धार्मिक वगैरे वगैरे

"आपण धार्मिक आहोत का?"

गेले कित्येक महीने, कदाचित वर्षं, हा प्रश्न विक्रमाच्या वेताळासारखा माझ्या मानगुटीवर बसला आहे. आज ते भूत परत नव्यानं उगवुन आलं याचं कारण नुक्तंच एका पुस्तकाचं वाचलेलं ब्लर्ब!

थोडं मागं वळून बघायचं तर मी संघाच्या शाळेत शिकलो. अगदी दहावी पर्यंत खाकी चड्डी घातली. शाखेत कधीच गेलो नाही पण शाखेत जास्त आणि शाळेत कमी असणारया मास्तरांवर मनापासून प्रेम केलं. पण म्हणून मी संघिष्ट किंवा कुठलाच पोथीनिष्ठ झालो नाही. पर्यायानं संघाची शाळा माझं कसलंही धार्मिक ब्रेन-वॉशिंग करु शकली नाही. मग मी धार्मिक नाही का? सर्वसाधारणपणे आपण कुणीतरी नसतो म्हणजे ते सोडून दुसरं कुणीतरी असतो (सोप्पय!). मी कम्युनिस्ट असुच शकत नाही कारण तेव्हढा झापडबंद मी कधीच नव्हतो.मग मी समाजवादी आहे का? आमच्या घरी य वर्षं साधना मासिक यायचं. एस. एम, नानासाहेब गोरे, सानेगुरुजी ही आई-दादांची दैवतं होती. पण काही अपवाद वगळता समाजवाद्यांची ढोंगं फार उघड दिसायची. कित्येकांचं दुटप्पी वागणं, उरलेल्या थोड्यांचं कधी अगतिक आणि जास्त करुन अव्यवहारिक वागणं समाजवादाच्या मर्याद्या उघड करायचं. डार्विन वगैरे बुवांनी तर सर्व्हावय ऑफ फीटेस्ट सांगून सर्वजण सारखे वगैरे थोतांडातली हवाच काढली. अंधेरे मे एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश या घोषणा आणि ते नेते भिंतीवरच्या कॅलेन्डरवरच राहीले. त्यांचे राजकिय अन्वेषार्थ निराळे पण माझ्या मानेवरच्या वेताळाच्या प्रश्नाचं उत्तर हे नव्हे. थोडक्यात विचारसरणी, राजकीय, सामाजिक बांधीलकी आणि धार्मिकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे निदान माझ्यापुरतं तरी मी स्पष्ट करुन टाकलं.

मग मी अजून अस्वस्थ होतो. एक सोपं उत्तर शोधायचा माझा पहीलाच प्रयोग फसलेला असतो. ज्या पुस्तकानं गडे मुडदे उखडले ते पुस्तक काहीतरी हिंदुइझम असं वर्णन करतं. हिंदुइझम ? सोशल-इझम, कम्युनि-इझम हे मी समजु शकतो. त्या त्या जीवनपद्धतींबद्दल/ समाजपद्धतींबद्दल हे ईझम आहेत. शब्दबद्ध करावी इतपत युनिफॉर्म आपली जीवनपद्धत/ समाजपद्धत आहे? प्रश्नातून उलगडणारे प्रश्न जास्त टोकदार आणि अंतर्मुख असतात. मुळात ज्या बेसवर हा सो-कॉल्ड ईझम टेकला आहे तो तरी युनिफॉर्म आहे? जसा जसा विचार करावा तसं तसं याच उत्तर जास्त जास्त नकारार्थी येतय. कोणत्याही धर्माला एक सुप्रीम-देव असतो. ख्रिश्चनांना जिझस, मुस्लिमांना अल्ला तसा हिंदुंना? अनंतकोटी!! वैष्णवांच्या देवाचं नाव घ्याल तर शैव खवळतात. ग्रामदैवतं, अघोरपंथी, जाती-जातींचे, प्रांता-प्रांतांचे असंख्य देव असे निर्नायकी असावेत? विशेषतः हाडा-मांसाच्या राजात देव मानणारया आपण भारतीयांचे देव मात्र राजा शिवाय असावेत हे जरा विचित्रच! धर्माचा एक मार्गदर्शक असा धर्मग्रंथ असतो जो त्या समूहाचे नियम, कायदे बनवण्यात मदत करतो. गंभीर प्रसंगी त्याच्या हवाल्यावर गंभीर आणि दुरगामी परिणाम होऊ शकणारे निकाल दिले जातात. त्या त्या समुहाच्या घरा-घरात बायबल, कुराण इ. ग्रंथ दिसतात. हिंदु धर्माच्या कोणत्या पुस्तकाला एकमुखानं धर्मग्रंथ म्हणावं? आणि हे म्हणणं आपल्या नियमांत परावर्तित व्हावं? माझ्या घरातल्या शेकडो पुस्तकांत मला कधीच रामायण, महाभारत किंवा भगवतगीता सापडणार नसते. धर्माला काही मुखंड असतात. देवाचे काही लाडके, ज्यांना देवा कडून डायरेक्ट ऑर्डरी मिळतात म्हणे, ज्यांना धर्मग्रंथाचं आपण पामरापेक्षा जास्त आकलन असतं म्हणे. इन-शॉर्ट, देवानं त्यांना खास निवडुन दिलेलं असतं, त्याचं रिप्रेझेन्टीव्ह म्हणून (असं त्यांना वाटतं!). पोप,खोमिनी अशी ही लाडकी व्यक्तिमत्व. कदाचित आपले देव अनंतकोटी असल्याने, त्याचे दुतही अनंतकोटी असतील. थोडक्यात, याही कसोटीवर हिंदु धर्म फेल. धर्माची, धर्मग्रंथाची म्हणून एक भाषा असते. भले ही ती भाषा त्या धर्माच्या लोकांना नीट येत नसेल पण ती एक अधिकृत भाषा असते. आपल्याकडे भाषा किती हे धड देवालाही सांगता येईल की नाही सांगणे कठीण. धर्म कडवट असतात. धर्मांना आतून पंथांच्या, जातीच्या पालव्या फुटतात पण एका धर्मात दुसरा धर्म मिसळलाय याची उदाहरणे विरळाच. शिख धर्म, जैन धर्म, बुद्ध धर्म ज्या पद्धतीने हिंदु धर्मात मिसळले आहेत ते पाहाता त्यांना हिंदु धर्मातील एका पंथाचे रुप आले यात नवल नाही. आणि असे असंख्य तुलनात्मक मुद्दे मांडता येतील.

मग माझी धार्मिकता ठरवणारा हा माझा धर्म नक्की आहे तरी काय? इट्स जस्ट अ रॅपर! आपली खरी ओळख, धर्माच्या आधारे नसून जातीच्या आधारे आहे हेच खरे. या असंख्य जाती समुहांना काही सामुदाईक रुढी, रिवाज, रिती यांनी बांधून ठेवणारं रॅपर म्हणजे हिंदु धर्म. धर्माची व्याख्या जशास तशी जातीला लागु होत नाही. पण जातीची मुख्य ओळख रोटी-बेटी व्यवहार, एक भाषा, जगण्याची बरयापैकी एक सारखी तरहा अशी आहे. शिवाय जातीला प्रादेशिकवादाचं आणखी एक अस्तर आहेच. कदाचित याच मुळे धर्माच्या नावाने केलेलं राजकारण इथे फोल ठरतं पण जातीनिहाय मागीतलेला मतांचा जोगवा यशस्वी ठरतो. कदाचित याचमुळे हा धर्म कधी कडवट बनला नाही की उन्मादक भाषणांनी इथे कुणी फार काळ कुणाची डोकी पिकवु शकला नाही. कदाचित याचमुळे इतका पुरातन असूनही हा धर्म जगभर वाढला नाही. कुण्या त्रयस्थ माणसानं हिंदु धर्म स्विकारायचा ठरवला तर त्याला कुठली तरी जात स्विकारावी लागेल, धर्म नव्हे.

