Posts

Showing posts from 2009

शुन्य भाव डोळ्यात

शुन्य भाव डोळ्यात अग्नी देहात मिटे अस्थीत कुठे धुमसतो जसा अंधार प्रेयसी पार सगुण साकार कधी पसरतो विझतो उदास हा देहसाज प्रलयात गाज मरणाची

चित्रे गेले

ऑटम माझ्या तळहातावर पडतो सूर्यास्ताचा ठसा सर्व झाडांची पानं चरत जाणारं नाजूक ऍसिड शिशिरातल्या संध्याप्रकाशाचं पुसून टाकतं तीव्र रेषा आता मी इतका पोखरला गेलोय बासरीसारखी भोकं पडून आपसूक अंगाला फक्त वारा सुटायचा बाकी आहे पानगळीपलिकडचं संगीत ऎकू यायला आणि तू मात्र अनिमिष इथे, नदीकाठी, पाण्यात गाढ झोपलेल्या लव्हाळ्यासारखी आकाशाचं प्रतिबिंब पांघरुन मोसमाची आच न लागता तरीही त्याच्याच मुशीत - दिलीप चित्रे चित्रे गेले. विंदांच्या भाषेत सांगायचं तर पंचमहाभुतातल्या भुतासारखी कविता मागे ठेवून गेले. तुकारामांनी विमान पाठवलं नाही याचं नवल करावं की त्यांच्या कविता बुडणार नाहीत याची व्यवस्था केली असेल याचं कोडं सोडवावं येव्हढाच प्रश्न! मटात आलेली ही त्यांची ताजी मुलाखत मराठी कवितेला आगळ्या उंचीवर नेणारे ज्येष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा ७०वा वाढदिवस गेल्या आठवड्यात मुंबईत साजरा झाला. त्यावेळी पोएट्रीवाला आणि अभिधानंतर प्रकाशनातर्फे त्यांच्या एकूण कविता १, २ व ३ मधील निवडक कवितांचा त्यांनी स्वत: केलेला इंग्रजी अनुवाद 'शेष' प्रकाशित झाला. याप्रसंगी दिपुंशी केलेली बातचीत- तुमच्या कव

शुभ्र कबूतर युगायुगांचे

युगांत झाला तसं नेमून दिलेल्या कामागत चहुबाजूने समुद्र चढले. कणा कणाने, क्षणा क्षणाने अवघी पृथ्वी जलमय झाली. रंग-रेषांगत सारे सजीव-निर्जीव कोणत्याही खुणा मागे न ठेवता हल्केच ओघळुन गेले. सारे संपले तसे आकाशाने एकदाच आपले सबंध प्रतिबिंब हळुहळु स्थिरावणारया पाण्यात पाहीले. पाण्याशी कानगोष्टी करायला आकाशाला क्षितीजाची आता गरजच नव्हती मुळी. एक हळुवार फुंकर मारली तरी शहारे यायचे पाण्यावर. दहा महीने चाललेली पाण्याची देहमग्नता मोडली ती नोहच्या निर्मितीच्या नव्या खुणा वागवणारया बोटीने. नोहनं हाताच्या ओंजळीत धरलेलं शुभ्र कबूतर एकवार सश्रद्धपणे डोळ्यांना टेकवलं आणि जमिनीच्या शोधार्थ त्याला आकाशात सोडून दिलं. आशेचा चिवट अदृष्य तंतू पायी बांधलेलं ते कबूतर थोड्याच वेळात ऑलिव्हची डहाळी चोचींत घेऊन नव्या विश्वाची ग्वाही फिरवत परत आलं. ********************************************************************************* विशाल सागराच्या मधोमध उगवलेल्या शाबोध बेटावर कल्लोळ शांतता होती. जगातले काही प्रज्ञावंत काही दशकांपासून तिथे राहात होते आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीनं, त्यांनी शाबोधभोवती जणु अदृश्य पोलाद

रेषेवरची अक्षरे

नमस्कार! सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! - संपादक मंडळ http://reshakshare.blogspot.com/

कविता: आधी, आत्ता आणि पुढे?

