Posts

Showing posts from March, 2009

माया

हिवाळ्यातील तहानेचे संकेत जरासे निराळे त्यात तगमग नसते उन्हाळी निवून जाण्याचे सोसही नसतात तुझ्या गुणसुत्रांची मांडण कदाचित तशीच; तालबद्ध अवरोहांची विलंबित लय. तुटण्याचे भय आणि जोडण्याची उत्कटता समेवर पेलतात तुझे मायावी हात.. हात.. बर्फाचे अभ्रकशुभ्र.. किंचित पारदर्शी आणि संदिग्धही.. माझ्या देहचूर कविता झाडात चंद्र अडकावा तश्या उसवतात तुझ्या स्पर्शातून स्पर्श... बर्फाचा.. अस्तित्वाचे दंश पुसून रक्ताशी एकरुप होणारा वंशहीन.. हिवाळी ओल्या तहानेसारखा तुझ्या भरतीचे एक वतन माझ्या हवाली करताना फकिराच्या वासनेचा उरुस तुझ्या दिठीत पाहीला मी आणि तेव्हापासून माझ्या चेतनातंतूंवरुन वाहाताहेत तुझे ओले स्पर्श

नाव देण्याचा कंटाळा आल्याने नाव न दिलेले पोस्ट

परवाच्या लोकसत्तात दहावीची परिक्षा झाल्यानंतर बर्फाचा गोळा खाणारया हुश्श्य आणि खुश्श्य अश्या तीन मैत्रिणींचा फोटो आला होता. तो बघून आनंद आणि हेवा असं काहीसं एकत्र वाटलं. कुठलीही आनंदी माणसं दिसली तरी मला आनंद होतो. नुस्ती माणसंच का, आनंदी मूडचं गाणं किंवा एखादा आनंदी प्रसंग पाहीला तरी का कोण जाणे पण रक्त अचानक निळसर गुलाबी होतं असं मला सारखंच वाटत आलय. आणि इथे तर परिक्षा नावाच्या राक्षसाचं मर्दन करुन आलेल्या तीन मैत्रिणी! फुल ऑफ युथ!! कसलेही ताण नाहीत, भविष्याची चिंता नाही, मैत्रीचं अजब गारुड अजूनही गळेकापु स्पर्धेपासून अलिप्त ठेवू शकतं!! बोला राव, अजून काय हवं असतं कधी कधी आनंदी असायला? आणि हो, पुढचे दोन-तीन महीने निवांत सुटी! आणि माझ्यातल्या रिंगवाला एजंल इथे संपतो आणि शिंगवाला राक्षस जागा होतो! आम्हाला का म्हणून नाही सुट्या? पोरांएव्हढंच उन, किंबहुना जास्तच आम्हाला लागतं (कारण एसीच्या सवयी), आम्हालाही पोटाला तडस लागेपर्यंत आब्यांचा रस खाऊन दुपारी डाराडूर झोपावं वाटतं, मामाचा गाव आम्हालाही असतो, निवांत वाचायची म्हणून जमा केलेली पुस्तकं, जमा केलेले सिनेमे, गाण्याचे छंदबंदंवाले क्लास अ

टू टेल्स

//१// सत्यशीलाने मोहाचे पाश तोडायचे ठरवले. अंतीम सत्याचे ज्ञान हेच त्याचे साध्य होते. अजून थोडा उशीर केला तर निश्चयाचे बळ कमी पडायला लागेल हे ओळखुन त्याने राजप्रासादाच्या दुसरया टोकाला असणारया मुख्य महालाकडे कुच केली. सत्यशीलाचा मनोदय ऎकून भाल्यागत ताठ राजा क्षणभर खांद्यातून वाकला. राजा म्हणून त्याचे धर्माप्रती कर्तव्य होते खरे पण म्हणून आपल्याच राजवंशी अस्तित्वाला असं पणाला लावावं लागेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. राजराणीने दरबारी नियमांना न जुमानता सज्जा सोडून ऎन दिवाणखान्यात धाव घेतली. नाळेने जोडले गेलेले आदी-सत्य तिच्या मिठीतून सोडवत सत्यशीलाने राजमुकूट तिच्या चरणी ठेवला. अंगावरील रेशमी उत्तरीय दोन्ही हातांनी उभे चिरत त्याने संसाराच्या वाटेवरचा शेवटचा धागाही तोडून टाकला. सत्यशीलाला सीमेपार सोडण्यासाठी सहा अबलख घोड्यांचा रथ आला. का कोण जाणे पण त्यावर फडकणारा ध्वज आज निस्तेज वाटत होता. सत्यशीलाने तो रथ नाकारला. लाकडी कठोर खडावा पायी चढवुन तो निघाला. त्याच्या मागोमाग हुंदके दाबत अथांग जनसमुदायही निघाला. सीमेपाशी थांबून सत्यशीलाने त्या जनसमुदायाला वंदन केले "नात्यांचे पाशच तोडू