Sunday, June 27, 2010

बॅन्डीट क्वीन आणि रणरणतं ऊन

आठवणी येताहेत. रक्त लाल फुल फुलताना गुल्मोहराच्या अंगावर शहारा आला होता त्याच्या हळुवार आठवणी येताहेत. बेसावध अखंड कातळावर पडलेल्या पहील्या घणाच्या आठवणी येताहेत. आठवणी येताहेत लिरिकल प्रवाही नदीच्या, त्यात वाकलेल्या आकाशाच्या. नाजूक क्षणी पत्थरात बंद होवून जीवाश्म झालेल्या पानाच्या नाजूक नक्षीदार खुणांच्या आठवणी येताहेत.

आठवणी येताहेत..पण थांब. आठवणी म्हणजे मुठीत बंद छोटा सजीव पक्षी. सारेच आठवते म्हणावे तर काल कराल मुठीत चिरडुन टाकेल त्या पक्ष्याला. नाही तर कश्या, स्वैर उडवुन टाकेल सारया रमलखुणा.

विवेक, त्याचं नाव. काय करायचा? लॉ करायचा. काय करायचा? -?? का-य करायचा? जगण्यासाठी? नाटकं! फार उंची नव्हती त्याला, खोलीही नव्हती तेव्हा पण डोळे विझले नव्हते अजून. तासं तास नाटकं, नेपथ्य, लाईट्सच्या चर्चा करायचा. एकदा ऎन दुपारचा धडकला. शब्दशः धडकला. तास भर बोलु नको म्हणाला. उद्ध्वस्त डोळ्यांनी फकाट छत शोधत राहीला. छातीभर श्वास घेऊनही आभाळ मावेना तसा गळाभरुन रडला. नुक्ताच बघितलेला बॅन्डीट क्वीन परत परत उपसत राहीला. विवेक? विवेकच असावं त्याचं नाव बहुदा. आपल्याला उगाच वाटत राहातं, ऑर्कुट, गुगलवर सारंच सापडतं म्हणून. आपल्याला उगाच वाटतं आपल्याला सारंच आठवतं म्हणून. उन्हाचा वणवणता कवडसा असाच उदासपणे चमकुन गेला.

बघावी तिकडं माणसं. माणसं, काळी, गोरी, वासाची, बिनवासाची. आणि हो खुप सारी हिरवी, नासक्या सल्फर वासाची सुद्धा. त्यांच्या अंगभर असतात डोळे आणि शरीरभर स्पर्शाच्या दाहक संवेदना. जमेल तेव्हा निरखत राहातात आणि चाचपडत राहातात मानवी देहाचे सोहळे अंगाप्रत्यांगाने ही हिरवी माणसे. थिएटरच्या अंधारात चमकणारे हिंस्त्र डोळे घेऊन ते दबा धरुन रेप सीनची वाट पाहात राहातात.

उलट सुलट आठवणींचे तुकडे हातात आले की माझ्याही नकळत माझी दीर्घ बोटे गोधडी शिवत बसतात. कच्चेपणी का कोण जाणे डिग्जॅमच्या जाहीरातीतला शेखर फार आवडायचा. त्याचा रुबाबदार सुट, कलावंत दाढी आणि अस्पष्ट घोगरा आवाज. आम्ही दोघांनीही आपापल्या सावल्या पायाखाली घातल्या आणि चालत राहीलो. लंडन! तश्या माझ्या आवडींना पुर्वपुण्याईचं संचित बळ देतं खरं पण विक्षिप्त पावसाच्या, टोकदार पारंपारिक लंडनला आम्हा दोघां मधला लघुत्तम सामाईक विभाजक बनावं वाटावं हा बिनचेहऱ्याचा योगायोग. झिम्माड रात्री, कित्येक रात्री, नुसरत शेखरला लंडनच्या पावसात लोकगीतं ऎकवत राहीला. नुसरतच्या मातकट आवाजात डग्गा मिसळुन जातो आणि घनगंभीर आवाजातली विराणी "सांवरे, तोरे बिन जिया जाये ना। जलुं तेरे प्यार मे। करुं इंतजार तेरा। किसीसे कहा जाये नां॥" माझ्या रक्तात मिसळु लागते. सहसा शब्दांना अर्थांवर आणि सुरांना शब्दांवर स्वार होऊ देत नाही मी. पण अश्रद्धांचेही कुठेतरी पंढरपुर असतेच. मातीचा आवाज ऎकण्याचे प्रसंग फार थोडके. अश्यावेळी आपल्या आग्रहांना मुरड घालतो मी.