विक्रमाचे मौन तुटलेले पाहून वेताळाने नेहमीचे विकट हास्य केले आणि तो परत झाडाला जाऊन लटकला.

धार्मिक अवडंबर, उन्माद, गुरु-बुवांचं उदात्तिकरण आणि जगण्यातलं कुतुहल हरवुन टाकणारा ठक्क कोरडा भोगवाद याच्या अधेमधे कुठेतरी एक रॅशनल, माणुसपणाच्या पातळीवर जीवंत असतो, तो माझा धर्म!

Comments

>> याच्या अधेमधे कुठेतरी एक रॅशनल, माणुसपणाच्या पातळीवर जीवंत असतो, तो माझा धर्म!

hmm... :)

masta post. vichaaraant paaDaNaaree. as usual. :)
Vidya Bhutkar said…
वाचायला सुरुवात केली तेव्हा वाटलं होतं की तू तुझ्या belief बद्द्दल लिहितोयस.जसं की काही धार्मिक संस्कार मान्यच नाहियेत त्यामुळे तो धर्म पूर्णपणे पाळणं शक्य नाहीये.
पण शेवटी शेवटी वाटलं की तू तुझ्या धार्मिक नसण्याची कारणं देत आहेस. कारण,जर हिंदु देवांचा एकच राजा असता, एकच पुस्तक असतं आणि एक प्रतिनिधी असता तरीही तू त्यांना मनापासून follow केलं असतंस का?
I am not sure if I was able to put my comment in correct words, I hope u understand. :-)
-Vidya.
Megha said…
kharay tuza mhanana...dusara para vishesh aavadala...i agree with u on that..
Abhijit Bathe said…
आणि जात? :))
विचारसरणी, राजकीय, सामाजिक बांधीलकी आणि धार्मिकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत: अगदी बरोबर.

पण त्यानंतरचे दोन्ही परिच्छेद नाही पटले.

त्यापैकी पहिल्या परिच्छेदाच उत्तर:
१. रामायण आणि महाभारत धर्मग्रन्थ नाहित. ती महाकाव्ये आहेत, ज्यांच्याद्वारे हिन्दू धर्म शिकवला जातो. भगवदगीता किंवा आजच्या काळातील ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा तत्सम पुस्तकाना तुम्ही धर्मग्रन्थ म्हणू शकता. ज्यात तुम्ही काय केल्यावर देवाच्या जवळ जाल, ते सांगितले आहे. तुमच्या लेखासाठी सांगायचे तर बाइबल किंवा कुराणात हेच आहे. आणि ते पोथ्यांच्या रुपात घरोघरी असतात.
२. जशा आपल्याकडे जाती आहेत, तसे तुम्ही उदाहरण दिलेल्या धर्मांमधेही पंथ किंवा वेग-वेगळे गट आहेत. आणि त्यांचा वापर जसा तुम्ही जातीचा सांगितला आहे, त्यासाठीच होतो. त्यावरून होणारे वाद खूप भयानकही असतात.
३. देवाचे रिप्रेझेन्टीव्ह म्हणजे हिन्दू धर्मात संत असतात. आजच्या काळातले बुवा-बाबा, हे त्यांच आधुनिक रूप. आणि ते जितके चांगले किंवा वाईट असतात, तितकेच इतर धर्मातले रिप्रेझेन्टीव्हही असतात.
४. जगात सगळ्या धर्मांमध्ये जो लढा ज्ञानेश्वरांनी गीतेचं संस्कृत ते मराठी भाषांतरासाठी दिला, तसा लढा त्या त्या धर्मातल्या लोकांना द्यावा लागला आहे. तशी हिन्दू धर्माची भाषा - संस्कृत गीर्वाणवाणी आहे.

दूसरा परिच्छेद:
जाती व्यवस्था कर्मावरुन न ठरवता जन्मावरून ठरवणे, ही सध्याच्या काळातली गोष्ट आहे. कदाचित त्यामुळेच तुमची 'धार्मिक' शब्दाबाबतीत शंका आहे, अस मला वाटतं. हिन्दू असणे म्हणजे काय, हे विवेकानंदानी खूप छान सांगितले आहे.
शिवाय हिन्दू धर्म विस्तारवादी कधीच नव्हता, त्यामुळे वाढायचा प्रश्नच येत नाही. उलट तो सहिष्णू आहे, जो प्रत्येकाच्या धर्माचा आणि त्यांच्या विचारांचा आदर ठेवतो. सरळ सरळ मी बरोबर, तू चुक - असा आरोप करत नाही.

कदाचित आर्यांचा हिन्दू धर्म आणि नंतर आलेले पुराण, याचा विचार केल्यास तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल, अशी आशा आहे.

मी स्वत: हिन्दुत्ववादी (शब्दश:, राजकीय नाही) मुळिच नाही, पण सध्या माझ्या बाइबलच्या अभ्यासाच्या निमित्ताने केलेल्या मी या दोन्ही धर्मांच्या तुलनेत मला हिन्दू धर्म जास्त उदार आणि logical वाटतो. कदाचित त्यामुळेच एवढी मोठी प्रतिक्रया लिहिली.

बाकी, तुमचे ब्लॉग मला आवडतात. न पटलेली ही पहिली पोस्ट.
Asha Joglekar said…
लेख चांगला आहे पण एकांगी आहे । हिंदु पेक्षा आपण सनातन धर्म म्हणू या प्रत्येक देवी देवतेला आपल्यात सामावून घेत एवढा मोठा झाला अन् दुस-या धर्मांचा आदर करणे . धर्मांतर हा पर्कारच नाही तर जबरीन करणं तर दूरच. ह्या विषया वर ही एक लेख लिहून होईल पण तूर्तास इतकंच.
तुला कमेण्ट खरडायला घेतली ती इतकी वाढत गेली की मी ती शेवटी माझ्याच ब्लॉगवर नेऊन टाकली. पण हा लेख एकदम विचारप्रवर्तक वगैरे होता. मजा आली.
Samved said…
एका अवघड विषयावर लगेच आलेल्या इतक्यासारया प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं. अजूनही काही लोक चर्चा, मुद्दे यावर विश्वास ठेवतात तर! धन्यवाद.
विद्या, तुझा पॉईन्ट नीट कळला नाही. मी माझ्या धार्मिकतेच्या व्याख्या ठरवण्याआधी नक्की या धर्माचं स्वरुप काय हे ठरवु पाहातोय. कदाचित, एक देव, एक पुस्तक असं काहीसं स्वरुप असतं तर निदान हा नमनाचा गोंधळ तरी झाला नसता हे नक्की.
अभिजीत, जात नाही ती जात बाबा!
आशाताई, लेख एकांगी कसा झालाय हे नाही कळालं. कारण मी मुळात धर्मावर टीकाच केलेली नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच की धर्माचे जे मापदंड आहेत त्यात हिंदुधर्म बसत नाही. आणि जो सहिष्णुपणा तुम्ही म्हणताहात तो खरंच दुर्लभ आणि चांगला गुण आहे.
आता श्रद्धा :). एकेक मुद्दा घेऊ. रामायण, महाभारत महाकाव्य आहेत. मान्य. तू म्हणतेस ते कुठलंही पुस्तक धर्माचं येनकेन प्रकारे अर्थ सांगतं. पण हिंदु धर्माचं "The Book" कोणतं? कारण बाकी धर्मातही अशी अर्थ सांगणारी पुस्तके आहेतच पण म्हणून बायबल, कुराण यांच मध्यवर्ति स्थान डळमळत नाही. शिवाय दासबोध, ज्ञानेश्वरी दुर्दैवाने मराठी प्रांतापलीकडे कोणा सामान्याला ठाऊक असते? मुद्दा हिंदु धर्मात धर्मग्रंथ नसण्याचा नाही. ते अनेक आहेत. मुद्दा एक मुळ ग्रंथाचा आहे.
संत-महंत यांनाही तोच न्याय आहे. कोणत्या धर्मात ते नसतात? पण म्हणून सर्वच ख्रिश्चन संत पोप नसतात. ते उच्च आसन प्रत्येक धर्मात फार राखीव असतं. शंकराचार्यांनी हा प्रयत्न केला. उत्तर आणि दक्षिण असा विभागल्या गेलेल्या हिंदुस्थानाला सामावण्यासाठी त्यांनी चार पीठही काढली पण दुर्दैवाने त्यांचे प्रयत्न अपूरे पडले.

