उसंत नसलेल्या वर्तमानाच्या कथा
कविता आणि कादंबरी या साहित्य प्रकारांना त्यांच्या अंगभुत रचनेमुळे मांडणीच्या ठाशीवतेपासून एक प्रकारचे संरक्षण लाभलेले असते. झाडांतून दुपारच्या प्रहरी झरणाऱ्या कवडश्यांच्या साऊलखुणांभोवती चौकट आखता येऊ शकते पण त्या चौकटीच्या आत काय घडेल याला मर्यादा नाहीत. कुठल्याही कादंबरीच्या मांडणीत पात्रे , त्यांचे परस्परांशी संबंध , त्या पात्रांमागचा भुगोल , काळाची रचना आणि अशी अनेक टोके तर असतातच शिवाय त्या टोकांना जोडू पाहाणाऱ्या असंख्य प्रवाहांच्या शक्यताही त्या कादंबरीची मांडण ठरविते. कवितेच्या बाबतीत बोलायचे तर तिच्या मांडणीचे अवकाश मर्यादित असले तरी शब्दकळा , छंद , संदिग्धता , उपमा , उत्प्रेक्षा , कविचे वैयक्तिक भाष्य यांच्या मदतीने कवी कवितेची मांडण लवचिक ठेवू शकतो. कथेला हे स्वातंत्र्य नाही. कविता आणि कादंबरी यांच्या तुलनेत कथेचे प्रतल मर्यादित असते आणि त्याचमुळेच तिची रचना नेमकी असावी लागते. लेखाच्या सुरुवातीलाच हा उहापोह करण्याचे कारण म्हणजे प्रणव सखदेव-कवी ते प्रणव सखदेव-कथाकार म्हणून मांडणीच्या या आव्हानाला कसा सामोरा जातो हा माझ्यापुरता थोडासा कुतुहलाचा विषय होता. २०१६ मध्ये विव