उसंत नसलेल्या वर्तमानाच्या कथा


कविता आणि कादंबरी या साहित्य प्रकारांना त्यांच्या अंगभुत रचनेमुळे मांडणीच्या ठाशीवतेपासून  एक प्रकारचे संरक्षण लाभलेले असते. झाडांतून दुपारच्या प्रहरी झरणाऱ्या कवडश्यांच्या साऊलखुणांभोवती चौकट आखता येऊ शकते पण त्या चौकटीच्या आत काय घडेल याला मर्यादा नाहीत. कुठल्याही कादंबरीच्या मांडणीत पात्रे, त्यांचे परस्परांशी संबंध, त्या पात्रांमागचा भुगोल, काळाची रचना आणि अशी अनेक टोके तर असतातच शिवाय त्या टोकांना जोडू पाहाणाऱ्या असंख्य प्रवाहांच्या शक्यताही त्या कादंबरीची मांडण ठरविते. कवितेच्या बाबतीत बोलायचे तर तिच्या मांडणीचे अवकाश मर्यादित असले तरी शब्दकळा, छंद, संदिग्धता, उपमा, उत्प्रेक्षा, कविचे वैयक्तिक भाष्य यांच्या मदतीने कवी कवितेची मांडण लवचिक ठेवू शकतो.

कथेला हे स्वातंत्र्य नाही. कविता आणि कादंबरी यांच्या तुलनेत कथेचे प्रतल मर्यादित असते आणि त्याचमुळेच तिची रचना नेमकी असावी लागते. लेखाच्या सुरुवातीलाच हा उहापोह करण्याचे कारण म्हणजे प्रणव सखदेव-कवी ते प्रणव सखदेव-कथाकार म्हणून मांडणीच्या या आव्हानाला कसा सामोरा जातो हा माझ्यापुरता थोडासा कुतुहलाचा विषय होता. २०१६ मध्ये विविध दिवाळी अंकात प्रणवच्या खालील कथा प्रकाशित झाल्या-

 

·       अभ्र्यांमधे दडलेलं फॅन्ड्री- युगांतर

·       अॅबॉर्शन-संवाद

·       अॅडॉप्शन- शब्दोत्सव

·       ’मूल’प्रश्न- अंतर्नाद

·       भाजीवाला-अक्षरअयान

·       हिरवे पक्षी- माऊस

·       नाभितून उगवून आलेल्या वृक्षाचं रहस्य- इत्यादी

 

’हिरवे पक्षी’ ही लहान मुलांसाठी लिहीलेली कथा या लेखाच्या चौकटीतून मी वगळलेली आहे.  ’नाभितून उगवून आलेल्या वृक्षाचं रहस्य’ या कथेवर थोडेसे स्वतंत्र भाष्य मला आवश्यक वाटते त्यामुळे आवश्य़क तेथे मी या कथेचा स्वतंत्र उच्चार करेनच.

 

प्रणवच्या कथांचा तोंडावळा हा पुर्णपणे शहरी आहे. यातली पात्रे सॅलडबार, मल्टीप्लेक्स मध्ये जातात, लिव्ह-ईन रिलेशनशीपमध्ये राहातात. त्यांची भाषा पुस्तकी तर नाहीच पण ती शुद्ध असावी हा ही हट्ट लेखक धरत नाही. जवळ जवळ प्रत्येक कथेमध्ये, हल्ली जणू नैसर्गिक झाले असावे, असे इंग्रजी येते. क्वचित अपवाद सोडले तर भाषेची ही भेसळ (हल्ली) डोळ्यांना खुपत नाही. त्या अर्थाने ही कथा ताज्या पिढीची आहे. कथांचा हा ताजेपणा, तरुणपणा फक्त भाषेपुरता मर्यादित नाही. या कथांमधील पात्रे सर्वसाधारण २६-३२ ची भासतात, त्यांचे विचार, प्रतिक्रिया, दैनिक व्यवहार हे या पिढीशी समांतर आहेत. हे महत्वाचे आहे कारण मराठीमधील बहुसंख्य प्रस्थापित लेखन हे काळाच्या दोनेक पिढ्या मागे असते आणि त्यामुळे चलनात असणारी पिढी नवी मराठी पुस्तके फारशी वाचत नाही. एका अर्थाने चेतन भगतने जश्या तरुणाईच्या कथा सांगून तरुण वाचकवर्ग काबीज केला, प्रणवच्या कथांसाठी ही शक्यता नाकारता येत नाही. चेतन भगतशी तुलना ही अशी आणि एव्हढीच, त्याच्या मागे पुढे न लिहीलेले कसलेही शब्द कुणी वाचण्याचा प्रयत्न करु नये!

