असंच लिहीत आहे. मग मी बाईंना विचारलं. त्यांना सगळं माहीत असतं. त्या म्हणाल्या की रोज नाही लिहीलं तरी चालेल. ज्या दिवशी मनाला वाटेल त्याच दिवशी लिहीलं तरी चालतं. आणि त्यांनी सांगीतलं की आपली डायरी कुणाला वाचायला द्यायची नाही. ती गुप्त ठेवायची. हे मला मस्त वाटलं. मी ती माझ्या कपड्यांच्या कपाटात ठेवली. पण अन्यादादा सारखं घर उचकत असतो म्हणून त्या डायरीवर आडा-मोडा-शनिवारी-पाय तोडा असा मंत्र पण घालून ठेवला आहे. अन्यादादाचा पाय तुटला तर? मला खुप भिती वाटली. डायरी अदृष्य करायचा मंत्र मिळाला तर बरं होईल. सईला विचारायला पाहीजे. बाईसारखं म्हणतात सईला नको तिथे जास्त अक्कल आहे म्हणून


दि. १ मार्च

परिक्षा आल्या. खुप अभ्यास करायला पाहीजे. नंबर आला नाही तर बाई सरळ क तुकडीत घालतील

दि. १५ मार्च

परिक्षा झाली की दुसरया गावाला जायचं असं बाबा रात्री आईला सांगत होते. म्हणजे काचकांगरयांसाठी रंगीत काचा जमवायला वेळ आहे अजून. सईच्या गावाकडची एक बहीण येणार आहे. ती आम्हाला अजून मस्त खेळ शिकवणार. मस्त! मी पुष्करदादाला विचारलं तर वस्सकन अंगावर आला आणि म्हणाला डफ्फर तुला कश्याला उचापती हव्या? आपली ट्रांफर झालीए. मला काहीच कळालं नाही. तो नेहमीच असा वसवस करत असतो. आई तर नेहमी म्हणते अरे तुम्ही सख्खी भावंडं नां? किती रे भांडता. पण त्याचं मुळी माझ्यावर प्रेमच नाही. आणि आता त्याला खुप अभ्यास इंग्रजीतून असतो (इ. ७वी ब, हुशार मुलांचा वर्ग) त्यामुळे तो अजून फुशारक्या मारतो. अन्यादादाला विचारलं तर तो म्हणाला डफर म्हणजे मुर्ख आणि त्याला काही ट्रांफरचा अर्थ सांगता नाही आला. अन्यादादा आत्ता ५वी ब त आहे. त्याला थोडंस इंग्रजी येतं. मला खुप राग आलाय. बरं झालं आपण इंग्रजांना हाकलुन लावलं

दि १ एप्रिल

आमची ट्रांफर झाली म्हणजे बदली झाली असं आईनं सांगीतलं. म्हणजे नवीन गावाला जायचं आणि इथे परत कध्धी नाही यायचं. सई म्हणाली एप्रिलफुल केलं असेल पण आई कध्धी खोटं बोलत नसते. मला सारखं रडू येतय

दि १८ एप्रिल

आमचं सामान बांधणं सुरु आहे. मी खुप रडले. मी रडले की सगळेजण अगदी पुष्करदादापण माझं ऎकतो. पण यावेळी कुणीच माझं ऎकत नाहीए.

दि १९ एप्रिल

आम्हाला सईच्या आईनं जेवायला बोलावलं होतं. मला आवडतो म्हणून आंब्याचा रस केला होता. रस मस्त होता पण मला सारखं रडू येत होतं. मग आई म्हणाली सईला आपल्याकडे झोपायला घेऊन जाऊ. सई एकदम डफ्फर आहे. इतक्या जवळच्याजवळ यायला पण तिने मोठ्ठी ब्याग घेतली.

दि १९ एप्रिल

मी आज दोनदा डायरी लिहीली.
सई एकदम भारी शुर आहे. तिने ब्यागेत कपडे भरुन आणले आहेत. ती आमच्याबरोबर पळून येणार आहे. मला तिचा एकदम लाड आला. मी माझी पिंकी बाहूली तिला देऊन टाकली. सईला ती टकली आणि हात मोडकी बाहूली फार आवडते. जर ती आमच्याबरोबर येणार असेल तर पिंकी बाहूली पण सोबतच असेल. मला आता बरं वाटतय. सईनं मला आईशप्पत घातलय. मी ती आमच्याबरोबर पळून येणार आहे हे कुणालाच सांगणार नाही. शप्पत मोडली की ज्याची शप्पत असेल तो मरतो

दि ३ मे

आम्ही आता नव्या गावात आलो आहोत. पण आम्ही इथे येताना खुपच तमाशा झाला. आम्ही सामानाबरोबर ट्रकमधे बसूनच जाणार होतो. मला मस्त वाटलं. सईपण कधी ट्रक मधे बसली नव्हती. पण ट्रक सुरु व्हायच्या आधी बाबांनी तिला उतरवून तिच्या आईकडे दिली. तिची ब्याग पण दिली. आमचा ट्रक जोरात जात होता आणि मागे सई रडत जोरजोरात पळत होती. पळता पळता ती पडली आणि पूर्ण रस्ताभर तिची ब्याग सांडली. रस्ताभर तिचे कपडे, रंगीत खडू, खेळंपाणीतली भांडी सांडली होती. मी पण जोरात रडून दिलं. माझी पिंकी पण तिच्याचकडे राहून गेली

दि १ जून

आम्ही नव्या गावात परत घर बदललं. आधीच्या घरापेक्षा हे घर आणि आजुबाजुचे लोक चांगले आहेत. आमच्या घराच्या एका कोपरयात मोठ्ठी विहीर आहे. तिकडे अजिबात फिरकायचं नाही असं आईनं बजावून ठेवलं आहे. तिथे बहुतेक भुत असावं. विहीरीत भुत असतं असं सई सांगायची. कोरेआप्पांनी तिथे काट्याची झाडं लावून ठेवली होती. कोरेआप्पांची मुलं खुप वांड आहेत असं आई बाबांना सांगत होती. काट्याच्या झाडांवरुन उडी मारुन ती विहीरीपाशी जायची आणि आत दगड टाकायची. त्यांची विहीर असली म्हणून काय झालं? भुतांना थोडंच कळतं ते?