Image
'Twas not my blame-who sped too slow 'Twas not his blame-who died While I was reaching him But 'twas - the fact that He was dead - एमिली कवितेच्या प्रांतात सध्या एक स्फोटक शांतता आहे. हा स्फोट अनेक अर्थी आहे. कविता फारसं कुणी छापत नाही. कविता फारसं कुणी विकत घेऊन वाचत नाही. कवितेत नवे प्रयोग असे क्वचितच होताहेत. अगदी गेला बाजार, हल्ली कुणी कवींवर नवे विनोदही करत नाही! म्हणजे मराठीतली कविता मेली का? तर निदान अजून तरी नाही असंच उत्तर द्यावं लागेल. बाजारात भाराभर नवे कवी स्वतःच्या पैश्यांनी कविता संग्रह छापताहेत. सहज मराठी ब्लॉग-विश्वाचं निरीक्षण करा. कवितांच्या ब्लॉगची संख्या अगदी लक्षणीय! म्हणजेच उदंड जाहले कवडे!! वाचतय कोण? वाचल्यानंतर झिरपत जाऊन शिल्लक राहतय कोण? धोंड, विजया राजाध्यक्ष, सुधीर रसाळ या बाप-समिक्षकांनी समिक्षा केलेला शेवटचा कवी कोण? प्रश्नचिन्हांच्या ओझ्याखाली दबलात तरीही तुमचं उत्तर मला ठाऊक आहे. पाडगावकर, ग्रेस, भट, आरती प्रभु, कुसुमाग्रज, विंदा...अहो जुनी पिढी ही कवींची! सौमित्र आणि (समजा ओढून ताणून) संदीप खरे म्हणता? आणि हो,हो, सलिल वाघ देखील!! चांगले शिक

झाडे भ्रमिष्ट झाली

मातीत मिटून फुटलेली बहरुन झाडे आली पाण्यात पसरुनी नाती आकाश पेलती झाली झाडांची माया पुरुषी मौनाला यावी कीव देठाला चुकवून जेव्हा फुल देतसे जीव पाण्याचे गोत्र निराळे ते तहानलेले ओले प्रतिमा वाहून नेताना झाडास पुसे ना बोले झाडांचे तरते भास माती नं मुळाला पाणी देह विस्कटुन गाते जणु भासामधली राणी प्रतिमांचे साजण ओझे झाडे जळात झुकली माश्यांचे रडणे पाहून पण झाडे भ्रमिष्ट झाली

सदु स्टार डॉट स्टार

म्हणजे सदु काही हुशार नसतो. डोंबिवलीतला माणूस कसा लोकल पकडताना अचानक शुर होतो तितपत प्रसंगानुरुप हुशारी सदुला कधीमधी जमून जाते इतकंच. सदुची ऑफिसला येण्याजाण्याची वेळ हा या हुशारीचा एक नमुना. आम जनतेगत सकाळी साडेसातच्या बसने सदु कधीच जात नाही. सदु सकाळी साडेनवाची बस जमवतो आणि येताना आठची. सकाळी घरच्यांच्या धावपळीत आपली भर नाही म्हणून कौटुंबिक सदु खुश, आपण बसने जातो आणि गाडीसाठी पेट्रोल जाळत नाही म्हणून सामाजिक सदु खुश, साडेआठाला येणारी टीम आणि अकराला येणारा प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या दरम्यान आघाडी सांभाळायला मिळते म्हणून ऑफिशिअल सदु खुश वगैरे वगैरे. म्हणजे हे फार पुर्वी सदुला कधीतरी जाणवायचं. हल्ली साडेनवाच्या बसमधे खिडकीपाशी झोपायला मिळतं आणि हिंजवडीच्या कोपरयावर वाकडला भयाण ट्रॅफिक-जॅम लागत नाही एव्हढंच सत्य उरलं होतं. सदुनं विचार करत करत (सश्याचं गंडस्थळ त्या चालीवर सदुच्या परिस्थितीचं सिंहावलोकन!) कदाचित जास्तंच जोरात सुस्कारा टाकला असावा कारण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवुन झोपलेल्या सुंदरीनामक प्राण्याला खडबडुन जाग आली. "अबीबी उद्री है क्या?" असं त्या द्राविडभाषिणीनं तमिळ ह