 

प्रणवने या कथा वेगवेगळ्या दिवाळी अंकांसाठी लिहीलेल्या आहेत. दिवाळी अंक वाचताना ईतर साहित्यासोबत याही कथा वाचल्या गेल्या असतील, काही लोकांनी विविध अंकामधून प्रणवच्या एकापेक्षा जास्त कथाही वाचल्या असतील. पण जेव्हा मी (पहिल्या) पाच कथा सलग वाचल्या तेव्हा या कथांमध्ये मला एक ठराविक साचा आढळला. मी कथांमधली पात्रे तरुण असल्याचा उल्लेख आधी केलाच आहे. या शिवाय बहुतेक कथांमधली पात्रे ही उच्चशिक्षीत, नौकरी करणारी आणि डींक (डबल ईनकम-नो किड्स) आहेत. त्यांचं डींक असणं हा योगायोग नाही, ही त्या कथांमधली महत्वाची घटना आहे, मुल नसणे/ न होणे/ नको असणे याभोवती या कथा फिरतात. त्यामुळे या कथा सलग वाचताना, पात्रांची नावे वेगळी असली तरीही, आपण त्याच त्या व्यक्तींच्या आयुष्यात घडणाऱ्या विविध घटना वाचतो आहोत की काय हा प्रश्न पडतो. शिवाय कथांचा तोंडावळा, पात्रांची भाषा, आणि अंतरप्रवाहाचा पोत या गुणसुत्रांची रचना सर्वच कथांमध्ये सारखीच दिसते.  यातला धोका लेखकाला ओळखता आला पाहीजे.  वाचकाचा लंबक "गीत वही गातां हुं" ते "सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते!! तेच ते!!"  या दोन टोकांमध्ये कधी झुलेल हे सांगता येणे कठीण. 

 

चांगल्या कथांची काही गुणवैशिष्ट्ये सांगीतली जातात. त्यातले एक म्हणजे कथाबीजाचे सच्चेपण. या कसोटीवर मी लेखकाला पैकीच्या पैकी गुण देऊ शकतो. ज्या प्रकारचे कथाबीज रुजवीत या कथा पुढे जातात, ते मराठीत फारसे प्रचलित नाही. हा धागा मी परत आधी सांगीतलेल्या मुद्द्याशी जोडून देतो. हे कथाबीज "आजच्या" काळातील- "वर्तमान" काळातील आहे. मला या कथा वाचताना कुठेतरी गंगाधर गाडगीळांच्या कथा आठवत राहील्या, त्याही कथा तेव्हाच्या वर्तमान काळाशी समांतर होत्या. उदाहरणच घ्यायचे झाले तर "अभ्र्यांमधे दडलेलं फॅन्ड्री" या कथेचे घेऊ. दिसेल त्याचे किंवा दिसु तसे स्वतःचे फोटो सतत फेसबुक करणे, त्यावर लोकांची मत-मतांतरे हा भाग कथेत सुरेख दृष्य झालेला आहे. डिजीटल उश्या आणि आपल्या जगण्याचे हिस्से सामाजिक करीत जाणे यातला विरोधाभास ठसठशीत नसला तरीही तो नेमका हवा तेव्हढाच अंतर्प्रवाही आहे. पण-- पण त्याचवेळी या सगळ्याशी गुंतू पाहाणारा फॅन्ड्रीचा धागा विसविशीत राहातो. हा ’पण’ फार महत्वाचा आहे. थोडेसे कठोर होऊन सांगावे लागेल पण कथाबीजांचे सच्चेपण प्रणवने पुर्णपणे फुलवलेले नाही.  यातील अनेक कथाबीजात फुलण्याच्या अजून खुप शक्यता आहेत पण त्या शक्यता, का कोण जाणे, नीट चाचपल्या गेल्या नाहीत ही माझी मोठी तक्रार आहे. अपवाद "नाभितून उगवून आलेल्या वृक्षाचं रहस्य". प्रतिभा, चमकदार कल्पना आणि इन्स्टंट प्रतिक्रिया हे मिश्रण चांगल्या लेखकासाठी घातक आहे आणि उसंत नसलेल्या या काळात सामाजिक माध्यमातून व्यक्त होणाऱ्या प्रत्येक लेखकासाठी हा धोका आहे. कथा फुलण्यासाठी तिला जेव्हढा वेळ लागु शकतो, तेव्हढा वेळ लेखकाने तिला द्यायलाच हवा. 

 

