Friday, July 27, 2007

"शांतता... कोर्ट चालु आहे" आणि "महानिर्वाण"

"हिंसा आणि वासना या माणसाच्या मुलभुत भावना आहेत!" "तें"च्या या विश्वप्रसिध्द वाक्याला कसल्याच सिद्धांताचा टेकु न देता मी पट्कन मान्य करुन टाकतो. शेपूट गळून गेलं तरी आपण आपल्यातलं जनावर जपतोच नां? जंगल काय झाडांचंच असतं? जनावरं राहातात त्याला जंगल म्हणतात मग ते भलेही इमारतींचं असो. आपल्या बहुतेक कुठल्याच साहित्यात/कलेत हा रासवटपणा का उतरत नाही? एक मिनीट; भडकपणे लिहीणं म्हणजे या विषयाला भिडणं नव्हे. किरण नगरकर (रावण आणि एडी) आणि नातिचरामी (मेघना पेठे) आणि तत्सम लिखाण (गौरी, अर्थातच अपवाद..सानिया पेक्षा कितीतरी जोरकस आणि सकस) निदान मला तरी मुद्दाम "धाडसी" केल्यासारखं वाटतं. किरण नगरकर तर अगदी इंग्रजीतल्या चलाऊ लेखकांइतका टाकाऊ... वासना आणि हिंसा यांच्या व्याख्या हिंदी सिनेमात दाखवतात तश्या पावसात भिजणारया बाया (किंवा एकमेकांवर आपटणारी "कलात्मक" फुलं) आणि टोमॅटो केचपचे डाग या पुरत्याच मर्यादित आहेत? "ईडिपस" आणि " ऑथेल्लो"त वासना आणि हिंसा नाही? मराठीत असे मैलाचे दगड का नसावेत? पांढरपेश्यांनी लिहीलं म्हणून आणि झाकून ठेवण्याच्या तद्दन भारतीय प्रवृत्ती या factors बरोबरच मराठी प्रतिभा खुरटलेली आहे हे आता मान्य करुनच टाकु. सुभाष म्हणतो तसं आपल्या (इति: भारताच्या) आयुष्यात काहीच महत्वपुर्ण घडलेलं नाहीए...ना युध्द ना कसल्या क्रांत्या..ना धर्माच्या विरुध्द कसली बंडं... निमुटपणे मान्य करण्याची आपली वृत्ती सगळी कडे अगदी प्रकर्षाने reflect होते! गांधीबाबानं अगदी बरोबर हे ओळखुन आपण बुळ्या लोकांच्या हातात सत्याग्रह नावाचं शस्त्र दिलं. टिळक/सावरकर मार्गानं स्वतंत्र व्हायला आपण किती शतकं घेतली असती देव जाणे. असो.

या सगळ्या बॅकड्रोपवर "तें"च "शांतता... कोर्ट चालु आहे" आणि आळेकरांचं "महानिर्वाण" stands tall!! मराठी वाटुंच नयेत अशी ही नाटकं! अनंत सामंतंच एम टी आयवा मारु तितकंच जीवघेणं पण तो स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे.

आधी महानिर्वाण विषयी. नाटक गाजलं ते मराठीतलं पहीलं Black Comedy नाटक म्हणून. देहावर मृत्युनंतरचे संस्कार नीट न झाल्याने भाऊराव नावाच्या किर्तनकाराचा आत्मा कसा भटकतो आणि त्याचं कुटुंब आणि चाळ यांची त्यावरची रिऍक्शन इतकासा या नाटकाचा जीव आहे. भाऊराव किर्तनकार असल्यानं नाटकात त्या अंगानं जाणारे बरेच संवाद आहेत पण या सगळ्या नाट्याला सुक्ष्म डुब आहे ते वासनेची. कोणी एका "डावीकडून तिसरा" आणि भाऊंची बायको यांच्यातल्या संशयास्पद नात्याचा. "डावीकडून तिसरा" म्हणजे काय भानगड आहे असं विचाराल तर आधी आळेकरांना कडक सॅल्युट ठोकायचा. भाऊंच्या तिरडीला ज्या चार लोकांनी खांदा दिला, त्यातला डावीकडून तिसरा!!! तोच तो ज्याचं सौ. भाऊंबरोबर "काहीतरी" सुरु असावं! तो डावीकडून तिसरा खरंच अस्तित्वात आहे की खुद्द भाऊंच्याच अतृत्प्त इच्छा त्याच्या रुपात त्यांच्या बायकोसमोर उभ्या ठाकतात? भाऊंच्या बायकोला तो डावी कडून तिसरा खरंच भेटतोय की तो ही एक भास आहे? भाऊंच्या जाण्यानंतर लगेच चाळवाल्यांचं भाऊंच्या बायकोबरोबरचे बदलणारे संबंध आणि सौ. भाऊंचं सुखावुन जाणं... कुठेही शारीर न होता, कसलीही वर्णनं न करता फक्त रुपकांतुन आळेकरांनी ज्या प्रकारे वासना अंडरलाईन केल्या आहेत; just hats off!

