Posts

Showing posts from May, 2008

मोरल ऑफ द स्टोरी?

मॅन्चेस्टरच्या एका शांत कोपरयात त्याहूनही शांत असं ते छोटंस रेस्तॉंरॉ होतं. वेगात बुडणारया ब्रिटीश परंपरेच्या शेवटच्या अवशेषांपैकी एक. रेस्तॉंरॉचं नाव टी-क्लब असलं तरी चार रिकामटेकडी म्हातारी सोडली तर तिथे क्वचितच कुणी दिसायचं. अर्थात कुणी यावं असं तिथं काही नव्हतंच. सजावटीच्या नावाखाली कधी काळी तेलपाणी झालेलं जुनाट लाकडी छत, त्यावर कोरलेली रेशीम काढण्याच्या मॅन्चेस्टरच्या जुन्या प्रथेची आताच अर्वाचिन भासणारी चित्रं, पायाखाली करकरणारं लाकडी फ्लोरिंग आणि टेबलावर छोट्या चौकानाचौकानांचं डिजाईन असणारं टेबलक्लॉथ या पलीकडे तिथे आणखी काही ही नव्हतं. पेप्सी, कोक, कॉफी, बर्गरवर वाढणारया नव्या पिढीला तिथे मिळणारया कुकीज आणि चहात कणभरही स्वारस्य नव्हतं. किंचित बहीरा, बराचसा विक्षिप्त आणि अस्सल शिष्ट इंग्रज म्हातारा तो टी-क्लब चालवायचा. दिवसभरात मोजून १५-२० लोक तिथे यायचे तरी म्हातारयाचं बरं चालायचं. आलेल्या लोकांना न हसता अभिवादन करण्याचा त्याचा रोजचा शिरस्ता मोडायचा तो फक्त महीन्याच्या शेवटच्या रविवारी जेव्हा त्या चार व्यक्ती एकत्र यायच्या तेव्हाच. त्याला कारणही तसंच होतं. ती चारही टाळकी अस्सल

कन्फेशन्स आणि इतर तुच्छ गोष्टी

कन्फेशन्स म्हणजे मनाचे तळ परक्याच्या निक्क्या बोटाने ढवळायचे आणि पापफुटीच्या भयाला किंचितभरही थारा न देता मोकळं व्हायचं अशी राजस परंपरा. गदगदलेल्या झाडांचे संभार तर अफाट पण निरर्थक रानफुलांना माळणार कोण हा कळीचा प्रश्न. लाकडी जाळीआडच्या पाद्रयाचं काळीजही वातड झालेलं असतं पाप-पुण्याचे रोजचे हिशोब ऎकून. कन्फेशन्स...आवडतात, म्हणून ती द्यावीतच असं नाही. मात्र फुलांच्या ताटव्याआड फुटून फुटून कन्फेशन्स देताना अल पचिनोचा मायकेल कोरलेओन पाहील्यानंतर तळाशी दाबून ठेवलेला दगड स्प्रिंग सारखा उफाळून आला. हिवाळा होता का तेव्हा? हिवाळाच असावा बहूदा. नुक्तंच प्रसिद्ध झालेलं तिसरं पुस्तकही सलगपणे गाजत होतं. आणि चौथ्याच्या तयारीसाठी माझ्या प्रशस्त बंगल्यात मी एकटाच राहात होतो. लिखाणासाठी ही जागा पर्फेक्ट होती. कॉलनी नवी होती त्यामुळे फारश्या ओळखी आणि पर्यायाने फारशी येणावळ नव्हती. माझा बंगला कॉलनीच्या शेवटाला होता त्यामुळे येणारया जाणारया गाड्यांचे, माणसांचे फारसे ताप नव्हते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बंगल्याच्या मागच्या बाजूला एक छोटं तळं होतं. लिहायला बसलं की खिडकीतून ते तळं, त्यात पडलेलं चांदणं स्प

