भंपि

भाऊ, धाडस लागतं तसले पिक्चर बघायला.

कुणी ही सोम्यागोम्या नाही पाहु शकत तसले पिक्चर.

अश्या विचित्र नजरेने काय बघता? आम्हाला आवडतात तसले पिक्चर. जर कुणी तन-मन-धन घालून आपल्या अंगभुत कलेचं प्रदर्शन करत असेल तर आपण प्रोत्साहन नको द्यायला?

Wait a minute.. तुम्ही हे तसल्या-तसल्या शब्दा मुळे आमच्याकडे असे बघताय का? अहो मी बोलतोय मनःपुत भंकस पिक्चर्स उर्फ भंपि बद्दल...

हं coming back to the point , तर आम्हाला असले (यावेळी तसले नाही)पिक्चर्स आवडतात. आम्ही त्यांना एंजॉय करतो. खरंच!

आता बघा, पाथेर पांचाली किंवा जन अरण्य किंवा अपूर संसार बद्दल तुम्ही-आम्ही काय लिहिणार? म्हणजे, एक तर कळत नसताना उगीच आर्टी व्हायचं, जगातल्या कुठल्याशा भोकात बसणारा एक समिक्षक त्या पिक्चरची स्तुती करणार आणि मग आपण त्याची रि ओढायची. यात काही राम आहे का? (हा सध्या कळीचा प्रश्न आहे म्हणे). काही लोकांना आपली लायकी कबूल करणं भयंकर अपमानास्पद वाटतं पण गुरु, दिलवाले दुल्हनिया..(सुस्कारा SS ) वगैरे पब्लिक कॅटॅगरीतल्या पिक्चर्स बद्दल बोलायचं तर आपल्याला तिथं कुत्रं पण हुंगत नाही. तिथे तरण आदर्श, मसंद असले महागुणी खांब आहेत. तर आता आपल्या वाट्याला काय राहातं? हंSSSSS बरोब्बर...आपल्या वाट्याला राहाते भंपिची समिक्षा. खरं सांगु का? अहो मजा असते असले पिक्चर बघण्यात.

आता या "छंदा"ची सुरुवात कुठून झाली? ज्याकाळी (म्हणजे इयत्ती दहावी पर्यंत)आई-दादा घेऊन जायचे तेच (वर्षातुन एक किंवा दोन) पिक्चर आम्ही बघायचो, त्याकाळात शाळा बुडवून (किती विचित्र- शाळा बुडवुन काय? बहुतेक शाळा न आवडणारया माणसानं फेकलेलं वाक्य दिसतय) मी आणि भुषण फडणिस नावाचा सर्वार्थाने स्वच्छ मित्र घरी न सांगता पिक्चरला गेलो. त्याच दिवशी आम्ही पकडलेही गेलो आणि शाळेत सरांसमोर दादांचा मार खाऊन झाल्यावर आम्हाला पिक्चरचं नाव विचारलं गेलं. "शिरडी के साईबाबा" आम्ही अत्यंत निरागस चेहरयाने सांगितलं (शाळेत वर्गातल्या मुलीबाळींसमोर अपमान झाला की चेहरयाचं जे होतं त्याला निरागस चेहरा म्हणतात- गरजुंसाठी निरागस चेहरयाची व्याख्या). आणि माझ्या या भयंकर छंदाची अशी सुरुवात झाली, kick start म्हटलं तरी चालेलं.