सुफी-(याना)-(नामा)

"आपल्याला मुलगी झाली तर आपण तिचं नावं सुफी ठेवु!" माझ्या गंभीर प्रस्तावावर उत्तरादाखल फक्त एक ठसठशीत मौन! याचा अर्थ कॅपिटल बोल्ड फॉन्टमधे "नाही" असा होतो हे सरावाने उत्तम संसारपट्टुला उमजुन येते. मुलगा झाल्याने नैसर्गिकरित्या प्रश्न सुटला. कुठून आलं हे नाव डोच्क्यात? थोडासा मेमरी जॉग. कश्मिर दुरदर्शनवर झिंटबेबी नाचतेय "बुमरो बुमरो." पारदर्शी चेहरयाचा ह्रतिक खुप वर्षांनी तिला भेटायला आलाय. त्याची सहजगत्या थिरकणारी पावलं, साधेपणातूनही न लपणारं ग्रीक गॉडत्व, निरागस चेहरयामागचा दहशतवाद आणि तिचं ओसंडुन वाहाणारे हसु, त्याला भेटल्यावर देहबोलीतून अखंड पाझरणारा अविश्वास, आनंद, आश्चर्य यांचं भन्नाट मिश्रण. मंत्रावल्यागत तिचं नाव त्याच्या तोंडून बाहेर पडतं "सुफी..." नव्हे; सुफीचा संदर्भ असेल तिथे पण उगम नाही. सम मोअर ब्रेन-ड्रॅग. लख्खावलेले इंजिनिअरींगचे दिवस. नुसरतचा संगम कुठूनसा हातात आलेला. जुल्फे उलझाए तो दुनिया परेशां हो जुल्फे सुलझाए तो ये झिस्त आसान हो जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं रेशमी रेशमी अंबरी अंबरी आणि मग खुळावल्यागतच झालं. सुफीच्या जन्मखुण

...आणि डार्लिंग

"आठवणी येताहेत जन्मापासून जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. गर्भाशय हादरले, तडकले, जागोजाग तेव्हाच्या. आठवणी येताहेत तळघरातील भातुकलीच्या शेजारी निवांत निजलेल्या अधोरेखित टिपणाच्या. .. आठवणी येताहेत पहाडामागून, पहाडापूर्वीच्या. एका उपनदीचे नाव डार्लिंग." नदीला असतात आकार, उगम, अंत आणि काही नावे. मी अगस्त्य, समुद्र म्हणू तुला डार्लिंग? अट्टहास आणि परिणाम एकत्र तोलायचे नाहीत या जीवघेण्या बोलीवर तुझे अनंग अस्तित्व वसतीला आले माझ्या. शब्दहीन अर्थांचे पुंजके लगडले आहेत मेंदुला तेव्हा पासून. रंगीत पुंजके. निळे, हिरवे पिवळे उदाहरणार्थ अनंतपण, वासना आणि विरक्ती अनुक्रमे. आणि हो काळे आणि पांढरेसुद्धा. निम्बस; घनकल्लोळ काळेपणाला आकृतीबंधात गुंफणारा सोनेरी धागा, तो ही आहेच. रंगांचे इतके सहजी वर्गिकरण होणे नाही पण पॅलेटमधे कुस्करलेल्या रंगांच्या ट्युब्स काही तरंग सोडून जातात मनात. मी मुळचाच निसर्गवादी; पुज्य आणि सांख्य, धन आणि ऋण, निर्मिती आणि विनाश आणि हो, काळे आणि पांढरे एकत्रित आवडतात मला. या न्यायाने तुझ्या अनंग अस्तित्वाचे दुसरे शारीर टोक असणार कुठे तरी. शोधु म्हटले तर सापडणार नाही. आ

