ऑटम माझ्या तळहातावर पडतो सूर्यास्ताचा ठसा सर्व झाडांची पानं चरत जाणारं नाजूक ऍसिड शिशिरातल्या संध्याप्रकाशाचं पुसून टाकतं तीव्र रेषा आता मी इतका पोखरला गेलोय बासरीसारखी भोकं पडून आपसूक अंगाला फक्त वारा सुटायचा बाकी आहे पानगळीपलिकडचं संगीत ऎकू यायला आणि तू मात्र अनिमिष इथे, नदीकाठी, पाण्यात गाढ झोपलेल्या लव्हाळ्यासारखी आकाशाचं प्रतिबिंब पांघरुन मोसमाची आच न लागता तरीही त्याच्याच मुशीत - दिलीप चित्रे चित्रे गेले. विंदांच्या भाषेत सांगायचं तर पंचमहाभुतातल्या भुतासारखी कविता मागे ठेवून गेले. तुकारामांनी विमान पाठवलं नाही याचं नवल करावं की त्यांच्या कविता बुडणार नाहीत याची व्यवस्था केली असेल याचं कोडं सोडवावं येव्हढाच प्रश्न! मटात आलेली ही त्यांची ताजी मुलाखत मराठी कवितेला आगळ्या उंचीवर नेणारे ज्येष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा ७०वा वाढदिवस गेल्या आठवड्यात मुंबईत साजरा झाला. त्यावेळी पोएट्रीवाला आणि अभिधानंतर प्रकाशनातर्फे त्यांच्या एकूण कविता १, २ व ३ मधील निवडक कवितांचा त्यांनी स्वत: केलेला इंग्रजी अनुवाद 'शेष' प्रकाशित झाला. याप्रसंगी दिपुंशी केलेली बातचीत- तुमच्या कव...