हिंदु धर्माची भाषा संस्कृत आहे? मला शंका आहे. कारण दक्षिणेकडे, ज्यांना अनार्य म्हटलं जायचं पण जे हिंदु समजले जातात, त्यांची भाषा कायमच निराळी आणि काहीशी संस्कृत-विरोधी राहीलेली आहे. काही मोजकेच शब्द किंवा शब्द छटा दोन्ही भाषांमधे कॉमन आढळतात. मी काही या विषयातला अभ्यासक नाही त्यामुळे मी कदाचित चूक असू शकेन पण धर्म-भाषांचे उप-भाषांवर कायमच खुप दाट संस्कार आहेत. हिब्रु-ग्रीक भाषेतून इंग्रजीत आलेले शब्द पाहा. असंख्य!
हिंदु धर्माच्या उदारपणाबद्दल मी वर लिहीले आहेच. तुर्तास पुरे.
a Sane man said…
प्रतिक्रिया खूप मोठी झाली. म्हणून भाग पाडून.

प्रतिक्रिया भाग १

खूप तर्कविसंगत वाटला लेख. आता ह्याला लेख म्हणून लेखाचे निकष लावणं म्हणजे तुझ्या प्रकट चिंतनावर अन्याय आहे. पण ब्लॉगवर आलाय तर त्या प्रकट चिंतनावर प्रक्रिया झाली असणार असं गृहीत धरतो. प्रकट चिंतनपर लेख (!) म्हणून अन्वयाचा विस्कळीतपणा राहू देत बाजूला, पण त्या पलीकडेही मला हे पोस्ट व/वा हे विचार तर्कविसंगत वाटले.

"पर्यायानं संघाची शाळा माझं कसलंही धार्मिक ब्रेन-वॉशिंग करु शकली नाही. मग मी धार्मिक नाही का?"
काय संबंध? कुणाच्या धार्मिक असण्या, नसण्याचा मक्ता संघाने घेतलाय?

"सर्वसाधारणपणे आपण कुणीतरी नसतो म्हणजे ते सोडून दुसरं कुणीतरी असतो (सोप्पय!)."
हो??

"कित्येकांचं दुटप्पी वागणं, उरलेल्या थोड्यांचं कधी अगतिक आणि जास्त करुन अव्यवहारिक वागणं समाजवादाच्या मर्याद्या उघड करायचं."
समाजवादाच्या की समाजवाद्यांच्या?

"डार्विन वगैरे बुवांनी तर सर्व्हावय ऑफ फीटेस्ट सांगून सर्वजण सारखे वगैरे थोतांडातली हवाच काढली."
खरंच? नक्की? सर्वजण सारखे असं मार्क्स म्हणाला का, नि तसं म्हणणारा तो पहिला होता का, डार्विनचा सिद्धांत लागू होण्यासाठी ही नैसर्गिक निवडीची प्रक्रिया आहे का, हे सगळं सगळं राहिलं बाजूला...पण डार्विन मार्क्सच्या नंतर येऊन अशी हवा वगैरे काढून गेला??

"थोडक्यात विचारसरणी, राजकीय, सामाजिक बांधीलकी आणि धार्मिकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे निदान माझ्यापुरतं तरी मी स्पष्ट करुन टाकलं."
हे ठिकच. पण आधीच्या परिच्छेदावरून हा निष्कर्ष कसा काय निघाला?

"कोणत्याही धर्माला एक सुप्रीम-देव असतो."
"धर्माचा एक मार्गदर्शक असा धर्मग्रंथ असतो जो त्या समूहाचे नियम, कायदे बनवण्यात मदत करतो."
हे गृहीतक आहे की प्रमेय?

"त्या त्या समुहाच्या घरा-घरात बायबल, कुराण इ. ग्रंथ दिसतात."
म्हणजे त्या त्या धार्मिक समूहाच्या असं म्हणायचंय का? त्या त्या समूह/संस्कृतीत राहूनसुद्धा अधार्मिक लोक असू शकतात, असं नाही वाटत?
a Sane man said…
प्रतिक्रिया भाग २

"हिंदु धर्माच्या कोणत्या पुस्तकाला एकमुखानं धर्मग्रंथ म्हणावं? आणि हे म्हणणं आपल्या नियमांत परावर्तित व्हावं? माझ्या घरातल्या शेकडो पुस्तकांत मला कधीच रामायण, महाभारत किंवा भगवतगीता सापडणार नसते. धर्माला काही मुखंड असतात. देवाचे काही लाडके, ज्यांना देवा कडून डायरेक्ट ऑर्डरी मिळतात म्हणे, ज्यांना धर्मग्रंथाचं आपण पामरापेक्षा जास्त आकलन असतं म्हणे. इन-शॉर्ट, देवानं त्यांना खास निवडुन दिलेलं असतं, त्याचं रिप्रेझेन्टीव्ह म्हणून (असं त्यांना वाटतं!). पोप,खोमिनी अशी ही लाडकी व्यक्तिमत्व. कदाचित आपले देव अनंतकोटी असल्याने, त्याचे दुतही अनंतकोटी असतील. थोडक्यात, याही कसोटीवर हिंदु धर्म फेल."
पुन्हा माझा तोच प्रश्न. ही कसोटी कुणी ठरवली?

"धर्माची, धर्मग्रंथाची म्हणून एक भाषा असते."
(एक वा अनेक) धर्मग्रंथांची स्वाभाविकपणे मूळ भाषा असणार. पण धर्माची भाषा असते, ह्या वाक्याला काय अर्थ आहे? भाषा माणसांच्या संवादाची असते, नाही?

"भले ही ती भाषा त्या धर्माच्या लोकांना नीट येत नसेल पण ती एक अधिकृत भाषा असते."
हे काय भारताची अधिकृत राष्ट्रभाषा किंवा युरोपिअन युनिअनची अधिकृत भाषा असण्या/ठरविण्यासारखं आहे का? देव येऊन अधिकृत करून जातो, की ती माणसं करतात?

