Posts

Showing posts from 2010

अ- कील

जंगलातून सयामी असल्यागत आम्ही जुळेच धावत सुटलो ठेचकाळत जीवाच्या आकांताने कधी कधी हिरव्याकांत तृणाच्या धारदार पात्यांवरुन धावण्याला भितीचा आकार नव्हता पाठीवरच्या लंपट तीळासारखी निव्वळ निखळ जाणीव दिशांनी वाटा अडवल्या पण हातातून हात सुटले नाहीत प्रहरांनी चकवे लावले पण पाय क्षणभरही थबकले नाहीत भाळावर कोरलेली अक्षांश रेखांशाची प्रमेये कधीच तुझ्या वतनावर वाहीलेली म्हणून हक्काचे आलो तुझ्या मुक्कामी पण दिठीतले धुके जरा निवळते तोच दारावर मारेकऱ्यांच्या अबोध खंजीराची नाजूक नक्षीदार किणकिण "त्यांना" असते हेवा वाटावे असे दगडी काळीज "त्यांना" माहीत नसतो घटनेमागचा कार्यकारणभाव "ते" जोडतात आणि मोडतात काळाचे काही तुकडे "त्यांना" नेमून दिलेले चित्र पुर्ण करण्यासाठी "त्यांना" माहीतही नसतं आमचं जुळं अस्तित्व एका क्षणाचा इतिहास झाला काजळाचा एक आर्त थेंब टेकवलास गालावर- जुळ्यांमधे द्वैती पाचर जशी पुरत्या जन्माची नवी ओळख जशी एका जगण्यासाठी- एक मरण अस्तित्वाचा दंश जणु तुझी काजळमाया आवेगाने दार उघडलस आणि डार्लींग, तू कवितेला मारेकऱ्यांच्या हवाली केलस.

रेषेवरची अक्षरे 2010

यंदाचं रेषेवरची अक्षरेचं तिसरं वर्ष. तिसरं म्हणजे खासचं नाही? हॅट-ट्रीक, साडे माडे तीन इ इ. प्रस्तावनेतून उचलेली ही कविता आणि ही लिंक, बघा काही कुतुहल चाळवतय का...बरं वाईट जसं वाटलं तसं कळवा अंक कसा झालाय ते. आपल्याही बाब्याचं कौतूक कधी करावं म्हणून नाही, पण यंदाचा अंक मला खरंच आवडलाय... http://reshakshare.blogspot.com/ आम्ही लिहितोच आहोत पैसाच्या खांबाला टेकून किंवा गणपत वाण्याच्या बिडी बंडलाला फुंकून मुक्तपणे कधी आणि कधी प्रमाणबद्ध आकृतिबंधात. इरेस पडलों जर बच्चमजी तर आम्ही मोरूच्या बोरूनेही लिहिले असते किंवा कमळाच्या सचित्र पानांवरही. गणिताच्या वहीत मागच्या पानांवर आम्ही लिहीत होतो आणि लिहीत होतो कोसळणार्‍या पावसात काचेच्या तावदानावर उन्मनीपणे. आज विदेशी कळ-फलकावर मातृभाषेच्या पाऊलखुणा शोधत आम्ही लिहितोच आहोत. पण नंतर असेच झाले अट्टल कलावंताचे होते तसेच झाले प्रश्नचिन्हांनी फेर धरले आमचेच शब्द गर्गरा फिरले. अप्रकट विचार तरंगासाठी असतातच का नेमके शब्द? आणि या सांकेतिक चिन्हांतून खरंच का हो होते अर्थबांधणी? शब्दांवर शब्द रचत आमचाच अक्षर समुच्चय तेवढा भद्र आणि जन्म-मृत्यूचे दाखले, वाण्