आता या भंपिचा पण आपला म्हणून एक क्लास असतो. बनवतानाच एखादा सिनेमा एका विशिष्ट वर्गासाठी आणि मुद्दाम बकवास केला तर तो भंपि नाही म्ह्टला जाऊ शकत उदा. मिथुनचे शिणेमे (गुंडा, चिता, चांडाल!!!!). खरा भंपि हा नैसर्गिकरित्याच भंकस बनतो उदा. दौड. बहुतेकवेळा अत्यंत निर्मळ मनाने अश्या चित्रपटांची निर्मिती झालेली असते. दरवेळीच असे भंपि विनोदी असतात असेही नाही. आता मी काही उदाहरणे इथे देणार आहे. तुम्हाला माझी या विषयातली मास्टरी दाखवण्याचा यात अजिबातच हेतु नाही हे मी नम्र पणे सांगु ईच्छितो. सरहद नावाचा एक सिनेमा आहे. मला खात्री आहे, तुम्ही तो पाहिलाच असु शकत नाही. दिपक तिजोरी हिरो असणारा भंपि कोण बघणार? आम्ही हा भंपि बघितला कारण दिपक त्यात इंजिनिअर होता. एका वयात समव्यवसायी बंधु विषयी जो कळवळा वाटु शकतो केवळ त्या पोटी आम्ही हा भंपि बघितला. याच इसमाचा पहला नशा नावाचा सो-कॉल्ड सस्पेन्स भंपि पण मजा मारत बघितला. तस्साच सैनिक नावाचा भंपि आम्ही नितळ देशप्रेमापोटी बघितला. त्यात भलतच प्रेम ऊतु जातं होतं हा वेगळा भाग. अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण उगाच तुम्हाला कॉम्प्लेक्स यायला नको म्हणून थांबतो.

निर्मिती प्रक्रियेकडून आता आपण असा एखादा जेन्युईन भंपि कसा बघावा या कडे वळु. ही तपश्चर्या थोडी कठीण, पण जमणेबल आहे. सर्वात आधी मनातले विकार काढा. मोह-मत्सर यांच्यावर विजय मिळवणे हीच भंपिच्या यशाची पहिली पायरी आहे. आता काही तरी होईल मग काही तरी होईल असा विचार करुन भंपि बघाल तर हाती काहीच लागणार नाही. दुसरी पायरी म्हणजे निरपेक्षता. भंपि बघताना कसल्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत, मनात कसलेही पुर्वग्रह ठेवायचे नाहीत आणि लोकांच्या कुत्सित कॉमेंट कढे तर लक्ष मुळीच द्यायचं नाही. पडद्यावर समोर जे चालु आहे त्यात मजा शोधायची. हे काय सुरु आहे आणि मी इथे का आहे हे मुळ प्रश्न भंपि बघताना डोक्यात आले जरी तरी तुमची तपश्चर्या भंग पावु शकते. आणि तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे शहाणे करुनी सोडावे सकळ जन. भंपि बद्दलचे गैरसमज दुर करत अजून मित्र-मैत्रिणी भंपि चळवळीत सामिल करत जायचे.

भंपि हे व्यसन किंवा छंद आहे हे म्हणण्यामागे कोणताही सटायर नाही. आजा मेरी जान नावाचा किशनकुमारचा भंपि बघायला आम्ही २ तास आधी अभिनवला गेलो आणि आरडी ची आजा मेरी जानची अप्रतिम कॉम्पोझिशन ऎकायला मिळाली. प्रभुदेवाचा मुकाबला बघायला २ तास आधी गेल्यामुळे आधीच्या शोतलं मुकाबला-मुकाबला गाणं ऎकायला मिळालं. हे गाणं भंपित शेवटी आहे त्यामुळे भंपि शेवटपर्यंत बघायचा आणि या पुढे कधीही डब्ड साऊथ इंडि. सिनेमा बघायचा नाही हाही बोध मिळाला. चॉकलेट बघितलाय का? बहुतेक इंग्रजी सिनेमाची कॉपी वाटावी इतपत भारी भंपि. दौड हा तर भंपि शिरोमणी म्हणावा या लायकीचा सिनेमा आहे-मास्टरपिस! वाक्यावाक्याला विनोद आणि हशे. मैं हुं ना, बादशाह हे भंपि तर मी कितीही वेळा, कोणत्याही सीन पासून, कुठेही पाहू शकतो. गोंद्याचे अनारी नं १ हा त्यातल्या सिमरन नावाच्या इसमी साठी आणि हद कर दी आपने त्यातल्या गाढवाच्या सीन साठी (मेरा वजन जादा है तो मेरी बात का वजन भी तो जादा होगा!!) लै वेळा बघुन झाले आहेत. कच्चे धागे तुम्ही बघितलाय का? नुसरत फतेह नं नुस्तं पाडलय. मेलेल्या डोळ्यांचा देवगण, (तेव्हा) बायलट सैफ, नाचण्यापुरत्या बाया आणि नुसरतची अमेझिंग कव्वाली आणि सुफी ट्रीट. कधी कधी भंपि एखाद्या प्रसंगातही अमर होतो. भयंकर फ्लॉजवाला ऋतिकचा फिजा हा एक अप्रतिम भंपि केवळ त्यातली महासुंदर दिसलेली सुश आणि पिया हजी अली या रेहमानच्या डेडली कॉम्पोजिशन यामुळे भंपि ठरत नाही. ऋतिकचे दोन प्रसंग; एकदा तो जेव्हा व्हिलनची बाईक पेटवतो आणि एकदा जेव्हा त्याला पोलिस पकडुन नेतात आणि अत्यंत असहाय नजरेनं तो जया भादुरीकडे बघतो...हा पोट्टा खाऊन टाकणार सगळ्यांना...असो. भंपिपाई सेन्टी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आय ऍम ओके, आय ऍम डुईंग फाईन.