"धर्मांना आतून पंथांच्या, जातीच्या पालव्या फुटतात पण एका धर्मात दुसरा धर्म मिसळलाय याची उदाहरणे विरळाच. शिख धर्म, जैन धर्म, बुद्ध धर्म ज्या पद्धतीने हिंदु धर्मात मिसळले आहेत ते पाहाता त्यांना हिंदु धर्मातील एका पंथाचे रुप आले यात नवल नाही."
ह्या दोन वाक्यांतला संबंध नाही कळला. नि काही धर्मांत (उदा. हिंदू) जर जात आधी असेल नि धर्म मागाहून तर तिथे हे कसं काय लागू होतं? नि हे इतर धर्म तुझ्याच आधीच्या निकषांवर (जे गृहीतके आहेत की प्रमेय हा स्वतंत्र प्रश्न आहे) जर धर्म म्हणून उतरतात, तर त्यांना असं पंथ वगैरे करून त्यांची कशी काय बुवा एका दमात सहज पदावनती करता येते?

नि ह्या सगळ्या सगळ्या प्रकारात, हिंद्वेतर धर्म हे काही तरी एकसंध, एकजिनसी प्रकरण आहे नि हिंदू धर्म काय तोच बापुडा सगळी सरमिसळ असं तू अध्याहृत धरलं आहेस असं वाटतंय. तसं तुला खरंच वाटतं का? नि असल्यास काय म्हणून?

"मग माझी धार्मिकता ठरवणारा हा माझा धर्म नक्की आहे तरी काय?"
एक मिनिट...तू धार्मिक आहेस का, हा प्रश्न कधी सुटला की आता तू ती धार्मिकता ठरविणारा धर्म शोधू लागला आहेस?

"धर्माची व्याख्या जशास तशी जातीला लागु होत नाही. पण जातीची मुख्य ओळख रोटी-बेटी व्यवहार, एक भाषा, जगण्याची बरयापैकी एक सारखी तरहा अशी आहे."
सिंधुदुर्गातला ९६ कुळी मराठा नि विदर्भातला ९६ कुळी मराठा एक भाषा बोलतो? मुंबईतला कोळी नि गुजरातमधला कोळी एक भाषा बोलतो?

"कदाचित याचमुळे इतका पुरातन असूनही हा धर्म जगभर वाढला नाही."
हिंदू धर्म पुरातन आहे की वैदिक?

"कुण्या त्रयस्थ माणसानं हिंदु धर्म स्विकारायचा ठरवला तर त्याला कुठली तरी जात स्विकारावी लागेल, धर्म नव्हे."
ह्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे कुणा हिंदूने दुसरा धर्म स्विकारला तरी धर्म बदलतो, पण जात बदलत नाही, ही नव्हे का? मग तसं असेल तर जातीचं नातं इथल्या समाजव्यवस्थेत घट्ट रुजलेल्या काही (बहुतांश विषम) मूल्यांशी असून धर्माशी नाही...असं म्हणता येणार नाही का? नि मग फिरून कुठल्याही धर्माच्या एकजिनसी असण्याचे सर्व निकष गैरलागू ठरत नाहीत का?

"धार्मिक अवडंबर, उन्माद, गुरु-बुवांचं उदात्तिकरण आणि जगण्यातलं कुतुहल हरवुन टाकणारा ठक्क कोरडा भोगवाद याच्या अधेमधे कुठेतरी एक रॅशनल, माणुसपणाच्या पातळीवर जीवंत असतो, तो माझा धर्म!"
आधी धर्माची ग्रंथ-ग्रंथकार‍-भाषाधिष्ठीत व्याख्या व त्याधारीत असणारे निकष वापरून एकाएकी "धारयति इति धर्मः" वर गाडी आणताना काहीच विरोधाभास तुला जाणवत नाही का?
a Sane man said…
प्रतिक्रिया भाग ३

आपण धार्मिक आहोत का, हा तुझा मूळ प्रश्न आहे, नि तू उत्तर मात्र आपण हिंदू धार्मिक आहोत का, ह्या प्रश्नाचं सोडवतो आहेस. तुझा मूळ प्रश्न त्या पलीकडचा नि अधिक व्यापक आहे, असं तुला वाटत नाही का?

हे प्रश्न तर्कसंगतीच्या दृष्टीने पडलेले प्रश्न आहेत. आपल्या विचारांकडेही आपण त्रयस्थपणे नाही, पण तटस्थपणे पाहिलंच पाहिजे ना? नि ते तर्कसंगत व्हावेत म्हणून त्यातलं प्रत्येक गृहीतक पारखायला हवंच ना? ते तसं झालं नाही इथे, असं मला स्पष्टपणे वाटतं. अनेक गोष्टींमध्ये गृहीतक काय नि प्रमेय काय हे स्पष्ट नाही. दोहोंपैकी कशाचाही आधार काय हेही स्पष्ट नाही. त्याआधारे केलेली मांडणी कार्यकारणभाव स्पष्ट उलगडून दाखवत नाही. नि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रश्न वेगळाच नि उत्तर वेगळच असा काहीतरी गोंधळ उडालाय असं मला वाटलं.

मेघनाने एक पाऊल पुढे टाकून निदान धर्माचे कुठले निकष ती वापरतेय हे तरी स्पष्ट केलं नि त्याच्याशी ती प्रामाणिक राहिली. पण मूळात प्रश्न काय आहे नि आपण शोधतो काय आहोत, ही गफलत तिनेही केली असं मला स्पष्ट वाटतं. ती त्याही पुढे जाऊन धार्मिकता सोडून कर्मकांडातही घुसली. तो तर आणिक वेगळा मुद्दा झाला, नाही?

एकंदरीत पण बाकी प्रतिक्रिया पाहता, मलाच का एवढे प्रश्न मूळातून पडले कोण जाणे, पण पडले खरे. (हुश्श! संपली.)
हे प्रश्न पाडण्याइतकं श्रेय तरी संवेदला द्यायलाच हवं रे. बाकी सगळ्या गफलती बरोबर आहेत, तू म्हणतोस त्याप्रमाणे. (म्हणजे गफलती बरोबर नव्हेत. गफलती आहेत हे बरोबर.:))

शिवाय तू म्हणतोस तशी धर्म आणि कर्मकांड या दोन गोष्टी वेगवेगळ्या न राखण्याची गल्लत मी केलेली आहेच. पण (उद्धटपणे समर्थन नाही, खरंच) माझा धर्म या गोष्टीचा संबंध, निदान माझ्या वर्तुळात वावरताना तरी, कर्मकांडाच्या संदर्भातच मुख्यत्वेकरून येतो. कुठलीही एक जीवनदृष्टी स्वीकारून त्याआधारे आयुष्य आखावं आणि त्याची खिडकी करून स्वतःला पडलेले प्रश्न सोडवावेत, या धर्माच्या स्वरूपाशी येत नाही. त्या अर्थानं माझी धर्माकडे पाहण्याची दृष्टीच मुळात तोकडी आणि अपुरी आहे असं म्हणायला हवं.

कर्मकांडाच्या बाजूनं पाहायचं, तर मग मी धार्मिक नाही.

पण जीवनदृष्टी, जीवनपद्धती, मला उपलब्ध असलेले आणि मी ज्यांच्याशी निगडीत आहे (स्वेच्छेनं वा नाईलाजानं) असे संदर्भ, माझे सामाजिक लागेबांधे, माझी विचार करण्याची दिशा या सगळ्या संदर्भांतून पाहायचं झालं, तर मग मी धार्मिक आहे. नुसतीच धार्मिक नाही, हिंदू धार्मिक आहे. हिंदू धर्मातल्या कुठल्या वर्तुळात मी माझी गणना करते ते किंवा हिंदू धर्म माझ्यासारख्या गोंधळलेल्या लोकांचा आणिक एक गोतावळा तयार करून आम्हांला त्याच्यात ओढतो ते - अलाहिदा.