ऍबस्ट्रॅक्ट वातकुक्कुट

रिकाम्या वेळात पेन्सिलींना टोक काढणं म्हणजे लिहीण्याची जय्यत तयारी किंवा सफाई कामगाराला अखंड कामाची हमी. किंवा शुन्याचा कडेलोट बिंदु शोधून काढणं हा ही एक दैनंदीन कार्यक्रम असुच शकतो. असं सावरुन बसलं असताना ती दोघं आली तरी लेखक दचकणार नसतो. लेखक- तुम्ही काय करताय? तो- मी पाय मोडक्या स्टुलवर बसलोय आणि ती स्पंज उसवलेल्या खुर्चीत टेकलीए लेखक- मी उसवलेल्या पेन्सिलीची कुंची शुन्याला घालत आहे. ती- प्रश्न नसताना उत्तर देताय म्हणजे तुमच्या मनात नक्कीच कुठेतरी अपराधी भावना आहे. असो. निष्पर्ण वृक्षाखाली टोपी घातलेलं कुणीच नाही तरी आपण असे का बोलत आहोत? असे का? असे का? असे का? तो सर्वत्र आहे. तो सदैव आहे. तो सर्वाकार आहे. गोदाशेट, गोदुकल्या, लाडक्या गोदुका तू नाहीस तरी तू आहेस रे. तो- महोदय, मुद्याला भिडु. आपण आमची गोष्ट लिहावी असा आमचा प्रस्ताव आहे. लेखक- पण तुमच्या गोष्टीत विशेष काय? ती- काहीच नाही. पण तुम्हीही रिकामेच आहात. आणि तुमचं आडनाव पिरॅन्डेलो नसतानाही तुमच्या गोष्टीतली पात्रं तुम्हाला बोलताहेत हे विशेष नव्हे काय? काही तरी घडवण्याची संधी आल्यानं लेखक सावरुन बसतो. दरचवेळी सावरुन बसलं की क

उपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता

नव्या खेळण्याचं कौतुक संपलं की ते विसरायला होतं. ब्लॉग्सचं असंच काहीसं होतय. संपलेलं नावीन्य, कामांचा तगादा, कधीमधी विषयांचा अभाव इ. इ. कारणांमुळे भलेभले ब्लॉगे गारद झाले किंवा वाटेवर आहेत तर काहींचा रायटर्स ब्लॉक संपता संपत नाहीए. फार काही सुचत नसलं की स्मरण-रंजन करावं असा विनोद मी नेहमीच करतो (आणि काही लोक तो गंभीरपणे घेऊन निव्वळ तेव्हढंच लिखाण करतात) पण आता आख्या समुद्राला उकळण्याची वेळ आली असं दिसतय. म्हणून परत एकदा खो खो चा उपद्व्याप सुरु. यावेळी खेळ आणि नियम एकदम सोपे आहेत. मराठी सोडून कुठल्याही भाषेतली तुम्हाला आवडलेली दुसऱ्या कुण्या कवीची एक कविता(/ गाणं) देवनागरीत किंवा इंग्रजीत लिहायची आणि सोबत तुम्ही त्याचं मराठीत भाषांतर करायचं. तुम्ही कवी (बाबा किंवा बाई अर्थानं)ची काही माहीती देऊ शकाल तर अजूनच मजा पण कंपलसरी नाही. शक्य झालं तर तुम्ही खो दिलेल्या ब्लॉगची लिंक या पोस्टच्या कॉमेन्टमधे टाका म्हणजे कुणी हरवणार नाही. शिट्टी फुर्र्र्र्र ******************************************************** अमृता प्रीतम नावाचं वादळ होतं. पंजाबसारख्या पाश्चात्य आचार आणि कर्मठ विचार अश्या दोन टो

