भुताडी झांपा
टीव्हीवर दाखवतात तश्या सुहासनं स्टंपपासून ढांगा मोजल्या आणि हातातल्या बॉलला थुंकी लावावी की नाही याचा क्षणभर विचार केला. रोंगट्या गेल्या तीन ओवर आऊट होत नव्हता. सुहासनं पाचही बोटं तोंडात घातली. मळकट रबराची चव तोंडात घोळली आणि टपकन ओलेता बॉल एक टप्पा खाऊन नेमका रोंगट्याच्या बॅटवर पडला. रोंगट्यानं त्याच्याही नकळत बॅट फिरवली आणि बॉल बी-बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर ३०३च्या गॅलरीत जाऊन पडला. तोंडावर हात दाबला तरी पोरांच्या तोंडून अस्फुट किंकाळी फुटलीच. बॉल भुताडीच्या गॅलरीत पडला होता. भुताडीच्या घरातून काहीच बाहेर पडत नाही ...माणूस सुद्धा... असा सोसायटीतल्या पोरांमधे प्रवाद होता! हा निदान चौथ्या बॉलचा बळी होता. ... श्रीनं अस्वस्थपणे कुस बदलली. मोठं होणं म्हणजे नक्की काय हे त्याला काही केल्या कळत नव्हतं. परवाच्याच सातव्या वाढदिवसानंतर आई-बाबांनी त्याला आता तो मोठा झालाय हे स्पष्ट सांगीतलं होतं. मोठं होणं म्हणजे खेळणी कपाटात भरुन ठेवणं, शाळेची बॅग झालंच तर कपडेही आवरुन ठेवणं असं असेल तर मोठं होणं वट्ट बोर होतं. मोठं होण्यात मजा असते जेव्हा टीव्ही बघत कधीही लोळत पॉपकॉर्न खाता येतात किंवा