Friday, April 10, 2009

मुक्ताची डायरी

दि. १ फेब्रु

//श्री गणपती प्रसन्न//

शाळेत बाईंनी डायरी लिहीण्याचं महत्व सांगितलं. गुरु म्हणजे देव म्हणून तर बाईंचं ऎकलं पाहीजे. काही वाईट मुले त्यांचे ऎकत नाहीत. देव त्यांना नरकात पाठवेल हे नक्की. माझं बघून सईनं पण डायरी लिहायचं ठरवलं आहे. म्हणजे ती पण नरकात जाणार नाही. आम्ही सतत एकत्र असतो. ती नरकात जाणार नाही हे कळल्यानं मला मस्त वाटलं.

कु. मुक्ता फडणिस,
इ. ३री अ

दि. २ फेब्रु

काल आईला डायरी दाखवली. ती म्हणाली की असं गणपती प्रसन्न वगैरे लिहायचं नसतं आणि दरवेळी पानाखाली नाव आणि वर्ग लिहायची पण गरज नसते. पण मग ही माझी डायरी आहे हे कसं कळणार? आणि मी ३री अ त म्हणजे हुशार मुलांच्या वर्गात शिकते हे कसं कळणार? मग तिने वहीला निळ्या रंगाचं कव्हर घालून दिलं आणि त्यावर मोठ्या अक्षरात मुक्ताची डायरी असं लिहून दिलं. मला मस्त वाटलं. आईचं सगळंच मस्त असतं. तिचा गोरा गोरा रंग, तिच्या हातचा खाऊ, तिचा गोड आवाज एकदम मस्त. पुष्करदादा आणि अन्यादादा तिच्याच सारखे गोरे आहेत पण मी बाबांसारखी आहे, गव्हाळ रंगाची. पुष्करदादा म्हणतो असा काही रंग नसतो (मी रंगाच्या पेटीत बघितलं. मला गव्हाळ रंगाचा खडू नाही दिसला म्हणजे तो खरं बोलत असणार) आणि अन्यादादा मला काळी म्हणतो मग मला फार वाईट वाटतं. मी आईसारखी गोरी का नाही?

दि. १२ फेब्रु

सईनं डायरी लिहीणं थांबवलं. मला ती नरकात जाईल अशी सारखी भिती वाटते. खरं तर मला ही रोज काय लिहायचं कळतच नाही. गेले पाच सहा दिवस मी नुस्तंच शाळेत गेले, जेवले असंच लिहीत आहे. मग मी बाईंना विचारलं. त्यांना सगळं माहीत असतं. त्या म्हणाल्या की रोज नाही लिहीलं तरी चालेल. ज्या दिवशी मनाला वाटेल त्याच दिवशी लिहीलं तरी चालतं. आणि त्यांनी सांगीतलं की आपली डायरी कुणाला वाचायला द्यायची नाही. ती गुप्त ठेवायची. हे मला मस्त वाटलं. मी ती माझ्या कपड्यांच्या कपाटात ठेवली. पण अन्यादादा सारखं घर उचकत असतो म्हणून त्या डायरीवर आडा-मोडा-शनिवारी-पाय तोडा असा मंत्र पण घालून ठेवला आहे. अन्यादादाचा पाय तुटला तर? मला खुप भिती वाटली. डायरी अदृष्य करायचा मंत्र मिळाला तर बरं होईल. सईला विचारायला पाहीजे. बाईसारखं म्हणतात सईला नको तिथे जास्त अक्कल आहे म्हणून


दि. १ मार्च

परिक्षा आल्या. खुप अभ्यास करायला पाहीजे. नंबर आला नाही तर बाई सरळ क तुकडीत घालतील

