हे राम...विराम "?;.’

आटपाट नगर होतं
सुरुवात  वाचून गोष्ट वाचणं बंद कराल तर तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप क्षणोक्षणी  तरलावस्थेत जाऊन तुम्हाला त्याच्या पायावर लोळण घ्यायला भाग पाडेल
डी-धमक्या म्हणजे डिजीटल-धमक्यांचा तुमच्यावर परिणाम होतोय असं समजून पुढे चला
हं
तर
आटपाट नगर होतं आणि म्हणजेच जुना काळ होता असं नव्हे
या गोष्टीत आपण काळाचा एक आडवा काप काढला आहे
म्हणजे कसं की काळाचे उभे कप्पे असतात जसं की अठरावं शतकं किंवा एकविसावं शतकं वगैरे वगैरे
पण काळाचा आडवा काप काढला की कुठल्याही काळातल्या कुठच्याही घटना आपण एका प्रतलात आणू शकतो
उदाहरणार्थ प्रभु रामचंद्र (जुना काळ) विमानाने (नवा काळ) लंकेला गेले किंवा सुवर्णलंकारांकीत नगरसेवकाची (नवा काळ) पुस्तकतुला (जुना काळ) वगैरे
तुमचा काल-अवकाश अश्या संकल्पनांचा अभ्यास नसणारच तर आता या उदाहरणांवरुन तुम्हाला काळाचा आडवा काप म्हणजे काय याचा अंदाज आला असेल
असो
तर आटपाट नगरात वसंत मंगेश गोडघाटे नावाचा राजा होता आणि महत्वाचं म्हणजे तो पार्टटाईम कवीदेखिल होता
म्हणजेच वमंगो राजा भावनाप्रधान वगैरे असतो
भावनाप्रधान कलावंत आणि राजा या डेडली कॉम्बिनेशनवर संशय असणाऱ्या पापी लोकांनी चित्रकार अडॉल्फ हिटलर याचे स्मरण करावे
तर वमंगोचा कारभार बरा सुरु होता म्हणजे वेळच्या वेळी करबिर मिळणे किंवा क्वचित डुगना लगान इत्यादी
पण मग प्रथेप्रमाणे दोनेक वर्ष भीषण दुष्काळ पडला
मंत्र्यांनी रोजगार हमी योजना आखली आणि भावनाप्रधान वमंगोनं कविता लिहील्या
या सगळ्या भानगडीत वमंगोचा मोठा कविता संग्रह छापून आला आणि मंत्र्याच्या विविध योजना राबवून झाल्या
या सगळ्याचं मिळून एक भलं मोठ्ठं बील आलं आणि मग पैश्यांचादेखिल दुष्काळ पडला
आता टिग्ना लगान लावून चालणार नसतो तेव्हा वमंगोनं स्वतःचा वैयक्तिक खजिना नीट दडवून ठेवला आणि बॅंकेकडे लोनचं ऍप्लिकेशन पाठवलं
बॅंकेनं डोळ्यात तेल घालून ऍप्लिकेशन तपासलं कारण कवीला कर्ज देणं डेन्जर आणि महाराजाला कर्ज देणं महाडेन्जर 
बॅंकेतले जाणकार असलं कर्ज मंजूर करण्याला किंग फिश्यर रोग झाला असंही म्हणतात
पण वमंगोची गोष्टच वेगळी
बॅंक चक्क हसत हसत वमंगोसाठी सुवर्णमुद्रा घेऊन घरी आली
महाराज तुमच्या ऍप्लिकेशन नुसार आम्ही या १००० सुवर्णमुद्रा तुम्हाला कर्जाऊ देत आहोत
अहो पण मी तर १००००० सुवर्णमुद्रा मागितल्या होत्या
छे हो महाराज हे बघा तुमचं ऍप्लिकेशन यात स्पष्ट लिहिलय १०००.०० सुवर्णमुद्रा