सगळ्याच चांगल्या गोष्टींचं जे होतं तेच आता भंपिचं ही होतय. परवाच झुम बराबर बघितला आणि डोळ्यात पाणीच आलं. आम्हाला आवडतात म्हणून अभिषेक आणि प्रितीनंही भंपि करावा?

Comments

Mints! said…
aai g :) tula filmfare dyayala havey tujhya hya guNavattebaddal :)

maayboli var sadhya achat aNi atarkya logic ashya movies chi chirfad chalu aahe. vaachun paha jamale ter :)
Yogesh said…
daud peksha ddlj jast bhampi ahe asa vatata
Monsieur K said…
amongst the bhampi category movies tht i can start watching frm any scene onwards: Kahi Pyaar Na Ho Jaaye, Main Hoon Na, Hero No 1, Saajan Chale Sasuraal (the last two could be debatable entries in this category) :D
सही लिहिलंय. :-))
ही माझ्या आवडत्या भंपिंची यादी :-

१. प्रेम अगन
२. खुशी (यातल्या हिरो हिरॉईनमध्ये भांडण होण्याचे कारण अप्रतिमच! एवढे डोके तोवर कुणी लढवले नव्हते.)
३. रूप की रानी चोरोंका राजा (माझ्या वाढदिवसाला दहा मैत्रिणींना दाखवला होता हा सिनेमा मी... त्यानंतर त्यांपैकी एकीनेही पुन्हा मला वाढदिवसाची पार्टी मागितली नाही.)
४. सौदागर
५. बंधन
६. मेहेंदी
७. तेरा जादू चल गया
....
....
यादी वाढत जाईल म्हणून थांबते आता. :-P
Megha said…
hmm....mala aathvan aali tabu chya prem rog chi.mi aani kalyani ne ratri 3 paryant jagun enjoy karun pahilela picture...tyatli noha ki kashti,punarjanma....dhammal aahe nusti.by the way kachche dhage che ganne mala pan aavadtat manapasun..
a Sane man said…
hahaha...masta zalay lekh!!!

Jaani dushman navacha bhampi mazya yaidt sarvat var aahe...ni "kanishThikadhishThit kalidasa..." chya nyayane tee yadi tithech sampate...ha aamhi 30-35 lokani miLun pahila hota tyachi aathavaN zali...:)
Samved said…
Thanks a lot friends. I am so glad that I am not only one pursuing this hobby!!
Anand Sarolkar said…
Ya "Bhampi" list madhe Saglayt jast cineme Ramuche janar...
e.g. Gayab, Darna mana hai, Darna zaroori hai, D, ani latest mhanje darling ani AAG..sorry sorry AAG nahi...Ram Gopal Varma ki AAG!!!