आता मीच परस्पर तुला खो देते. तूपण लिही. होऊन जाऊ दे. हे खूपच मूळ प्रश्नांकडे चाललं आहे. पण हरकत नाही. मजा येतेय. :)
आता अजून विचार डोक्यात चालू झाल्यावर लक्षात येतं आहे तुला काय म्हणायचंय ते. मी थोड्या सुधारणा करते.
हिंदू कर्मकांडाच्या आधारे पाहायचं झालं, तर मी धार्मिक नाही. कारण त्या कर्मकांडावर माझा विश्वास नाही.
पण धर्म म्हणजे जीवनदृष्टी या दृष्टिकोनातून पाहायचं झालं, तर मग माझ्या (हिंदू + निधर्मीपणाचा मोह आणि कधी कधी आभास + माझे स्वतःचे अग्रक्रम या सगळ्यांनी मिळून तयार झालेल्या) दृष्टितून - आपोआप काहीतरी कर्मकांड आकाराला येत गेलं असणार. उदाहरणार्थ - (हे खूपच फुसकं उदाहरण आहे, पण मुळातच मी तोकडा विचार करतेय ही माझी मर्यादा मला मान्य आहे!) मी कुठल्याही नव्या माणसाशी ओळख करून घेताना या गोष्टी विचारात घेते - त्याचं स्त्रीवादाविषयीचं मत आणि त्यामागची त्याची भूमिका, भाषेकडे पाहण्याची त्याची नजर, आपला स्वत:चा 'पंथ' (हे कुठल्याही अर्थानं वापरता येऊ शकतं बरं का!) सोडून इतरांकडे बघताना त्या माणसाला आत्मसात करता येणारा समंजसपणा (स्वीकार?). या निकषांवर तो माणूस उतरला, तर मग त्याच्याशी माझं जुळण्याच्या शक्यतेची शक्यता असते. आता हे कर्मकांडच नाही का?
तर मग अश्या अर्थानं आपण सगळेच आपापला धर्म (म्हणजे हिंदूंप्रमाणे कर्तव्य नव्हे, प्लीज!) पाळत असतो, आपापल्या कर्मकांडासकट.

म्हणजे आपण सगळेच धार्मिक असतो की काय? की मी धर्माची व्याख्या अतिरिक्त भोंगळ करते आहे?
पण "हिन्दू" हा धर्म आहे का ?
कि फक्त जे मुस्लिम किंवा बुद्ध / ख्रिस्तांव नाहीत त्यांना हिन्दू म्हणायला लागलेत लोक ?? आणि म्हणुनच दक्षिणेकडे वारे वेगळेच वाटतात..!!
माझ्या मते हिंदू ही जीवनपद्धती असल्या मुळे त्याबद्दल एखाद्या पुस्तकात वगैरे कसं समजवणार??
म्हणजे आज देखील "हाउ टू" वाली कितीतरी पुस्तकं आहेत ... एक नाहीये
"पुरातन असुनही जगभर वाढ का झाली नसावी " ह्य मागील कारण "वाचून" क्षणभर का होइना पण वाईट वाटलं !! Harsh but can be very true..
छान लिहिलय ...!!
too good shraddha ...
itka muddesood mandlau ki kay sangu...
Samved said…
माझी कॉमेन्ट कुठे गेली? परत ...?
Samved said…
सेन, खुपशी बालीश आणि हटवादी झालीए प्रतिक्रिया.
"पर्यायानं संघाची शाळा.." किंवा "सर्वसाधारणपणे आपण.." यावर जसं तू फक्त हो? असं प्रश्नचिन्ह डकवलं आहेस त्याला "का नाही?" असं सोपं उत्तर देता येईल. तरी ही उत्तर देतो. धार्मिक संस्कार म्हणजे केवळ पुजाअर्चा नव्हे. एका विशिष्ट पद्धतीने(च)रोजचे जीवन जगायला शीकवणे यालाही धार्मिक संस्कार म्हणतात. सोप्पं उदा. म्हणजे आमच्या शाळेत मुलींना जीन्स घालायला बंदी होती. हे धार्मिक आहे का? तेव्हा ते कदाचित अजिबातच टोचलं नव्हतं पण आज तालिबानी जेव्हा तोच नियम लागु करतात तेव्हा आपण त्याला धार्मिक उन्माद म्हणतो. का? दुसरं उदा. शाळेत राखी पोर्णिमा व्हायची, गणपती व्हायचा. बुद्ध जयंती किंवा रमजान का नाही? कारण ज्या उद्देशांनी संघ आणि पर्यायाने शाळा चालते त्या मागे एक विशीष्ट धर्माला अनुसरुन (तथाकथीत) विचारसरणी आहे. मी यातल्या कशालाच इथे चूक किंवा बरोबर म्हणत नाही तर फक्त एक विचार तर्काच्या पातळीवर तपासून पाहात आहे.

समाजवाद आणि समाजवादी. परत तू मुद्दा अर्धा सोडलायस. कुठल्याच व्यवस्थेचे तिला deploy करणारया माणसांना वजा करुन मुल्यमापन करता येत नाही. कारण सर्वच व्यवस्था, अगदी मला न आवडणारया कम्युनिझमसह, पुस्तकात चांगल्याच असतात. पण जेव्हा ती व्यवस्था वापरात येते, तिचे नेते तिचा अर्थ सांगतात, आचरणात आणतात तेव्हा तिची बलस्थाने आणि मर्याद्या उघड होतात. आणि समाजवादाच्या failureला त्यामागच्या भोंगळ आदर्शवादी विचारसरणीसह (अपवाद आहेतच पण) ढोंगी समाजवादीही तितकेच कारणीभुत आहेत. आणि या सर्वांवर आधारीत निष्कर्ष, ज्याच्यामागे तू ? डकवलं आहेस तो काढण्यामागचा उद्देश असा की बरीच वर्षं मी (बावळट सारखा)लोकांच्या राजकिय आणि सामाजिक निष्ठा आणि त्यांची धार्मिकता यांची सांगड घालत होतो. म्हणजे कुणीतरी संघाच्या शाखेत जातो म्हणजे तो हिंदुत्ववादी, कुणी समाजवादी शिबीरांना जातो म्हणजे तो धर्मनिरपेक्ष इ. इ. पण फक्त (असा अजून तरी माझा समज आहे)कम्युनिस्ट सोडले तर उरलेले सर्व वादी (परत हे उदा जनरलाईज्ड आहे. सन्माननिय अपवाद असतातच)त्यांच्या सार्वजनिक राजकिय आणि सामाजिक निष्ठा आणि त्यांची धार्मिकता या दोन गोष्टी दुट्टपीपणाने स्वतंत्र ठेवतात.
Samved said…
"कोणत्याही धर्माला एक सुप्रीम-देव असतो."
"धर्माचा एक मार्गदर्शक असा धर्मग्रंथ असतो जो त्या समूहाचे नियम, कायदे बनवण्यात मदत करतो."
हे गृहीतक आहे की प्रमेय?

