ऍबस्ट्रॅक्ट वातकुक्कुट

रिकाम्या वेळात पेन्सिलींना टोक काढणं म्हणजे लिहीण्याची जय्यत तयारी किंवा सफाई कामगाराला अखंड कामाची हमी. किंवा शुन्याचा कडेलोट बिंदु शोधून काढणं हा ही एक दैनंदीन कार्यक्रम असुच शकतो. असं सावरुन बसलं असताना ती दोघं आली तरी लेखक दचकणार नसतो.

लेखक- तुम्ही काय करताय?

तो- मी पाय मोडक्या स्टुलवर बसलोय आणि ती स्पंज उसवलेल्या खुर्चीत टेकलीए

लेखक- मी उसवलेल्या पेन्सिलीची कुंची शुन्याला घालत आहे.

ती- प्रश्न नसताना उत्तर देताय म्हणजे तुमच्या मनात नक्कीच कुठेतरी अपराधी भावना आहे. असो. निष्पर्ण वृक्षाखाली टोपी घातलेलं कुणीच नाही तरी आपण असे का बोलत आहोत?

असे का? असे का? असे का?

तो सर्वत्र आहे. तो सदैव आहे. तो सर्वाकार आहे. गोदाशेट, गोदुकल्या, लाडक्या गोदुका तू नाहीस तरी तू आहेस रे.

तो- महोदय, मुद्याला भिडु. आपण आमची गोष्ट लिहावी असा आमचा प्रस्ताव आहे.

लेखक- पण तुमच्या गोष्टीत विशेष काय?

ती- काहीच नाही. पण तुम्हीही रिकामेच आहात. आणि तुमचं आडनाव पिरॅन्डेलो नसतानाही तुमच्या गोष्टीतली पात्रं तुम्हाला बोलताहेत हे विशेष नव्हे काय?


काही तरी घडवण्याची संधी आल्यानं लेखक सावरुन बसतो. दरचवेळी सावरुन बसलं की काही घडेल असं नाही (जसा लेखक मघाशी दचकला नाही तस्संच) पण कधीमधी खो बसला अन तुम्ही सावरलेले नसाल तर तोंडावर पडणार, त्यापेक्षा तयारीत असणं बरं.

लेखक- गोष्ट काय सांगण्याआधी तुमची नाव सांगा बरं

तो- तुम्ही ठेवाल ते

ती-नको. ते विचित्र नावं ठेवतात. काही तरी सहज सुंदर नाव ठेवा बाबा

तो- मधु-मालती? रमेश-प्रिया? शाम-भावना?

लेखक- तुमची गोष्ट जुन्या जुलाबी कथांसारखी फळफळीत आहे का? काही तीव्र नसेल तर मी लिहीत नाही, तुम्हाला कदाचित माहीत असेलच. तसंही गेले कित्येक दिवस मी काहीच लिहीत नाहीए. तीव्र...

ती- गोष्ट रहस्यमय नसली तरी शेवट सांगणं बरं नव्हे. पण हा माझा नवरा खुन करणार आहे

लेखक- अहो असं ढळढळीत काय सांगताय?

ती-हे स्वगत होतं

लेखक- कप्पाळ. मला ऎकु आलं नां..

ती- महाशय! तुम्हीच ह्या गोष्टीचे लेखक आहात. तुम्हाला हे कळायलाच हवं

लेखक- तुम्ही बटबटीत आहात आणि तुम्हाला सौंदर्यदृष्टीपण नाही. का विचारु नका? काही विधानांना तत्कालीन संदर्भ नसतात. असो. तुमचं नाव आपण मन्या-मनी ठेवु

मनी- बरंय

मन्या- काव्यात्मय

मनी- आमच्या गोष्टीत कविता नको. कवींना खरं तर फाशी द्यावी असं माझं मत आहे

लेखक- मी लेखक म्हणून काही ठरवु शकतो का?

मन्या- मनी म्हणतेय कविता नको तर नकोच मुळी. आमची मेजॉरिटी. आमचीच झुंड जिंकणार लोकशाहीत.

लेखक- प्रभुची ईच्छा! निदान लेखक म्हणून मी तुमच्या गोष्टीत मधे मधे डोकावणार हे तरी मान्य कराल? साडे माडे तीन. टाईम आऊट! तुमचं मौन हीच तुमची स्वीकृती असं मी गृहीत धरतो.

