टू टेल्स

//१//

सत्यशीलाने मोहाचे पाश तोडायचे ठरवले. अंतीम सत्याचे ज्ञान हेच त्याचे साध्य होते. अजून थोडा उशीर केला तर निश्चयाचे बळ कमी पडायला लागेल हे ओळखुन त्याने राजप्रासादाच्या दुसरया टोकाला असणारया मुख्य महालाकडे कुच केली.

सत्यशीलाचा मनोदय ऎकून भाल्यागत ताठ राजा क्षणभर खांद्यातून वाकला. राजा म्हणून त्याचे धर्माप्रती कर्तव्य होते खरे पण म्हणून आपल्याच राजवंशी अस्तित्वाला असं पणाला लावावं लागेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. राजराणीने दरबारी नियमांना न जुमानता सज्जा सोडून ऎन दिवाणखान्यात धाव घेतली. नाळेने जोडले गेलेले आदी-सत्य तिच्या मिठीतून सोडवत
सत्यशीलाने राजमुकूट तिच्या चरणी ठेवला. अंगावरील रेशमी उत्तरीय दोन्ही हातांनी उभे चिरत त्याने संसाराच्या वाटेवरचा शेवटचा धागाही तोडून टाकला.

सत्यशीलाला सीमेपार सोडण्यासाठी सहा अबलख घोड्यांचा रथ आला. का कोण जाणे पण त्यावर फडकणारा ध्वज आज निस्तेज वाटत होता. सत्यशीलाने तो रथ नाकारला. लाकडी कठोर खडावा पायी चढवुन तो निघाला. त्याच्या मागोमाग हुंदके दाबत अथांग जनसमुदायही निघाला. सीमेपाशी थांबून सत्यशीलाने त्या जनसमुदायाला वंदन केले "नात्यांचे पाशच तोडून जाताना निरोप कसला घ्यायचा? मुक्तीच्या वाटेवर मोठा विरोधाभासंच म्हणायचा हा!" सीमेवर थबकलेले पावूल क्षणभर तसेच ठेवून तो राजाकडे वळला "राजन, स्मृतीवनातुन खुणेसाठी म्हणून केवळ माझी सावली नेतो आहे. आज्ञा असावी."

काळाची गणिते त्याला, ज्याला काळाची बंधने. पण म्हणून मोजलाच नाही तरीही काळ चालायचा थांबत नाही. वर्षा मागून वर्षे गेली. सत्यशीलाला मार्ग काही सापडेना- अंतीम सत्याचा मार्ग. उपास-तापास झाले, देव-धर्म झाले, शरीराला सर्व प्रकारचे त्रास देवून झाले पण एका जीर्ण शुन्याखेरीज हाती काही गवसेचना.

"बेटा, कश्यासाठी हे खडतर तप?" झाडांतून किंवा पानांतून, प्रकाशातून किंवा अंधारातून, हवेतून किंवा निर्वातातून कुठूनही आला असे भासवणारा एक आवाज सत्यशीलाच्या कानी पडला.

"अंतीम सत्याच्या शोधासाठी" आवाजातील बेचैनी दडवत सत्यशील उदगारला "संसाराचे, मोहाचे सारे पाश तोडून केवळ त्याचसाठी मी इथे आलो आहे"

"सारे त्यागलेस? नीट आठव. कुठलासा क्षुल्लक मोह तुझ्या तपाचे बळ फिरवत आहे"

कठोर तपाने शीणलेला सत्यशील आठवणींच्या एकेक कड्या तपासून पाहू लागला. गत स्मृतीतून त्याच्या सोबत फक्त त्याची सावलीच आली होती. "पण" जड सुरात तो बोलला "निर्णयाचे स्वातंत्र्य असतेच कुठे? जन्मजात पाठीला चिकटलेली असते सावली. मोहाचे हे कोणते परिमाण म्हणायचे गुरुदेव?"

"अंतीम परिक्षा या अश्याच क्षुल्लक भासणारया पण कूट अर्थाने भारलेल्या असतात मुला. तुला भय होते म्हणून सावलीची सोबत घेतलीस? की तुला हवी होती गतकाळातील एखादी खुण की जी परत नेऊ शकते तुला तुझ्याच उगमाशी? अरे, सावली म्हणजे मी पण. मोहाचे आदी रुप. आणि तेच सोडवलं नाही तुला? सावली जन्मजात असते खरी पण अंतीम सत्य जन्माच्याही पलीकडे असतं. हे जंगल, ही हवा, हा प्रकाश, तू आणि मी; आपण सारेच बनलो असतो कणाकणांनी. उघड्या डोळ्यांनाही न दिसणारया सुक्ष्मातीसुक्ष्म कणांनी. पाहीली आहेस कधी त्यांची सावली? सत्य कदाचित तिथे असेल. सुर्यालाही झाकोळणारे शुभ्र काही असेल कुठे. पडेल त्याची सावली? सत्य तिथे ही असेल. तीव्र टोकांच्या पलीकडे कुठे तरी असेल ते सत्य!"