आधी मी याला गृहीतक म्हणणार होतो. कारण हे काही विज्ञान नाही की कुणीतरी व्याख्या केली आणि सारयांनी ती ऎकली. पण या मी माझ्या विचारांपुरत्या केलेल्या कसोट्या होत्या. त्या आल्या कुठून? मला जे दिसत गेलं, वाटतं गेलं आणि निरिक्षणांतून. नुस्तीच गंमत म्हणून http://en.wikipedia.org/wiki/Religion वरचा पहीला पॅरा वाच. आत्ता हे लिहीताना मला अजून बरयाच अश्य़ा व्याख्या मिळाल्या. यातच तुझ्या मुखंडांबद्दलच्या प्रश्नाचं पण उत्तर आहे. obvious , मी ही पुर्ण उचापत केली कारण मला तसं वाटलं! आणि उगाच हवेत नाही वाटलं तर तशी उदाहरणं मला दिसत गेली. बरयाच स्कॉलर्सनी तर धर्म असा काही नसतोच तर ते सांस्कृतिक एकत्रिकरण असतं अश्या टाईपचही काहीबाही लिहीलं आहे. असो.
आता भाषा..धर्माची भाषा हे जरा मी लुजली वापरलेली टर्म आहे. ज्या भाषेत त्या धर्माचे मूल ग्रंथ लिहीले गेले ती भाषा. या भाषा सर्वजनांना अवगत असतीलच असे नाही किंवा त्यांना ती वापरायची परवानगी असेलच असे नाही. ही भाषा संवादाची असलीच तर ती विशीष्ट वर्गापुरती मर्यादित असायची. त्या अर्थाने धर्माची अधिकृत भाषा!
धर्मांची सरमिसळ..you missed the point completely. मुद्दा हा की एका धर्मात दुसरे धर्म मिसळुन आलेत अशी उदा विरळाच. आणि असे झाले कारण हिंदु धर्माची (!) सैलसर बांधणी. जे व्यवहार जातीच्या, पंथाच्या पातळीवर होतात ते व्यवहार शीख, जैन इ. धर्मात आणि हिंदु धर्मातील जातीत सर्रास होताहेत. यात त्या धर्मांची पदावनती कुठून आली? आणि ही सैलसर बांधणी वाईट असं गृहीत धरुन तू माझी नसलेली गृहीतक(हिंदू धर्म काय तोच बापुडा सगळी सरमिसळ..)काढून मोकळा झालास. तर्कावर आधारीत विचार मांडताना आपली अशी बाजु नसावी. तो फक्त तर्क किंवा निष्कर्ष असावा.

जातींबद्दल म्हणशील तर तू दिलेल्या उदाहरणांमधे फक्त त्या जातींची नावे सारखी आहेत. त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाहीत, त्यांच्या भाषा वेगळ्या इ. इ. शक्य असतं तर त्या जातींची नावे वेगळी असती (आणि त्याने काहीच फरक पडला नसता).

माझ्या धार्मिकते बद्दलचे प्रश्न अर्थातच माझ्या हिंदु धार्मिकतेबद्दल आहेत. ते मुस्लीम किंवा ख्रिस्ती धार्मिकतेबद्दल कसे असणार?
मी हिंदु असणं नाकारतोय किंवा मला माझ्या धर्माची लाज वाटतेय असं अजिबातच नाही. उलट त्याचं मोकळं आणि सुटसुटीत रुप मला जास्त आवडतं. फक्त जेव्हा मी त्याचा तौलनिक अभ्यास करतो तेव्हा मी जास्त बुचकळ्यात पडत जातो. आणि म्हणून मी "हिंदु" धार्मिक आहे का हे मी शॊधतोय.
गावाला जाण्याआधी त्या गावचा रस्ता माहीत असावा लागतो. जर मी माझ्या धार्मिकता शोधू पाहातो तर त्या आधी मला माझ्या धर्माची माहीती असणं आवश्यक आहे. रस्ता रस्ता आहे नां की चकवा आहे की शॉर्टकट आहे की अजून काही हे समजणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कित्येकजण आधीच गावाला आपला किंवा परका मानून टाकतात तो त्यांचा चॉईस.
हिंदु धर्म मीच केलेल्या व्याखेत बसावा हा अट्टहास नाही किंवा अपेक्षाही. पण मला माझी धार्मिकता ठरवण्या आधी त्याचे रुप कळावे, बाकी धर्मांच्या comparison मधे तो कुठे आहे हे कळावे म्हणून हा उद्योग होता. त्याचं रॅशनल रुप हा मी माझ्यापुरता जवळ केलेला भाग. त्याच्या अनुषंगाने धार्मिकता परत define करावी लागेल ते पोस्ट वेगळे.
Megha said…
baas ki rao aata...kiti charvit charvan karal....hi charcha na sampanari aahe...e samved tula dusare vishay milale nahit kay re?????? postayachi nasel tar postu nako hi comment...
a Sane man said…
संवेद,

तुझ्या लेखात जेव्हा तू एखादं विधान करतोस नि त्या आधारे निष्कर्ष काढतोस, तेव्हा त्या दोन वाक्यांत किमान संगती असावी, अशी किमान अपेक्षा माझी होती. ती तशी ह्या लेखात जागोजागी आढळली नाही, असं मला वाटलं. त्याचं एक कारण बेधडक गृहीत धरलेल्या मूळ विधानात असू शकतं किंवा निष्कर्षाप्रत येण्यापर्यंतच्या विधानांमधील परस्परसंबंधांचा अभाव. मला वाटलेल्या अशा विसंगती मी फक्त प्रश्नांमधून उपस्थित केल्या. त्यातून तू तुझी गृहीतकं स्वतःशी किंवा प्रकट पुन्हा पडताळून पाहशील किंवा मला न दिसणारा परस्परसंबंध उलगडून दाखवशील असं मला वाटत होतं. पण बहुदा तुला त्या सर्व बाबी खूप trivial वाटत असाव्यात. तुझ्या प्रतिक्रियेतील सोप्पं ह्या शब्दाच्या सढळ वापरामुळे तसं ध्वनितही होतंय. मला वाटणार्‍या ह्या विसंगती trivial मानण्याची खोड इतकी सार्वत्रिक आहे, की कुणाला माझी प्रतिक्रिया बालिश वाटली तर मला त्याचं जराही आश्चर्य वाटणार नाही, पण तुला ती वाटली, ह्याचं मात्र जरूर आश्चर्य वाटलं. मी मुळात तुझ्या उत्तराच्या बाजूची वा विरोधात अशी कुठलीतरी भूमिका घेऊन माझं मतप्रदर्शन करतोय असं खरं तर त्या प्रतिक्रियेवरून वाटू नये. मुळात मी कुठला तुझ्या समर्थनाचा वा विरोधाचा मुद्दाच मांडत नाहीये तर मुद्दा अर्धवट सोडून द्यायचा प्रश्नच येत नाही. तुझ्या तुझ्याच उत्तरापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत काही विसंगती वाटल्या, काही विधानांवरून काढलेल्या निष्कर्षात स्पष्ट संगती, परस्परसंबंध आढळला नाही, काही गृहीतकं trivial मानून स्वीकारणं पटलं नाही नि त्याचसाठी हा अट्टाहास केला. त्यात आग्रही वस्तुनिष्ठतेपल्याड मी काय हटवादीपणा केला, हेही मला माहित नाही.

माझ्या "हो?" ला "का नाही?" असं सोप्पं उत्तर तुला द्यावंसं वाटलं, त्यातच तुला जगातल्या सगळ्या गोष्टींना केवळ दोनच पर्याय आहेत असं वाटतंय हे स्पष्ट आहे. ह्या विचाराची मलाही उथळ म्हणून संभावना करता येईल, पण तो फालतू वितंडवाद होईल, जो मला अर्थातच घालायचा नाही.