लेखकाला खरं तर काहीही गृहीत धरता येतं पण केवळ सवयीनं त्यानं डाव साधला येवढंच



असो. मन्या होता गेमाड. म्हणजे गेम थेरी आणि फिजिक्सचे अरबट चरबट नियम यावर काही तरी तो करायचा. नक्की काय ते सांगता यायचं नाही आणि कुणाला फारसं कळायचंही नाही. लेखकानं बाकी बरेच धंदे आठवुन बघितले पण हा त्याला पुढच्या कथानकाच्या दृष्टीनं सोईचं होता. शिवाय पुढे खुनबिन असेल तर तेव्हढंच साय-फाय.



मनी- लिहीलं?

लेखक- बाई, पोट शिवण्यासाठी पाठ शिवणीची गरज असते...



मन्या आला कुठून? कुठे भेटली मनी त्याला? कसे असतील त्यांचे संबंध? मन्या खुन करेल की उगाच मनीनं आशा लावली? चार प्रश्नचिन्हं पडली तसं लेखकानं तंद्रीतच दुसऱ्या बाजुनंही पेन्सीलचं टोक काढलं. एक टोक पेपरावर अन दुसरं? सटवाईच्या शिलालेखावर रोखलेलं! लेखकानं मनातच टाळी दिली. कुठं तरी वापरायला हवं हे, तीव्र असं...



तर एक असते मनी. मनी असते...



मनी- ...जिवंत! प्रेमात चारवेळा सपाटून आपटल्यावरही प्रेमोत्सुक. शारीर म्हणता वेगळा पोत आणायचा असेल तर?

लेखक- टोकदार मुद्याचं बोलणाऱ्या लक्षवेधी बायका बहुदा महत्वाकांक्षी असतात आणि त्यांच्या शोकांतिका अफाट असतात.

मनी- आमचं स्वगत तुम्ही ऎकु शकता, पण तुमची मनोगते तुमच्यापाशी (कुत्सीतपणे) पिरॅन्डेलो..



मनी अशी तर मन्या उघडच निरस, गाळलेल्या चहा पत्तीसारखा असणार. मनीनं त्याला प्रेमात पाडून घेतलं म्हणून त्याच्या आयुष्यातला कर्फ्यु उठला तरी.



मनी- लेखकाला आपला किंचित भुतकाळ हवा आहे

मन्या- काळ आहे तिथेच असतो. पृथ्वी सोबत फिरत फिरत आपणच पुढे निघून येतो इतकंच

मनी- आयुष्य असं भिरंभिरलेलं का असतं रे मन्या?

मन्या- पृथ्वी न फिरती तर तिरसट ऊन किंवा काजळ रात्रीत जग पांढरं किंवा काळं रंगलं असतं डार्लींग

मनी- रंगीत चष्मे वापरावेत मन्या, ता-ना-पि-हि-नि-पा-जा!

मन्या- तू मटेरिअलिस्टीक होत आहेस मने

मनी- आणि तू धड कम्युनिस्टही नाहीस.



(वेदमंत्रांच्या चालीवर)



बघ प्रत्येकजण धावतोच आहे.

बघ धावणारा कुठे तरी पोचतोच आहे.

प्रवाहासोबत पुढे, प्रवाहा विरुद्ध तळात किंवा लख्खं नव्या मळ्यात.



मनी- मन्या, तूही धावत सुटला आहेस.. ट्रेडमिलवर; गतीच्या सापेक्ष आणि निरपेक्ष गमजा मारत



उडणाऱ्या विमानात उडणारी माशी विमानाच्या पुढच्या टोकापासून मागच्या टोकापर्यंत जाण्याच्या प्रयत्नात आहे. तर विक्रमा आता मला सांग की ती माशी उडत उडत विमानाच्या शेवटापर्यंत पोचेल की नाही? विक्रमाच्या मस्तकाची हजारो शकले करणारा वेताळाचा तर्कदुष्ट प्रश्न मनीच्या कानात ओतावा असा विचार लेखकाच्या मनात आला खरा पण तो पर्यंत पृथ्वी थोडी अजून फिरली. काळ थोडा अजून पुढे सरकला.



मनी- जानु



मन्याच्याही आधी लेखक दचकला. असलं काही लिहून त्याला सवय नव्हती आणि मन्याला ऎकून



मनी- लहानपणी माझं एक स्वप्न होतं. घोड्याच्या डोक्यावर डोळ्यांपुढे येईल अशी एक छ्डी लावायची. त्या छ्डीला मोत्यांचा खरारा बांधून ठेवायचा. धक्यागणीक खरारा कधी तोंडाजवळ येईल न् कधी लांब जाईल. आणि घोडा न थांबता खराऱ्याच्या आशेनं पळतच राहील.