दि. १५ मार्च

परिक्षा झाली की दुसरया गावाला जायचं असं बाबा रात्री आईला सांगत होते. म्हणजे काचकांगरयांसाठी रंगीत काचा जमवायला वेळ आहे अजून. सईच्या गावाकडची एक बहीण येणार आहे. ती आम्हाला अजून मस्त खेळ शिकवणार. मस्त! मी पुष्करदादाला विचारलं तर वस्सकन अंगावर आला आणि म्हणाला डफ्फर तुला कश्याला उचापती हव्या? आपली ट्रांफर झालीए. मला काहीच कळालं नाही. तो नेहमीच असा वसवस करत असतो. आई तर नेहमी म्हणते अरे तुम्ही सख्खी भावंडं नां? किती रे भांडता. पण त्याचं मुळी माझ्यावर प्रेमच नाही. आणि आता त्याला खुप अभ्यास इंग्रजीतून असतो (इ. ७वी ब, हुशार मुलांचा वर्ग) त्यामुळे तो अजून फुशारक्या मारतो. अन्यादादाला विचारलं तर तो म्हणाला डफर म्हणजे मुर्ख आणि त्याला काही ट्रांफरचा अर्थ सांगता नाही आला. अन्यादादा आत्ता ५वी ब त आहे. त्याला थोडंस इंग्रजी येतं. मला खुप राग आलाय. बरं झालं आपण इंग्रजांना हाकलुन लावलं

दि १ एप्रिल

आमची ट्रांफर झाली म्हणजे बदली झाली असं आईनं सांगीतलं. म्हणजे नवीन गावाला जायचं आणि इथे परत कध्धी नाही यायचं. सई म्हणाली एप्रिलफुल केलं असेल पण आई कध्धी खोटं बोलत नसते. मला सारखं रडू येतय

दि १८ एप्रिल

आमचं सामान बांधणं सुरु आहे. मी खुप रडले. मी रडले की सगळेजण अगदी पुष्करदादापण माझं ऎकतो. पण यावेळी कुणीच माझं ऎकत नाहीए.

दि १९ एप्रिल

आम्हाला सईच्या आईनं जेवायला बोलावलं होतं. मला आवडतो म्हणून आंब्याचा रस केला होता. रस मस्त होता पण मला सारखं रडू येत होतं. मग आई म्हणाली सईला आपल्याकडे झोपायला घेऊन जाऊ. सई एकदम डफ्फर आहे. इतक्या जवळच्याजवळ यायला पण तिने मोठ्ठी ब्याग घेतली.

दि १९ एप्रिल

मी आज दोनदा डायरी लिहीली.
सई एकदम भारी शुर आहे. तिने ब्यागेत कपडे भरुन आणले आहेत. ती आमच्याबरोबर पळून येणार आहे. मला तिचा एकदम लाड आला. मी माझी पिंकी बाहूली तिला देऊन टाकली. सईला ती टकली आणि हात मोडकी बाहूली फार आवडते. जर ती आमच्याबरोबर येणार असेल तर पिंकी बाहूली पण सोबतच असेल. मला आता बरं वाटतय. सईनं मला आईशप्पत घातलय. मी ती आमच्याबरोबर पळून येणार आहे हे कुणालाच सांगणार नाही. शप्पत मोडली की ज्याची शप्पत असेल तो मरतो

दि ३ मे

आम्ही आता नव्या गावात आलो आहोत. पण आम्ही इथे येताना खुपच तमाशा झाला. आम्ही सामानाबरोबर ट्रकमधे बसूनच जाणार होतो. मला मस्त वाटलं. सईपण कधी ट्रक मधे बसली नव्हती. पण ट्रक सुरु व्हायच्या आधी बाबांनी तिला उतरवून तिच्या आईकडे दिली. तिची ब्याग पण दिली. आमचा ट्रक जोरात जात होता आणि मागे सई रडत जोरजोरात पळत होती. पळता पळता ती पडली आणि पूर्ण रस्ताभर तिची ब्याग सांडली. रस्ताभर तिचे कपडे, रंगीत खडू, खेळंपाणीतली भांडी सांडली होती. मी पण जोरात रडून दिलं. माझी पिंकी पण तिच्याचकडे राहून गेली

