Sunday, March 29, 2009

माया

हिवाळ्यातील तहानेचे संकेत जरासे निराळे
त्यात तगमग नसते उन्हाळी
निवून जाण्याचे सोसही नसतात
तुझ्या गुणसुत्रांची मांडण
कदाचित तशीच;
तालबद्ध अवरोहांची
विलंबित लय.

तुटण्याचे भय आणि
जोडण्याची उत्कटता
समेवर पेलतात
तुझे मायावी हात..

हात..
बर्फाचे
अभ्रकशुभ्र..
किंचित पारदर्शी
आणि संदिग्धही..

माझ्या देहचूर कविता
झाडात चंद्र अडकावा तश्या
उसवतात
तुझ्या स्पर्शातून

स्पर्श...
बर्फाचा..
अस्तित्वाचे दंश
पुसून रक्ताशी
एकरुप होणारा
वंशहीन..
हिवाळी ओल्या तहानेसारखा

तुझ्या भरतीचे एक वतन माझ्या
हवाली करताना
फकिराच्या वासनेचा उरुस
तुझ्या दिठीत
पाहीला मी

आणि तेव्हापासून
माझ्या चेतनातंतूंवरुन
वाहाताहेत तुझे
ओले स्पर्श

3 comments:

Harshada Vinaya said...

khup avadali kavita..

प्रशांत said...

http://marathi-e-sabha.blogspot.com/

Jaswandi said...

छान... म्हणजे मला अजुन कळली नाही आहे... हळुहळु उमगत्ये...

"तुटण्याचे भय आणि
जोडण्याची उत्कटता ..." हे आवडलं

"अभ्रकशुभ्र" हा शब्दही जाम आवडला. :)