दि १२ जून

पुष्करदादाबरोबर आज नवाच मित्र घरी आला होता. आमच्या घराच्या बरोब्बर मागे त्याचं घर आहे. पुष्करदादा त्याच्याबरोबर परत इथेही गाण्याच्या क्लासला जाणार आहे

दि १७ जुलै

अभ्यादादा एक्दम मस्त आहे. तो पुष्करदादाला पुश म्हणतो, अनुदादाला अन्या आणि मला मुक्ते, मुक्ती, मुक्ताताई, मुक्ताडे असं काहीही म्हणतो. अभ्यादादा आणि पुशदा सकाळी उठून रियाज करतात. अभ्यादादा पुशदाला आवाज द्यायचा असला की त्याच्या खिडकीतून कूऊ ss ऊ असं ओरडतो मग पुशदा पण तसंच ओरडतो. मग ते गाणं सुरु करतात साजन मोरा ss घर नहीss इss आया. एकदम डफर आहेत. सगळ्यांची झोप उडते पण यांचं आपलं साजन मोरा सुरुच असतं

दि १३ ऑगस्ट

मला आता अभ्यादादा आणि पुशदाची सगळी गाणी पाठ झाली आहेत. ना जाओ बालम किंवा रसिया तुम बिन एकदम मस्त. त्यात शब्दच नाहीत. नुस्तंच आ ऊ किंवा नि ग सा रे असं म्हणावं लागतं. मी जोरजोरात कधी कधी ती गाणी म्हणत असते मग अभ्यादादा म्हणतो मुक्ताताई, असा कुठलाही राग कधीही नाही म्हणायचा त्यांना राग येतो बरं. पुशदा माझ्याशी कध्धी असं नाही बोलत. पुढच्या जल्मी मला अभ्यादादासारखाच भाऊ मिळो

दि १७ ऑगस्ट

मला आता बरं वाटतय. म्हणजे नां त्या दिवशी काय झालं आम्ही काही मुली पंधरा ऑगष्टसाठी फुलं जमा करत होतो. मी मुद्दाम आईने शिवलेला परकर पोलका घातला होता कारण त्याच्या ओच्यात खुप फुलं जमा करता येतात. पण आमच्या अंगणातली सगळी फुलं कुणीतरी आधीच तोडली होती. आता काय करायचं? कोरेआप्पांच्या अंगणात खुप फुलं होती. आपल्या सगळ्यांचा देश एक नां? मग पंधरा ऑगष्टसाठी चार फुलं घेतली तर काय होतं असं म्हणत आम्ही मुली तार वर करून त्यांच्या अंगणात शिरलो आणि फुलं तोडायला लागलो. माहीत नाही कुठून पण अचानक मंग्या तिथे आला. मंग्या म्हणजे कोरेआप्पांचा वांड पोरगा. आला आणि सरळ आमच्या मागेच लागला की. म्हणे आमची फुले का तोडता. मंग्या एकदम बिनडोक आहे असं पुशदा म्हणतो. एकदम दगडच फेकून मारतो म्हणे. आम्ही सरळ पळतच सुटलो. तारेतून पळताना माझा परकराला खोच पण लागली. मागे वळून मंग्याकडे बघत पळताना अचानक समोर विहीरच आली की. मंग्यानं खुप रागानं मोठ्ठा दगड उचलला अन फेकला की विहीरीत आणि वर तुलाही असंच फेकेन असंही म्हणाला. माझी तर तंद्रीच लागली. विहीरीतलं काळं पाणी गोल फिरत अचानक गार हवा बनून माझ्याभोवती फिरायला लागलं. मग त्या पाण्याला निळा आणि मग हिरवा रंग सुटला. रंगांच मग गर्र्गट झालं आणि परत सगळं पाणी काळं झालं. असं वाटलं आपल्याला कुणीतरी बोलवतय. खुप प्रयत्नांनी मी डोळे उघडले तर मी पलंगावार झोपले होते. मला म्हणे चक्कर आली होती आणि पुशदानं तिथून मला उचलून आणलेली.

दि २१ ऑगस्ट

माझा ताप उतरत नाहीए. पुशदानं मंग्याला बडवला म्हणे. आईला वाटतय की आम्हाला हे घर सोडून जावं लागेल. पुशदाची गाण्याची परिक्षा आहे पण माझी झोप मोडू नये म्हणून तो प्रॅक्टीस नाही करतए. अभ्यादादा आणि तो रोज मारुतीला जातात. त्यांच्या कपाळावर मस्त शेंदूर असतो.

दि २९ ऑगस्ट

पुशदा मला बरं वाटावं म्हणून रोज मारुतीला जातो आहे. देवा, मला सतत पुशदा सारखा भाऊ मिळो

दि १० सप्टे

आज आम्ही पुशदाच्या गाण्याच्या परिक्षेला गेलो होतो. त्याच्या गळ्यातून आवाजच निघत नव्हता. आईला वाटलं त्याने रियाज केला नाही म्हणून तसं होत आहे. नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो.

दि १२ सप्टे

डॉक्टर म्हणाले की पुशदाचा आवाज शेंदूरामुळे गेला आहे. म्हणजे यानं कपाळाचा शेंदूर खाऊन बघितला की काय? मी आईला विचारलं तर ती मला जवळ घेऊन रडायलाच लागली. मी खुप घाबरले आहे.

दि २२ सप्टे

पुशदा म्हणाला की मुक्ते जिथे मी गाणं सोडलं तिथून तू सुरु करायचं. आता अभ्यादादा आणि मी रियाज करतो. काय माहीती तुम बिन चैन न आए म्हणताना आमच्या तिघांच्याही डोळ्यात पाणीच येतं

Sunday, March 29, 2009

माया

हिवाळ्यातील तहानेचे संकेत जरासे निराळे
त्यात तगमग नसते उन्हाळी
निवून जाण्याचे सोसही नसतात
तुझ्या गुणसुत्रांची मांडण
कदाचित तशीच;
तालबद्ध अवरोहांची
विलंबित लय.

तुटण्याचे भय आणि
जोडण्याची उत्कटता
समेवर पेलतात
तुझे मायावी हात..

हात..
बर्फाचे
अभ्रकशुभ्र..
किंचित पारदर्शी
आणि संदिग्धही..

