शुभ्र कबूतर युगायुगांचे

युगांत झाला तसं नेमून दिलेल्या कामागत चहुबाजूने समुद्र चढले. कणा कणाने, क्षणा क्षणाने अवघी पृथ्वी जलमय झाली. रंग-रेषांगत सारे सजीव-निर्जीव कोणत्याही खुणा मागे न ठेवता हल्केच ओघळुन गेले. सारे संपले तसे आकाशाने एकदाच आपले सबंध प्रतिबिंब हळुहळु स्थिरावणारया पाण्यात पाहीले. पाण्याशी कानगोष्टी करायला आकाशाला क्षितीजाची आता गरजच नव्हती मुळी. एक हळुवार फुंकर मारली तरी शहारे यायचे पाण्यावर. दहा महीने चाललेली पाण्याची देहमग्नता मोडली ती नोहच्या निर्मितीच्या नव्या खुणा वागवणारया बोटीने. नोहनं हाताच्या ओंजळीत धरलेलं शुभ्र कबूतर एकवार सश्रद्धपणे डोळ्यांना टेकवलं आणि जमिनीच्या शोधार्थ त्याला आकाशात सोडून दिलं. आशेचा चिवट अदृष्य तंतू पायी बांधलेलं ते कबूतर थोड्याच वेळात ऑलिव्हची डहाळी चोचींत घेऊन नव्या विश्वाची ग्वाही फिरवत परत आलं.



*********************************************************************************


विशाल सागराच्या मधोमध उगवलेल्या शाबोध बेटावर कल्लोळ शांतता होती. जगातले काही प्रज्ञावंत काही दशकांपासून तिथे राहात होते आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीनं, त्यांनी शाबोधभोवती जणु अदृश्य पोलादी पडदाच उभा केला होता. जगापासून तुटलेल्या त्या बेटाला शांतता नवी नव्हती पण आजच्या शांततेला रक्तहीन कत्तलीची किनार होती. रोजची रुटीन आणि कंटाळवाणी काम करण्यासाठी निर्माण केलेली यंत्रमानवांची फौज अचानक बंड करुन उठली होती. कुठल्याही सरकारी नियमांचा, सेन्सॉरशीपचा जाच नको म्हणून बेटावरच्या ज्ञानर्षींनी जे अनेक नियम गुंडाळले होते, त्यातच ऍसिमोव्हचे यंत्रमानवांसंबधीचेही नियम होते. आणि ज्या क्षणी यंत्रमानवांना या को ss हंचा साक्षात्कार झाला त्या क्षणी बेटावरची संदेशवहनाची, पाणी शुद्धीकरणाची, प्रोसेस फुडची यंत्रणा बंद पडली. शतकांचं ज्ञान आणि लाखो-करोडो पुस्तकं असणारं डीजीटल ग्रंथालय करप्ट झालं. अत्याधुनिक प्रयोगशाळांमधल्या वातानुकुलीत यंत्रणेतून कसलाचा बिनवासाचा, बिनरंगाचा वायु पसरत गेला अन आतल्या आत रक्त गोठून शेकडो ज्ञानर्षी जागीच ठार झाले होते. यंत्रमानवांना आता बेटाबाहेर पडून जगावर राज्य करायचं होतं. पण ज्ञानर्षींनी उभ्या केलेल्या विविध फायरवॉल्स आणि पोलादी पडद्यांमुळे यंत्रमानवांचं जगाबद्दलचं ज्ञान तोकडं होतं. नव्या जगाची रचना करण्यासाठी त्यांना बेटाबाहेर पडायचं तर होतं पण समुद्र पार करताना त्यांची संख्या आणि शक्ती जपून वापरायच्या होत्या. शाबोधवरचा शेवटचा माणूस नष्ट करेपर्यंत यंत्रमानवांना हे उमजलंच नव्हतं. आणि चिरक्या आणि भांडकुदळ भासु शकणारया अल्ट्रा-हाय फ्रीक्वेन्सीत यंत्रमानव आपापसात आता हा वाद घालत होते. शाबोधवरच्या शांततेत हा असा निःशब्द कल्लोळ भरलेला होता.


