भिंतीवरचे काळे धुके
"शेवाळ्यासारखं बुळबुळीत काही अंधार अधांतर भिंतभर पसरत होतं. धुरासारखं असलं तरी वास नव्हता त्याला. पण डोळ्यांवर अदृष्याचा पडदा ओढण्याचं अचाट सामर्थ्य मात्र होतं; धुक्यासारखं; तेही काळ्या रंगाच्या धुक्यासारखं. बघता बघता डोळ्यांदेखत घरातली भिंत काळवंडत गेली. ’ते विषारी आहे’ एक मन आतून ओरडलं पण नजरबंदीच्या प्रयोगासारखे माझे डोळे काळ्या ठीक्क पडलेल्या भिंतीवरुन काही हलत नव्हते. कुणीतरी आकाशगंगेतलं एखादं कृष्णविवर भिंतीवर मायाजालासारखं पसरवावं तसं समोरच्या भिंतीवरच्या काळ्या धुक्याकडे माझे पाय माझ्या ईच्छेविरुद्ध मला ओढत होते. अम्मांनं हाक मारली नसती तर कदाचित मी त्या धुक्यात विरुनही गेले असते. भिंतीवरची ओंगळवाणी पाल एकदा मारली तरी आपल्या मनात ती कितीतरी वेळा तडफडत मरतच राहाते तसं काही तरी झालय मला. मी ते काळं धुकं विसरुच शकत नाही. काही तरी अशुभ, विषारी आणि दुष्ट आहे इथे. आम्ही हे घर लगेच सोडलं. पण इथे जो कुणी नवीन राहायला येईल त्याच्या साठी मी, शवर्री किणी, ही नोट ठेवत आहे." मी सलग दुसरयांदा हे पत्र वाचलं. हल्ली मी छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होत नाही. पण हे पत्र वाचून मी अस्वस