माझ्या देहचूर कविता
झाडात चंद्र अडकावा तश्या
उसवतात
तुझ्या स्पर्शातून

स्पर्श...
बर्फाचा..
अस्तित्वाचे दंश
पुसून रक्ताशी
एकरुप होणारा
वंशहीन..
हिवाळी ओल्या तहानेसारखा

तुझ्या भरतीचे एक वतन माझ्या
हवाली करताना
फकिराच्या वासनेचा उरुस
तुझ्या दिठीत
पाहीला मी

आणि तेव्हापासून
माझ्या चेतनातंतूंवरुन
वाहाताहेत तुझे
ओले स्पर्श

Sunday, March 22, 2009

नाव देण्याचा कंटाळा आल्याने नाव न दिलेले पोस्ट

परवाच्या लोकसत्तात दहावीची परिक्षा झाल्यानंतर बर्फाचा गोळा खाणारया हुश्श्य आणि खुश्श्य अश्या तीन मैत्रिणींचा फोटो आला होता. तो बघून आनंद आणि हेवा असं काहीसं एकत्र वाटलं. कुठलीही आनंदी माणसं दिसली तरी मला आनंद होतो. नुस्ती माणसंच का, आनंदी मूडचं गाणं किंवा एखादा आनंदी प्रसंग पाहीला तरी का कोण जाणे पण रक्त अचानक निळसर गुलाबी होतं असं मला सारखंच वाटत आलय. आणि इथे तर परिक्षा नावाच्या राक्षसाचं मर्दन करुन आलेल्या तीन मैत्रिणी! फुल ऑफ युथ!! कसलेही ताण नाहीत, भविष्याची चिंता नाही, मैत्रीचं अजब गारुड अजूनही गळेकापु स्पर्धेपासून अलिप्त ठेवू शकतं!! बोला राव, अजून काय हवं असतं कधी कधी आनंदी असायला? आणि हो, पुढचे दोन-तीन महीने निवांत सुटी! आणि माझ्यातल्या रिंगवाला एजंल इथे संपतो आणि शिंगवाला राक्षस जागा होतो! आम्हाला का म्हणून नाही सुट्या? पोरांएव्हढंच उन, किंबहुना जास्तच आम्हाला लागतं (कारण एसीच्या सवयी), आम्हालाही पोटाला तडस लागेपर्यंत आब्यांचा रस खाऊन दुपारी डाराडूर झोपावं वाटतं, मामाचा गाव आम्हालाही असतो, निवांत वाचायची म्हणून जमा केलेली पुस्तकं, जमा केलेले सिनेमे, गाण्याचे छंदबंदंवाले क्लास अश्या तुंबून स्तब्ध झालेल्या लिस्टा आमच्याही तयार असतात. आता बोला, आम्हाला का नको सुट्या? मी मघाशी हेवा वाटतो म्हटलं तो या कारणांसाठी. कामं काय सुरुच राहाणार.

यावरुन आठवलं. परवा कुठेतरी बीबीसीचा एक सर्व्हे वाचला. समजा दिवस २४ ऎवजी २५ तासाचा झाला तर जास्तीच्या एक तासाचं काय कराल? भारतीय माणसाचं प्रातिनिधिक उत्तर म्हणे त्या एक तासात जास्त काम करु असं होतं! आपली लोकसंख्या पाहीली की भारतीय माणूस किती कामसु आहे हे कळतंच अन काय! डोंबल..

याच सर्व्हेत अजून कुण्या देश्याच्या लोकांनी व्यायाम करु,खेळ खेळू अशी (निराशाजनक) मनोगत व्यक्त केली आहेत. माझ्यासारख्या अ-खिलाडु (वृत्तीच्या नव्हे, सदेह)माणसाला यात काय गम्य? शाळेत असताना खेळाचा तास हा राठोड सरांना तंबाखु खायची सोय म्हणून ठेवलेला असतो यावर आमचा ठाम विश्वास होता. नाही तर खेळाचं एकही आयुध शाळेत नसताना आम्हाला नियमितपणे खेळाचा तास उगाच का असणार? मधेच एकदा उगाच क्रिकेट खेळण्याचं फॅड आलं. कुणीतरी म्हणालं की कॉर्कचा बॉल हत्तीच्या पो (शी!) पासून बनतो. आमच्यातील काही महाभाग ताज्याच आलेल्या सर्कशीतल्या हत्तीवर बारीक नजर ठेवून होते. पण बहूदा त्या हत्तींची पचनशक्ती दांडगी असावी किंवा त्यांना खायला देत नसावेत कारण त्यांना शेवटपर्यंत "तसं" काही मिळालं नाही. शेवटी होम-मेड कॉर्क बॉल ऎवजी बाजारातून रेडीमेड बॉल आणून आम्ही खेळायला सुरुवात केली. तर मुद्दा असा की खेळाविषयीचं प्रेम हे असं. उन्हाळ्यात दुपारचं बाहेर कुठे पडता म्हणून बैठे खेळ खेळु म्हणाल तर साप-शिडीतले साप त्याची सापीण मारल्यागत डूख धरुन आम्हाला नव्वदीवरुन थेट पटलाच्या सुरुवातीलाच आणून पोचवायचे. कुठल्या पत्त्याचा कुठला कोपरा दुमडला आहे किंवा कसं हे ध्यानात धरुन अट्टल पत्तेबाज बरोबर हुकुमाचं पान ओढून घ्यायचे किंवा उजवी भुवई खाजवली की बदामची राणी हे असलं बाईलबाज काहीतरी लक्षात ठेवायचे. आमची ट्रेकींगची आवड जो किल्ला सकाळी दहानंतर उघडतो, जिथे दर वीस फुटावर चमचमीत काही तरी खायला मिळतं, जिथे ऎतिहासिक बघण्यासारखं काहीही नसतं, ज्याला शक्यतो इतिहास-भूगोल नसतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथे शेवटपर्यंत गाडी चढते अश्याच स्थळांपर्यंत मर्यादित आहे. अश्या ठिकाणी भिंतींवर मनोरम मजकुर असल्यास प्राधान्य. वाचनाची आवड अन दुसरं काय!

वाचनावरुन आठवलं, परिक्षेहून घरी आलं की पहीलं काम असायचं पुस्तकांची यादी तयार करणे. कॉलेजची लायब्ररी आपलंच वतन असल्यानं सायकलला भल्या थोरल्या दोन पिशव्या लावून सकाळी सकाळी कॉलेज गाठायचं. आधी डोळेभरुन नीट रचून ठेवलेली ती पुस्तकं बघायची आणि नंतर शिवाजीनं सुरत लुटली नसेल तितक्या तडफेनं ती लायब्ररी लुटायची. कॉलेजच्या शिपायांना फुकटंच पुस्तकांवरची धूळ निघाल्याचा आनंद आणि लायब्ररीमन चंदूकाकाला आमच्या वाचनाचंं कौतूक. पिशव्या तरी फाटतील किंवा हात तरी तुटतील इतपत पुस्तकं जमली की सायकलला तो खजिना अडकवायचा आणि दुप्पट वेगाने घरी. टीव्ही, सिनेमे असले चक्रवाढ व्याजी फुजूल चित्तविचलक नसल्याने आंघोळ आणि झोप वगळता हातात सतत पुस्तक असलंच पाहीजे असलं गहजब हे व्यसन. (यावर सविस्तर कधीतरी स्वतंत्र पोस्ट मस्ट! इती स्वगत नोंद)

