दुर्मुखाच्या आयुष्यातील निरर्थकता!

'ऑऑऑ' दुर्मुखाने अगणिताव्यावेळी जांभई दिली. "आज शुक्रवार, पाच वाजलेत म्हणजे टिंब्या गेला असेल. आपणही कटोफाय" मनाशीच पुटपुटत दुर्मुख लॅपटॉपची सुरळी करु लागला. " करा लॅपटॉपची सुरळी आणि घाला.." "दप्तरात!" टिंब्याच्या आचकट विचकट कॉमेंटला मनातल्या मनात (अजून कसं?) तत्परतेने उत्तर देतं दुर्मुख जरा जास्तच जोरात बोलला. "कायरे कसले प्लॅन करतोयस? weekend चे?" "नाही गं" ठकीला सांगावं की कसं या गोंधळात दुर्मुख असतानाच ठकी अगदीच जवळ आली. "या बाईला दुसरया पासून किती अंतरावर थांबावं हे कळत नाही" हा दुर्मुखचा विचार ठकीने लावलेल्या उंची perfumeच्या वासात विरुन गेला आणि स्वतःच्या नकळत दुर्मुखाने बॉसचे लॅपटॉपबद्द्लचे विचार जमतील तेवढे सभ्य करुन सांगितले. "तसंच काही नायरे दुर्मुख" ठकीने मानेला एक सुरेख झोका दिला. "माझं नाव दुर्मुख नाहीये", दुर्मुख मनातल्या मनात (परत?) पुटपुटला. "पण मगं माझं खरं नाव काय?" दुर्मुखाला स्वतःलाच ते आठवलं नाही तसं या त्रासदायक विचारांपेक्षा ठकीकडे नीट लक्ष दिलेलं बरं असं त्यानं ठरवलं. "ठकी बॉसचा मर्जीतली, तिच्याशी चांगल्या भावनेने बोलायला पाहीजे" दुर्मुख या विचारांसरशी दचकलाच. "च्यायला! मी आत्ता या बाईला नक्की काय काय सांगीतलं?" दुर्मुखाचं डोकं एव्हाना दुखायला लागलं होतं; ते नक्की आत्ता झालेल्या साक्षात्कारमुळे की ठकीच्या perfume मुळे हे दुर्मुखालाच उमजत नव्हतं. ठकीच्या स्लीवलेसकडेही जेंव्हा त्याचं लक्ष गेलं नाही तशी आपल्या निरर्थकतेची जाणीव दुर्मुखाला नव्याने झाली.

दुर्मुख तसा अगदीच टाकाऊ नव्हता. पण त्याला हसताना शेवटचा कोणी पाहीला हा जसा पैजेचा विषय झाला तसं दुर्मुख हे त्याचं नाव त्याच्या सकट सगळ्यांनीच मान्य केलं. टिंब्याचं तसं नव्हतं. टिंब्या कायमच dotted lines च्या भाषेत बोलायचा आणि अर्धवट भरलेल्या ppt पुर्ण करायला forward करायचा म्हणून तो स्टाफपुरता टिंब्या. त्याचा सगळा स्टाफ त्याला त्याच नावाने ओळखायचा म्हणून lets call him टिंब्या. टिंब्याची प्रजननक्षमता अफाट होती. तो कायमच नव्यानव्या आयडीया प्रसवत राहायचा आणि दुर्मुख अजूनच खचत जायचा.

टिंब्याचं नवं initiative होतं personal productivity मोजायचं. जगभर sales target हीच मोजमापाची पट्टी असताना टिंब्या salesvolume, total sales, cost of selling, time to sale, inventory, shelf life, customer satisfaction index असल्या बरयाच गोष्टींचं combination असणारा एक फॉरम्युला घेऊन आला होता आणि दुर्मुखाला आता त्याच्या लोकांच्या personal productivity मोजून द्यायच्या होत्या.