बॅन्डीट क्वीन आणि रणरणतं ऊन

आठवणी येताहेत. रक्त लाल फुल फुलताना गुल्मोहराच्या अंगावर शहारा आला होता त्याच्या हळुवार आठवणी येताहेत. बेसावध अखंड कातळावर पडलेल्या पहील्या घणाच्या आठवणी येताहेत. आठवणी येताहेत लिरिकल प्रवाही नदीच्या, त्यात वाकलेल्या आकाशाच्या. नाजूक क्षणी पत्थरात बंद होवून जीवाश्म झालेल्या पानाच्या नाजूक नक्षीदार खुणांच्या आठवणी येताहेत. आठवणी येताहेत..पण थांब. आठवणी म्हणजे मुठीत बंद छोटा सजीव पक्षी. सारेच आठवते म्हणावे तर काल कराल मुठीत चिरडुन टाकेल त्या पक्ष्याला. नाही तर कश्या, स्वैर उडवुन टाकेल सारया रमलखुणा. विवेक, त्याचं नाव. काय करायचा? लॉ करायचा. काय करायचा? -?? का-य करायचा? जगण्यासाठी? नाटकं! फार उंची नव्हती त्याला, खोलीही नव्हती तेव्हा पण डोळे विझले नव्हते अजून. तासं तास नाटकं, नेपथ्य, लाईट्सच्या चर्चा करायचा. एकदा ऎन दुपारचा धडकला. शब्दशः धडकला. तास भर बोलु नको म्हणाला. उद्ध्वस्त डोळ्यांनी फकाट छत शोधत राहीला. छातीभर श्वास घेऊनही आभाळ मावेना तसा गळाभरुन रडला. नुक्ताच बघितलेला बॅन्डीट क्वीन परत परत उपसत राहीला. विवेक? विवेकच असावं त्याचं नाव बहुदा. आपल्याला उगाच वाटत राहातं, ऑर्कुट, गुगलवर स

गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी

बयो, चाफ्याचं वेडं मोठं जीवघेणं. मणीदार सर्पाला ही सुटत नाही सुगंधाची चटक आणि तुझं वय हे असं, बेभान. म्हणालीस, पापण्यांवर तोलेन वरचेवर एखादं फुल, अस्पर्श, म्हणजे स्वप्नही भारलेलं सुगंधी पडेल. होतं असं? पडतात अशी ठरवुन स्वप्न? तुझ्या स्वप्नात चाफा, चाफ्याच्या स्वप्नात तू. परत चाफा, परत तू. आणि मग लहान लहान होत तुमच्या प्रतिमा एक होऊन जातील. तू चाफा-चाफा म्हणजेच तू. चाफ्याचं झाडं ही जरा अल्लडच. पानांचे बहर जेमतेम येताहेत तोवर टच्च गर्भार कळ्यांचे ऋतु पानांआडून बेबंद उलगडुही लागले. पानांची नवथर नवलाई निरखावी की कळ्यांचे गर्भार सोस जपावेत हा मोठा जीवघेणा प्रश्न. पानांवरच्या रेषांत भविष्य बघून तू म्हणालीस, कळ्यांना जपायला हवं. सावल्यांच्या दीर्घ साजणवेळी वाऱ्यावर वाहून आले असतील निळावंतीचे काही शब्द कानी, झाडांना तुझी भाषा समजते. पानांच्या कोषात कळ्यांचे संभ्रम दडून गेले. सुर्य कलथुन जाण्याआधी आमरशी रंगाचा पट्टा ओढतो तरी कळ्या शहारत नाहीत. वाऱ्याच्या भुलीला फशी पडून त्या गंधही उधळत नाहीत. उत्कट डोळ्यांनी पाहात राहातेस तू गुणसुत्रांची मायावी मांडणी. फुलांवर इतका लळा लावु नये कधी मुली. मोह, क