सुटीतला दुसरा उद्योग (उपक्रम नव्हे उगाच संघात गेल्यासारखं वाटतं)म्हणजे आंबा. तुम्ही आयुष्यात हापूस, चूकलं, अल्फान्सो शिवाय काही खास खाल्लं नसेल तर तुम्हाला आंबा प्रकारातली गंमत कळणार नाही (आंबा! यावरही पोट-पोस्ट होऊ शकतं! दुसरं स्वगत). सुटीत पहाटे उठून आम्ही आंबा आणायला जायचो. आमच्या भागात जो आंबा येतो त्याला गोटी आंबा म्हणतात. हा डझनावर वगैरे घ्यायचा नसतो, हा शेकड्यात घ्यायचा आणि शेकडा म्हणजे १०० हे गणित इथे नाही. इथला शेकडा म्हणजे ११० वगैरे आंबे. चव म्हणाल तर अजिबात कन्सिस्टन्सी नाही, एक गोड निघेल तर दुसरा क्कच्च आंबट निघू शकतो. हातातलं पुस्तक बाजूला ठेवायचं, खास आंबे खाण्यासाठीचे म्हणून काढलेले कपडे चढवायचे (म्हणजे रस सांडला तरी वाईट वाटणार नाही या लायकीचे कपडे. काही लोकांना सगळं म्हणजे सगळं विस्ताराने सांगावं लागतं. डफर लेकाचे) आंब्यांची दुरडी घेऊन अंगणात (अंगण: घरासमोरील/मागील मोकळी जागा. पूर्वी अशी जागा असायची)बसायचं आणि त्या आंब्यांचा छातीभरुन गंध घ्यायचा. मग आव देख्या न ताव देख्या, आंबा माचवायचा (आंबा नैसर्गिकरित्या पिकतो आणि आपण जेव्हा तो "मोकळा" करतो त्यास माचविणे म्हणतात)आणि तोंडात पिळायचा. त्याची कोय चोखून चोखून पांढरीभुरुक करताना काय चिन्यांसारखे बारिक डोळे व्हायचे!

असो. तर हे सगळं परत करायचं तर सुटी नको का? जास्तीच्या एक तासात काम करणारयांना यातली मजा नाही कळणार. त्यांना शिक्षा म्हणून घरगुती कॉर्कबॉल करायला पाठवावं असा असुरी आनंद देणारा विचार माझ्या मनात पक्काच पक्का होत जातोय. काय म्हणता?

Sunday, March 8, 2009

टू टेल्स

//१//

सत्यशीलाने मोहाचे पाश तोडायचे ठरवले. अंतीम सत्याचे ज्ञान हेच त्याचे साध्य होते. अजून थोडा उशीर केला तर निश्चयाचे बळ कमी पडायला लागेल हे ओळखुन त्याने राजप्रासादाच्या दुसरया टोकाला असणारया मुख्य महालाकडे कुच केली.

सत्यशीलाचा मनोदय ऎकून भाल्यागत ताठ राजा क्षणभर खांद्यातून वाकला. राजा म्हणून त्याचे धर्माप्रती कर्तव्य होते खरे पण म्हणून आपल्याच राजवंशी अस्तित्वाला असं पणाला लावावं लागेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. राजराणीने दरबारी नियमांना न जुमानता सज्जा सोडून ऎन दिवाणखान्यात धाव घेतली. नाळेने जोडले गेलेले आदी-सत्य तिच्या मिठीतून सोडवत
सत्यशीलाने राजमुकूट तिच्या चरणी ठेवला. अंगावरील रेशमी उत्तरीय दोन्ही हातांनी उभे चिरत त्याने संसाराच्या वाटेवरचा शेवटचा धागाही तोडून टाकला.

सत्यशीलाला सीमेपार सोडण्यासाठी सहा अबलख घोड्यांचा रथ आला. का कोण जाणे पण त्यावर फडकणारा ध्वज आज निस्तेज वाटत होता. सत्यशीलाने तो रथ नाकारला. लाकडी कठोर खडावा पायी चढवुन तो निघाला. त्याच्या मागोमाग हुंदके दाबत अथांग जनसमुदायही निघाला. सीमेपाशी थांबून सत्यशीलाने त्या जनसमुदायाला वंदन केले "नात्यांचे पाशच तोडून जाताना निरोप कसला घ्यायचा? मुक्तीच्या वाटेवर मोठा विरोधाभासंच म्हणायचा हा!" सीमेवर थबकलेले पावूल क्षणभर तसेच ठेवून तो राजाकडे वळला "राजन, स्मृतीवनातुन खुणेसाठी म्हणून केवळ माझी सावली नेतो आहे. आज्ञा असावी."

काळाची गणिते त्याला, ज्याला काळाची बंधने. पण म्हणून मोजलाच नाही तरीही काळ चालायचा थांबत नाही. वर्षा मागून वर्षे गेली. सत्यशीलाला मार्ग काही सापडेना- अंतीम सत्याचा मार्ग. उपास-तापास झाले, देव-धर्म झाले, शरीराला सर्व प्रकारचे त्रास देवून झाले पण एका जीर्ण शुन्याखेरीज हाती काही गवसेचना.

"बेटा, कश्यासाठी हे खडतर तप?" झाडांतून किंवा पानांतून, प्रकाशातून किंवा अंधारातून, हवेतून किंवा निर्वातातून कुठूनही आला असे भासवणारा एक आवाज सत्यशीलाच्या कानी पडला.

"अंतीम सत्याच्या शोधासाठी" आवाजातील बेचैनी दडवत सत्यशील उदगारला "संसाराचे, मोहाचे सारे पाश तोडून केवळ त्याचसाठी मी इथे आलो आहे"

"सारे त्यागलेस? नीट आठव. कुठलासा क्षुल्लक मोह तुझ्या तपाचे बळ फिरवत आहे"

कठोर तपाने शीणलेला सत्यशील आठवणींच्या एकेक कड्या तपासून पाहू लागला. गत स्मृतीतून त्याच्या सोबत फक्त त्याची सावलीच आली होती. "पण" जड सुरात तो बोलला "निर्णयाचे स्वातंत्र्य असतेच कुठे? जन्मजात पाठीला चिकटलेली असते सावली. मोहाचे हे कोणते परिमाण म्हणायचे गुरुदेव?"