कुळकथा

रुट्स नावाचं पुस्तक वाचून म्हणे अमेरिकेत आपलं कौटुंबिक मुळ शोधण्याचं फॅड आलं होतं. तसं आपल्याकडे कुलवृत्तांत, गोत्र वगैरे गोष्टी आहेत पण खानदान की खोज म्हणजे जरा अतीच झालं म्हणावं लागेल. मुळातच राजु मुर्डेश्वरकर, हणमाप्पा कवाडे किंवा बाळासाहेब शिंदे इतपत चिल्लर नावं असणारयांनी वंशवृद्धीला खानदान म्हणावं म्हणजे स्नेहा उलालला ऎश्वर्या राय म्हणल्यागतच झालं. विजयविक्रम चोप्रा, संपुर्णप्रताप सिंग असं भरगच्च नाव असणारयांनी खानदान शब्द वापरावा. त्यांच्याकडे म्हणजे कसं, पोरगी पळून गेली की खानदान की इज्जत वगैरे जाते. आपण लग्नाचा खर्च वाचला म्हणत हुश्श करणारे बिच्चारे लोक. तर बाय डीफॉल्ट मी बिच्च्यारा कॅटॅगिरीत असतानाच मी गंडलो. झालं असं की एका दिवाळीत आख्या कुटूंबानं एकत्र यावं असं कुठल्यातरी काकाच्या डोक्यात आलं आणि आम्ही सगळे नांदेडला गेलो. बरीचशी काकामंडळी य वर्षांनी भेटली. काही चुलत भावंडांचे चेहरे फिक्कट ओळखीचे वाटत होते पण मुद्दलात आनंद होता. एक बरया पैकी मोठा दिसणारा बाप्या शिंग मोडून आमच्यात खेळत होता, आमच्या बरोबर जेवत होता आणि नंतर आमच्याच घरी झोपलाही. दुसरयाच दिवशी खेळता खेळता भांडणं

रस्ता

रस्ता, आदी अन अनंताच्या मधे घुटमळणारा नुस्ताच गुंता. त्याच्या एका बिंदुवर मी सावरुन उभा आहे जणू की तो असावाच एका शेवटाची सुरुवात फक्क पिवळे सोडीयमचे दिवे ओकताहेत पारंपारिक शिळाच प्रकाश, किंवा सरावाने तोडताहेत अंधाराचे हिंस्त्र लचके. आणि आपल्याला उगाचंच वाटत राहातं दिवे प्रकाश देतात रस्ता, पहील्या प्रियकराच्या आठवणींसारखा; संपतच नाही संदर्भ संपले तरीही. लख्खं काळा जणू काळजाला पिळा. त्याच्या काठाकाठावर, भ्रमिष्टांसारखी झुलत असतात गुल्मोहरी काही झाडं, अधूनमधून पडणारया चांदण्यांच्या सावल्यात. रस्ता, अनाघ्रात आणि अस्पर्श. रात्रीचा एखादाच चुकार वाटसरु अंगावर ओरखडे ओढत जातो; अन्यथा पुर्णपणे व्हर्जिन

आयवा मारु

"कोणे एकेकाळी" असं म्हणण्याइतपत जुनी गोष्टं नाही ही. सत्तरीच्या आसपास आयवा मारु नावाचं एक मालवाहु जहाज प्रवासाला निघालं. कोणत्याही जहाजाला असतो, तसं आयवा मारुला पण एक कॅप्टन होता, फर्स्ट मेट, सेकंड मेट, थर्ड मेट होता, चीफ ऑफिसर, सुकाण्या, कुकही होता. या सारया मुरलेल्या खलाश्यांना समुद्राची, त्याच्या वादळांची सवय होती. पण एक वादळ त्यांच्या सोबतच प्रवासाला निघालं होतं ते जरा निराळं होतं. आयवा मारुवर राहणारया या वादळाने आणखी वादळे निर्माण केली आणि आयवा मारुचा तळ ढवळुन निघाला. आयवा मारुवरच्या माणसांच्याच काय पण प्रत्यक्ष आयवा मारुच्याही इच्छा, वासना, आशा जागृत व्हाव्यात असं भीषण वादळ. एम. टी आयवा मारु ही त्याचीच गोष्ट. ******************************************************* अश्रूंच्या उंच सावल्या कलंडतात तिच्या बिलोरी डोळ्यांत आक्रोशत ओलांडतात अक्षांश आग लागलेले राजहंस आणि तिच्या गिरकीची शैली उगवते भूमितीत दिक्काल अचानक पडतो एक क्ष-किरणांचा झोत अंगावर आणि तिच्या शरीराचें शुभ्र यंत्र होते पारदर्शक पेटलेल्या कंबरेभोवती तिच्या विस्कटतात छाया किंचाळतात नीरवपणे स्तब्धतेत वाहणारया तिच्