Sunday, May 18, 2008

कन्फेशन्स आणि इतर तुच्छ गोष्टी

कन्फेशन्स म्हणजे मनाचे तळ परक्याच्या निक्क्या बोटाने ढवळायचे आणि पापफुटीच्या भयाला किंचितभरही थारा न देता मोकळं व्हायचं अशी राजस परंपरा. गदगदलेल्या झाडांचे संभार तर अफाट पण निरर्थक रानफुलांना माळणार कोण हा कळीचा प्रश्न. लाकडी जाळीआडच्या पाद्रयाचं काळीजही वातड झालेलं असतं पाप-पुण्याचे रोजचे हिशोब ऎकून.

कन्फेशन्स...आवडतात, म्हणून ती द्यावीतच असं नाही. मात्र फुलांच्या ताटव्याआड फुटून फुटून कन्फेशन्स देताना अल पचिनोचा मायकेल कोरलेओन पाहील्यानंतर तळाशी दाबून ठेवलेला दगड स्प्रिंग सारखा उफाळून आला. हिवाळा होता का तेव्हा?

हिवाळाच असावा बहूदा. नुक्तंच प्रसिद्ध झालेलं तिसरं पुस्तकही सलगपणे गाजत होतं. आणि चौथ्याच्या तयारीसाठी माझ्या प्रशस्त बंगल्यात मी एकटाच राहात होतो. लिखाणासाठी ही जागा पर्फेक्ट होती. कॉलनी नवी होती त्यामुळे फारश्या ओळखी आणि पर्यायाने फारशी येणावळ नव्हती. माझा बंगला कॉलनीच्या शेवटाला होता त्यामुळे येणारया जाणारया गाड्यांचे, माणसांचे फारसे ताप नव्हते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बंगल्याच्या मागच्या बाजूला एक छोटं तळं होतं. लिहायला बसलं की खिडकीतून ते तळं, त्यात पडलेलं चांदणं स्पष्ट दिसत राहायचं. दिवसा त्या तळ्याकाठी बरीच प्रेमळ जोडपी हातात हात घालून हिंडत असायची आणि संध्याकाळी म्हातारीकोतारी येऊन बसायाची तिथे. पण माझी लिखाणाची सुरुवातच मुळी कधी तरी मध्यरात्री व्हायची ती पहाटपर्यंत त्यामुळे लिखाणाला हवी असलेली निरंजन शांतता मला तिथे पुरेपुर लाभायची.

असंच एका रात्री लिखाणाचा ज्वर ऎन भरात असतानाच तळ्याकाठून एका वेडसर हसण्याचा भयाण आवाज आला. डोळे ताणले तरी कुणी दिसत नव्हतं. माझा तर मुडच गेला. मी सगळं आवरुन झोपी गेलो. पण मग तो रोजचाच शिरस्ता झाला. माझ्या लिखाणाला दृष्ट लागल्यासारखं ते बंद होऊन गेलं. त्या वेडसर आवाजाच्या शोधात मी कित्येक दिवस गाव पालथं घातला पण व्यर्थ.

लिखाण तर बंदच झालेलं होतं त्यामुळे वाट फुटेल तशी एका रात्री मी गाडी हाकत होतो. अचानक थोड्या अंतरावर मला तो दिसला. त्याला कधीच पाहीलं नव्हतं तरी मी त्याच्या विक्षिप्त हसण्याला चांगलाच ओळखुन होतो. कपडे असून नसल्यासारखे, जागोजागी जखमा, त्यावर बसलेली धुळ, भिस्स वाढलेले केस आणि तोंडावर तेच ते अस्वस्थ करणारं विकट हसु. क्षणभरच दाटलेल्या कणवेवर विकृत तिरस्काराने लगेच मात केली. डोक्यात अडकलेल्या अर्थांचे घण झाले आणि गाडीच्या ऍक्सलरेटरवर धाडकन आपटले.