ऎन माध्यानीचा सुर्य तपाने कृश झालेल्या सत्यशीलाला हलकेच वितळवुन गेला. जमिनीवर कोसळणारा स्वतःचाच देह त्याला दिसत होता. आता त्याची सावली कुठेही नव्हती. अंतीम प्रार्थनांच्या क्षणी त्याला जाणवले जन्म आणि मृत्यु हेच सत्य; ज्याला कुठल्याही उद्देश्याची गरज लागत नाही, ज्याचे अर्थ कुणाला सांगावे लागत नाहीत, जे चुकूच शकत नाही असे ते तीव्र टोकांच्या पलीकडले सत्य! आणि दोन टोकांमधले जगणे म्हणजे केवळ प्रवास..


//२//

अनुदीपाने यावेळी मात्र अस्वस्थता लपवली नाही. कित्येक घटका राजज्योतिषी ग्रह तारयांच्या स्थिती तपासत होते आणि सतत कसलेसे गणित चुकत असल्यासारखे परत परत कुंडलीची मांडणी करत होते. "महाराज" माथ्यावरचा घाम पुसत राजज्योतिषी अखेर बोलले "अभय असावे. पण सर्व गणिते करुनही एक शक्यता अटळ दिसते. आपल्या प्राणांना सावलीपासून धोका आहे"

जळी स्थळी काष्ठी पाषाणी अनुदिपाला मृत्यु दिसु लागला. महाअमात्यांनी राजाची मनस्थिती ओळखली आणि राजसरोवरात ऎन मध्यभागी भराव टाकून एक राजमहाल उभारवला. अनुदीप एक प्रकारे नजरबंदच झाला.

अनुदीपाच्या अनुपस्थितीत महाअमात्यच राज्य चालवु लागले. राजाच्या लहरींनुसार जिथे वारयाची देखिल दिशा बदलते तिथे मनुष्याचे काय? पडद्या आडच्या एका कुजबुजीनंतर एका आमेच्या रात्री सेनापतींनी शिताफिने महाअमात्यांची गर्दन उतरवली.

पण गिधाडांचे जरा वेगळेच. स्वजातियांना टोचे मारुन खलास करणारी ही जात. आणि इथे तर भक्ष्य मृत्युच्या भयाने अर्धमेले झालेले. एक गिधाड रस्त्यातून सरकताच दुसरयाने त्याची जागा घेतली. सेनापतीला राजमुकूट खुणावु लागला. अनुदीपाला हे तीव्रतेने जाणवत होते.

दिवस पूर्ण बहरावर असताना अनुदीप सावल्यांचे सरकते खेळ बघत होता. क्षणभर तो थबकला आणि मग आतून दचकला. "पाण्यावर सावल्या पडत नसतात महाराज. त्याला फार तर प्रतिबिंब म्हणता येईल" महाअमात्यांचे शब्द अनुदीपाच्या कानी रुंजी घालू लागले. पण आत्ता त्याने जे पाहीले ते प्रतिबिंब नव्हते, नक्कीच नव्हते. त्या पाण्यावर पडलेल्या सावल्याच होत्या. सरकत जाणारया सावल्या, विकृत आकारांच्या सावल्या, पारदर्शक सावल्या...सावल्याच सावल्या. थरथरणारया पाण्यात अनुदीपाला तलवार उंचावलेला सेनापती दिसला, क्षणभरच आणि नंतर ती सावली वाहाती झाली. पाण्यावरुन परावर्तित होणारया सुर्यकिरणांनी अनुदीपाच्या मस्तकात शुळ निर्माण झाला. पुढचा घाव आपण घालायचा या सुडातिरेकाच्या विचाराने अनुदीप सरसावून बसला. काहीच काळ आणि अनुदीपाला परत पाण्यावर विकृत आकारात सेनापतीची सावली दिसली आणि क्षणाचाही विलंब न करता अनुदीपाने त्याच्या अंगावर उडी मारली. होय, सावलीच्या अंगावर उडी मारली. थंड काळसर पाण्यात तलवार आरपार जाताना अनुदीपाला शेवटचे दिसले ते पाण्याच्या तळाशी असणारे टोकदार कातळ, त्यावर सरकणारी त्याचीच सावली आणि डोक्यातून उगवणारी काळसर लाल रक्ताची असंख्य वर्तुळे

