भेट

दिवस-रात्र यांच्या दरम्यान सॅन्डवीच झालेली संध्याकाळ, माझा एक पाय गाडीत अन दुसरा जमिनीवर, गाण्याचं शेवटंच टोक ऎकायचं म्हणून गाडी पूर्ण न विझवता फक्त इन्जिन ऑफ केलेलं. असल्या हिरण्यकश्यपु अवस्थेत फोन टणटणला. "उद्या भेटायचं?" भडाभडा लिहीणारया माणसानं इतकंच विचारावं? मी तंद्रीतच परत फोन करुन सांगतो असं म्हटलं. हं...शेवटी ती वेळ आली तर! अमेरीकेहून निघण्याआधी त्याने मेल टाकलेला, पूर्ण आयटनरीसहीत. त्यावेळी फक्त उत्सुकता की फस्स्स उतु जात असल्यासारखं लिहीणारा हा माणूस असेल तरी कसा याची. बघता बघता हा समोर उभा अन फोन करुन विचारतोय की कधी भेटायचं. वीतभर जीना हातभर झाला अन तो चढून घरात येईपर्यंत माझं आक्रसुन आक्रोड झालेलं.

अनोळखी माणसाला भेटणं इतकं का सोपं असतं? आपल्या अंगांना कितीक उपांगे असतात. आपण लिहीतो ती त्यातलीच एक शक्यता. आता सदेह कुणाला भेटायचं म्हणजे निमूटपणे सारया शक्यता देह साजागत लेवून सामोरं जाणं आलं. हे राम! हा मनुष्य भेटल्याशिवाय काही जायचा नाही...चमत्कारांवर विश्वास ठेवण्याइतपत आपण भाबडे नसतो नाहीतर रात्रीतून काहीतरी होईल अन ही भेट टाळता येईल या आशेवर तरी डोक्यातला भुंगा थंडावला असता..

कुणी कसले अर्थ विचारले की उगाच संदर्भांची वीण उसवावी लागते कधी. कधी त्वचेखालचे नितळ जुनेच आपण परत उगवुन येऊ याची सार्थ भिती! एकाच वेळी डोळ्यातले माणसे वाचण्याचे कुतुहल अन स्वतःभोवतीचे अदृष्य कोट जपण्याची तेव्हढीच जीवापाड धडपड! आपल्या प्रतिभेच्या मायन्यातून उगवणारे अपरिहार्य अहंकाराचे टोक बेसावधपणे आपल्याच डोळ्यात घुसून अंध ठरवु पाहाणारे क्षण टाळण्याची एक पराकाष्ठा...नक्की काय साध्य करायचं असतं मला अश्या भेटी टाळून? एकांतात बसून लिहीलेल्या कविता पकडल्या गेल्या की किती कानकोंडलं होतं हे तो फक्त एक कवीच जाणो!!

माणूसघाणा म्हणता मग? आय बेट, यू कॅन नॉट. जिथे कवितेचा नार्सिझम संपतो, तिथून माझ्या वैश्विकरणाला सुरुवात होते प्रिय! घटनांचे असंख्य पदर, त्यांना छेदत जाणारे मनुष्य स्वभावाचे धारदार कंगोरे अन अनंत शक्यतांचं अजब गारुड मला सतत खुणावत असतं. वादळं निर्माण करण्याची अचाट शक्यता केवळ फुलपाखराच्याच फडफडण्यात असते काय? लेट मी डिसेक्ट यू ऍन्ड आय गॅरन्टी यू अ स्टॉर्म. जन्मताना सोबत असते तेव्हढीच नग्नता सत्य. चेहरायवार चेहरे घालून जेव्हा जेव्हा लपाछपी खेळशील, शब्दांचे अर्थ तुला शोधत येतील.

दोन अर्थपुर्ण टोकांवर मी यथेच्छ झुलून घेतो. आहे त्याहूनही जास्त मी आधी माणूस असतो, माये. जितक्या सहजपणे मित्राने फोन केला तितक्या सहजपणे मलाही त्याला भेटता येऊ शकते.

"मी येतो" कुठल्याही संदिग्धतेशिवाय एक उखाणा मीही सोडवतो!

Comments

Samved said…
अभिजितनं निर्माण केलेल्या पोस्टचा हा पुर्वार्ध..माझ्या चष्म्यातुन!
Abhijit Bathe said…
उत्तरार्ध लिहुन टाक बाबा एकदाचा - म्हणजे अनेक जीव (एकदाचे) भांड्यात पडतील!

ता.क. तुझी पोस्ट्स (नेहमीच) जाम हळुहळु वाचावी लागतात - जरा भरभर लिही ना!
सही! मस्तच मूड पकडलायेस भेटीपूर्वीचा.. तो आहेच असा अवलिया की इतकी वर्षे त्याला ओळखत असूनही तो भेटणार म्हटल्यावर तो त्या तुफ़ान एनर्जीने कोणकोणत्या विषयांवर कायकाय बोलेल, आणि लाईफ़चे काय फ़ंडे मारून आपल्याला स्तब्ध करेल या विचारानेच मी हबकून जातो! तुला पहिल्या भेटीआधी असं सारं वाटणं एकदम स्वाभाविकच आहे - आय् कॅन् आयडेण्टिफ़ाय् विथ् योर् फ़ीलिंग्ज् ऍण्ड् थॉट्स्!

पुढच्या भागाच्या इंतजारमें...
a Sane man said…
अदृश्याच्या भेटीचे दृष्टांत!! जियो!
Monsieur K said…
the emotions, the palpitations, the expectations.. before meeting s'one u havent met before.. and really look forward to meeting.. mast express kela aahe!
so, how did the rendevous go?
Tulip said…
लिहा की आता पुढे. अभिजित बरोबर म्हणतोय. आमचा जीव भांड्यावरच किती वेळ लटकावून ठेवणार आहेस असा?(संवेद-बाठे भेट ऐतिहासिक होतीच पण आता त्याचा वृत्तांत टाकायला तु इतका वेळ लावत आहेस की ती रहस्यमय सुद्धा होती की काय असा संशय यायला लागलाय:P)

पोस्ट तुझ्या नेहमीच्याच स्टाईलने अगदी ’तरल’ झालय.
Monsieur K said…
arey, lihitoys na???
Samved said…
अरे...ट्राय करुन बघतोय पुढचा भाग जमतो का ते..