लेखक हसला. लग्नात मन्याच्या मुंडावळ्यांना मोत्याचा खरारा लावला असेल!!



मनी- पण आपण हे असं नाही करायचं. आपण सगळं सायंटीफीक करायचं. स्वप्नबांधणीचं एक ३ डी व्हर्च्युअल व्हीज्युऍलीटी देणारा हा चष्मा! यात काही प्री-फीड स्वप्न आहेत-आपली. शिवाय त्यात सोशिओ-इकॉनॉमिक स्टेटसचा रिअल टाईम सर्व्हे सतत सुरु असतोच.

मन्या- त्यानं काय होईल?

मनी- स्वप्नं तुला सतत आपल्या प्रवासाची आठवण करुन देत राहातील. आणि सर्व्हे तुला तुझ्या पीअर ग्रुप सोबत बेंचमार्क करुन देतील. त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचं स्टेटस, त्यांचे पगार यांच्या तुलनेत तू कुठे आहेस याचं चालु विश्लेषण तुला सतत मिळत राहील.

मन्या- त्यानं काय होईल?

मनी- (किंचित हताश स्वरात) तुझं ट्रेड-मिलवरंच धावणं बंद होऊन तू खरा पळायला लागशील, जास्त कॉम्पीटेटीव्ह होशिल, तुझा कीलर इंन्स्टीक्ट वाढेल.

मन्या- पुढे काय होईल?

मनी- (किंचित हुरुप येऊन)तू एक टप्पा प्रत्यक्षात पार पाडलास की पुढची स्वप्न! पुढंच स्टेटस रॅन्कींग!!

मन्या- त्यानं काय होईल?

मनी- (साशंक स्वरात स्वगत)काय मी वर्तुळाच्या परिघावरुन धावत आहे? काय मी जिथून हे सुरु केलं तिथेच पोचत आहे? (उघडपणे) पुढचे टप्पे गाठत आपण उत्तरोत्तर प्रगती करत राहु. आपली आजची, उद्याची आणि पुढच्या पिढ्यांसाठी व्हॅल्यु-चेन तयार करु

मन्या- लेखकराव, मी हा क्षण सोडून पुढच्या क्षणासाठी जगु? आज जगता जगता उद्याची तरतुद करु? हे भीषणै

लेखक- कल्पना! मघाशी तुम्ही म्हणालात, काळ आहे तिथेच असतो फक्त पृथ्वी सोबत आपण पुढे सरकतो. तुम्ही फिजीक्सवाले. बघा एक क्षण पृथ्वीपेक्षा वेगात पळु शकता का. म्हणजे तुम्ही काळाच्या कायम पुढे! फार अपराधी न वाटता उद्याची तरतुद करु शकाल.



आपण काय बोलतोय हे लेखकाला अजिबात कळलेलं नस्तं. पण आपल्याच गोष्टीतल्या पात्रासमोर असं भासवायचं नसतं एव्हढं भान असतं शिल्लक अजून.



मन्या- ब्रिलीएंट आयडीया. उगाच तुम्ही लेखक नाहीत पटलं मला. असं करा, मला एक पोर्टेबल टाईम-मशिन बनवुन द्या

लेखक- मी? कसा?

मन्या- म्हणजे तसं नुस्तं लिहा हो. तुमचं नाव पिरॅन्डेलो असो किंवा नसो, तुम्ही लिहाल तसंच तर होणार आमच्या गोष्टीत

लेखक- बरं...तर "मन्या बनवतो टाईम-मशिन" कारण तो फिजिक्सवाला आहे (याला आपले ट्रॅक कव्हर करणं म्हणतात-लेखक जाम खुश!)

मन्या- (स्वगत) जगाच्या एक क्षण पुढे राहून जगण्याचे अट्टहास अजूनच बिनचेहऱ्याचे करावेत की मुळात जिथे चूक घडली तिथे जाऊन ती सुधारावी हा कठीण प्रश्न!



मनी- लेखक, मन्या काय करतोय?

लेखक- मीही उत्सुकतेने जागाच आहे



मन्या कालकुपीत बसून मागेच मागे जातोय. जगातली पहीली स्पर्धा जिथे सुरु झाली, जगातली पहीली साठवणुक जिच्यामुळे स्पर्धा सुरु झाली, त्या बिंदुशी जाऊन मन्या काळाचं प्रतल बदलणार होता.



