Thursday, July 23, 2009

सदु स्टार डॉट स्टार

म्हणजे सदु काही हुशार नसतो. डोंबिवलीतला माणूस कसा लोकल पकडताना अचानक शुर होतो तितपत प्रसंगानुरुप हुशारी सदुला कधीमधी जमून जाते इतकंच. सदुची ऑफिसला येण्याजाण्याची वेळ हा या हुशारीचा एक नमुना. आम जनतेगत सकाळी साडेसातच्या बसने सदु कधीच जात नाही. सदु सकाळी साडेनवाची बस जमवतो आणि येताना आठची. सकाळी घरच्यांच्या धावपळीत आपली भर नाही म्हणून कौटुंबिक सदु खुश, आपण बसने जातो आणि गाडीसाठी पेट्रोल जाळत नाही म्हणून सामाजिक सदु खुश, साडेआठाला येणारी टीम आणि अकराला येणारा प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या दरम्यान आघाडी सांभाळायला मिळते म्हणून ऑफिशिअल सदु खुश वगैरे वगैरे. म्हणजे हे फार पुर्वी सदुला कधीतरी जाणवायचं. हल्ली साडेनवाच्या बसमधे खिडकीपाशी झोपायला मिळतं आणि हिंजवडीच्या कोपरयावर वाकडला भयाण ट्रॅफिक-जॅम लागत नाही एव्हढंच सत्य उरलं होतं. सदुनं विचार करत करत (सश्याचं गंडस्थळ त्या चालीवर सदुच्या परिस्थितीचं सिंहावलोकन!) कदाचित जास्तंच जोरात सुस्कारा टाकला असावा कारण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवुन झोपलेल्या सुंदरीनामक प्राण्याला खडबडुन जाग आली. "अबीबी उद्री है क्या?" असं त्या द्राविडभाषिणीनं तमिळ हिंदीत विचारलं. सदुनं मान हलवत घड्याळ बघितलं आणि मग मुस्काटात बसल्यागत बाहेर बघितलं. अकरा! तब्बल एक तास त्याची बस वाकडच्या सुप्रसिद्ध (हायवे वरुन जाणारा तो उडता पुल म्हणजे रोड-प्लॅनिंग मधला एक चमत्कार असं जाणकारांचं मत!)फ्लाय ओव्हर खाली उभी होती. मागे पुढे, बघावं तिकडे बस, कार, फटफट्या यांचा नुसता पुर आला होता. एरव्ही भारताच्या प्रगतीचं हे चित्र बघून सदुला भरुन आलं असतं पण आत्ता नुस्ताच कंटाळा आला. द्राविडी सुंदरी परत झोपली होती म्हणजे कुणाशी बोलण्याचा प्रश्न नाही. खिडकी बाहेरची ही..गर्दी पाहून त्याला वाटलं सगळेच कंटाळले असतील का? या गर्दीत कोण काय विचार करत असेल? रोज घरी गेल्या गेल्या बायको आधी त्याचं स्वागत करणारया शुभ्रा आणि सुलेखा (पक्षी पार्वती आणि इंदुमती) या बाया त्याला आठवल्या. लोकांच्या मनात प्रवेश करणे, त्यांच्याकडून हवी ती कृत्यं करुन घेणे ही त्यांची विद्या आत्ता आपल्याला अवगत असती तर काय बहार आली असती असं त्याला वाटून गेलं. आणि काय आश्चर्य! बघता बघता सदु मनकवडा झाला. लोकांच्या मनातला गोंगाट बाहेरच्या कोलाहलापेक्षा कैक पट जास्त होता.