सगळ्या शहाण्यांनी एकत्र येऊन तो अपघात ठरवला आणि मला अन त्या वेड्यालाही मुक्ती मिळाली. पण माझे डोळे आता गोठलेत. असं वाटतं की पेन मधून शाई ऎवजी रक्त वाहातय आणि कागदावर चुकून उमटणारे शब्द फेर धरुन नाचत हसताहेत.

ज्या तळ्याच्या काठी बसून मी आज तुम्हाला हे कन्फेशन देतोय, त्याच तळ्यात काही काळा पुर्वी मी माझं सगळंच लिखाण बुडवून मारलय. लौकीक अर्थानं ही शिक्षा नसली तरी माझ्या मनाला तेव्हढंच अपरं समाधान...

9 comments:

Samved said...

मलाच आधी सांगु दे..इंजिनिअरिंगच्या पहील्या वर्गात कधी तरी लिहिलेली ही गोष्ट होती. अचानकच आठवली म्हणून छापून टाकली. त्या पलीकडे काही नाही..

Meghana Bhuskute said...

अजून काहीतरी हवं आहे... सॉरी अगेन. :(

Yashodhara said...

सही!!

Jaswandi said...

"Danger" ashi pratikriya hoti.

mag tumachi comment vachun ata "SAHICH"...

Megha said...

pahila paragraph kunacha re?
mala faar aavadala.

a Sane man said...

काय म्हणू?...गोष्ट सुरेख आहे म्हणू की तुझी प्रतिक्रिया वाचेस्तोवर मनात धस्स करून गेली म्हणू? बहुदा प्रतिक्रिया वाचेस्तोवर मनात धस्स करून गेली म्हणून सुरेख! अन्वयाचे गुंते संदिग्ध अर्थाच्या उखाण्यात ज्याने त्याने आपापले सोडवायचे...हेच खरं!

एखादी दीर्घ कथा लिही ना कधी वाटलं तर...एक विनंती!

mad-z said...

कधी कधी एखादा विचार मनात येतो आणि वाटतं साला हे कधी तरी आधी घडलंय ... आणि मग लाखप्रयत्ने ते उमगत नाही.

पण या वेळी गोष्ट वेगळी आहे. (आणि योगायोग म्हणजे आणखी काय असत!) खरं सांगायचं म्हणजे मला हे सत्य वाटतंय. किंबहूना आज मी ज्या अवस्थेतनं जातोय ते पहाता हा असा अपघातच त्यातनं सोडवू शकतो हे मला पक्क ठावूक आहे आणि तो अपघात घडवण्यासाठीच मी गाडीचे अगदी ब्रेक्स काढुनही टाकलेत. अपघात घडला की मी तुला त्या तळ्याकाठी परत भेटेन .. हातात पेन आणि पेपर घेवून परत आधीसारखं लिहीण्याकरीता!

Samved said...

यशोधरा, जॅस, सेन, मला किंचित वाटलं होतं की सगळ्यात आधी मी स्पष्टीकरण देणं अवश्यक आहे म्हणूनच मी आधी comment टाकली. पण तुम्ही लोक इतक्या गांभिर्यानं घ्याल असं खरंच वाटलं नव्हतं. Thanks for the concern hidden in your messages.

सेन, जरा विचार केला, तर त्या वेड्य़ा माणसाच्या जागी कुणी ही असु शकतं रे!

दिनेश, बराच भंजाळलेला दिसतोयस..वेड्याच्या जागी बॉस दिसतोय की अजून कोणी?

मेघना B, सेन, दीर्घ आणि बरं लिहीण्याचा प्रयत्न करेन

मेघा, तुला आवडला का पहीला पॅरा? मला पण जाम आवडला. कसलं कातील लिहीलय नां? ...मीच लिहीलय :) :) :)

सर्किट said...

masta ch re.. chyayala, angavar kaTa ala.. mala adhi vaTalela ki kharach asa kahi karun alayes ki kaay hya weekend la? ;-p