बाष्कळ नोंदी

शप्पत- करंगळी, मरंगळी, मधलं बोट, चाफेकळी, अंगठा. हाताच्या बोटांचा हा क्रम ग्राह्य धरला तर चाफेकळी आणि अंगठा यांच्या चिमटीत (स्वतःचा) कंठ पकडला की होते शप्पत. काही भाषाप्रभुंना हा शब्द शपथ असाही आवडतो पण शप्पतची परिणामकारकता शपथला नाही. शप्पत हे एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्याला खात्री देण्याचं हुकुमी शस्त्र आहे. म्हणजे कसं की ’गोजमगुंडेबाई त्यांच्या घरात चेंडु गेला की विळीवर चिरुनच ठेवतात, तुझी शप्पत’ असं, यावर अपील नाही. प्रसंगी तो चेंडु विळीवर गळा कापून जीव देईल पण शप्पत खोटी जाऊ देणार नाही असलं भारी. शप्पत घेण्याच्या तीन पायऱ्या असतात; तुझी शप्पत, आई शप्पत आणि देवा शप्पत. कुणी खोटी शप्पत घेत असेल तर ज्याची शप्पत घेतली तो मेलाच समजायचं. फारसे बरे संबंध नसताना कुणी तुझी शप्पत म्हणालं की उतारा म्हणून डोक्यावर हात ठेवावा, शप्पत लागत नाही. परिणामी तुम्ही जिवंत राहाता. अश्यावेळी खरं खोटं करायचं झाल्यास घे आई शप्पत अशी गुगली तुम्ही टाकु शकता. पाच मिनीटं- हे वेळ मोजायचं सर्वात छोटं परिमाण असे. इकडुन अमेरिकेला विमानानं जायला पाच मिनीटं लागतात असं काही तज्ञ मुलं छातीठोकपणे सांगत तेव्हा बाकीची म

मशिनगन मुथ्थु: लामचा आणीक जवळीचा

प्रथा- मद्रासेत ग्रॅज्युएट, मुंबईत नौकरी, मद्रासेत लग्न, मुंबईत पोरं, मद्रासेत सांभार, मुंबईत वडा, मुंबई, मद्रास, मुंबई, मद्रास,मुंबई, मद्रास,मुंबईत रिटायर, मद्रासेत हर्ट, फुलस्टॉप. गीत- सोलोमन ग्रॅन्डे । बॉर्न ऑन सन्डे । डाईड ऑन सन्डे रित- नवाला ओठ सीलबंद करणारी गोडगट्ट कॉफी, बुडाला डिंक, आध्यात्मिक चेहरयानं फाईली रिचवणं वर्ष- चौदावे प्रगतीची दिशा- उर्ध्व संस्कार- बाबा वाक्यम् प्रमाणम्. साहेबाबाचं वाक्य पुर्ण होण्याआधी निदान चार वेळा "यास्स्सार" होकारार्थी मान हलली नाही तर घोर पातक नाव- मुथ्थु- यास्सार मुथ्थु यास्सार मुथ्थुचा बायोडाटा हा असाच राहाता पण साहेबा बरोबर त्याचे ग्रहही बदलले. नव्या साहेबांनी जुनं ते कसं चुक, सांगत भानामतीत बिब्ब्याच्या फुल्या माराव्यात तसं मुथ्थुवर फुली मारली. मुख्य डिपार्टमेन्टमधून हलवुन मुथ्थुला त्यांनी सिस्टम्सवर टाकलं. क्वालिफिकेशन हेच की मुथ्थुला टाईपिंग येतं. त्याचवेळी कंपनीत ईआरपी लावायची टूम आली. आयटी कंपनीतली नुक्तीच एमबीए झालेली पोरं कोकाटे फाडफाड इंग्रजी बोलत मुथ्थुला त्याच्याच कामाची माहीती नव्यानं देऊ लागली. प्रश्नोत्तरं झाली, फ्लो डाय