संघाच्या शाळांतल्या संस्कारांबद्दलच्या उदाहरणांतून (ज्यांत असत्य काहीच नाही) पुन्हा तुझा नेमका मुद्दा काय आहे, हे मला अजिबात कळलेलं नाही. संघाची शाळा आपल्यात धार्मिक उन्माद भिनवू शकली नाही, पण तरीही आपण धार्मिक असू शकतो, ही शक्यता तू पडताळून पाहतो आहेस, एवढाच अर्थ मी घेतलाय. त्यापल्याड काही आहे का त्यात? तुझ्या मूळ लेखातील त्या संबंधातील वाक्याद्वारे संघाच्या शाळेतील संस्कार हे धार्मिकतेसाठी पूर्वअट असावेत की काय, असा काहीसा अर्थ ध्वनित होत होता (किंवा माझ्या कानात वाजला होता.) तुझ्या स्पष्टीकरणाने तो आवाज काही बदलला नाही फारसा, पण मी जरा तात्पुरता जुळवून घेतलाय अर्थ.

तुझ्या राजकीय निष्ठा नि धार्मिकतेच्या असंलग्नतेच्या निष्कर्षाबाबत माझा काहीच आक्षेप नव्हता, पण त्या आधीच्या वाक्यांवरून तो कसा काय निघाला, हे अजूनही अस्पष्टच आहे. तू विधान समाजवाद्यांबद्दल करतो आहेस नि निष्कर्ष समाजवादाबद्दल काढतो आहेस. असं करणं तुला स्वतःला पटतं हे तू स्पष्ट केलं आहेस. पण तर्काच्या कुठल्याही कसोटीवर मला तरी ते पटत नाही. तुझ्या न्यायाने मग कुठल्याही धर्माच्या अतिरेकी मूलतत्त्ववाद्यांमुळे तो धर्म नालायक ठरवायला तुझी हरकत नसावी. तुला स्वतःशी विचार करतानाही हे तर्कसंगत कसं काय वाटतं, ह्याचं आता मला नव्याने कुतूहल आहे. (तुला ज्या गोष्टी trivially तर्कसंगत वाटताहेत, त्या मला trivially तर्कविसंगत वाटताहेत. त्यामुळे ह्या वादाचा शेवट We agree to disagree वर व्हायची शक्यता आहे.) ह्यात पुन्हा मी समाजवादाच्या योग्यायोग्यतेचा कुठलाच मुद्दा उपस्थित करत नाहीये, एवढं तरी पुरेसं स्पष्ट व्हावं!
a Sane man said…
विकीपीडियावरचा तो लेख मी पूर्वीच आख्खा वाचलाय. त्यात य व्याख्या आहेत. सामाजिक शास्त्र म्हटलं की हे आलंच, त्यात नवीन ते काय. तू नेमक्या कुठल्या वापरतो आहेस, हे पुरेसं स्पष्ट केलं नाहीस, हाच तर मुद्दा होता! म्हणून तर मेघनाने एक पाऊल पुढे टाकलं असं मी म्हटलं. त्यामुळे "हे कोणी ठरवलं" ह्या माझ्या प्रश्नावर तू "मी नि विकिपीडिया ह्यांनी" असं म्हटला असतास, तर ते पुरेसं होतं. तरीही त्यांतल्या नेमक्या कुठल्या वापरल्यास हे स्पष्ट नाही. पण तुला मिळालेल्या नव्या व्याख्यांत मी उत्तर शोधायचा घाट अजब आहे. व्याख्यांत उत्तरं शोधायची की व्याख्या स्पष्ट करून त्या आधारे उत्तरं शोधायची? हे पुन्हा तुला तर्कसंगत, मला तर्कविसंगत प्रकरण होतंय! नि शेवटी तुझ्या धार्मिकतेची ओळख तुला जातीत सापडल्यावर शेवट सापडलेला धर्म मात्र जातीविहीन वाटतोय. त्यामुळे अभिजीतने विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने त्यालाही तू तितकंच trivial उत्तर दिलं आहेस. असं त्याला वाटलं का कोण जाणे, पण मला तरी वाटलं बुवा. ते उत्तर द्यायला तू अर्थातच बांधील नाहीस, पण ते तुला स्वतःला मिळालं असावं अशी अपेक्षा करतो.

"जैन म्हणजे हिंदूच" हा असा सूर त्या धर्माचं स्वतंत्र अस्तित्त्व नाकारतो. तो तसा माझ्या कानांत वाजला (कारण ध्वनित झाला म्हटल्यावर तू तुला तसं म्हणायचं नव्हतं किंवा तू तसं म्हटलं नाहीस असंच म्हणशील, त्यावर वितंडवाद कशाला?) म्हणून मी त्यांची पदावनती असा शब्द वापरला. पण तुला तसं खरंच म्हणायचं नसावं. त्यामुळे ते असो.

शेवटी "माझ्या धार्मिकते बद्दलचे प्रश्न अर्थातच माझ्या हिंदु धार्मिकतेबद्दल आहेत. ते मुस्लीम किंवा ख्रिस्ती धार्मिकतेबद्दल कसे असणार?" असं म्हणून तू एका दमात माझं काम सोपं केलंस, त्याबद्दल आभार. एक म्हणजे तुझा मूळ प्रश्न धार्मिकतेचा नि उत्तर हिंदू धार्मिकतेबद्दल आहे हे मान्य केलंस, त्याबद्दल आभार. नि तुला हेही फारच स्वाभाविक वाटतंय हेही सुचवलंस, त्याबद्दलही आभार. त्यामुळे त्यावर मी आता अधिक काय बोलावं?
Shardul said…
"श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रन्थकोटिभिः । परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ॥ "

माझ्या मते हिंदू धर्माचा गाभा इथे आहे.
prasad bokil said…
एकंदरीत विचारांची बरीच उलथापालथ झालेली दिसते. लिखाण प्रामाणिक वाटले म्हणून भावले जरी त्यात काही त्रुटी होत्या तरीही. इथे माझी मते पटत नाहीत म्हणून त्रुटी म्हणले नाही तर विचारधारा जरी एकसंध असली तरी त्यात मधे मधे विसंगती आणि विरोधाभास आहे. असो.
माझे मत असे की,
काही वर्षांच्या संशोधनानंतरही माझ्या विषयात ’अधिकारवाणीने’ बोलायला मी कचरतो त्यामुळे चार दोन पुस्तकांच्या वाचनावर हिंदू काय किंवा इतर कोणत्याही धर्माविषयी भाष्य करणे हे म्हणजे मुंगी उडाली आकाशी... सारखे होईल.
त्यामुळे मी धर्मा विषयी नाही पण धार्मिकते बद्दल लिहू इच्छीतो कारण तो अभ्यासापेक्षा आचरणाचा भाग आहे असे मला वाटते.