दि १ जून

आम्ही नव्या गावात परत घर बदललं. आधीच्या घरापेक्षा हे घर आणि आजुबाजुचे लोक चांगले आहेत. आमच्या घराच्या एका कोपरयात मोठ्ठी विहीर आहे. तिकडे अजिबात फिरकायचं नाही असं आईनं बजावून ठेवलं आहे. तिथे बहुतेक भुत असावं. विहीरीत भुत असतं असं सई सांगायची. कोरेआप्पांनी तिथे काट्याची झाडं लावून ठेवली होती. कोरेआप्पांची मुलं खुप वांड आहेत असं आई बाबांना सांगत होती. काट्याच्या झाडांवरुन उडी मारुन ती विहीरीपाशी जायची आणि आत दगड टाकायची. त्यांची विहीर असली म्हणून काय झालं? भुतांना थोडंच कळतं ते?

दि १२ जून

पुष्करदादाबरोबर आज नवाच मित्र घरी आला होता. आमच्या घराच्या बरोब्बर मागे त्याचं घर आहे. पुष्करदादा त्याच्याबरोबर परत इथेही गाण्याच्या क्लासला जाणार आहे

दि १७ जुलै

अभ्यादादा एक्दम मस्त आहे. तो पुष्करदादाला पुश म्हणतो, अनुदादाला अन्या आणि मला मुक्ते, मुक्ती, मुक्ताताई, मुक्ताडे असं काहीही म्हणतो. अभ्यादादा आणि पुशदा सकाळी उठून रियाज करतात. अभ्यादादा पुशदाला आवाज द्यायचा असला की त्याच्या खिडकीतून कूऊ ss ऊ असं ओरडतो मग पुशदा पण तसंच ओरडतो. मग ते गाणं सुरु करतात साजन मोरा ss घर नहीss इss आया. एकदम डफर आहेत. सगळ्यांची झोप उडते पण यांचं आपलं साजन मोरा सुरुच असतं

दि १३ ऑगस्ट

मला आता अभ्यादादा आणि पुशदाची सगळी गाणी पाठ झाली आहेत. ना जाओ बालम किंवा रसिया तुम बिन एकदम मस्त. त्यात शब्दच नाहीत. नुस्तंच आ ऊ किंवा नि ग सा रे असं म्हणावं लागतं. मी जोरजोरात कधी कधी ती गाणी म्हणत असते मग अभ्यादादा म्हणतो मुक्ताताई, असा कुठलाही राग कधीही नाही म्हणायचा त्यांना राग येतो बरं. पुशदा माझ्याशी कध्धी असं नाही बोलत. पुढच्या जल्मी मला अभ्यादादासारखाच भाऊ मिळो

दि १७ ऑगस्ट

मला आता बरं वाटतय. म्हणजे नां त्या दिवशी काय झालं आम्ही काही मुली पंधरा ऑगष्टसाठी फुलं जमा करत होतो. मी मुद्दाम आईने शिवलेला परकर पोलका घातला होता कारण त्याच्या ओच्यात खुप फुलं जमा करता येतात. पण आमच्या अंगणातली सगळी फुलं कुणीतरी आधीच तोडली होती. आता काय करायचं? कोरेआप्पांच्या अंगणात खुप फुलं होती. आपल्या सगळ्यांचा देश एक नां? मग पंधरा ऑगष्टसाठी चार फुलं घेतली तर काय होतं असं म्हणत आम्ही मुली तार वर करून त्यांच्या अंगणात शिरलो आणि फुलं तोडायला लागलो. माहीत नाही कुठून पण अचानक मंग्या तिथे आला. मंग्या म्हणजे कोरेआप्पांचा वांड पोरगा. आला आणि सरळ आमच्या मागेच लागला की. म्हणे आमची फुले का तोडता. मंग्या एकदम बिनडोक आहे असं पुशदा म्हणतो. एकदम दगडच फेकून मारतो म्हणे. आम्ही सरळ पळतच सुटलो. तारेतून पळताना माझा परकराला खोच पण लागली. मागे वळून मंग्याकडे बघत पळताना अचानक समोर विहीरच आली की. मंग्यानं खुप रागानं मोठ्ठा दगड उचलला अन फेकला की विहीरीत आणि वर तुलाही असंच फेकेन असंही म्हणाला. माझी तर तंद्रीच लागली. विहीरीतलं काळं पाणी गोल फिरत अचानक गार हवा बनून माझ्याभोवती फिरायला लागलं. मग त्या पाण्याला निळा आणि मग हिरवा रंग सुटला. रंगांच मग गर्र्गट झालं आणि परत सगळं पाणी काळं झालं. असं वाटलं आपल्याला कुणीतरी बोलवतय. खुप प्रयत्नांनी मी डोळे उघडले तर मी पलंगावार झोपले होते. मला म्हणे चक्कर आली होती आणि पुशदानं तिथून मला उचलून आणलेली.

