भिंतीवरचे काळे धुके

"शेवाळ्यासारखं बुळबुळीत काही अंधार अधांतर भिंतभर पसरत होतं. धुरासारखं असलं तरी वास नव्हता त्याला. पण डोळ्यांवर अदृष्याचा पडदा ओढण्याचं अचाट सामर्थ्य मात्र होतं; धुक्यासारखं; तेही काळ्या रंगाच्या धुक्यासारखं. बघता बघता डोळ्यांदेखत घरातली भिंत काळवंडत गेली. ’ते विषारी आहे’ एक मन आतून ओरडलं पण नजरबंदीच्या प्रयोगासारखे माझे डोळे काळ्या ठीक्क पडलेल्या भिंतीवरुन काही हलत नव्हते. कुणीतरी आकाशगंगेतलं एखादं कृष्णविवर भिंतीवर मायाजालासारखं पसरवावं तसं समोरच्या भिंतीवरच्या काळ्या धुक्याकडे माझे पाय माझ्या ईच्छेविरुद्ध मला ओढत होते. अम्मांनं हाक मारली नसती तर कदाचित मी त्या धुक्यात विरुनही गेले असते. भिंतीवरची ओंगळवाणी पाल एकदा मारली तरी आपल्या मनात ती कितीतरी वेळा तडफडत मरतच राहाते तसं काही तरी झालय मला. मी ते काळं धुकं विसरुच शकत नाही. काही तरी अशुभ, विषारी आणि दुष्ट आहे इथे. आम्ही हे घर लगेच सोडलं. पण इथे जो कुणी नवीन राहायला येईल त्याच्या साठी मी, शवर्री किणी, ही नोट ठेवत आहे."


मी सलग दुसरयांदा हे पत्र वाचलं. हल्ली मी छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होत नाही. पण हे पत्र वाचून मी अस्वस्थ झालो. रादर, माझ्या घराबद्दलं असं लिहीणारया शर्वरी किणीचा मला भयंकर राग आलेला आहे. याच किणीबाईंनी एक वर्षापुर्वी याच फ्लॅटसाठी आक्काच्या किती मनधरण्या केल्या होत्या! जुना फ्लॅट आहे म्हणून भाडं ही कमी करुन घेतलं होतं. लोक सोईस्कररित्या विसरतात आणि लोकांच्या अश्या वागण्यानेच माझा संताप संताप होतो. टेक अ डीप ब्रीद. ..संतापामुळे फक्त नुकसानच होतं. पण किणीबाईंच्या एपिसोड नंतर इथे भाडेकरु मिळणं कठीण झालय हे खरं. आजुबाजुची मुलं देखील इथून जाताना चट्कन न बोलताच घाईघाईने पुढे सटकतात. माझं ठीक आहे, माझ्या काही फारश्या गरजा नाहीत पण आक्काच्या एक्कलकोंड्या संसाराला याच फ्लॅटचा टेकू आहे. निदान तिच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून का होईना, या फ्लॅटमधे कुणीतरी राहायला यायला हवं. मिस्टर गुरुनाथ शब्दे, टेक अ डीप ब्रीद...सगळं काही ठीक होईल. किणीबाईंची नोट तुमच्याच हातात पडली हे किती चांगलं झालं!

तुमच्याशी बोलत काय बसलोय? पुढचा भाडेकरु यायची वेळ झाली तरी मी अजून इथेच हे कळालं तर आक्का खवळेल. घ्या! आलीच वाटतं मंडळी.

गुरुनाथ शब्देंनी दार आतून उघडायला आणि लॅचची चावी फिरवुन आक्का आत यायला एकच गाठ पडली. दारासमोरुन उड्या मारत जाणारी दोन लहान मुलं अचानक आलेल्या कुबट गार वारयानं गुदमरायला झाली आणि शब्दांचं ओझं असह्य झाल्यागत चिवचिवाट बंद करुन चुपचाप चालती झाली. व्हरांड्यात घू घू करणारी कबुतरं मरणांतिक भीतीनं आवाज न करताच उडून गेली. आक्कांनी सांडणारं हसु ओठ दुमडून तिथंच थांबवलं आणि भसाड्या आवाजात त्यांनी "या" असं आमंत्रण दिलं. गुरुनाथ शब्देंनी अंग चोरुन आक्कांना आत येऊ दिलं. त्यांच्या मागोमाग आलेल्या पाहुण्यांनां आक्कांनी निरस सुरात विचारलं "नाव काय म्हणालात तुमचं?"


"नयन महेश्वरी" शंकाच नाही. अहो शाळेपासून सोबत होतो आम्ही. अगदी दोन वेण्या ते पोनी टेल असा सारा प्रवास मी तिच्या सोबत केलेला आहे. गेली १-२ वर्ष मी तिला पाहीली नाही म्हणून काय झालं? नो मिस्टेक, नयनच ती. शाळा-कॉलेजातले कोणतेही ग्रुप फोटो तुम्ही काढून बघाल तर नयनच्या जवळपास मी दिसेनच दिसेन. नाही, तशी घट्ट मैत्री वगैरे नव्हती आमची. मुलींशी मैत्री म्हणता आक्कानी उभा सोलला असता मला. आक्का सोडून बाई माणसाशी बोलण्याचा प्रसंगच आला नाही कधी. खरं तर हिंमत झाली नाही असं म्हणायला हवं आणि ..जाऊच द्या.

काही दिवस सुरळीत गेले पण नंतर..