"अंतीम परिक्षा या अश्याच क्षुल्लक भासणारया पण कूट अर्थाने भारलेल्या असतात मुला. तुला भय होते म्हणून सावलीची सोबत घेतलीस? की तुला हवी होती गतकाळातील एखादी खुण की जी परत नेऊ शकते तुला तुझ्याच उगमाशी? अरे, सावली म्हणजे मी पण. मोहाचे आदी रुप. आणि तेच सोडवलं नाही तुला? सावली जन्मजात असते खरी पण अंतीम सत्य जन्माच्याही पलीकडे असतं. हे जंगल, ही हवा, हा प्रकाश, तू आणि मी; आपण सारेच बनलो असतो कणाकणांनी. उघड्या डोळ्यांनाही न दिसणारया सुक्ष्मातीसुक्ष्म कणांनी. पाहीली आहेस कधी त्यांची सावली? सत्य कदाचित तिथे असेल. सुर्यालाही झाकोळणारे शुभ्र काही असेल कुठे. पडेल त्याची सावली? सत्य तिथे ही असेल. तीव्र टोकांच्या पलीकडे कुठे तरी असेल ते सत्य!"

ऎन माध्यानीचा सुर्य तपाने कृश झालेल्या सत्यशीलाला हलकेच वितळवुन गेला. जमिनीवर कोसळणारा स्वतःचाच देह त्याला दिसत होता. आता त्याची सावली कुठेही नव्हती. अंतीम प्रार्थनांच्या क्षणी त्याला जाणवले जन्म आणि मृत्यु हेच सत्य; ज्याला कुठल्याही उद्देश्याची गरज लागत नाही, ज्याचे अर्थ कुणाला सांगावे लागत नाहीत, जे चुकूच शकत नाही असे ते तीव्र टोकांच्या पलीकडले सत्य! आणि दोन टोकांमधले जगणे म्हणजे केवळ प्रवास..


//२//

अनुदीपाने यावेळी मात्र अस्वस्थता लपवली नाही. कित्येक घटका राजज्योतिषी ग्रह तारयांच्या स्थिती तपासत होते आणि सतत कसलेसे गणित चुकत असल्यासारखे परत परत कुंडलीची मांडणी करत होते. "महाराज" माथ्यावरचा घाम पुसत राजज्योतिषी अखेर बोलले "अभय असावे. पण सर्व गणिते करुनही एक शक्यता अटळ दिसते. आपल्या प्राणांना सावलीपासून धोका आहे"

जळी स्थळी काष्ठी पाषाणी अनुदिपाला मृत्यु दिसु लागला. महाअमात्यांनी राजाची मनस्थिती ओळखली आणि राजसरोवरात ऎन मध्यभागी भराव टाकून एक राजमहाल उभारवला. अनुदीप एक प्रकारे नजरबंदच झाला.

अनुदीपाच्या अनुपस्थितीत महाअमात्यच राज्य चालवु लागले. राजाच्या लहरींनुसार जिथे वारयाची देखिल दिशा बदलते तिथे मनुष्याचे काय? पडद्या आडच्या एका कुजबुजीनंतर एका आमेच्या रात्री सेनापतींनी शिताफिने महाअमात्यांची गर्दन उतरवली.

पण गिधाडांचे जरा वेगळेच. स्वजातियांना टोचे मारुन खलास करणारी ही जात. आणि इथे तर भक्ष्य मृत्युच्या भयाने अर्धमेले झालेले. एक गिधाड रस्त्यातून सरकताच दुसरयाने त्याची जागा घेतली. सेनापतीला राजमुकूट खुणावु लागला. अनुदीपाला हे तीव्रतेने जाणवत होते.

दिवस पूर्ण बहरावर असताना अनुदीप सावल्यांचे सरकते खेळ बघत होता. क्षणभर तो थबकला आणि मग आतून दचकला. "पाण्यावर सावल्या पडत नसतात महाराज. त्याला फार तर प्रतिबिंब म्हणता येईल" महाअमात्यांचे शब्द अनुदीपाच्या कानी रुंजी घालू लागले. पण आत्ता त्याने जे पाहीले ते प्रतिबिंब नव्हते, नक्कीच नव्हते. त्या पाण्यावर पडलेल्या सावल्याच होत्या. सरकत जाणारया सावल्या, विकृत आकारांच्या सावल्या, पारदर्शक सावल्या...सावल्याच सावल्या. थरथरणारया पाण्यात अनुदीपाला तलवार उंचावलेला सेनापती दिसला, क्षणभरच आणि नंतर ती सावली वाहाती झाली. पाण्यावरुन परावर्तित होणारया सुर्यकिरणांनी अनुदीपाच्या मस्तकात शुळ निर्माण झाला. पुढचा घाव आपण घालायचा या सुडातिरेकाच्या विचाराने अनुदीप सरसावून बसला. काहीच काळ आणि अनुदीपाला परत पाण्यावर विकृत आकारात सेनापतीची सावली दिसली आणि क्षणाचाही विलंब न करता अनुदीपाने त्याच्या अंगावर उडी मारली. होय, सावलीच्या अंगावर उडी मारली. थंड काळसर पाण्यात तलवार आरपार जाताना अनुदीपाला शेवटचे दिसले ते पाण्याच्या तळाशी असणारे टोकदार कातळ, त्यावर सरकणारी त्याचीच सावली आणि डोक्यातून उगवणारी काळसर लाल रक्ताची असंख्य वर्तुळे

Wednesday, February 25, 2009

खाए जा...


सृष्टीसे पहले कुछ नही था.
सत भी नही-आ-सत भी नही था.

याच चालीवर आपल्यातील असंख्यांना कोंबडी आधी की अंडं? हा प्रश्न पडलेला असतो. नुक्ताच मला एका ध्यानमग्न क्षणी या सत्याचा साक्षात्कार झाला अन मी उत्स्फुर्त पणे ऑर्डर दिली "जे तयार असेल ते आणा आधी"

मनुष्यप्राण्याच्या असंख्य व्याख्या विद्वानांनी केलेल्या आहेतच. त्यात चवीने खातो आणि खिलवतो तो प्राणी म्हणजे मनुष्य अशी एक भर आज मी टाकतोय. चव असणारे बरेच प्राणी आहेत. म्हणजे ज्यांना चव कळते ते, ज्यांची स्वतःची चव चांगली आहे ते नव्हे! पण तुम्ही कधी "वा! वा!! ही मिर्ची छान आहे. कोल्हापुरसाईडची दिसते. या राघोबा, या मिठुराया. लाजु नका. आज ताव मारु" असा आगत्यशील पोपट पाहीला आहे का? आता तुम्ही शिकवुन एकादा पढतमुर्ख आणाल तर त्याच्याच पिंजरयातली एखादी मिर्ची तुम्हाला टाकून मी तुम्हाला वाटेला लावेन ही एक शक्यता. पण चवीने खाणे आणि खिलवणे ही मक्तेदारी मनुष्यप्राण्याचीच.