कथा या वाङमय प्रकाराचा तोकडा जीव पाहाता, त्यात पात्रांची जत्रा फारशी अपेक्षित नसते. प्रणवच्याही कथा प्रामुख्याने दोनच पात्रांभोवती गुंफलेल्या दिसतात, पुरुष आणि स्त्री. या पात्रांमध्ये नवरा-बायको हे इतपत साधं (!) नातं आहे. कथांचे स्वरुप फॅन्टसी नसल्याने (अपवाद ’भाजीवाला’) त्यात कसले चमत्कार अपेक्षित नाहीत. तरुणाईच्या कथा असल्याने लैंगिकतेचे संदर्भ येतात पण ते कथेचा डोलारा पेलत नाहीत. (तर मग) कथा फुलण्यासाठी लागणारा विरोधाभास हा प्रणवने पात्रांच्या भुमिकांमधून उभा केला आहे. त्याची पात्रे अगदीच काळी-पांढरी नसली तरी ती बऱ्याच अंशी यीन-यांग प्रकारातली आहेत. एकमेकांना  छेदत जाणाऱ्या बौद्धीक भुमिका घेणे, स्वभावामधल्या टोचणाऱ्या कोपऱ्यांना धार आणणे आणि तरीही एकमेकांना पुरक असणे ही खास यीन-यांग लक्षणे कथांमध्ये उघड दिसतात. कथेची अशी रचना सोपी नसते. पात्रांच्या स्वभावातले कंगोरे हे हवे तेव्हढेच टोचरे  ठेवले नाहीत तर ते कर्कश्य तरी होतात किंवा बोथट आणि निरुपयोगी तरी. हा तोल लेखकाने खासच सांभाळला आहे. त्याची गडबड उडते जेव्हा त्याची पात्रे बौद्धीक भुमिका घेऊ पाहातात तेव्हा.  मुख्यतः दोनच पात्रे, त्यांची विशिष्ट रचना आणि बेताचे नेपथ्य या रचनेमुळे प्रणवच्या पात्रांना वारंवार बौद्धीक भुमिका घ्याव्या लागतात आणि एकदा का अश्या भुमिका घेतल्या की त्यांचे समर्थन आणि विश्लेषण करणे ओघानेच आले. एका वळणावर कथांमधल्या पात्रांनी वारंवार बौद्धीक भुमिका घेणे कथेच्या प्रवाहाला मारक तर ठरतेच पण वाचताना उगाच जड आणि कंटाळवाणेही वाटते. उदा. ’मूल’प्रश्न मधला हा छोटा प्रसंग-

 



 

या सगळ्या कथांमधून मला आवडलेली कथा म्हणजे ’नाभितून उगवून आलेल्या वृक्षाचं रहस्य’. माझ्या मते कथाबांधणीतील हा एक वेगळा, महत्वाचा आणि जवळ जवळ यशस्वी प्रयोग आहे. कथाकल्पना, निवेदनातला खेळ, कथेची गुंफण,  काळाचे प्रवाह आणि कथा फुलायला घेतलेले निवांतपण ही या कथेची बलस्थाने. थोडेसे धाडसी विधान असले तरी या कथेचे वर्णन मी भाऊ पाध्ये व्हाया खानोलकर असे करेन. या कथेतून कवी-प्रणव सखदेव वेगळा काढता येत नाही आणि तो काढू ही नये.

Comments

'अभ्र्यांमध्ये दडलेलं फॅन्ड्री' मला अगदी एकास एक लावून दाखवलेली वाटली होती. कथांमध्ये कोणता काळ आहे, ही गोष्ट माझ्यासाठी अजिबातच महत्त्वाची असत नाही. कारण कथेतला अंतर्गत वास्तव काळ कोणताही असला, तरीही मला तिच्याशी जोडून घेता आलं, तर आणि तरच ती मला महत्त्वाची वाटते. त्या दृष्टीनं माझा निकषच तो नाही. कौतुकाचं कारणही नाही. या कथांत बहुधा नसलेली, पण त्याच्या संग्रहातली एक कथा मला मेजर आवडली होती. सतत सोशल मिडियाला वाहिलेलं एक जोडपं. त्यातल्या पुरुषाचं प्रकरण. पण हे सगळं करताना आपण कुठेच नसलेले त्यात. सतत लोकांच्या प्रतिक्रियांची आस, हाव, भीती. संभोगाच्या उत्कर्षबिंदूपाशीही लोकांच्या प्रतिक्रियेत गुंतलेले आपण. ते मला अतिशय आवडलं होतं. पण त्याला ते सोशल मिडियापासून तोडून एकूण जगण्याच्या पद्धतीशी जोडून घेता आलं नाही. एरवी ती गोष्ट ऑलमोस्ट 'ब्लॅक मिरर'इतकी मोठी झाली असती. आणि हे त्याच्या बर्‍याच कथांबाबत होतं, असा माझा अनुभव.

बाकी हे मला 'अंकनामा'त करता आलं असतं तर.... असो. सगळ्या गोष्टी नाही जमत मनासारख्या. सॉरी, पुन्हा एकदा. तुलाही आणि प्रणवलाही.
प्रणव said…
बरेच दिवस मी हे शोधत होतो, मंदारने पाठवली याची लिंक परवा. असो. तर शक्यतो मी माझ्या लेखनाबाबत जे लिहिलं जातं त्यावर फार काही प्रतिक्रिया देत नाही. कारण प्रत्येकाची इंटरप्रिटेशन्स वेगळी असतात, ती असायलाच हवीत या मताचा मी आहे. पण अभ्र्यांमध्ये दडलेलं फँड्री या कथेवरच का एवढा फोकस आहे ते समजलं नाही, ती कथा सर्वांत लहान असावी व दीर्घकथा असलेली 'नाभितून...' या कथेबाबत एकच पॅरा आहे. असो. शेवटी लेखकाचा निर्णय.
कथा वाचून आपलं मत प्रदर्शित केल्याबद्दल मनापासून आभार.
Tulip said…
Hi,
Just testing.