सदुनं खिडकीबाहेर बघितलं. बाहेर रस्त्यावर फ्लेक्सबोर्डची जत्रा होती. कुणी सार्वजनिक शौचालय समितीवर निवडुन आलं होतं, कुणाला दादांच्या आशिर्वादानं अठरावं वर्षं लागलं होतं, असंख्य जयंत्या-मयंत्या, कुणी बराक ओबामाचं निवडुन आल्याबद्दल अभिनंदन करत होतं तर कुणाला कुठल्या बाबाच्या कृपेनं पोरं झालं होतं. सारं कसं स्वच्छ, सार्वजनिक, पारदर्शक सुरु होतं! एका फ्लेक्सबोर्डावर मावळ्याच्या वेषात एका पोराचा फोटो होता. प्रणवदादांना दहा पुर्ण झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन करायला कोण नव्हतं? म्याडम, जान्ते राजे, त्यांचे पुतणे, आदरणीय मुख्यमंत्री, लाडके आमदार, मार्गदर्शक खासदार, खालच्या रांगेत गं.भा. चंद्रवतीबाई अश्श्श्शी फोटोची नुस्ती झुंबड उडालेली. कोपरयात महाराजही होते आणि भगव्या अक्षरात ठळक लिहीलेलं "महाराज, तुम्ही याच! मावळे तयार आहेत." हे महाराजांना आमंत्रण होतं की आव्हान, सदुला काही कळालं नाही. आणि गंमत म्हणजे त्याच बोर्डाखाली कसल्याशा रांगेत प्रणवदादा उभे. सदुनं चट्कन त्याच्या मनात उडी मारली. " च्यामायला, गावभर आम्चे फोटो लागले तरी बी आमच्या मागची लाईन काई सुटत नाही. मास्तर वर्गात कुजकट हसतय. गेल्या यत्तेतलं प्रगती पुस्तकपन छापा म्हने बोर्डावर. मायला. बापसाला पन आत्ताच फोटो छापायचा होता, त्येबी फॅन्शी. गावात सग्ळे पन्या म्हन्त्यात आन हितं प्रणवदादा. आजकाल बापुला काय जालयकी. सगळ्यांना आवो-जावो करतो. त्येच्या कडेवर बसून मिशा वोडत मुतायचो तवा बी पन्या म्हनायचा आन आता काय? प्रनवदादा, आक्कासायब..आक्की कसलं भारी म्हनायची मायला..मम्मे मम्मे. त्येबी बंद केलं. आईसायब म्हनायचं म्हनं. दिवसा आईसायब आन रात्री दारु पिवून तिला मारायचं. वा रं दादासायब! मायला रांग सरकती काय नाय फुडं?" सदुनं बाहेर डोकावुन बघितलं. सार्वजनिक संडासाच्या लायनीत प्रणवदादांना बघून त्याला घाण मळमळलं.

आता पुढं कुणाला गाठावं या विचारात असतानाच सदुला गर्दी नियंत्रण करणारा मामा दिसला. सदु लहान असताना त्याला पोलिसंच व्हायचं होतं. खाकी शर्ट चड्डी, हातात प्लास्टीकची बंदुक, डोक्यावर इन्स्पेक्टरची टोपी या अवतारात त्याचे लहानपणीचे फोटो पाहाताना आता जरी त्याला लाज वाटत असली तरी मनात कुठेतरी सुप्त आकर्षण होतंच. नेहमीच्या मामांपेक्षा हा मामा बारीक आणि कमी उग्र होता आणि त्याच्याकडे फट्फट आवाज करणारी फट्फटीपण नव्हती. सदु त्याच्या मनात डोकावला.

"शिट्टी गेली
गेली गाडी
चड्डी गेली
गेली नाडी
तरीही मी उभाच

वॉकी गेली
टॉकी गेली
साहेब आले
येतच राहीले
तरीही मी उभाच

गाडी थांबे
ट्रॅफिक तुंबे
सिग्नल लोंबे
गर्दी झोंबे
तरीही मी उभाच"

पोलिस आणि कविता? सतत घसरणारी खाकी फुल्ल चड्डी, त्यात कोंबलेलं पोट आणि वरुन तो गोल प्रकार झाकु पाहाण्याचा आटोकाट प्रयत्न करणारं शर्ट नामक वस्त्र, डोक्यावर दिशादर्शक टोपी आणि गेस व्हॉट? दहा पंधरा दिवस न केल्याने वाढलेली कवी-दाढी आणि खांद्याला कवी-शबनम घेऊन मामा बुलेटच्या सीटावर डोकं टेकवुन कविता लिहीतोय! सदुला नुस्तं ईमॅजिन करुनही धडधडलं. कविता करणारा पोलीस या उपर त्याला सहन नाही झाला आणि तो निघाला. मग त्यानं शेजारच्या भाताच्या ढिगात डोकावायचा प्रयत्न केला. शब्दांची अगम्य रांगोळी ऎकून त्याने ताबडतोब पळ काढला.