महानिर्वाण मधे समुहाची मानसिकता जर वासनेच्या बाजुने झुकली आहे तर तिचं दुसरं आणि अजून हिडीस रुप "शांतता.. कोर्ट चालु आहे"त अंगावर येतं. एका नाटकाच्या प्रयोगाला उशीर होतो म्हणून त्यातली पात्र वेळ घालवण्यासाठी अभिरुप न्यायालयाचा खेळ खेळतात. आपल्यातल्याच एकावर खोटे आरोप करायचे आणि दोन्ही बाजुच्या वकीलांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडायच्या असा अगदी साधा खेळ आणि आरोपी म्हणून उभ केलं जातं बेणारे बाईंना. साध्या खेळाचं शिकारीत कधी रुपांतर होतं हे कळायच्या आत तेंडूलकर मानसिक हिंसाचार आणि समुहाची मानसिकता यांची वीण अशी काही घट्ट वीणतात की तुम्ही त्यातुन जीवंत सुटूच शकत नाही. खरे-खोटे, सार्वजनिक-खाजगी असे सारे आरोप बेणारेबाईंना उभे चिरत जातात; त्यांचं स्त्री असणंही एका बिंदुशी येऊन खेळाचा भाग ठरतो. बघता बघता सारयांची जनावर होतात, लपवलेली शस्त्र बाहेर निघतात आणि आरोपांच्या सरी झेलत बेणारे "बाई" उभ्या उभ्या संपतात. कोण म्हणतं फक्त बंदुकीनं खुन करणारे हिंसक असतात? त्यात माणुस निदान संपतो तरी...मनावरचे ओरखडे आयुष्यभर पुरुन उरतात.

10 comments:

Anonymous said...

Disclaimer: Comment is not relevant to the post!

> गांधीबाबानं अगदी बरोबर हे ओळखुन आपण बुळ्या लोकांच्या हातात सत्याग्रह नावाचं शस्त्र दिलं.

Gandhi, truth and non violence deserves much better compliments! Don't you think so?
In your post you have accepted violence is the basic human instinct. And when it is a mob then violence gets even worse.
Going against this basic human nature and leading entire country to freedom on the path of non violence is one of the greatest thing happened in entire human history.

Non violence is obviously not a coward man's weapon. You can easily find people to bash someone's head but not to get their own head bashed for a cause.
Think about it!
May be its time to go back to Richard Attenbourg's classic movie Gandhi (1982).

Meghana Bhuskute said...

'Nahicharami'baddalch tuz mat sodun sagal sagal patal.
'aayawa maru' war kadhi lihitos? Just can't wait to read your take on that...

Abhijit Bathe said...

’अल्टिमेट लिहिलंयस’ एवढीच रिऍक्शन देणं योग्य होणार नाही. हा ’केवळ’ प्रकार आहे. वेळे अभावी एवढंच लिहितोय, परत येईन तेव्हा सविस्तर लिहिन.

Dhananjay said...

Lekh awadala! 'Shantata..' wachalela ahe.. 'Mahanirvan' baddal adhi kahich wachala navata. Aapala lekh vachun vachaychi ichha ahe.

Dhananjay

Nandan said...

Shantata vaachala aahe. Tyaavarache tumache mat agadi patle. Mahanirvan pahayachi/vaachayachi utsukata lagli aahe.

Meghana said...

mahanirvan baddal ekdam patala aani bhujang kakach aathavale....bhauravancha terava basamaticha bhat hava...aani mala shantata aathvatach navata,dadani story sangitali aani mag shantata pan patala.....nice post.

Tulip. said...

सुंदर पोस्ट संवेद! ( उच्चार कसा आहे? समवेद असा तर नाही?)