नयन बेचैनपणे कुस पालटत राहीली. या जागेचे संकेत आणि ऎकलेल्या अफवा तिला अस्वस्थ करत होत्या. दाराच्या उंबरयावरच खिळा धसून पाऊल रक्ताळले होते तिचे. नवाच गृहप्रवेश केल्यासारखी पावलं उमटली होती तिची घरभर. आणि यावर त्या घरमालकीणबाई म्हणाल्यापण,"कशी लक्ष्मीसारखी पावलं उमटलीत. घर लाभणार तुम्हाला. आता काही सोडत नाही तुम्ही हे घर". आपण घराला की घर आपल्याला सोडणार नाही? नौकरीचा हट्ट न करतो तर आज स्वतःच्या घरात आपण झोपलो असतो, नयनने सुस्कारा टाकला.

नयनला लाभायलाच हवं हे घर. तुम्हाला सांगतो, स्वतःच्या घरापासून असं दूर राहून नौकरी करणं सोपं असतं का? मला वाटतं आय शुड स्पीक विथ हर. आक्काला अजूनही ते आवडणार नाही पण तिच्याशी मी बोललो तर तिला कदाचित एकटं वाटणार नाही. एकटेपणाबद्दल तुमचा काही अनुभव?

कुजत चाललेलं स्थिर पाणी, त्यावर शेवाळ्याचा हिरवट काळसर जाड थर. एखादा खडा उडून आला तर त्याला शोषून प्रत्त्युतरादाखल पाण्याचा एखादा थेंबही न उडवणारा असह्य डोह. जुन्या, अस्पर्श पाण्याला वासनेची डूब असते. ते अंगाला लागले की पाण्यालाच तहान लागते देहाची. स्पर्शासारखे देहभर पसरत जाते ते आणि उभ्या देहाचे पाणीच करुन टाकते. नयन अर्धवट जागी झाली ती अश्या काही तरी भयंकर विचित्र स्वप्नामुळे. तिच्या पलंगभर शेवाळलेले पाणी पसरले होते.

हे गुरुनाथ शब्देचं घर आहे? आक्कांना भेटून आल्यावर कितीतरी वेळ नयन विचार करत होती.
गु.. रु.. ना.. थ.. श.. ब्दे. गु..रु..लहानपणापासून तिच्या वर्गात असणारा एक किडूकमिडूक नगण्य मुलगा. भेदरल्या डोळ्यांचा आणि ज्याचे शब्द कधी ओठापर्यंत आलेच नाहीत असा मुलगा. ज्याने...

...ज्याने एक वर्षापुर्वी गावाबाहेरच्या जुनाट डोहात आत्महत्या केली तो गुरुनाथ शब्दे! नयन, आयुष्यभर तू कधी तरी माझ्याशी बोलशील याची मी वाट पाहीली. प्रत्येक फोटोत आपल्या आजुबाजुला धडपडणारा, मुकाटपणे परस्पर तुझी कामं करणारा सश्याच्या काळजाचा मुलगा तुला कधी तरी आवडेल असं मला वाटत राहीलं. पण तू तुझ्या जगात मश्गुल राहीलीस. मग मी हिंमत करुन आक्काला तुझ्याबद्दल सांगीतलं. बेभान आक्काचे अशुभ शब्द आठवले की अजूनही काटा येतो अंगावर. शब्दांनी शब्द वाढले आणि नकळत आक्काच्या प्रौढ कुमारीपणाचा उल्लेख झाला. तिरमिरीत आक्कानं तापल्या तेलाचं भांडं ढकललं आणि अंगभर आयुष्यसरुन उरणारया वेदनांचा डोंब उठला. संतापाच्या भरात दाह मिटवणारं पाणीच जवळ केलं मी. त्या शेवाळलेल्या गर्द काळ्या पाण्याने सारं देहपणच नष्ट केलं आणि तरीही फिरुन इथेच आलो मी, सारया अपुरया ईच्छा, वासना घेऊन, माझ्याच घरात. नयन, तुला आठवतय नां?

नयन बधीर होऊन पलंगाच्या काठावर बसली होती. परत परत हातातले फोटो चाळूनही तिला त्यातला गुरुनाथ शब्दे नक्की ओळखु येत नव्हता. खोलीभर पसरलेल्या अनंत शांततेचा कोलाहल तिला असह्य होत होता.

टेक अ डीप ब्रीद गुरुनाथ..तिला आठवेल. नाही आठवतय तिला. टेक अ डीप..श्वास नाही पुरत आता. टेक अ..श्वासाची गरजच नाही गुरुनाथ आणि नयनचा श्वास कोंडायला...

...बघता बघता खोली निर्वात होत गेली. नयनला वाटलं भिंती जवळ जवळ येऊन तिला चिणून टाकतील. अंधारातही भिंतींचं काळं होणं लपत नव्हतं. घरभर धुकं पसरत होतं. ओलं, शेवाळी, काळं धुकं.

Comments

a Sane man said…
मस्त झाल्या. शब्दकळाही नेहमीसारखीच मस्त! नि ठेचाळवणारी वाक्यही आहेतच की अनेक..."आपण घराला की घर आपल्याला सोडणार नाही?", "टेक अ डीप..श्वास नाही पुरत आता. टेक अ..श्वासाची गरजच नाही गुरुनाथ..." अशी.

आणि हो, "इच्छा" असते, नाही?
matakarinchya kathanchi athavan zali agdi.
जबरदस्त लिखाण अप्रतिम मांडणी आणि लय....
Nivedita said…
Very nice, the dark environment is wonderfully created. Cool writing.
अगदी रत्नाकर मतकरीच.
छान कथा...
prasad bokil said…
आयला, सही जमली आहे लघुकथा!
Samved said…
धन्यवाद. मतकरींसारखी झाली आहे यातला एक भाग कॉम्प्लीमेन्टचा झाला आणि एक भाग धोक्याचा इशारा. ईस्टाईल बदलना मंगता है भिडु..