चार सिटा सोडून पलीकडे कुणी मुलगी बसली होती. सदुनं कुणाला न समजेल अश्या रितीनं मान वाकडी करुन तिच्या आयडी कार्डवरचं तिचं नाव वाचलं रो-हि-णी कां-ज-र...मान दुखायला लागली तसा सदु थांबला. तिच्या मनात डोकावताना सदुला गुलाबी चोरट्यासारखं वाटलं पण तो घुसलाच. " काय तर प्रश्न आहे? ट्ट्म्म फुगणारी गोल पोळी कशी करावी? पोळी करुन तिला किंचित छिद्रीत करावे आणि त्यात फुग्यासारखी हवा भरावी!! ब्रम्हज्ञानी गुगलवर शोधायचं म्हटलं तर की-वर्ड काय टाकु? पोळी? की ट्ट्म्म फुगणारी गोल पोळी? पोळीला द्या गोळी, सासुमां की जय. त्या दिवशी त्या सायकलवाल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न न करते तर
आज या धुराड बशी ऎवजी कारने ऑफिसात येते. मी गाडी रस्त्याच्या काठावरुन चालवत होते, सायकल दिसल्यावर ओरडून सरकायला ही सांगीतलं पण मेला हलायलाच तयार नाही. आणि आमचा नवरोबा, मलाच शिव्या घालतोय. आता खिडकीची काच बंद आहे हे मला कसं कळणार? रस्त्याकडे बघायचं की खिडकीकडे असं विचारल्यावर नवरयाने काय तो लुक दिला! आणि कारचा भोंपु , तो मेला सापडत नाही ऎन मोक्याच्या वेळी. मरो. गेल्या गेल्या त्या टेस्टरला कोड द्यायचा आहे. मेला म्हणतो कसा म्याडम, बहुत डिफेक्ट आ रहे है...अरे गाढवीच्या मी डिफेक्टफ्री कोड दिला तर तुझा जॉब जाईला नां. मरो. गेल्या गेल्या आधी ट्ट्म्म फुगणारी गोल पोळी वर गुगल करायचं. नवरे लाडावुन ठेवल्याचे परिणाम..." "आता नवरयाचा, आणि मग सासुचा उद्धार!" सदुला पुढचा ट्रॅक बर्रोब्बर कळाला आणि तो तिथून घाईघाईने निघाला. स्त्री-मन नावाचं अगम्य कोडं किंचित कां होईना म्हणून त्याने देवाचे आभार मानले.

"च्यामायला, कापून ठेवलं असतं." सदुनं दचकुन आवाजाच्या दिशेनं बघितलं. गळ्यात कुत्र्याला घालतात तशी जाडसर पण सोन्याची साखळी, कवटीला ताण नको म्हणून उडून गेलेले केस, कर्कश्श काळा वर्ण, बाह्या वर ओढलेला लाल शर्ट आणि बुडाखाली शर्टच्याच रंगाची बाईक. "सापडलं असतं बेनं तर जित्तं नस्तं सोडलं पन पळून गेलं. च्यामायला, येव्हड्या वर पान्याच्या टाक्यावर चढनार कोन? भोसडीच्याला म्हायती असनार मला उंचावर चडायचं भ्या वाटतं म्हनून तिकडुनच पळालं." व्हर्टिगो असणारा गुंड पाहून सदुला धमाल मजा वाटली. एका उंचावर टांगलेल्या फ्लेक्सबोर्डावर ही स्वारीपण होतीच. अचानक गुंडादादाच्या नावामागं लागलेल्या पै. उपाधीचा उलगडा सदुला झाला. पै. म्हणजे पैलवान! कै. च्या चालीवर सदुनं गुंडादादाला पै.-पैगंबरवासी करुनच टाकलं होतं. हे भुत जिवंत पाहून सदुला पुढचा प्रश्न पडला. गुंडादादाच्या बाजुला चार-आठ शेणफडी मुलं होती. त्यांच्या नावामागंही पै.च होतं. १०-१५ वर्ष वयाची भुस्कट पोरं पाहून सदुला त्यांच्या दंडात बेटकुळ्या सोडून द्या टॅडपॉल तरी असतील का असा प्रश्न पडला.

सदुच्या प्रश्नांना तसा फारसा काही अर्थ नसतो. ते पडतात आणि गळून जातात.

बस हलली तसा सदु भानावर आला.