दि २१ ऑगस्ट

माझा ताप उतरत नाहीए. पुशदानं मंग्याला बडवला म्हणे. आईला वाटतय की आम्हाला हे घर सोडून जावं लागेल. पुशदाची गाण्याची परिक्षा आहे पण माझी झोप मोडू नये म्हणून तो प्रॅक्टीस नाही करतए. अभ्यादादा आणि तो रोज मारुतीला जातात. त्यांच्या कपाळावर मस्त शेंदूर असतो.

दि २९ ऑगस्ट

पुशदा मला बरं वाटावं म्हणून रोज मारुतीला जातो आहे. देवा, मला सतत पुशदा सारखा भाऊ मिळो

दि १० सप्टे

आज आम्ही पुशदाच्या गाण्याच्या परिक्षेला गेलो होतो. त्याच्या गळ्यातून आवाजच निघत नव्हता. आईला वाटलं त्याने रियाज केला नाही म्हणून तसं होत आहे. नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो.

दि १२ सप्टे

डॉक्टर म्हणाले की पुशदाचा आवाज शेंदूरामुळे गेला आहे. म्हणजे यानं कपाळाचा शेंदूर खाऊन बघितला की काय? मी आईला विचारलं तर ती मला जवळ घेऊन रडायलाच लागली. मी खुप घाबरले आहे.

दि २२ सप्टे

पुशदा म्हणाला की मुक्ते जिथे मी गाणं सोडलं तिथून तू सुरु करायचं. आता अभ्यादादा आणि मी रियाज करतो. काय माहीती तुम बिन चैन न आए म्हणताना आमच्या तिघांच्याही डोळ्यात पाणीच येतं

13 comments:

अनिकेत वैद्य said...

संवेद,
खरच खूप मस्त लिहिलयस. वाचताना कायम उत्कंठा वाढत होती. लहान लहान गोष्टीतून मुक्तात घडलेला बदल छान टिपलाय.
शेवट वाचून भरच बधीर झालोय.


अनिकेत वैद्य.

माझ्या मना said...

मजा येतेय वाचुन, अजुन असतील भाग तर आवडेल वाचायला. बाय-द-वे ही डायरी खरंच कुणाची आहे की कल्पनाविस्तार??

Shraddha said...

खूपच छान. शेवट एकदम अनपेक्षित होता.
पण मुक्ताची डायरी एकदम तिच्या वयाला शोभणारी आहे.
तिचा निरागसपणा मस्त रेखाटला आहे. त्याबद्दल अभिनंदन.

Aparna Pai said...

waah, ekdum surekh !!

Jaswandi said...

ए हे नाहीये बरोबर... सुरुवातीला कसली cute वाटली ही पोस्ट... पोस्टच्या शेवटी रडवायलाच हवं होतं का? मला नाही आवडलं, पण मुक्ता मस्त आहे आणि तिची सई पण खूप भावली.

Bipin said...

फ़ार सुरेख!

अश्या आणखी करामतींची वाट बघत आहे.

- बिपिन.

शब्दबंध said...

मस्त!
शेवट डोळ्यांत पाणी आणतो.

Megha said...

mangesh kore la vachayala deu ka he post? ha ha just kiddin'....vachtana bhushan aani tyachi bahin aathavali kunas thauk ka te...baki lahan mulanmadhla niragas pana chaan rekhatala aahes re....good work keep it up.

Anand Sarolkar said...

Post changli ahe pan mala shevat nahi avadla :(

Tulip said...