तेंडुलकर आणि आळेकरांबद्दल प्रश्नच नाही. दबा धरुन बसलेली त्यांच्या शब्दांमधली हिंसा आणि वासना एकाच वेळी प्रकट आणि अमूर्त दोन्ही असते आणि त्यांच्या पात्रांच्या माध्यमातून ती उसळून अंगावर येत रहाते. इव्हन वाडा मध्ये सुद्धा मानवी अतृप्त इच्छावासनांचे जे उघडेवाघडे दर्शन मुखवटा फ़ाडून आपल्यापर्यंत पोचते त्याला तोड नाही.
ह्या दोघांबरोबरच त्याच दर्जाचा, तितक्याच समर्थ ताकदीचा पण दुर्दैवाने ह्या दोघां इतका मान्यता न मिळू शकलेला अजून एक लेखक मराठीत होता तो म्हणजे चिं.त्र्यं.खानोलकर. त्यांच कोंडुरा हॉन्ट करत रहातं. तसंच रात्र काळी..

अनंत सामंतांच नुकतंच अश्वत्थ वाचलं मी. काय विलक्षण तर्‍हेने एकाच वेळी मानसिक आणि शारिरीक पातळीवरील गुंता आणि पात्रांची त्यातून सतत सुटत रहाण्याची, पुन्हा पुन्हा अडकत जाण्याची धडपड शब्दांत मांडतो हा माणुस. व्यक्तिचित्रण सुद्धा सुरेख. शिवाय सामंतांचा अजून एक प्लस पॉइन्ट म्हणजे मराठी कादंबर्‍यांमधे अगदी क्वचित आढळणारा पात्रांचा आणि परिसराचा मोठा canvas.

छान लिहितोस.

Samved said...

Well, सगळ्यात आधी इतक्या genuine comments साठी thanks to all.
धनंजय, नंदन, कधी पुण्यात आलात आणि त्यावेळी चंद्रकांत काळ्यांचं महानिर्वाण सुरु असेल तर नक्की बघा..
मेघना, माहीत नाही पण मला नातिचरामी थोडसं "अति" आणि "मुद्दाम" बाजुला झुकलेलं वाटलं. आंधळ्याच्या गाई was superb though.

ट्युलिप, you wrote it correct संवेद (आत्मिक ज्ञान!). (ईंग्रजीचं limitation आहे की तो अनुस्वार ना तर "म" आहे ना "न". माझा आणि संस्कृतचा एव्हढाच संबंध!). खानोलकर खरंच दुर्दैवी होते यात वाद नाही. गद्य आणि पद्य, दोन्हीतलाही दादा माणूस. कोंडूरा मला तितकीशी आठवत नाही कारण ती आणि रात्र काळी.. मी बरया पैकी लहानपणी (अर्थात चोरुन!) वाचल्या होत्या पण रात्र काळी मात्र आठवते. अजूनही माझ्या अंगावर सरसरुन काटा येतो. वासनांचा इतका उघड नाच काळाच्या इतका पुढचा होता की ती पिढी चिंत्र्यंना न्यायच देऊ शकली नाही.

Harshada Vinaya said...

भडकपणे लिहीणं म्हणजे या विषयाला भिडणं नव्हे.
हे तूमचे वाक्य अगदी पटलं,
मूळात योगायोग हा की "रावण आणि एडी" आणि " नातिचरामी" मी एकामागोमाग वाचायला घेतले."रावण आणि एडी" मध्ये चार /पाच पानांच्या पलीकडॆ जाऊ शकले नाही मात्र नातिचरामी पूर्ण वाचले. जसे तूम्ही एखाद्या गोष्टीला भडकपणा म्हणताय, कदाचित तो लेखीकेच्या मते नसेल.. थोडा गरज नसताना आणलेला "भडकपणा" वगळता, विषय आणि त्याचे विवेचन मला बरं वाटलं, अगदिच तरल आहे !!

अनामिक मेघवेडा... said...

तेंडुलकर बाप माणुस आहेत. ते एकदा म्हणले होते कि मी मुख्यता स्वतःमधुनच लिहितो आणि आसपासची लोक पण बघत असतो. आणि मला पदोपदी जाणवलं कि माझ्या आतमधे हिंसा दडुन आहे.
तु स्टेनली कु्ब्रीकचा ’अ क्लॉकवर्क ऑरेंज’ पाहिला आहेस का? माझ्या मते ते हिंसा या विषयावरचे फायनल स्टेटमेंन्ट आहे.
आळेकरांच्या बेगम बर्वे चे प्रयोग होत आहेत, तरी मी मिस केला, त्यामुळे चिड्चिड सुरु आहे.

टूलिप:
खरोखर खानोलखर महान आहेत. पु.लंनी त्याच्यांवर ’खानोलकरांचे देणे’ म्हणुन लेख लिहिला होता. या माणसाचे आपण देणे लागतो. कोंडुरा अप्रतिम आहे, सध्या रात्र काळी वाचत आहे, ते पण खुपच भारी आहे.