शाबोधच्या एका दुर्लक्षित कोपरयात मोडक्या लाईटहाऊसवर काही तितकीशी हुशार नसणारी माणसं जीव वाचवुन जमा झाली होती. विज्ञानातून वैराग्य आल्यागत प्रयोगशाळांऎवजी झाडाझुडपांमधे रमणारया या बिनमहत्वाच्या माणसांबद्दल शाबोधवासींयांना कधीच फारशी आत्मियता नव्हती. त्यांचे जगण्याचे अट्टहास वेगळे आणि इतरांचे वेगळे. त्यांचे हे तुटकपण इतके टोकाचे होते की हरकाम्या यंत्रमानवांच्या डेटाबेसमधे त्यांची साधी नोंदही नव्हती. जगण्याचे इन्स्टींक्ट बोथट न झाल्यानं ही बिनमहत्वाची माणसं यंत्रमानवांच्या तडाख्यातून सुटून लाईटहाऊसवर जमली होती.


बाहेरच्या जगाला इथे झालेल्या नरसंहाराचा आणि येऊ घातलेल्या धोक्याचा इशारा द्यायचा तर कसा द्यायचा याचा काथ्याकुट सुरु असतानाच एक डौलदार कबूतर अचानक कुठूनसं येऊन खोलीत स्थिरावलं. ज्या अर्थी या बेटाबाहेरची प्रजाती इथे आली आहे त्या अर्थी जवळपास कुठेतरी जहाज-माणसाचा वावर आहे यावर सारयांच एकमत झालं. संदेश वाहनासाठी कुठलही आधुनिक माध्यम वापरायचं तर यंत्रमानव त्या लहरी अचूक टिपून आपल्यापर्यंत पोचणार हे ओळखुन आत्ता पर्यंत हातावर हात ठेवून बसलेल्या शाबोधवासीयांना ते कबूतर जणू देवदुतच वाटलं. एका कागदी चिटोरयावर थोडक्यात सारा मामला लिहून शाबोधवासीयांनी तो चिटोरा जवळच पडलेल्या एका डहाळीभोवती गुंडाळला आणि कबूतराच्या चोचीत दिला. तत्क्षणी कबूतराने आकाशात झेप घेतली. ऎन समुद्रात कबूतराच्या चोचींतून कागद निसटून जाऊन नुस्तीच ताज्या ऑलिव्हची डहाळी उरलेली पाहून शाबोधवासीयांच्या मुक डोळ्यांत युगांताचे आर्त उतरले.

Comments

a Sane man said…
वाह! ह्याला म्हणायचं कवितेला न्याय देणं...नाही? क्या बात है!
कोहम said…
shevatachi chamatkruti awadali, pan shabdanchya janjalat jara goshta haravali asa vatala
kshipra said…
sahi !! sobat purna kavita

मनात माझ्या उंच मनोरे;
उंच तयावर कबुतरखाना;
शुभ्र कबूतर घुमते तेथे
स्वप्नांचा खाउनिया दाणा.

शुभ्र कबूतर युगायुगांचे-
कधी जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे?
अर्थावाचुन व्यर्थ न का रव?

प्रश्न विचारी असे कुणी तरि;
कुणी देतसे अगम्य उत्तर!
गिरकी घेऊन अपणाभवती
तसेच घुमते, शुभ्र कबूतर.

- vinda
Megha said…
i agree with sane man aani kavita pan mastach....soory are comment lihayala vel zala...eshaan ne 7,8 keys ukhadun taklya laptop chya....
Anonymous said…
तुम्ही काय सुरेख लिहिलं आहे. वाचताना जी ए कुलकर्णींची आठवण होत राहिली; त्यांचाच उतारा तर दिलेला नाही अशी शंका आली. पण ही छुपी टीका नव्हे, बरे का. तुमचीही शैली मुळातच तशी असेल, तर काहीच हरकत नाही. उलट त्याचा तुम्हाला त्रासच होऊ शकणार. आणि हेतुतः जी ए शैली वापरली असेल, तर मी म्हणेन की दुसर्‍याची शैली ज़ाणूनबुज़ून वापरायची ठरवून तसे यशस्वीरित्या लिहिणे तर फारच कठीण.