पडदाभर मातकट रंग पसरलेले. काळा-पांढरा आणि ग्लॉसी रंगीत यांच्या दरम्यानच्या काही शक्यता अस्वस्थ करत होत्या. फुलन! चिंधुकल्यांचे कपडे अंगभर टाचून पडदा व्यापायला सुरुवात करते. खंगलेल्या बापानं वेदना आणि सुडाचा एक अध्याय फुलनच्या बाल-विवाहातून जन्माला घातला.

"छोटी सी उमर परनाई ओ बाबसा
काई थारो काई मारो कसुर"

ही आगतिकता कुणाची? नियतीनं फेकलेले चार तुकडे अमंगळ योग साधतात यात दोष कुणाचा?

"था घर जरनी, था घर खेली
अब घर भेजो दुजा सा
मुसकाये बोला मोरा आंसुदा बोले
हिवडे भरे है भरपुर॥

थारे पिपरयाकी भोली मै चिडत री
भेजे तो उड जाऊं सा
भेजो तो भेजो बाबुल मर्जी हो थारी
सावन में बुलैल्यो जरुर॥"

ठेचकाळत शिकलेले बांध अवचित उद्ध्वस्तच झाले. हातात स्वतःचं घर उभारण्याचं बळ नाही आणि तेव्हाच भातुकली उधळ्ण्याची कोण ही क्रुरता? आणि बयो, कुणाच्या विश्वासावर हा असला जुगार खेळतेस? पावसाच्या? तुझ्या गावात पाऊस आलाच नाही तर डोळ्यांना समांतर कढ आणण्याचं मंत्रबळ कुणाकडे आहे तिथे? बसल्याजागी गुढघ्यातून मोडतो मी.

थिएटरभर पसरलेली अस्वस्थता जाणवण्याइतपत टोकाला पोचलीए. काही माणसाळलेले साप तरीही विषाच्या दातांना धार लावत असतात. बळजबरीच्या प्रसंगी फुलनच्या डोळ्यांवर साचलेला कॅमेरा नंतर फक्त सतत दार उघडण्याचे आणि बंद होण्याचे शॉट्स निर्विकारपणे दाखवत राहातो. नखशिखांत हादरणं माझ्या हाडांपर्यंत जाऊन पोचतं. माणुसपणाची घृणा इतकी की आपलंच कातडं ओरबाडून फेकून द्यावं. थिएटरमधल्या मरणव्याकुळ शांततेला बेशरम सापांचे फुत्कार तरीही भंग करत राहतात.

हिंसेचे समर्थन करत नाही मी आणि तिला फिजुल तत्वज्ञानाचे कुंपणही घालत नाही. उत्क्रांतीच्या दरम्यान रहावं की गळावं यांचा गोंधळ उडालेलं जनुकातलं एक छोटं टिंब म्हणजे हिंसा. महात्म्यांनी आपडीत किंवा थापडीत त्याचंच आकाश केलं. बंदुकीच्या दस्त्यानं गावाच्या मध्यभागी फुलन चेचून काढते ठाकुरांना तेव्हा ना मुठी वळल्या जातात ना डोळे मिटावे वाटतात, बर्फगार मेंदुला झिणझिण्यादेखिल येत नाहीत. थिएटरमधून बाहेर पडतो तेव्हा आपलं माणूसपण गोठून गेलं असतं.

संवेदनांचा तीव्र निषाद अजूनही तसाच लागेल की नाही सांगता येत नाही. पण जेव्हा जेव्हा नुसरत "किसीसे कहा जाये नां" म्हणतो, गोधडीचा जीर्ण वास नव्यानं आठवतो. आठवुनही न आठवणारा मित्र आठवत राहातो. उन्हाचा कवडसा वाट चुकून परत परत चमकत राहातो.