भिंतीवरचे काळे धुके

"शेवाळ्यासारखं बुळबुळीत काही अंधार अधांतर भिंतभर पसरत होतं. धुरासारखं असलं तरी वास नव्हता त्याला. पण डोळ्यांवर अदृष्याचा पडदा ओढण्याचं अचाट सामर्थ्य मात्र होतं; धुक्यासारखं; तेही काळ्या रंगाच्या धुक्यासारखं. बघता बघता डोळ्यांदेखत घरातली भिंत काळवंडत गेली. ’ते विषारी आहे’ एक मन आतून ओरडलं पण नजरबंदीच्या प्रयोगासारखे माझे डोळे काळ्या ठीक्क पडलेल्या भिंतीवरुन काही हलत नव्हते. कुणीतरी आकाशगंगेतलं एखादं कृष्णविवर भिंतीवर मायाजालासारखं पसरवावं तसं समोरच्या भिंतीवरच्या काळ्या धुक्याकडे माझे पाय माझ्या ईच्छेविरुद्ध मला ओढत होते. अम्मांनं हाक मारली नसती तर कदाचित मी त्या धुक्यात विरुनही गेले असते. भिंतीवरची ओंगळवाणी पाल एकदा मारली तरी आपल्या मनात ती कितीतरी वेळा तडफडत मरतच राहाते तसं काही तरी झालय मला. मी ते काळं धुकं विसरुच शकत नाही. काही तरी अशुभ, विषारी आणि दुष्ट आहे इथे. आम्ही हे घर लगेच सोडलं. पण इथे जो कुणी नवीन राहायला येईल त्याच्या साठी मी, शवर्री किणी, ही नोट ठेवत आहे." मी सलग दुसरयांदा हे पत्र वाचलं. हल्ली मी छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होत नाही. पण हे पत्र वाचून मी अस्वस

धार्मिक वगैरे वगैरे

"आपण धार्मिक आहोत का?" गेले कित्येक महीने, कदाचित वर्षं, हा प्रश्न विक्रमाच्या वेताळासारखा माझ्या मानगुटीवर बसला आहे. आज ते भूत परत नव्यानं उगवुन आलं याचं कारण नुक्तंच एका पुस्तकाचं वाचलेलं ब्लर्ब! थोडं मागं वळून बघायचं तर मी संघाच्या शाळेत शिकलो. अगदी दहावी पर्यंत खाकी चड्डी घातली. शाखेत कधीच गेलो नाही पण शाखेत जास्त आणि शाळेत कमी असणारया मास्तरांवर मनापासून प्रेम केलं. पण म्हणून मी संघिष्ट किंवा कुठलाच पोथीनिष्ठ झालो नाही. पर्यायानं संघाची शाळा माझं कसलंही धार्मिक ब्रेन-वॉशिंग करु शकली नाही. मग मी धार्मिक नाही का? सर्वसाधारणपणे आपण कुणीतरी नसतो म्हणजे ते सोडून दुसरं कुणीतरी असतो (सोप्पय!). मी कम्युनिस्ट असुच शकत नाही कारण तेव्हढा झापडबंद मी कधीच नव्हतो.मग मी समाजवादी आहे का? आमच्या घरी य वर्षं साधना मासिक यायचं. एस. एम, नानासाहेब गोरे, सानेगुरुजी ही आई-दादांची दैवतं होती. पण काही अपवाद वगळता समाजवाद्यांची ढोंगं फार उघड दिसायची. कित्येकांचं दुटप्पी वागणं, उरलेल्या थोड्यांचं कधी अगतिक आणि जास्त करुन अव्यवहारिक वागणं समाजवादाच्या मर्याद्या उघड करायचं. डार्विन वगैरे बुवांनी तर

नाचु आनंदे

Image
खुप सारी वाट पाहाणे उत्सुकता चिंता प्रार्थना आनंद नवा जीव जागरण दुपटी लंगोट पेढे जॉन्सन पावडर तेलपाणी सल्ले चौकश्या अधून मधून लाल गुल्मोहर पिवळा बहावा आनंद..