"सर, आम्ही कामं करायची की तुम्ही दिलेली कोष्टकं भरत राहायची ते एकदाचं सांगा"
"हा डेटा आपण ठेवतच नाही दुर्मुख, बेसलाईन कसली काढणार, कप्पाळ?"
"सेल्सवाले म्हणतात मार्केटिंगवाल्यांना कामं नाहीत म्हणून हे चाळे सुचतायत"

टीमच्या उदंड प्रतिसादावरुन आपली quarterly review त कशी लागणार हे नकळण्या इतपत दुर्मुख निर्बुद्ध नव्हता.

दुर्मुख: टिंब्या सर हे आमचे आकडे. जसं की तुम्हाला pptत दिसतच आहे आम्ही...
टिंब्या: दुर्मुख, sales is function of market तुला नव्याने सांगायला नकोय. तुमचे नंबर्स उत्तम आहेत कारण लोकांना तुमच्या सॉफ्टवेअर्सची गरज आहे. तुमचं असंcontribution काय? मला personal productivity चे नंबर्स देशील तर मी तुमचा performance judge करु शकेन.

आता ही आकडेवारी दिली तर टिंब्याला आपलं contribution नव्याने कसं कळेल हे न लक्ष्यात आल्यानं दुर्मुख खुळावला.

"सर, आपण साईटच्या हीट्स गॄहीत धरुया"
"अपग्रेड म्हणजे shelf life समजलं तर?"
"सगळे आकडे जमा करु, outlayers काढू, मिनीटॅब इक्वेशनच देईल काढून"
या सगळ्याचा आपल्या सॉफ्टवेअरच्या खपाशी काय संबंध आहे हे न समजुन ही दुर्मुखाने रिकामे पणाने मान हलवली.

Review-II टिंब्या आम्ही काहीतरी केलय रे. pilot करतोय.
स्वतःच्या नकळत दुर्मुख खेळात सामील झाला. ठकीनं कौतुकानं पाहीलं तशीतर पोरांनी केलेल्या कामाची त्याला स्वतःलाच नव्याने खात्री पटली. मिटींग रिक्वेस्ट पाठवून ठकी साठी कॉंन्फरन्स रुम मधे त्याने एक डेमोही दिला. यावेळी मात्र त्याने ठकीच्या स्लीवलेसकडे निरखुन पाहीले. "नवीन काही करायचं झालं तर जुनी गॄहीतके मोडावी लागतात. डॊळ्यांवरचे चष्मे उतरवून आपल्याला नव्या दॄष्टीने परिस्थीतीकडे पाहावे लागते. It's all about common sense which is not common!" ठकीचा पदर किचिंत ढळला नसता तर दुर्मुख बोलतच राहीला असता. सावरासावरी करुन ठकीनं कल्पनेपलीकडचा प्रश्न विचारला;" याचा तुमच्या कामाशी काय संबंध रे दुर्मुख?" ठकीने मानेला दिलेला गोड झटका दुर्मुखाला गर्तेत कोसळताना किंचीत जाणवला.
review-III. Stage : Pilot
review-n. Stage : Pilot
"दुर्मुख, लॅपटॉपच लोणचं घालू नकोस. तुला आम्ही तो enabler म्हणून दिला आहे. किती दिवस पायलट पायलट खेळणार आहेस?"
"काही तरी फालतू घेऊन आमच्याकडे नका येऊ रे. सेल्स कसा करायचा आणि वाढवायचा आम्हाला माहीतीये"
"सर, आपल्या ग्रुपमधे गेल्या दोन वर्षात कोणालाच प्रमोशन नाहीये, इतकं path breaking इक्वेशन देऊनही!"
"तू घरी कशाला येतोस जर ते डबडं तुला सतत उघडं ठेवायचयं तर?"
"दुर्मुख, तू काम छान delegate केलयसं हं"(मानेला गोड झटका) "आता कसं, तू नसलास तरी तुझी मुलं देतात हवी ती माहीती"

आयुष्याची दिशा हरवल्यासारखा दुर्मुख भांबवला होता. वाढणारा सेल्स, वापरात नसलेली इक्वेशन्स, पोरांची अडकलेली प्रमोशन्स, ठकीचा स्लीवलेस, टिंब्याचे आचरट विनोद...दुर्मुखाला कशाचीच संगती लावता येत नव्हती. रिकामेपण वाढलं तसं दुर्मुखाच्या डोक्यात भलतेसलते विचार यायला लागले.