आम्ही तर कुतूहल म्हणून हिशोबही केला की कविता संग्रहाच्या खपून खपून जेमतेम २०० प्रती खपतात आणि एका प्रतीचा खर्च ५ मुद्रा अश्या महाराजांना १००० मुद्रा लागणार
मोठ्या कष्टानं वमंगोनं आपला राग आवरला
मला कवितासंग्रहासाठी कर्ज नको होतं तर राज्यासाठी हवं होतं आणि ही १०००.०० सुवर्णमुद्रा भानगड मला नाही कळाली
टिंबाचं ते इतकं काय कौतूक
असेल पडलं चुकून आकड्यांच्या मध्यात
क्षमा असावी महाराज
विरामचिन्हांबद्दल इतकं कॅज्युअल राहून चालत नसतं
हा विशिष्ट अधिकारी भाषेत एम ए करुन बॅंकेत पिओच्या परिक्षा देऊन लागलेला असतो
चलं आजी खाऊ या या वाक्यात नातू आजीला काही तरी खाण्याचा आग्रह करतो आहे की हा नातू त्याच्याच सारख्या दुसऱ्या नरभक्षक माणसाला आपली आजी खाण्याची ऑफर देत आहे हे या वाक्यात विरामचिन्ह कुठं आहे यावर अवलंबून आहे
बघितलंत किती पॉवरफुल असतात विरामचिन्हं
महाराजांनी १०० कोरडे मनातल्या मनात मोजले आणि १००० तर १००० सुवर्णमुद्रा घेऊन भाषेत एम ए केलेल्या अधिकाऱ्याला निरोप दिला
अशी बावळट चूक आपल्याकडून कशी झाली याचा विचार करत वमंगो रात्रभर अस्वस्थ झोपला
नाश्ता घ्यावा महाराज
काय आहे आज
काजु पुलाव
वमंगोनी साडेसात काजु मोजून काढले
त्यांचा विरामचिन्हासारखा आकार वमंगोला खिजवत होता
बल्लवा हे साडेसात कॉमे म्हणजे ते आपले काजु काढले तर या भाताला काय म्हणशील
फोडणीचा भात महाराज
गळ्यात मोत्यांची माळ असती तर याच क्षणी ती तुला बहाल करतो बल्लवा
मला रात्रभर जे सुचलं नाही ते तू किती सहजगत्या बोललास
रोजच्या लिहिण्यातली विरामचिन्हं काढली तर त्या भाषेचा सगळा तोलच चालला जाईल
वमंगोनं ताबडतोब दरबार भरवला आणि विद्वानांना पाचारण केलं
एका टिंबापाई जे आम्ही गमावलं ते आम्ही त्यातूनच कमावणार
या पुढे प्रत्येक विरामचिन्हाच्या वापरावर अधिभार लावावा असा आमचा मानस आहे पण हा बेत अंमलात कसा आणावा हे काही उमगत नाही
तर्‍हेवाईकपणा हा कलावंताचा कमावलेला आणि राजाचा जन्मजात अधिकार असतो
दरबारात जमलेल्या सर्व गुणीजनांनी डोकं खाजवूनही त्यांना सहज उत्तर काही मिळालं नाही
एक दिवस मात्र दरबारात बल्लु फाटक नावाचा माणूस उगवला
बारकीमो नावाच्या त्याच्या कंपनीत तो पाट्या तयार करे
बल्लुने वमंगोला अशी ऑफर दिली ज्याला वमंगो नाही म्हणूच शकला नाही
यापुढे वमंगोच्या राज्यात लिहीण्यासाठी फक्त आणि फक्त बारकीमोच्याच पाट्या वापरल्या जातील आणि विकल्या गेलेल्या प्रत्येक पाटीमागे वमंगोला विरामचिन्हांवरचा अधिभार मिळेल
फाटकांच्या पाट्या दिसायला सुरेख आणि वागवायला हलक्या आणि अक्षर तर बर्गेंच्या पाटीपेक्षा सुरेख उमटायचं