मुक्ताची डायरी

दि. १ फेब्रु //श्री गणपती प्रसन्न// शाळेत बाईंनी डायरी लिहीण्याचं महत्व सांगितलं. गुरु म्हणजे देव म्हणून तर बाईंचं ऎकलं पाहीजे. काही वाईट मुले त्यांचे ऎकत नाहीत. देव त्यांना नरकात पाठवेल हे नक्की. माझं बघून सईनं पण डायरी लिहायचं ठरवलं आहे. म्हणजे ती पण नरकात जाणार नाही. आम्ही सतत एकत्र असतो. ती नरकात जाणार नाही हे कळल्यानं मला मस्त वाटलं. कु. मुक्ता फडणिस, इ. ३री अ दि. २ फेब्रु काल आईला डायरी दाखवली. ती म्हणाली की असं गणपती प्रसन्न वगैरे लिहायचं नसतं आणि दरवेळी पानाखाली नाव आणि वर्ग लिहायची पण गरज नसते. पण मग ही माझी डायरी आहे हे कसं कळणार? आणि मी ३री अ त म्हणजे हुशार मुलांच्या वर्गात शिकते हे कसं कळणार? मग तिने वहीला निळ्या रंगाचं कव्हर घालून दिलं आणि त्यावर मोठ्या अक्षरात मुक्ताची डायरी असं लिहून दिलं. मला मस्त वाटलं. आईचं सगळंच मस्त असतं. तिचा गोरा गोरा रंग, तिच्या हातचा खाऊ, तिचा गोड आवाज एकदम मस्त. पुष्करदादा आणि अन्यादादा तिच्याच सारखे गोरे आहेत पण मी बाबांसारखी आहे, गव्हाळ रंगाची. पुष्करदादा म्हणतो असा काही रंग नसतो (मी रंगाच्या पेटीत बघितलं. मला गव्हाळ रंगाचा खडू नाही दिसला म्ह

माया

हिवाळ्यातील तहानेचे संकेत जरासे निराळे त्यात तगमग नसते उन्हाळी निवून जाण्याचे सोसही नसतात तुझ्या गुणसुत्रांची मांडण कदाचित तशीच; तालबद्ध अवरोहांची विलंबित लय. तुटण्याचे भय आणि जोडण्याची उत्कटता समेवर पेलतात तुझे मायावी हात.. हात.. बर्फाचे अभ्रकशुभ्र.. किंचित पारदर्शी आणि संदिग्धही.. माझ्या देहचूर कविता झाडात चंद्र अडकावा तश्या उसवतात तुझ्या स्पर्शातून स्पर्श... बर्फाचा.. अस्तित्वाचे दंश पुसून रक्ताशी एकरुप होणारा वंशहीन.. हिवाळी ओल्या तहानेसारखा तुझ्या भरतीचे एक वतन माझ्या हवाली करताना फकिराच्या वासनेचा उरुस तुझ्या दिठीत पाहीला मी आणि तेव्हापासून माझ्या चेतनातंतूंवरुन वाहाताहेत तुझे ओले स्पर्श

नाव देण्याचा कंटाळा आल्याने नाव न दिलेले पोस्ट

परवाच्या लोकसत्तात दहावीची परिक्षा झाल्यानंतर बर्फाचा गोळा खाणारया हुश्श्य आणि खुश्श्य अश्या तीन मैत्रिणींचा फोटो आला होता. तो बघून आनंद आणि हेवा असं काहीसं एकत्र वाटलं. कुठलीही आनंदी माणसं दिसली तरी मला आनंद होतो. नुस्ती माणसंच का, आनंदी मूडचं गाणं किंवा एखादा आनंदी प्रसंग पाहीला तरी का कोण जाणे पण रक्त अचानक निळसर गुलाबी होतं असं मला सारखंच वाटत आलय. आणि इथे तर परिक्षा नावाच्या राक्षसाचं मर्दन करुन आलेल्या तीन मैत्रिणी! फुल ऑफ युथ!! कसलेही ताण नाहीत, भविष्याची चिंता नाही, मैत्रीचं अजब गारुड अजूनही गळेकापु स्पर्धेपासून अलिप्त ठेवू शकतं!! बोला राव, अजून काय हवं असतं कधी कधी आनंदी असायला? आणि हो, पुढचे दोन-तीन महीने निवांत सुटी! आणि माझ्यातल्या रिंगवाला एजंल इथे संपतो आणि शिंगवाला राक्षस जागा होतो! आम्हाला का म्हणून नाही सुट्या? पोरांएव्हढंच उन, किंबहुना जास्तच आम्हाला लागतं (कारण एसीच्या सवयी), आम्हालाही पोटाला तडस लागेपर्यंत आब्यांचा रस खाऊन दुपारी डाराडूर झोपावं वाटतं, मामाचा गाव आम्हालाही असतो, निवांत वाचायची म्हणून जमा केलेली पुस्तकं, जमा केलेले सिनेमे, गाण्याचे छंदबंदंवाले क्लास अ