मनाचा हिय्या करुन शेवटी दुर्मुखाने आत्मह्त्येचा निर्णय घेतला. कोंडी सुटण्याचा हा एकच मार्ग आहे याची खात्री पटल्यावर दुर्मुखाने हिशोब मांडले. पीएफ, इन्श्युरन्स, दगडं-माती सगळे मोजले तर बायको-पोरांच आयुष्य सुखात जाईल याची त्याला खात्रीच पटली. आपल्या अंगात एक नवा उत्साह संचारला आहे याच्या जाणीवेने त्याचं मन प्रसन्न झालं.

दुर्मुखाच्या चेकलीस्टमधला शेवटचा आयटम म्हणजे ठकीला हे सगळं सांगणे.

नेहमीचे सारे रुटीन (मानेला झटका वगैरे) पार पाडल्यानंतर ठकी किंचित गंभीर झाली. "किती सुंदर दिसते ही गंभीर झाली की. पण मला आता याचा काय उपयोग?" दुर्मुखाने जमेल तेवढा दीर्घ सुस्कारा टाकला. त्याच्याकडे कम्प्लीट दुर्लक्ष करत ठकीनं legal point काढला "दुर्मुख, तुझ्या सगळ्या प्लॅन मधे एक झोल आहे रे. तू सुसाईड केलीस तर तुझ्या बायडीला इन्श्युरन्सचे पैसे नाय रे मिळणार!" आता दुर्मुखाच्या तोंडून नैसर्गिक सुस्कारा पडला. "च्यायला, आपल्याला एवढं साधं कळू नये" दुर्मुखाच्या डोळ्यात आता विषाद दाटून आला.

खुप कठोर होऊन दुर्मुखाने ठकीचा मोह सोडला! नौकरी बदलली!! त्याच्या आयुष्यात हा एक क्रांतीकारकच बदल होता.

जुन्या बायको-पोरांसहीत नव्या नौकरीत नव्या निरर्थकतेसह दुर्मुख सुखाने नांदु लागला!

Comments

आपण सगळेचजण कधी दुर्मुख असतो आणि कधी ठकी... एका रोलमधे असताना दुसऱ्याला हसायचं इतकंच!
BTW thanks for adding the link to my blog on your blog. :)
Megha said…
kay bhayankar lihala aahes.....
pipat mele olya undir peksha jad gela
mad-z said…
संव्या, तुझ्या लिहिण्याबद्दल काय लिहायचं. तुझे टिंब्या ठकी आणि कोण कोण ते "item" सगळ्याच ऑफ़िसात सापडतात. आणि त्यांच्यात एक विलक्षण साम्य असतं. तुझा ब्लॉग वाचतान मागली १० वर्ष मेन्दुतून समोर सरकली. मला भेटलेले सगले टिंबे आणि दुर्मुख आठवले. आणि सगळ्यात जास्ती आवडली ती लॅपटॉपची सुरळी. सोमवार ते शुक्रवार अशी ऑफ़िसची वारी करणारे वारकरी पुष्कळ पाहिलेत. पण तुझा ब्लॉग वाचताना त्यांच ते "नव्यानं" आठवणं अगदी धमालंच होतं. थोडक्यात म्हणजे मनात हसू पेरून गेलं.
लिहीत जा आणि थोडी frequency वाढव.
Amit said…
farach chaan
asach lihit jaa