अश्याच एका गाफील क्षणी कधी तरी पहीली-दुसरीत असताना मामाच्या गावाला जाऊ या- शिकरण पोळी खाऊ या म्हणायच्या ऎवजी मामानं झिंगे खाऊ घातले अन अस्मादिक बाटले. तोवर आमची मजल उकडलेलं अंडं किंवा कच्चं अंडं घातलेलं कॆशरी दुध (!!) येव्हढीच होती. त्यातही ते देण्यामागचा उद्देश आम्हाला खाताना मजा येण्यापेक्षा आमच्या खारीकछाप दंडात बेटकुळ्या निर्माण व्हाव्यात असाच पर्म उदात्त आण वुच्च असायचा. बरं हे अंडं खाणं प्रकरण किती सिझनल असावं? अजून काही वर्षात मी न बाटतो तर जसा आंबा उन्हाळ्यात येतो तदवतच अंडी हिवाळ्यात घातली जातात असं मी वाटून घेतलं असतं हे नक्की. असो. बाटगा मौलवी जोरात नमाज पडतो म्हणतात. तसं काही या बाटग्याच्या बाबतीत झालं नाही. पुढील कैक वर्षं या जीवाला कोंबडी अन तत्सम चवीष्ट प्राणी आजुबाजुला बागडतानाच पाहावयाचे होते.

इंजिनिअरींगच्या चार वर्षात नॉन-व्हेज खाणे म्हणजे एक टप्पेदार प्रोसेसच होती.
१) १ तारखेची वाट पाहाणे. काहींचे तीर्थरुप मुलाचे प्रताप ऒळखुन असल्याकारणे १ तारखेच्या आसपास (ठिबक सिंचनच्या चालीवर) किंचित किंचित पैसे पाठवायचे
२)नॉन-व्हेज खाणारे मित्र शोधणे. बाकी सर्व आप्तमित्र कडबाखाऊ प्रकारात मोडत असल्याकारणे कोंबडीसाठी खात्या-पित्या मित्रांना धरुन चालणे या शिवाय (आयुर्विम्याला पर्याय नाही चालीवर)पर्याय नव्हता. खाऊन-पिऊन येताना मी त्यांना (शब्दशः) धरुन चालवितो याच्या मोबदल्यात मी त्यांच्या चकण्याचे बोकणे मारतो याकडे ते दुर्लक्ष करायचे
३)कोंबडी खाणे. कमीत कमी दोन ते तीन शेर-ए-पंजाब आणि तत्सम नाव असणारया हॉटेलातून एक हॉटेल निवडायचं. त्यात तळघरात एक टेबल अन चार खुर्च्या असणारया केबीन असायच्या. केबीनला एक मळका अन रंग ओळखा -पैसे मिळवा छाप पडदा असायचा. आपल्याला ऑर्डर द्यायची असली की त्या पडद्याच्या बाहेर हात काढायचा. हात दाखवा-वेटर बोलवा अश्या सिस्टम मधल्या हॉटेलला चव अशी ती किती असणार? चार वर्षात मेलेल्या कोंबडीची चव मारणारे मसालेदार बटर चिकन किंवा लाली तेरे प्यार में मै भी हो गई लाल म्हणणारे रासायनिक लाल चिकन तंदुरी खाऊनही हार न मारणारे काहीच वीर सरते शेवटी उरले. जे उरले-ते या रसना युद्धात तरले.

खाणं ही एक वृत्ती आहे. तिथे जर तुम्ही चित्ती असो द्यावे समाधान असा निरपेक्ष भाव बाळगाल तर तुमचा सर्च फॉर एक्सलन्स लगेच संपुष्टात येईल. बडोद्याला अलकापुरीच्या मागे चौकात गाडीवरंच किंवा पुर्वी पुणे विद्यापिठाकडून बाणेर कडे जाणारया रस्त्यावर चायनिज खाऊचे ठेले होते. महाराजा, कोंबडीचं ते चायनिज रुपडं काय स्वस्त आणि मस्त असायचं! ती चव तुम्ही मेनलॅन्ड चायना किंवा चायना हाऊसला जास्त टिकल्या मोजूनही येणार नाही.

मला स्वतःला कोंबडी तंदुर फॉर्ममधे आवडते. बहुतेक ठिकाणी हा प्रकार बरा मिळतो. पण काही ठिकाणं अनबिटेबल. टॉपला आहे ते सिगरी. ऎन बंडगार्डनवर असून सुद्धा कलकलाट नाही, सुंदर इंटेरिअर आणि अफाट चव. तिथल्या काचेला नाक चिकटवुन उभं राहीलं की किचन दिसत राहातं. तिथला तो कुक अश्या काही स्टाईलनं रुमाली रोटी उंच उडवतो की देखते रह जाओगे. पण खरी गंमत तिथलं तंदुर.

सिगरीच्याच बाजुला दिल्लीचं दिल्ली-दरबार आहे. त्यांनी म्हणे भारतात तंदुर आणलं. असेल ही बुवा. पण सिगरी म्हणजे अशक्य. दोन्ही ठिकाणांसाठी एक वैधानिक आणि पुणेरी कुचका इशारा म्हणजे हॉटेलमधे जाण्यापुर्वी आपले खिसे तपासा. बंगरुळात आणि आता पुण्यातही एक झकास ठिकाण आहे, बार्बेक्यु नेशन. तिथे प्रत्येक टेबलवर एक छोटा झेंडा ठेवलेला असतो. टेबलावरच्या मिनी-बार्बेक्युत वेटर पनीर ते फिश तंदूर करत राहातो आणि आपण खात राहायचं...दमलो की तो झेंडा आडवा पाडायचा (थोडक्यात..आता दमलो बुवा). मग म्हणे मेन कोर्स सुरु होतो.

मुळात कोंबडीला चव नसते म्हणे. त्यामुळे तिच्यात काय पडतं त्यावर तिची सारी दारोमदार! काही वर्षांपुर्वी आनंदनं बाबा (!) नावाच्या पिद्दकड हॉटेलात चिकन मराठा नावाची डिश खिलवली होती. पंजाबी मसाल्यांचा अजिबात वापर नसणारी ती डिश संपूर्णपणे कढीपाला घातलेल्या पातळसर ग्रेव्हीत बनवलेली. केवळ अप्रतिम! हिंजवडीत जेव्हा फक्त तमन्ना होतं तेव्हा कुकचा मुड असेल तर चिकन पतियाळा छानपैकी ऑम्लेटवर पसरवुन द्यायचा. तमन्नाचा आणि सदानंदचे कुक कदाचित एकाचवेळी बदलले आणि एकूणच त्या परिसरावर अवकळा आली.