टू टेल्स

//१// सत्यशीलाने मोहाचे पाश तोडायचे ठरवले. अंतीम सत्याचे ज्ञान हेच त्याचे साध्य होते. अजून थोडा उशीर केला तर निश्चयाचे बळ कमी पडायला लागेल हे ओळखुन त्याने राजप्रासादाच्या दुसरया टोकाला असणारया मुख्य महालाकडे कुच केली. सत्यशीलाचा मनोदय ऎकून भाल्यागत ताठ राजा क्षणभर खांद्यातून वाकला. राजा म्हणून त्याचे धर्माप्रती कर्तव्य होते खरे पण म्हणून आपल्याच राजवंशी अस्तित्वाला असं पणाला लावावं लागेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. राजराणीने दरबारी नियमांना न जुमानता सज्जा सोडून ऎन दिवाणखान्यात धाव घेतली. नाळेने जोडले गेलेले आदी-सत्य तिच्या मिठीतून सोडवत सत्यशीलाने राजमुकूट तिच्या चरणी ठेवला. अंगावरील रेशमी उत्तरीय दोन्ही हातांनी उभे चिरत त्याने संसाराच्या वाटेवरचा शेवटचा धागाही तोडून टाकला. सत्यशीलाला सीमेपार सोडण्यासाठी सहा अबलख घोड्यांचा रथ आला. का कोण जाणे पण त्यावर फडकणारा ध्वज आज निस्तेज वाटत होता. सत्यशीलाने तो रथ नाकारला. लाकडी कठोर खडावा पायी चढवुन तो निघाला. त्याच्या मागोमाग हुंदके दाबत अथांग जनसमुदायही निघाला. सीमेपाशी थांबून सत्यशीलाने त्या जनसमुदायाला वंदन केले "नात्यांचे पाशच तोडू

खाए जा...

सृष्टीसे पहले कुछ नही था. सत भी नही-आ-सत भी नही था. याच चालीवर आपल्यातील असंख्यांना कोंबडी आधी की अंडं? हा प्रश्न पडलेला असतो. नुक्ताच मला एका ध्यानमग्न क्षणी या सत्याचा साक्षात्कार झाला अन मी उत्स्फुर्त पणे ऑर्डर दिली "जे तयार असेल ते आणा आधी" मनुष्यप्राण्याच्या असंख्य व्याख्या विद्वानांनी केलेल्या आहेतच. त्यात चवीने खातो आणि खिलवतो तो प्राणी म्हणजे मनुष्य अशी एक भर आज मी टाकतोय. चव असणारे बरेच प्राणी आहेत. म्हणजे ज्यांना चव कळते ते, ज्यांची स्वतःची चव चांगली आहे ते नव्हे! पण तुम्ही कधी "वा! वा!! ही मिर्ची छान आहे. कोल्हापुरसाईडची दिसते. या राघोबा, या मिठुराया. लाजु नका. आज ताव मारु" असा आगत्यशील पोपट पाहीला आहे का? आता तुम्ही शिकवुन एकादा पढतमुर्ख आणाल तर त्याच्याच पिंजरयातली एखादी मिर्ची तुम्हाला टाकून मी तुम्हाला वाटेला लावेन ही एक शक्यता. पण चवीने खाणे आणि खिलवणे ही मक्तेदारी मनुष्यप्राण्याचीच. अश्याच एका गाफील क्षणी कधी तरी पहीली-दुसरीत असताना मामाच्या गावाला जाऊ या- शिकरण पोळी खाऊ या म्हणायच्या ऎवजी मामानं झिंगे खाऊ घातले अन अस्मादिक बाटले. तोवर आमची मजल उकडल