ओसाड काळवंडलेल्या पार्श्वभुमीवर कुणीतरी धान्य जमा करत होतं, गरजेपेक्षा जास्त धान्य. डोंगराच्या पल्याड कुणीतरी अजून एक मेंढ्यांचा ताफा अजिबात आवाज न होऊ देता हाकत होता, गरजेपेक्षा जास्त मेंढ्या. दोन्ही आकृत्या वेगवेगळ्या मार्गांनी विलक्षण तेजाने चमकणाऱ्या पुलाच्या टोकाशी पोचल्या. पुल तरी किती विचित्र, एका वेळी एकालाच नेऊ शकणारा. डोळ्यात अंगार पारजुन एकमेकांना जोखत ते दोघे तो पुल दुसऱ्याच्या आधी पार करण्याचा प्रयत्न करणार होते.



लेखक- (आवाक) केन आणि एबल!ऍडम आणि इव्हची मुलं...

मन्या- (वेगळ्या काळात) जगातली पहीली साठवणुक आणि जगातली पहीली स्पर्धा ही म्हणायची तर...

मनी- लेखक, मला समजेल असं सांगाल का?

लेखक- केन आणि एबल, जगातली पहीली भावंडं. केन शेतकरी आणि एबल मेंढपाळ होता. केननं त्याच्या शेतातलं फळ आणि एबलनं त्याच्या कळपातलं मेंढरु देवाला अर्पण करण्यासाठी आणलं होतं. देवानं एबलचं मेंढरु स्विकारलं आणि केनचं फळ नाकारलं

मनी- (टाळ्या वाजवत) आणि जगातली पहीली स्पर्धा सुरु झाली!

लेखक- आणि केननं एबलला मारुन टाकून जगातला पहीला खुन केला!

मन्या- हा तेजस्वी पुल जो आधी पार करेल तोच जिंकेल आणि परत परत जिंकण्यासाठी त्याची भुक वाढतच जाईल. हे वर्तुळ इथेच उधळायचं तर ही माणसंही उधळावी लागतील मला

मनी- लेखक, मन्याला प्लीज थांबवा. तो काही तरी भयंकर करणारय...कदाचित खुन..केन आणि एबलचा खुन

लेखक- तसं झालं तर मनुष्य जातीचा इतिहासच बदलेलं! केन-एबलच्या पुढच्या पिढ्याच तयार होणार नाहीत. आपले पुर्वजच जन्माला आले नाहीत तर आपणही जन्मणार नाहीत पण आपण तर आहोत. म्हणजे मी आहे आणि मी आहे म्हणून तुम्हीही आहात. थांबा...काही तरी अतर्क आहे इथे. मन्या नक्की कुठे पोचलाय ते कळायलाच हवं

मन्या- उजाडतय! आता कसं सारं स्पष्ट दिसतय. आणि हे काय? या उद्ध्वस्त इमारती कसल्या? आणि ही ओसाड शहरे? ओ हो माझ्या घड्याळात दिसते आहे ही तारीख तरी कुठली? मी चुकून भविष्यात आलो तर!



ललित लेखकाची विज्ञानकथा ती काय आणि त्याचं कालयंत्र ते काय! लेखक मनातच किंचित मरतो.



मन्या- हा हव्यास, हा विनाश आणि हा अटळ शेवट! सारंच कसं उदास आहे. जगावं की मरावं हा मोठा प्रश्न आहे

मनी- मन्या...

लेखक- घाबरु नका. तो या घडीला भविष्यकाळात आत्महत्या करणार नाही. मघासारखं हे ही अतर्क आहे. मन्याच्या हातून कालकुपी काढून घेणं हा थेंबभर शाईचा खर्च आहे



मन्या- (वर्तमानात) तर हे असंच चालु राहाणार...तुमच्या अलंकारीक भाषेत वर्तुळाचा प्रवास की कायसं..