अपुर्णांकाची अवतरणे- ।४/४।-टिक्टॉक टिक्टॉक सी-सॉ

[पुस्तक शेवटाकडून वाचण्याचा उरफाटा शौक नसेल तर ही गोष्ट पुढील क्रमाने वाचा: अपुर्णांकाची अवतरणे- ।१/४।-रम्य ते अभयारण्य अपुर्णांकाची अवतरणे- ।२/४।-सपाट इस्त्रीसारखा मेंदू अपुर्णांकाची अवतरणे- ।३/४।-सॅन्डी, भाड्या कुठं आहेस तू? ] कॅन्टीनच्या मागल्या बाजुला बसून मीरा पॅडीला प्रेम करावं भिल्लाच्या बाणासारखं वगैरे सांगत होती. तिचा गळा किंवा आपले डोळे भरुन आले तर काय करायचं या विचारांनी पॅडीचं लक्ष पारंच उडालं. त्यानं गेले कित्येक दिवस रुमाल धुतलेलाच नव्हता. संत्र्यासारखं रुमालाची घडी सोलत सोलत त्यानं सगळ्या बाजु वापरुन टाकल्या होत्या आणि आत्ता निकराच्या प्रसंगी रुमाल लागला तर रुमाल म्हणून त्याच्याकडे एक घामट काळपट चौरस कापडी तुकडा होता. त्यानं कसंबसं मीरेला थांबवलं. अनिलाला आर्चिजच महागड आय लव्ह यू वालं ग्रिटींग देऊन ऑलमोस्ट एक वर्ष झालं होतं. शिवाय ग्रिटींगमधलं गाणं वाजणं बंद झालं तर स्पेअर असावा म्हणून एक बटण सेल पण दिलेला. बाटलीभर गुलकंद निघेल इतके गुलाब देऊन झाले होते. पण तिच्या नरडीतून हो काही निघाला नव्हता. या सगळ्याची पुढची पायरी म्हणजे तिला पळवुन नेणं. पण पॅडी ऎनवेळी चपलेचा अंगठा त

अपुर्णांकाची अवतरणे- ।३/४।-सॅन्डी, भाड्या कुठं आहेस तू?

अंधाराचं एक बरं असतं, सगळा उजेड काळाभोर असल्यानं कुणाच्या डोळ्यातले भाव वगैरे दिसत नाहीत. दारुचंही तसं एक बरंच असतं की ती पोटात गेली की कान मुके अन जीभ बहीरी होऊन जाते. त्यामुळे पॅडी आणि सॅन्डी अंधारात दारुकाम करत बसले होते या घटनेतच मोठी सीनर्जी होती. सीनर्जी म्हणजे १+१>२! थोड्याच वेळात हॉस्टेलच्या ज्या भिंतीवर बसून आपण दारु पित आहोत ती आपण चल म्हटलं की चालायला लागेल इतपत आत्मविश्वास आल्यावर सॅन्डीला जोराचं रडु आलं. म्हणजे तो इमोशनलच झाला जवळ जवळ! गेले कित्येक दिवस पॅडी जे ऎकत होता ते त्यानं "य"व्यांदा ऎकलं. म्हणजे एनपीचं उभरतं पोलिटीकल करिअर कसं खलास झालं, सॅन्डीवर कसा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याला आता विद्यार्थी बंधु-भगिनींची सेवा कशी करता येणार नाही वगैरे वगैरे. "तुला काय वाटतं?" सॅन्डीचा झुलता प्रश्न पॅडीला गिरमिटात पेन्सील घालून टोक काढल्या सारखा वाटला. पॅडीला वाटलं आपण सरळ सगळं कबूल करुन माफी मागून टाकावी. पाठीत खंजीर खुपसला की तो छातीतून बाहेर येईलच असं नाही. पण खिडकीबाहेर सिगरेटी टाकल्या की न्युटनच्या कृपेनं त्या खाली येणारच ही काळ्या दगडावरची रेघ. सॅन्