छानच झालाय एकंदरीत फ़ॉर्म. आवडलं. पण मला पिन्की बाहुलीचं वर्णन, विहिरीचं काळं निळं हिरवं गोल फ़िरणारं पाणी, मुक्ताचं आजारी पडणं, मैत्रिणीची आठवणं या सगळ्यातून काहीतरी गुढ रहस्याकडे डायरी चाललीय (धारप-मतकरींच्या अशा कथा आवडत असल्याने कदाचित:P)असं वाटत असताना अचानक वेगळाच टर्न आल्याने शेवटाला लेटडाउन फ़िल आला. मुक्ताचं मॅच्युअर होणं वगैरे फ़ारसं जाणवलं नाही (तसं दाखवायचा हेतू होता कां?) डिसकनेक्टेड वाटल्या शेवटच्या नोंदी आधीच्या एकंदर परिणामाशी.

कोहम said...

surekh,

mitra maja ali....ashi diary vagaire vachali ki kuthetari apanach tyat dokavatao. apalya swatahakade sthitapradnyapane pahayacha ek chance.....

Samved said...

आता बाठे स्टाईल मोठ्ठी कॉमेन्ट..

या पोस्टच्या दोन कहाण्या आहेत. एक म्हणजे यातली घटना सोडली तर पात्र खरीच आहेत. मी लहान असताना माझा एक शेजारी मित्र होता, भुषण फडणीस. त्याची भावंडं म्हणजे, अनिरुद्ध आणि मुक्ता. मी, भुषण आणि अनि एकत्र गाण्याच्या क्लासला जायचो. कधी तरी त्यांची बदली झाली आणि आमचा संबंध तुटला. आठवणींना जरा उजाळा देणे हा एक हेतु आणि एक आशाही की या पोस्ट मुळे कुठून तरी परत आम्ही एकमेकांना भेटू!!
आता दुसरा भाग. हा या कथेच्या घडवणुकीबद्दल आहे. जेव्हा हे पोस्ट डोक्यात आलं तेव्हा शेवटचा प्रसंग हा मुख्य भाग होता. कदाचित बाकीची पात्रं आली ही नसती पण अचानक मुक्ताच्या ऍंगल्ने या गोष्टीची मांडणी करता करता एक नवीच आणि कदाचित जास्त चांगली गोष्ट मांडली गेली.
लहान मुलांचं विश्व नेहमीच सुंदर आणि हॅपनिंग असतं. मुक्ताचं ६-८ महीन्याच्या काळातल बदलत जाणं टिपताना श्रीनिवास जोशी आणि प्रकाश संतांची जबरदस्त आठवण आली. हा प्रकार मराठीत रुजवण्याचा आणि गाजवण्याचा मान त्यांचा.
ही एक साधी गोष्ट असल्यानं त्यात काही "घडताना" दाखवण्याचा हेतू नव्हताच. आणि बरयाच जणांना वाटला तसा मला शेवट दुःखीही नाही वाटला. उलट मोठं होण्याकडे तिनं एक पाऊल टाकलय असं मला वाटतं. मोठं होणं ही तशी दुःखी गोष्ट आहे हे खरं
आता ट्युलिपच्या मताविषयी..कारण ते वेगळं आहे इतकच नाही तर एका पॉईन्टला ती सुचवते त्प मोह मला झाला होता. सई पासून तुटताना आणि विहीरीच्या प्रसंगात अचानक हीची गुढ/भुतकथा करण्याच जबरदस्त टेम्पटेशन झालेलं!! पण टाळलं:)

तर मी हे सगळं का सांगतोय? परवा रवी परांजप्यांचं एक पुस्तक वाचताना एका वाक्याशी जीव अडलाच. त्याचा तथ्यांश असा की आपल्या निर्मितीची मुळं आपणच मांडली नाहीत तर पुढे ती तर्कांवर सोडली जातात इ. इ.

असो. इतकं पुरे

संदीप वि.सबनीस said...

अप्रतिम...खरेच काय मस्त लिहाले आहे....सुंदर आणि शेवट :(