जी एं नी कथांचे किमान दोन वेगळे प्रकार हाताळले हे माझ्यासारख्या त्यांच्या वाटेला न ज़ाणार्‍यालाही ठाऊक आहे. नाना तर्‍हांनी पिचलेल्या जीवनाचे त्यांच्या कथेतील चित्रण मला प्रभावीही वाटत नाही, आणि त्यात वाचकाला खिळवून ठेऊन आपल्याबरोबर नेत रहाणारी युक्तीही मला ज़ाणवत नाही. त्यांचा दुसरा मी पाहिलेला प्रकार म्हणजे भाषेचा अत्यंत भारदस्त पोत सादर करणारा. त्यात हिरवे पाचू येतात. 'पाचूच्या हिरव्या माहेरी' हे गाणं ऐकण्याचं शक्यतोवर टाळूनही ते कानावर पडून पडून पाचूचं झाडबिड असतं की काय, हे माझ्या डोक्यात भरलेलं आहे. आणि त्याचं उत्तर काही माहित नाही. त्यांच्या कथांत निळसर लाल, लालसर पिवळा वगैरे प्रकाश येतात. ते नक्की कसे दिसतात याची कल्पना नाही, पण 'वाचायला उगीचच बरे वाटते'. वारा आपला स्वभाव विसरून स्तब्ध झाल्याबद्दलही वाचल्याचं आठवतंय. साला कशाचा काही अर्थ लागत नाही. पण हा वर्णनप्रकार मी 'यांना ही भाषा किती काळ टिकवता येते पाहूया', या औत्सुक्यानी काही कथांत वाचून पाहिल्याचे आठवते. अशी अनेक मुळात कंटाळवाणी पण तरीही कुतुहल वाटणारी वर्णने वाचल्यावर मग एकदा अचानक 'माणसं - अरभाट आणि चिल्लर' मधे अगदी खिळवून ठेवणारा भाग वाचायला मिळाला. आता पक्के काही आठवत नाही, पण त्यात भृशुंडाचा बराच उल्लेख होता. ते पुस्तक अगदी अथपासून इतिपर्यंत आवडले.

तुम्ही लांबीत छोटासाच प्रसंग (किंवा प्रसंगमालिका) रंगवला, हे छान झाले. कारण त्यात सुसूत्रता राहिली. वेगवेगळे प्रसंगही तुम्हाला अव्वल सुचले. जी एं प्रमाणे भरकटबाजी झाली नाही. कबूतर वेडेवाकडे न उडत राहता वाचक आपल्याकडे पाहताहेत, आपण त्यांच्या नज़रेआड झेप मारू पाहिली तर ते (निदान माझ्यासारखे तुमचे भक्तबिक्त नसलेले वाचक) आपल्यासाठी दुर्बीण हाती न घेता नज़र दुसरीकडे वळवतील, याची ज़ाणीव ठेऊन शहाण्यासारखे वागले.

- डी एन
मिताक्षरी गोष्ट आवडली. पण शेवट नाही आवडला.
Anonymous said…
"कणा कणाने क्षणा क्षणाने"
--> कणाकणाने क्षणाक्षणाने

This crazy habit of breaking up words has been insidiously spreading for some time now. 'over come', 'down load', 'out smart', 'devaki nandan'. But "कणा कणाने" is even worse, like 'un expected' or 'worth less'. Perhaps to balance the craziness, 're-sign' has come to be written as 'resign'. Sigh!
Samved said…
ज्यांना कथा आवडली त्यांचे आभार.
आम्ही खरं तर रेषेवरची अक्षरे भाग दोन साठी ही कविता निवडली होती. पण वेळे अभावी फार लोकांनी या थीमवर कथा न पाठवल्याने आम्ही तो बेत रद्द केला. आणि खरं सांगायचं तर वेळे अभावीच या कथेला हे रुप आलं आहे. मला खरं तर चार वेगवेगळ्या कथा लिहायच्या होत्या ज्यात कबुतर (i hate it!)ही मध्यवर्ती कल्पना होती. तर असो.
एनॉनिमस १ (डी एन)- किंचीत अशी कॉमेन्ट मला दुसरया कुठल्याशा पोस्टला मिळालेली. पण हे पोस्ट मला स्वतःला जीएंच्या शैलीच्या किंवा विषय निवडीच्या जवळ अजिबातच वाटत नाही. तुम्हाला कसं वाटलं याचं जरा कुतुहल आहे