खवय्यानं सतत आपले बेन्चमार्क वाढवत राहावेत. चांगली चव ही फक्त आणि फक्त एका कलाकाराच्या हातावर अवलंबुन असते. तो कलाकार रस्त्यावरच्या हातगाडीपासून ते पंचतारांकीत हॉटेलातील अद्यावत किचनपर्यंत कुठेही असु शकतो. पर्फेक्शन आणि इनोव्हेशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मासुळकर कॉलनीसारख्या अगम्य वस्तीत छाया नावाचं एक टपरीवजा हॉटेल आहे. त्याचे पराठे भल्याभल्यांना पाणी पाजतात. हा झाला पर्फेक्शनचा भाग. पण जर मी म्ह्टलं की त्याच्याकडे अंडा पराठा मिळतो तर ते झालं त्याचं इनोव्हेशन. कारण तो प्रकार मी अजून पर्यंत कुठेच चाखला नाही. पण हे प्रकरण इतकही सोपं नाही महाराजा. भलेभले बल्लव अगदी पर्फेक्शन या पायरीपर्यंत देखील पोचत नाहीत. जर बुवांनी ती सम गाठली तर आपल्या तोंडून बरोबर व्वा निघालंच पाहीजे आणि त्या व्वा साठी अस्सल खव्वया कुठल्याही थराला जायला तयार होतो. अंडाकरी खायला ४०-५० किमी जायची तयारी असेल तर लेक व्यु सारखं ठिकाण नाही हे वाक्य ज्याला एका दमात म्हणता येतं, त्यालाच त्या बल्लवाची खरी कदर.

गाण्याचं जसं घराणं असतं तस्संच खाण्याचंही घराणं असतं. सगळ्यात सुप्रसिद्ध घराणं पंजाबी आणि मग बरीच लोकल घराणी आहेत. महाराष्ट्रातलं म्हणाल तर इथे एकच घराणं आहे, कोल्हापुर! बचाबचा तिखट टाकून कोल्हापुरीच्या नावावर काहीही खपवणारी बरीच मंडळी पुण्यात आहेत. पण एक अफलातून मटन मी कोल्हापुरात नाही तर सांगलीच्या एका खाणावळीत खालेल्लं. पीसेस वेगळे आणि एक डबाभर संतप्त तर्री वेगळी असा जो काही प्रकार त्या काकुंनी खिलवला की डोळ्यातून येणारे आनंदाश्रु आवरत माणसांनं फक्त व्वा! म्हणावं. रेड मीट हा तसा हॅन्डल करायला अवघड प्रकार आहे. बनवण्याच्या नव्हे, खाण्याच्या दृष्टीने. तरी ही न टाळता येणारा किलर प्रकार म्हणजे हैद्राबादची मटन बिर्याणी. नबावी थाटात शिजवलेली ती बिर्याणी केसरात वगैरे शिजवतात की काय इतपत ती देखणी आणि सुगंधी असते. हैद्राबादी बिर्याणी न खाताच मराल तर भुते होतील हो तुमची..पण मटन हा खरा मुसलमानी पदार्थ. त्यांचे ते शीग कबाब किंवा मोगलाई मसाले घातलेली मटन करी केवळ अफलातुन. अमदाबादला एक मिनी-पाकिस्तान आहे, रेल्वे स्टेशनच्या समोरच्या बाजुला. तिथे टिपीकल मुसलमानी हॉटेल आहेत. एका हैद्राबादी मुसलमानासोबत मी होतो. त्याने तोंड वर करुन ऑर्डर दिली, दाबा गोश्त. मी घाबरत घाबरत त्याला विचारलं की त्यात डुक्कर किंवा गाय तर नाही? तो मान हलवत रावण स्टाईल हसला. तुम्हाला जर मटन आवडत असेल तर हा प्रकार नक्की खाऊन बघा.

सरतेशेवटी परमेश्वराच्या मत्स्यावताराकडे वळु. लेट मी ऍडमीट, आय ऍम बॅड ऍट इट. जरी माझ्या धर्म-भ्रष्टतेला मासा कारणीभुत होता तरी समहाऊ ती एक्साईटमेन्ट पुढे टिकली नाही. माश्याचा वास येत नाही म्हणणं म्हणजे आलेल्या पाहुण्याला घरातला राक्षसी आकाराचा गुरगुरणारा कुत्रा चावणार नाही असं सांगणं आहे. गोवा, मुंबई, पुण्यात अनेक ठिकाणी मासे खाऊन मी शेवटी निराश मनस्थितीत ये अपना गांव नही असं ठरवुन टाकलं. दृष्ट लागु नये म्हणून बांधल्यागत असणारा दुष्ट दोरा न काढता खाल्लेले प्रॉन्स आणि त्या नंतर पोटाचे निघालेले वाभाडे, माश्यांचा वास आणि कुणाची सुपारी घेतल्यागत काटा काढणे हे असले प्रकार मला निराशच निराश करत गेले. ज्यांना आवडतं त्यांनी गोमंतक, महेश, निसर्ग, अभिषेक, ओ कलकत्ता (खिसे सांभाळा!)अश्या ठिकाणी जाऊन बघावं. पण तिथेही मिळणार नाही असं फिश मोनाच्या मम्मीनं खाऊ घातलं होतं. मोना म्हणजे कल्याणीची मैत्रीण आणि त्या नात्याने मी त्यांचा जावई! त्यांनी खास सीकेपी पद्धतीचा फिश बनवलेला आणि वाटेतले काटे ही काढलेले! गॉड ब्लेस हर. तो आजपावेतो खाल्लेला बेष्ट फिश! काही ही झालं तरी शेवटी तो मॉं के हाथ का खाना!!

माणसाचं खाद्य जीवन कसं समृद्ध असावं. ज्याला जे आवडतं, त्याला ते ते मिळावं. आणि एका गोष्टी साठी बाप्पाचे आभार मानावेत की जिथे खाणं नुस्तंच उरकणं नसतं तर त्या सोबत प्रत्येक पदार्थाची चव, रंग, रुप, गंधही तितकंच महत्वाचं मानलं जातं अश्या देशात त्यानं आपल्याला जन्माला घातलं.