Comments

Shraddha Bhowad said…
मृत्यूच्या क्षणीच सत्यशीलाला अंतिम सत्य गवसावे याहून दुर्दैव कुठले???
’शरीर’ हेच अंतिम सत्य नाही का???
चार्वाक,कात्यायन यांनी सांगितलेली ’भौतिकवादा’ची थियरी लोकांच्या कधीच पचनी पडत नाही...पण बुद्ध आणि महावीरांनी सांगितलेली ’मोक्षाची’ थियरी पटते..
सुर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ दिसणारया गोष्टी सोडून ज्या दिसत नाहीत अशा गोष्टींचा ध्यास माणूस काहून घेतो???
’मोक्ष’, ’अंतिम सत्य’ अशा गोष्टींचा ध्यास का धरतो??
’अंतिम सत्य जाणून घेण्याची इच्छा”मोक्षाची आस’ हाही एक मोहच आहे...नाही??
कुठली इच्छा ही मोहालाच रिप्रेझेंट करते ना???
सगळं messed लिहीलेय..पण ’अंतिम सत्य’ वगैरे गोष्टींतले लॉजिकच मला कळत नाही..
तुम्ही माझ्या डोक्यात काही घुसवू शकता का??
Yogesh said…
dusari goshta jast awadali. maybe end jast sensational hota tyamule :p
a Sane man said…
दोन्ही कथांमधील वृत्तींच्या manifestation मध्ये कदाचित थोडंफार नाविन्य असेल, पण त्या वृत्ती काही नाविन्यपूर्ण वाटल्या नाहीत. पण मांडणी नेहमीप्रमाणेच प्रभावी.

"आपण सारेच बनलो असतो कणाकणांनी. उघड्या डोळ्यांनाही न दिसणारया सुक्ष्मातीसुक्ष्म कणांनी. पाहीली आहेस कधी त्यांची सावली? सत्य कदाचित तिथे असेल." हे क्लास!

सावली नसण्याचं कारण माध्याह्नीचा सूर्य की सत्यशीलाची निर्देह अवस्था? नि माध्याह्नीच्या सूर्याने सावली लोप पावली असताना सत्याचा झालेला तथाकथित बोध...तो बोध हे सत्य की केवळ सत्याचा एक आभास? हा सगळा (मला वाटणारा) गोंधळ नकळत की जाणीवपूर्वक? जाणीवपूर्वक असेल तर डोक्यावरून!
श्रद्धा शी सहमत!

http://circuitesh.blogspot.com/2009/03/blog-post_09.html
अप्रतिम !! .... मला दोन्ही गोष्टी आवडल्या...
जी. ए. च्या ’सांजशकुन’ ची आठवण झाली...

माझ्यामते यासारख्या कथा त्यांच्या शेवट किंवा अर्थापेक्षा ... ’शब्दलेणे’ किंवा अमुर्त कल्पनांच्या विस्तारासाठी (developement of abstract concepts) लक्षात राहतात...
Parag said…
Chan lihila ahe.Good.
Pahili gostha thodi jast abstract hoti. Donihi gosti madhe "karm" navhte...'antim satya' (jar kahi aslech) tar tyacha marg nakkich "karm" karunach sapadel.
Samved said…
श्रद्धा, गंमतचय नाही. एकाला सर्वस्वाचा त्याग करायचा होता आणि एकाला जगण्याचा मोह सुटत नव्हता. पण एका सामाईक दुव्यानं त्यांचं मरण मात्र बांधलेलं होतं. एका टोकापासून दोन्ही राजपुरुषांनी सुरुवात केली, पुढे वाटा वेगळ्या झाल्या पण शेवट परत तिथेच. माणसाच्या आयुष्यात अंतीम सत्य अजून वेगळं काय असतं? भौतिक जन्म आणि मृत्यु …आता हे भौतिक म्हटल्यावर चार्वाक आणि कंपनीला मान्य असायला हरकत नसावी असं वाटतं! अंतीम सत्य म्हणजे काय? जे कधीच बदलत नाही, जे कालातीत आहे, ज्याला समजण्यासाठी/समजावण्यासाठी कुठल्याही दृष्टीकोनाची गरज पडत नाही ते! त्यामुळे मोक्षाचा ध्यास म्हण किंवा जगण्यातलं पुर्णत्व, शेवट तोच. मोक्ष/निर्वाणा याबद्दल माझं जरा निराळं मत आहे. जे करण्यात मला सारं जग विसरुन जावं इतका आनंद होतो , तो मोक्ष! मग तो गाणं ऎकण्यात असो किंवा कविता वाचण्यात…तो दरवेळी तप करुन किंवा धार्मिक अंगानेच यावा असं नाही. मोक्षाचा ध्यास म्हणूनच स्वानंदासाठी घ्यावा असं माझं मत.

सेन, you went beneath the skin..सत्यशीलाला तो बोध खरंच झाला की उन्मनी क्षणी झालेला तो हिस्टेरिया होता हे मी वाचणारयांवर सोडलं होतं.