Posts

Showing posts from December, 2010

अ- कील

जंगलातून सयामी असल्यागत आम्ही जुळेच धावत सुटलो ठेचकाळत जीवाच्या आकांताने कधी कधी हिरव्याकांत तृणाच्या धारदार पात्यांवरुन धावण्याला भितीचा आकार नव्हता पाठीवरच्या लंपट तीळासारखी निव्वळ निखळ जाणीव दिशांनी वाटा अडवल्या पण हातातून हात सुटले नाहीत प्रहरांनी चकवे लावले पण पाय क्षणभरही थबकले नाहीत भाळावर कोरलेली अक्षांश रेखांशाची प्रमेये कधीच तुझ्या वतनावर वाहीलेली म्हणून हक्काचे आलो तुझ्या मुक्कामी पण दिठीतले धुके जरा निवळते तोच दारावर मारेकऱ्यांच्या अबोध खंजीराची नाजूक नक्षीदार किणकिण "त्यांना" असते हेवा वाटावे असे दगडी काळीज "त्यांना" माहीत नसतो घटनेमागचा कार्यकारणभाव "ते" जोडतात आणि मोडतात काळाचे काही तुकडे "त्यांना" नेमून दिलेले चित्र पुर्ण करण्यासाठी "त्यांना" माहीतही नसतं आमचं जुळं अस्तित्व एका क्षणाचा इतिहास झाला काजळाचा एक आर्त थेंब टेकवलास गालावर- जुळ्यांमधे द्वैती पाचर जशी पुरत्या जन्माची नवी ओळख जशी एका जगण्यासाठी- एक मरण अस्तित्वाचा दंश जणु तुझी काजळमाया आवेगाने दार उघडलस आणि डार्लींग, तू कवितेला मारेकऱ्यांच्या हवाली केलस.