Monday, February 9, 2009

भेट

दिवस-रात्र यांच्या दरम्यान सॅन्डवीच झालेली संध्याकाळ, माझा एक पाय गाडीत अन दुसरा जमिनीवर, गाण्याचं शेवटंच टोक ऎकायचं म्हणून गाडी पूर्ण न विझवता फक्त इन्जिन ऑफ केलेलं. असल्या हिरण्यकश्यपु अवस्थेत फोन टणटणला. "उद्या भेटायचं?" भडाभडा लिहीणारया माणसानं इतकंच विचारावं? मी तंद्रीतच परत फोन करुन सांगतो असं म्हटलं. हं...शेवटी ती वेळ आली तर! अमेरीकेहून निघण्याआधी त्याने मेल टाकलेला, पूर्ण आयटनरीसहीत. त्यावेळी फक्त उत्सुकता की फस्स्स उतु जात असल्यासारखं लिहीणारा हा माणूस असेल तरी कसा याची. बघता बघता हा समोर उभा अन फोन करुन विचारतोय की कधी भेटायचं. वीतभर जीना हातभर झाला अन तो चढून घरात येईपर्यंत माझं आक्रसुन आक्रोड झालेलं.

अनोळखी माणसाला भेटणं इतकं का सोपं असतं? आपल्या अंगांना कितीक उपांगे असतात. आपण लिहीतो ती त्यातलीच एक शक्यता. आता सदेह कुणाला भेटायचं म्हणजे निमूटपणे सारया शक्यता देह साजागत लेवून सामोरं जाणं आलं. हे राम! हा मनुष्य भेटल्याशिवाय काही जायचा नाही...चमत्कारांवर विश्वास ठेवण्याइतपत आपण भाबडे नसतो नाहीतर रात्रीतून काहीतरी होईल अन ही भेट टाळता येईल या आशेवर तरी डोक्यातला भुंगा थंडावला असता..

कुणी कसले अर्थ विचारले की उगाच संदर्भांची वीण उसवावी लागते कधी. कधी त्वचेखालचे नितळ जुनेच आपण परत उगवुन येऊ याची सार्थ भिती! एकाच वेळी डोळ्यातले माणसे वाचण्याचे कुतुहल अन स्वतःभोवतीचे अदृष्य कोट जपण्याची तेव्हढीच जीवापाड धडपड! आपल्या प्रतिभेच्या मायन्यातून उगवणारे अपरिहार्य अहंकाराचे टोक बेसावधपणे आपल्याच डोळ्यात घुसून अंध ठरवु पाहाणारे क्षण टाळण्याची एक पराकाष्ठा...नक्की काय साध्य करायचं असतं मला अश्या भेटी टाळून? एकांतात बसून लिहीलेल्या कविता पकडल्या गेल्या की किती कानकोंडलं होतं हे तो फक्त एक कवीच जाणो!!

माणूसघाणा म्हणता मग? आय बेट, यू कॅन नॉट. जिथे कवितेचा नार्सिझम संपतो, तिथून माझ्या वैश्विकरणाला सुरुवात होते प्रिय! घटनांचे असंख्य पदर, त्यांना छेदत जाणारे मनुष्य स्वभावाचे धारदार कंगोरे अन अनंत शक्यतांचं अजब गारुड मला सतत खुणावत असतं. वादळं निर्माण करण्याची अचाट शक्यता केवळ फुलपाखराच्याच फडफडण्यात असते काय? लेट मी डिसेक्ट यू ऍन्ड आय गॅरन्टी यू अ स्टॉर्म. जन्मताना सोबत असते तेव्हढीच नग्नता सत्य. चेहरायवार चेहरे घालून जेव्हा जेव्हा लपाछपी खेळशील, शब्दांचे अर्थ तुला शोधत येतील.

दोन अर्थपुर्ण टोकांवर मी यथेच्छ झुलून घेतो. आहे त्याहूनही जास्त मी आधी माणूस असतो, माये. जितक्या सहजपणे मित्राने फोन केला तितक्या सहजपणे मलाही त्याला भेटता येऊ शकते.

"मी येतो" कुठल्याही संदिग्धतेशिवाय एक उखाणा मीही सोडवतो!

Wednesday, January 28, 2009

मोर

काळाला पीळ पाडला की अवकाशाचे संदर्भ पुर्णपणे बदलतात म्हणे. एकदा का अवकाशाची प्रतले वेगळी झाली की चेहरयावरची अनोळख देखील वैध ठरते. अवकाशाला माझ्यापुरता पीळ पडायला लागला की तुटून वेगळ्या झालेल्या अवकाशाबद्दल मला फारसं ममत्व नसतं. भुतकाळातुन हवी तेव्हढीच माणसं सोबत घ्यावित अन बाकीचे प्रसंग कॅलिडास्कोपमधली एक शक्यता म्हणून ठेवून द्यावित की झालं. अनोळखी कौतूक म्हणून मला भविष्यकाळ जास्त प्रिय. अर्थात लिहावं इतक्या सहजपणे पाय निघत नाही एका काळातून दुसरयात. इंजिनिअरिंगच्या सेन्डऑफला "एक राह रुक गयी तो और जुड गयी" या ओळी म्हणून झाल्यावर मैत्रिणीच्या दुखावलेल्या नजरेला नजर न देताच कसंबसं गाणं पुर्ण केलं तो क्षण किंवा "वुई आर अ टीम. तुम मुझे छोडके जा ही नही सकते" असं म्हणणारया मल्याळी बॉसच्या हातात राजिनाम्याचं थंड पत्र ठेवताना एका अदृष्य भिंतीवर शेवटची वीट चढवल्यागत वाटलं तो क्षण असे काही सन्माननिय अपवाद. अन्यथा काळ बदलाच्या शेवटच्या टप्प्यात बरयाच अंशी अस्तित्व नव्या शक्यतांना पडताळुन पाहाण्यातच जास्त गुंग असतं.

मुळ मुद्याची शब्दांच्या वजनावर गर्दन न उतरवता, लेट्स कम टू पॉईन्ट.
पुन्हा नव्या शक्यता पडताळुन पाहाण्याचे दिवस आले. नव्या नौकरीची नवलाई अजून सरली नाहीए तोवर हे अवतरण.


माहेराहुन येतो मोर
नाचवित कोर
दिठीभर रंग

उजळते अंग
तरी निःसंग
कवड्यांची कंठी माळ

पिवळसर फुलबावडी डुल
रुते बाभुळ
काट्यांना टोके दोन

दिशांचे मुळ
तीळाचे कुळ
पायात शोधतो मोर