भेट

दिवस-रात्र यांच्या दरम्यान सॅन्डवीच झालेली संध्याकाळ, माझा एक पाय गाडीत अन दुसरा जमिनीवर, गाण्याचं शेवटंच टोक ऎकायचं म्हणून गाडी पूर्ण न विझवता फक्त इन्जिन ऑफ केलेलं. असल्या हिरण्यकश्यपु अवस्थेत फोन टणटणला. "उद्या भेटायचं?" भडाभडा लिहीणारया माणसानं इतकंच विचारावं? मी तंद्रीतच परत फोन करुन सांगतो असं म्हटलं. हं...शेवटी ती वेळ आली तर! अमेरीकेहून निघण्याआधी त्याने मेल टाकलेला, पूर्ण आयटनरीसहीत. त्यावेळी फक्त उत्सुकता की फस्स्स उतु जात असल्यासारखं लिहीणारा हा माणूस असेल तरी कसा याची. बघता बघता हा समोर उभा अन फोन करुन विचारतोय की कधी भेटायचं. वीतभर जीना हातभर झाला अन तो चढून घरात येईपर्यंत माझं आक्रसुन आक्रोड झालेलं. अनोळखी माणसाला भेटणं इतकं का सोपं असतं? आपल्या अंगांना कितीक उपांगे असतात. आपण लिहीतो ती त्यातलीच एक शक्यता. आता सदेह कुणाला भेटायचं म्हणजे निमूटपणे सारया शक्यता देह साजागत लेवून सामोरं जाणं आलं. हे राम! हा मनुष्य भेटल्याशिवाय काही जायचा नाही...चमत्कारांवर विश्वास ठेवण्याइतपत आपण भाबडे नसतो नाहीतर रात्रीतून काहीतरी होईल अन ही भेट टाळता येईल या आशेवर तरी डोक्यातला भुंग

मोर

काळाला पीळ पाडला की अवकाशाचे संदर्भ पुर्णपणे बदलतात म्हणे. एकदा का अवकाशाची प्रतले वेगळी झाली की चेहरयावरची अनोळख देखील वैध ठरते. अवकाशाला माझ्यापुरता पीळ पडायला लागला की तुटून वेगळ्या झालेल्या अवकाशाबद्दल मला फारसं ममत्व नसतं. भुतकाळातुन हवी तेव्हढीच माणसं सोबत घ्यावित अन बाकीचे प्रसंग कॅलिडास्कोपमधली एक शक्यता म्हणून ठेवून द्यावित की झालं. अनोळखी कौतूक म्हणून मला भविष्यकाळ जास्त प्रिय. अर्थात लिहावं इतक्या सहजपणे पाय निघत नाही एका काळातून दुसरयात. इंजिनिअरिंगच्या सेन्डऑफला "एक राह रुक गयी तो और जुड गयी" या ओळी म्हणून झाल्यावर मैत्रिणीच्या दुखावलेल्या नजरेला नजर न देताच कसंबसं गाणं पुर्ण केलं तो क्षण किंवा "वुई आर अ टीम. तुम मुझे छोडके जा ही नही सकते" असं म्हणणारया मल्याळी बॉसच्या हातात राजिनाम्याचं थंड पत्र ठेवताना एका अदृष्य भिंतीवर शेवटची वीट चढवल्यागत वाटलं तो क्षण असे काही सन्माननिय अपवाद. अन्यथा काळ बदलाच्या शेवटच्या टप्प्यात बरयाच अंशी अस्तित्व नव्या शक्यतांना पडताळुन पाहाण्यातच जास्त गुंग असतं. मुळ मुद्याची शब्दांच्या वजनावर गर्दन न उतरवता, लेट्स कम टू पॉईन