आपण विचारपूर्वक धार्मिक नसतो. आपण विश्वासाने धार्मिक बनतो. खूप विचार केल्याने त्याचे रूपांतर विश्वासात होत नाही. हं अनुभवाने ते होते हे मान्य. पण नेहमीच गरज असते असे नाही. आपली परिस्थिती आणि संस्कार आपल्याला विश्वास ठेवायला शिकवतात थोडक्यात त्यामुळे आपण धार्मिक बनत जातो. धर्म चांगला किंवा वाईट असण्याचा यावर काही परिणाम होत नाही पण तशा काही अनुभवांचा होऊ शकतो.
मुळात विश्वास आणि संदेह यांच द्वंद्व कायमच आपल्या मनात चालू असतं. धार्मिक असायला केवळ देव किंवा धर्म समोर असायला हवा असं नाही.
उदा. शाळेचं शिक्षण ही आपण धार्मिकतेनं घेत असतो. (इथे संघाची शाळा असल्याचा संबंध नाही) आपल्याला सांगितलं जातं एक ओक्सिजन आणि दोन हायड्रोजन मिळून पाणी बनते. आपण विश्वास ठेवतो. का तर समोर शिकवणारा मास्तर बरोबरच असतो. आता कोणी म्हणेल की ’हा प्रयोग करून कोणीही बघू शकतं’ पण हे ही पुस्तकातच लिहिलेलं असतं. खर कोणी प्रयोग करत नाही. का? तर आपण विश्वास ठेवतो. आईवडिलांवर, शिक्षकांवर मग मोठे झाल्यावर पुस्तकांवर, त्यातून भेटणार्‍या अरिस्टोटल पासून मार्कस पर्यंत वेगवेगळ्या लोकांवर, मिडीयावर आणि हे करता करता आजचा बुद्धीजीवी म्हणून विचार करत राहतो. शंका घेत राहतो. एका बद्दल शंका आली की दुसर्‍यावर विश्वास ठेवतो.

आता या सगळ्यात परसाकडलं जाताना मी कानावर जानवं घेत नाही म्हणून मी धार्मिक नाही? का आरत्या चालू असताना मला जोरजोरात टाळ कुटायला आवडतं म्हणून मी धार्मिक आहे??
यातून मला काय साध्य होणार.....

शेवटी विश्वास आहे तोवर आनंद आहे. तो उडाला एकदाचा की पुढे सरकायचं दुसर्‍या खांबाकडे
Yogesh said…
संवेद,

चांगला लेख! 'हिंदू धर्म' ही ओळख बाहेरुन आलेल्या लोकांनी येथील लोकांना दिलेली आहे. मुसलमान आक्रमकांनी भारतात प्रवेश करण्यापूर्वी हिंदू धर्म ही संकल्पना भारतात नव्हती. सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे ते हिंदू अशी सोपी व्याख्या आहे. मात्र हिंदू जीवनपद्धतीवर ज्या धर्माच्या ग्रंथांचा आणि कायद्यांचा प्रभाव आहे त्याला वैदिक किंवा सनातनी धर्म असे मानले जाते. मात्र सोयीसाठी त्याला आपण हिंदू धर्म असे म्हणूयात.

मग माझी धार्मिकता ठरवणारा हा माझा धर्म नक्की आहे तरी काय? इट्स जस्ट अ रॅपर! आपली खरी ओळख, धर्माच्या आधारे नसून जातीच्या आधारे आहे हेच खरे.
हे अगदी खरे आहे. किंबहुना याच एका कारणामुळे भारतावर वारंवार हल्ले होऊनही एकाच धर्माचे अनुयायी म्हणून प्रतिकार करणे येथील लोकांना शक्य झाले नाही.

हिंदू धर्म सहिष्णू आहे हा देखील एक गैरसमज आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी १००-१५० वर्षे वगळता हिंदूंनी नेहमीच सुधारणांना विरोध केला आहे. केवळ महाराष्ट्रातील उदाहरण घ्यायचे झाले तर आगरकर, फुले यांना दगडांनी, शेणगोळ्यांनी झोडपणारे आपलेच बांधव होते. समाजसुधारणांसाठी झटणाऱ्या सावरकरांना त्यांच्या आयुष्यात नेहमीच हेटाळणी सहन करावी लागली. इंग्रजांचे प्रशासन भारतावर नसते तर विधवाविवाह, पददलितांसाठी चालवल्या जाणाऱ्या चळवळी, स्त्रीशिक्षण वगैरे काहीही घडणे शक्य नव्हते. कोण्या देवाच्या डोक्यापासून एक वर्ण, बाहूंपासून दुसरा वर्ण, मांड्यांपासून तिसरा वर्ण आणि पायांपासून चौथा वर्ण असे अजब तत्त्वज्ञान मांडून पुढे त्याला जन्माधिष्ठित करुन शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना शिक्षण, संपत्ती वगैरे अधिकार नाकारण्याचा कायदा दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही.

वर कोणीतरी म्हटले आहे की,

जशा आपल्याकडे जाती आहेत, तसे तुम्ही उदाहरण दिलेल्या धर्मांमधेही पंथ किंवा वेग-वेगळे गट आहेत. आणि त्यांचा वापर जसा तुम्ही जातीचा सांगितला आहे, त्यासाठीच होतो. त्यावरून होणारे वाद खूप भयानकही असतात.
उपासनेचे पंथ किंवा धर्मांमधील समान हितसंबंध असण्याचे गट सर्व धर्मांमध्ये आढळतात. मात्र जन्माधिष्ठित उच्चनीचता हिंदू संस्कृती वगळता इतरत्र नाही.

हिंदू धर्म विस्तारवादी नव्हता याचेही तू दिलेले कारण योग्य आहे. धर्मात नव्याने येणाऱ्या माणसाची जात कोणती? आणि हिंदू धर्मामध्ये जातीशिवाय अस्तित्त्व असणे शक्य नाही.

हिंदू धर्माने धर्माचे तत्त्वज्ञान म्हणून अहिंसेचा पुरस्कार केल्याचे मी तरी वाचले नाही. ज्या भगवद्गीतेला धर्मग्रंथाचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्यातही अर्जुनाला स्वकीयांविरोधात हिंसा करणे योग्य आहे का असा प्रश्न पडला तेव्हा कृष्णाने कर्मयोगाचे उदाहरण देऊन हिंसा घडवून आणली. [आता यातही एक लोचा असा की परशुरामाने जसा क्षत्रियांचा १९ की कितीतरी वेळा संहार घडवून आणला होता त्याच प्रकारे क्षत्रियांचा संहार करण्याचे 'पवित्र' कार्य करण्यासाठी भगवंताने कृष्णावतार घेतला आणि कुरुक्षेत्रावर क्षत्रियांचा निःपात घडवून आणला असे कुठेसे वाचले आहे. चू.भू.दे.घे.]

बौद्ध, शीख, जैन हे हिंदूधर्माचेच पंथ आहेत ही एक सोयीस्कर लबाडी आहे. बौद्ध धर्मामध्ये प्रमाणग्रंथ म्हणून, जीवनाची तत्त्वे म्हणून, निर्मिकाची संकल्पना म्हणून नियमबद्ध व्याख्या आहेत. किंबहुना बौद्ध धर्मापासून हिंदू धर्माचा बचाव करण्यासाठी शंकराचार्यांनी जन्म घेतला व भारतभर फेरफटका मारुन त्या धर्माचे उच्चाटन केले.


या विषयावर लिहिण्यासारखे बरेच आहे पण त्याला बराच वेळ लागेल. त्यामुळे वरचा विस्कळीत प्रतिसाद गोड मानून घेणे. ;)
priyanka said…
"आपली खरी ओळख, धर्माच्या आधारे नसून जातीच्या आधारे आहे हेच खरे" हे तितक नाही पटलं.आधी तुमचा धर्म आणि त्या नंतर जात हे एक समीकरणच आहे . म्हणजे आपल्याकडे एखाद्या व्यक्तीची ओळखच मुळात जातीवरून केली जाते.