लेखक म्हणू नका, विद्यार्थी म्हणू नका, कारकुन म्हणू नका, मिलीट्रीतला जनरल म्हणू नका सगळे सगळे बारकीमोच्याच पाट्या वापरु लागले
वर्षांमागून वर्षे गेली पण कंत्राटी रस्त्यावरचा टोल कधी संपूच नये तसाच हा विरामचिन्हांवरचा अधिभार काही हटलाच नाही
वमंगोचा खजिना दुथडी भरुन वाहु लागला म्हणावं तर फाटकांच्या संपतीचे ढिगारे हिमालयाच्या उंचीचे झाल्याच्या चर्चा होत
सुख अंगात मुरु लागलं की अस्वस्थतेची कलमं रुजत नाहीत म्हणे
लोकांना बारकीमोच्या पाट्यांच्या सहजतेची आणि अपरिहार्यतेची इतकी सवय झाली की त्यांना अधिभाराचा जाच असा वाटेनासा झाला
पण समय बहोत बलवान होता है मेरे भाई
फाटकांच्या हे करु नका आणि ते तसंच करा किंवा याचे वेगळे पैसे द्या या मनमानीला काही लोक वैतागले आणि त्यांनी बारकीमोच्या पाट्यांसारख्या पाट्या तयार केल्या
बारकीमोपेक्षा या पाट्या रंगीबेरंगी आणि अमिबीय आकारात यायच्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चकटफू
फुकट मिळालं तर वीष ही खाणाऱ्या राज्यात आख्खी पाटी फुकट मिळते म्हटल्यावर लोकांनी या नव्या पाट्यांवर दणकून उड्या टाकल्या
शिवाय या पाट्यांची नावं तरी कोण चविष्ट
कधी हिमक्रीम तर कधी बुढी के बाल
लाळेचा नुस्ता महापूर
बारकीमोच्या पाट्यांवर वाढलेल्या पिढीपेक्षा नवी आलेली पिढी एकाचवेळी बहुसामाजिक आणि तरीही मितभाषी होती
या पिढीचं गप्पाष्टक सख्खे मित्र आणि शेजारी आणि नातेवाईक यांच्या पुरतं मर्यादित न राहाता देश आणि स्थळ काळ ओलांडून गेलेलं
बघावं तेव्हा हे पाटीला पाटी लावून उभेच
आणि स्थळ काळाशी स्पर्धा करायची तर लिहीण्याला विचारांचा वेग हवा
एकाचवेळी शेकडो न्  हजारो न् करोडो लोकांशी बोलायचं तर भाषा लिपीच्या पल्याड जायला हवी
अशिक्षीत न्  अर्धशिक्षित न्  सुशिक्षित अश्या खिचडीशी बोलायचं तर विरामचिन्हं आणि व्याकरणाच्या जंजाळातून सुटका हवीच
नव्या पिढीनं नवी वेगवान भाषा रुजवली
लोल न्  वाद्फ न्  लमो न्  काय काय
नव्या पिढीनं भाषेच्या जुन्या सीमा मिटवल्या
:)  :(  :/  न्  काय काय
निरक्षर आणि साक्षर आणि अशिक्षित आणि सुशिक्षित यांच्या दरम्यान संभाषणाच्या अखंड कोसळत्या प्रवाहात
वमंगोच्या डोळ्यादेखत अनेक विरामचिन्हांनी हे राम म्हटलं
संस्थानं बुडाली आणि राजे बुडाले
वमंगोसारखे कवीही बुडाले
कर्कश्श शांततेच्या गोंधळात
चष्मिष कावळे भुर्र उडाले


आणि तुम्हाला उगाच वाटतं की आटपाट नगर होतं अशी सुरुवात असलेल्या गोष्टीचा शेवट साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण असाच होणार

Comments

Anonymous said…
Masta re Sam....Awadla...
Samved said…
धन्यवाद.
पण कोण बोलतय??