आठवतं, मी किती पत्र लिहायचे तुला? कधी कधी तर दिवसातून २-२ वेळा..आणि तू निर्घृण थंडपणे एकदा विचारलस, का? पत्र म्हणजे काय औषध आहे, ठराविक वेळीच लिहायला? कुठेतरी उघडं होण्याची गरज असते माणसाला. तुला नाही कळणार.. व्हिन्सीच्या पत्रांची वाट पाहाणारा तिओ तुला आवडायचा, तू एकदा म्हणाली होतीस. तुझ्या पत्रांची वाट पाहून मी आज उंबरठ्याचाच एक भाग झालो आहे. मीही तुला आवडू शकतो नां? आपण मोठे मजेदार असतो. कधी तरी तंद्रीत, भावनेच्या भरात, बहराच्या वयात, माणूस काही तरी लिहून जातो आणि काही वर्षांनी ते बघून आपल्यालाच हसू फुटतं, कधी तर लाजही वाटते. काही काळाने, कोणत्याही संदर्भांशिवाय, त्या पत्रांचा काय अर्थ लावशील तू, याची मला चिंता नाही. माझं लिहून झालं की माझ्या पुरतं एक आवर्तन संपतं. कोणत्या भिंगातून मला बघायचं, हे तेव्हा तू ठरव. तुला तेव्हा आकाशाइतके मोठे वाटणारे प्रश्न, आज किती फुटकळ वाटतात म्हणून मी हसत नाही. त्या प्रश्नांना सोडवण्याची उर फोडणारी माझी धडपड आठवून मला हसू येतय तू कधीच पत्रांना उत्तर दिलं नाहीस..सामोरं येत राहीलास तेच न उलगडणारया प्रश्नांसारखा. तुझ्या न लिहीण्याची इतकी सवय झाली आहे की