एनॉनिमस २- असेल बुवा, तुम्ही म्हणता तसं असेल. माझा काय इतका अभ्यास नाही व्याकरण आणि तत्सम गोष्टींचा.
Naniwadekar said…
संवेद साहेब : हे पान सतत बदलतंय. पहिले मी एक प्रतिक्रिया दिली. दुसर्‍या दिवशी तुमची त्यावर प्रतिक्रिया आहे का, हे पाहिलं, तर ती नव्हती. तिसर्‍या दिवशी माझी प्रतिक्रियाही नव्हती. नंतर कबूतराची कविता पुन्हा वाचायला आलो, तर माझी प्रतिक्रिया तुमच्या तिच्याबद्दलच्या प्रश्नासकट हज़र. पण माझ्या प्रतिक्रियेतला शेवटचा भाग कापल्या गेलेला. ब्लॉगच्या प्रतिक्रियेवर ४०९६ अक्षरांची कंजूष मर्यादा का आहे, कळत नाही. एरवी मी ९,६४० शब्दही लिहू शकेन. पानंच्या पानं लिहू शकेन. पण माझी कापल्या गेलेली प्रतिक्रिया तितकीही लांब नव्हती. ते असो. कथेत जी एं सारखी शैली कुठे दिसली, या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेलो, तर २-३ दा एरर-मेसेजच दिसला. आज़ पुन्हा प्रयत्न करावा असा विचार केला; तर माझी पहिली प्रतिक्रिया, मधे कापल्या गेलेल्या भागासकट, पूर्ण हज़र.


> मला खरं तर चार वेगवेगळ्या कथा लिहायच्या होत्या ज्यात कबुतर ही मध्यवर्ती कल्पना होती.
>---

चारच कशाला, दहा लिहा. मी एकदा 'आ मुहब्बत की बस्ती बसाएंगे हम' वर ८-१० ओळी लिहिल्या आणि बढाई मारली की मी या गाण्यावर पानंच्या पानं लिहू शकीन. त्यावर एक मित्र म्हणाला: 'लिहिता येत असेल तर लिहून दाखव, उगीच आवाज़ करू नकोस.' मी मुकाट झालो. ही एक उगीचच आठवण आली. तुम्ही ३-४ कथा लिहू शकाल, याबद्‌दल मला शंका नाही. पण खरंच लिहिल्यात तर इतर शंकेखोरांनाही चूप बसावं लागेल. आणि या कथेच्या तोलामोलाच्या इतर कथा असल्यास मला वाचायलाही आवडेल.


> पण हे पोस्ट मला स्वतःला जीएंच्या शैलीच्या किंवा विषय निवडीच्या जवळ अजिबातच वाटत नाही. तुम्हाला कसं वाटलं याचं जरा कुतुहल आहे.
>----

थोडंसं स्पष्टीकरण मी आधीच दिलेलं होतं. त्याबद्दल अज़ून काही सांगता येईल का, हे ज़रा (येत्या रविवारी) बघतो.

- नानिवडेकर
Samved said…
@नानिवडेकर- अशी कॉमेन्ट ब्रेक करता येते/होते हे पहील्यांदाच वाचलं. बाकीच्या गोष्टी जमल्या तश्या/ जमल्या तर लिहीन. पैज मारुन करायचं काम थोडंच ते?
Anonymous said…
बरेच दिवस माझी पहिली प्रतिक्रिया 'तुम्ही लांबीत छोटासाच' इथपर्यंतच दिसत होती/असावी. निदान एक दिवस ती तिथे कापल्या गेली होती, आणि त्या दिवशी प्रतिक्रिया देताना bx-hhhh असा निरोप मिळत होता. त्याबद्दल 'This 'bx' error code appears when the blog owner makes some 'wrong' changes to his blog's settings' असं काहीतरी वाचायला मिळालं.

> बाकीच्या गोष्टी जमल्या तश्या/ जमल्या तर लिहीन. पैज मारुन करायचं काम थोडंच ते?
>-----
मराठी भाषाच अमृतातें पैज़ा जिंकायच्या अट्टाहासाबद्दल आहे; नाही? पण मला ज्ञानेश्वरांसारखी घाई नाही. कबूतराच्या इतर गोष्टी आरामात, ज़मेल त्याप्रमाणे, लिहा.

कथेची शैली जी एं सारखी का वाटली हे मला सांगता येईल, असं वाटतंय.

- डी एन