मनी- फार विचार करण्या शेवट निष्क्रियतेत होतो मन्या. तू म्हणशील तर हे महोदय आपली वेगळीच गोष्ट ही लिहून देतील

लेखक- पात्रंहो, वजा एकाचं वर्गमुळ म्हणजे तुमची कथा झाली आहे. असो. तीव्र काही लिहीण्याचे शोध चालुच ठेवले पाहीजेत

Comments

नाही कळली. :(
Samved said…
...आणि मला तर वाटलं मी (माझ्यापुरती) दशकातली एक ग्रेट गोष्ट लिहीली आहे! असो.
Samved said…
...निष्क्रियता
...निरर्थकता
...रॅट रेस
...गोष्टीतली गोष्ट
...काळ


अजून काय लिहू?
स्वतःच स्वतःच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची वेळ कुणावर येऊ नये, पण मी तुझ्यावर ती आणली खरी.
तू वर दिलेल्या दिलेल्या सगळ्या गोष्टी खर्‍या आहेतच. पण त्यासोबत, गोष्ट वाचणार्‍याला पकडून ठेवणारी व्हायला हवी. सुरुवातीचे काही परिच्छेद तिनं मला धरून ठेवलं. नंतर तिची ताकद किंवा माझा पेशन्स यांतलं काहीतरी एक कमी पडलं.
म्हणून माझी अशी कोरडीठण्ण प्रतिक्रिया... :(
Samved said…
असंही असेल. किंवा तसंही शक्यय

राज कपुरला मेरा नाम..कायमच भारी वाटला आणि यश चोप्राला लम्हे. वाटून घेण्यावर, थोडक्यात काही बंधन नाही. तरी एक बरं असतं एकदा पब्लीश म्हटलं की सटकन नाळ तुटते, आतडं अडकत नाही आणि शिवाय हे सगळे चोचले फुकट! अजून काय हवं?
Abhijit Bathe said…
One of the best piece I have read in some time. Samved - most of the times (I think) you write chutyaaps alankaarik. This one was awesome. More later.
Samved said…
च्यायला अभिजीत...इकडून आणि तिकडून आमचीच वाजवा....धन्यवाद (चांगल्या भागासाठी)
a Sane man said…
गोष्ट कळली बहुदा, म्हणजे नाही कळली असं काही झालं नाही. कल्पना नि काही काही सुटे सुटे भाग, विशेषत: सुरुवातीचे, मस्त वाटले. पण मध्येच काय झालं कळेना. त्या टाइम मशिन वगैरे प्रकारानंतर ती अगदीच सपक होत गेली नि सरतेशेवटी नाही आवडली ब्वा. त्या जानुच्या जानुने आधीच (नि उगाच) स्वत:चा खून करवून घेतला, तिथे झोल झाला का?

(पण, मला सहानुभूती वाटते आहे. मागे मला एक माझी कविता फार थोर वाटली होती. ती कोणालाच कळली नाही :D)
Samved said…
सेन, अरे सारी थोर माणसं तुझ्या माझ्यासारखीच असतात :). आणि एक नक्की झालं की मोठ्ठं लिहीलं की त्याचे तुकडे पाडायचे. म्हणजे कसं की रवीवारचा हा भला थोरला मासा आणला नी आख्खा एकेच दिवशी फस्त केला की पोटाला तडस. त्याऎवजी त्याचे तुकडे पाडून आठवडाभर पुरवले की एक्दम "फ्रीज मधे ठेवलेलं प्रेम" जणु....बोध घे माणसा बोध घे
Samved said…
अरे हो, आणि एक राहीलच. तुम्हा लोकांना पिरॅन्डेलो आठवतो नां? नाटककाराच्या शोधात सहा पात्र नावाच एक इटालियन नाटक लिहीलं होतं त्यानं. एक्दम माईलस्टोन
a Sane man said…
नाय बा. पण लगोलग विकीवर पाहून आठवून घेतला.
Anonymous said…
स्वप्नबांधणीचं एक ३ डी व्हर्च्युअल व्हीज्युऍलीटी देणारा हा चष्मा! यात काही प्री-फीड स्वप्न आहेत-आपली. शिवाय त्यात सोशिओ-इकॉनॉमिक स्टेटसचा रिअल टाईम सर्व्हे सतत सुरु असतोच.

स्वप्नं तुला सतत आपल्या प्रवासाची आठवण करुन देत राहातील. आणि सर्व्हे तुला तुझ्या पीअर ग्रुप सोबत बेंचमार्क करुन देतील. त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचं स्टेटस, त्यांचे पगार यांच्या तुलनेत तू कुठे आहेस याचं चालु विश्लेषण तुला सतत मिळत राहील.

Class. It is a mirrir image of most people who agree to it, realize this fact often but are just unable to break the viscious circle.

aawadal.