अपुर्णांकाची अवतरणे- ।२/४।-सपाट इस्त्रीसारखा मेंदू

सहा महीने-वर्षं गेलं म्हणजे साळगावकरांच्या कालनिर्णयची नुस्ती पान फरफरा नाही उलटली. सॅन्डीचे ३, पॅडीचे २ आणि ढापण्या रम्याचे ० बॅकलॉग राहीले. पॅडीची सिगरेटची नावड कायम राहीली तरी मीरेला तो खमंग वास भारी भावला. मोराच्या टोकाला काडी लावून धुक्यातून तारयाकडे तिचा प्रवास सुकर सुरु झाला. मोर म्हणजे राष्ट्रीय पक्षी नाही काही, नवशिक्यांसाठीची हल्की आगीनकाडी!- धुरांच्या रेषा हवेत झाडी!! सॅन्डीला एकटं वाटू नये म्हणून पॅडीनं आणि चकणा नुस्ता खाताना अपराधी वाटू नये म्हणून रम्यानं दारु प्यायची सवय जडवुन घेतली. एनपी आणि डोलीच्या चार दंड-बेटकुळ्या वाढल्या. बाकी बरंच काहीबाही बदललं आणि हो, पॅडीच्या लेखी अनिला सोळा वर्षाच्या गाढविणीपेक्षा म्हणजे असाधारणच सुंदर दिसु लागली. तश्यातच लोकशाहीची मुळं घट्ट करण्याचं ठरलं. पुढं मागं एनपीला छोट्या डबक्यातून मोठ्या डबक्यात आणायचं तर लोकशाहीयुक्त निवडणुकीची सवय असावी म्हणून महानगरपालीकेच्या एका वॉर्डाची जबाबदारी आमदारसाहेबांनी एनपीच्या गळ्यात मारली. गरजेत कामाला येतो तो मित्र या ईसापनितीतल्या गोष्टीला अनुसरुन एनपीनं झाडून सगळ्या मित्रांना कामाला लावलं. मस्कलची सगळ

अपुर्णांकाची अवतरणे- |१/४।-रम्य ते अभयारण्य

जात-संमेलनाला जायचं खरं तर पॅडीला फारसं पटलं नव्हतं. शाळा-कॉलेजच्या फॉर्मबाहेर त्याची जात कधी आली नव्हती पण इथं सगळं वेगळंच होतं. हॉस्टेलच्या खोलीत प्रवेश करताच रम्यानं कोण, कुठला, अमका नातेवाईक, तमकी सोयरीक असं करत शेवटी कोड क्रॅक केलाच. "म्हणजे तू आपल्यातलाच!" रम्यानं निर्णय जाहीर केला "सॅन्डी आपल्यातला नाही पण चॉईस नव्हता. त्याचे भाय-कॉन्टॅक्ट आहेत म्हणे. रॅगिंगच्या वेळी उपयोगी येतील म्हणाला. चल, आता आपल्या जातीचा मेळावा आहे आत्ता." डब्याबाहेर आलेला तुपाचा ओघळ बोटानं निपटून डब्यात ढकलावा तसं चापून चापून रम्यानं पोट पॅन्टमधे बसवलं. पॅडी तरीही मख्ख. आपले सिनिअर्स तिथे अभ्यासाच्या पुस्तकांची लिस्टपण देतात ऎकल्यावर कसाबसा पॅडी गेला. जातीवर अन्याय....ढॅण्ढॅढॅण्ढॅढॅण्ढॅ . पॅडीला मोनोटोनस भाषणं भयंकर आवडली, त्याचे डोळे आपसूक लागायला लागले. सगळीकडं आरक्षण, नौकरी नाही...ढॅण्ढॅढॅण्ढॅढॅण्ढॅ. पॅडीला स्वप्नात आपल्या जातीतली सगळी भावंडं नौकरी..नौकरी अशी याचना करताना दिसली. मधेच मोरपंखी निळा ड्रेस घातलेली मुलगी त्याच्याकडे बघून गोड हसली. पॅडीच्या पापण्या किलोकिलोच्या झालेल्या.