ऎसी अक्षरे (२०१५)साठी लिहीलेला हा लेख ( http://aisiakshare.com/node/4133), इथे परत डकवत आहे- सोप्या गोष्टींबद्दल लिहिणं फार कठीण असतं हे वाक्य अनंत वेळा वाचूनही टोचत नाही, जोपर्यंत ती वेळ तुमच्यावर येत नाही. आज ही वेळ माझ्यावर आणल्याबद्दल संपादकांचे आभार मानावेत की त्यांना बोल लावावेत हा प्रश्नच आहे. भा. रा. भागवतांची पुस्तकं आनंदानं वाचणं वेगळं आणि त्यांच्या लिखाणाचं तथाकथित मूल्यमापन करणं वेगळं. आज मागं वळून बघताना जाणवतं, की भारांचं स्थान तेच आहे जे आपल्या आवडत्या मावशीचं, दादाचं, आजीचं असतं. तिथं डावं-उजवं करताना मनात एक हळवा कोपरा आधीच तयार झाला असतो. भारांच्या लिखाणाचं मूल्यमापन करताना हा दुसरा अडथळा! असो. प्रयत्न करण्यात फिजूल मुजोरी कशाला? मराठी साहित्याच्या मर्यादित परिघात आपण असंख्य वर्तुळं आखून ठेवली आहेत; विविध साहित्यप्रकार (कथा, कादंबऱ्या, कविता, लघु-दीर्घ कथा, कविता, प्रवासवर्णनं, इ. इ.) हे सर्वात मोठं क्लस्टर. त्यातही आपण दलित-बहुजन-ब्राह्मणी, शहरी-ग्रामीण, पुरुष-महिला, प्राचीन-अर्वाचीन, पश्चिम महाराष्ट्रातलं-विदर्भाकडचं-वऱ्हाडी-मराठवाडी-खानदेशी, बालसाहित्य-कुमारसा