बस मधे बसलेले सारे सदु सावरुन बसले.खरं म्हणजे या गोष्टीचं नाव सदुची जादु, जादुचा सदु, मनकवडा सदु, सदा-सर्वदा-सदु असं काहीही होवु शकतं. पण सदु एकदम ऑर्डिनरी. सारे सदु एकदम शोधायचे तर वाईल्ड-कार्ड सर्च बरा पडतो म्हणून गोष्टीचं नाव सदु स्टार डॉट स्टार

Sunday, July 5, 2009

सुफी-(याना)-(नामा)

"आपल्याला मुलगी झाली तर आपण तिचं नावं सुफी ठेवु!" माझ्या गंभीर प्रस्तावावर उत्तरादाखल फक्त एक ठसठशीत मौन! याचा अर्थ कॅपिटल बोल्ड फॉन्टमधे "नाही" असा होतो हे सरावाने उत्तम संसारपट्टुला उमजुन येते. मुलगा झाल्याने नैसर्गिकरित्या प्रश्न सुटला.

कुठून आलं हे नाव डोच्क्यात? थोडासा मेमरी जॉग. कश्मिर दुरदर्शनवर झिंटबेबी नाचतेय "बुमरो बुमरो." पारदर्शी चेहरयाचा ह्रतिक खुप वर्षांनी तिला भेटायला आलाय. त्याची सहजगत्या थिरकणारी पावलं, साधेपणातूनही न लपणारं ग्रीक गॉडत्व, निरागस चेहरयामागचा दहशतवाद आणि तिचं ओसंडुन वाहाणारे हसु, त्याला भेटल्यावर देहबोलीतून अखंड पाझरणारा अविश्वास, आनंद, आश्चर्य यांचं भन्नाट मिश्रण. मंत्रावल्यागत तिचं नाव त्याच्या तोंडून बाहेर पडतं "सुफी..."

नव्हे; सुफीचा संदर्भ असेल तिथे पण उगम नाही. सम मोअर ब्रेन-ड्रॅग.

लख्खावलेले इंजिनिअरींगचे दिवस. नुसरतचा संगम कुठूनसा हातात आलेला.

जुल्फे उलझाए तो दुनिया परेशां हो
जुल्फे सुलझाए तो ये झिस्त आसान हो
जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं
रेशमी रेशमी अंबरी अंबरी

आणि मग खुळावल्यागतच झालं. सुफीच्या जन्मखुणा या इथल्या.स्वस्तात मिळणारया हार्मोनिअमवर पट्टी इतकीच झिजून गेलेली बोटं सराईत;
सुरांचं भान नाही की ते बेभान आहेत सांगणं कठीण;
ढोलकीचं कमावलेलं कातडं कडक वाजतय
"चढता सुरज धिरे धिरे ढल जायेगा"

टाळ्यांच्या कोरसला पार्थिव पार्श्वभुमी
पीर, थडगे
उद्ध्वस्त फकीराचा एकट दर्गा

साद-प्रतिसाद, सवाल-जवाब, फॉलो-थ्रु
रॉ किंवा सिनेमास्कोप
कव्वालीचा झिलकरी
गातच राहातोय

हराम वर्तनाला
धार्मिक वतन?
ऎकावं ते ते नवल!

"मैने काबे का हज कर के देख लिया"
कव्वाल, तुझ्या सहाशे वर्षाच्या इतिहासाचा भुगोल
बदलतोय

सिंहासनावरुन परमेश्वराला खेचलय कुणी
आणि काळजात खोचलय कुणी

प्रेयसीची गाणी समजता काफीर?
कंट्रोल एफ़ प्रेयसी रिप्लेस वुईथ बाप्पा
"तेरा तुझ को सौंप दे क्या लागत है मोर
मेरा मुझमें नाहीं जो होवत सो तोर"

सुफी,
ह्र्दयावर गोंदवावं
आत्म्याला पिंजून काढावं
वैराण फासळ्यांना अज्ञाताचं आव्हान करावं
इतका का परमेश्वर जवळ असतो तुमच्या सुरांच्या?
कंठाळ कोरस जाऊन ड्र्म्सचे प्लास्टीक, इलेक्ट्रॉनिक बीट्स आले
रागातून सारंगा, तुम्ही सरगम आणले
पण तुमच्या प्रार्थनांची मग्नता कश्यानेच मोडली नाही.
डोळे उघडावे कशाला?
"नैनों को तो डसने का चस्का लगा रे"
आतल्या आतच उघडतात आणि मिटतात तुमचे ऎहीक डोळे.
आतल्या आतच होतात तुम्हाला दिव्यत्वाचे साक्षात्कार.
दिव्याला पाहून नमस्कार.
सुफी,
तुमच्या सुरांनी भरती आलेले
समुद्र लपवताना तारांबळ उडते तेव्हा
आमचेही डोळे उघडतात आणि मिटतात आतल्या आत