Monday, April 2, 2007

मुकुल शिवपुत्र कोमकली

मुकुल शांतपणे विलंबित लयीत गाणं सुरु करतो, तब्येतीत.

राग: बागेश्री
स्थळ: अजीबातच महत्वाचं नाही (घर, कार; जिथे शांतता असेल ते कोणतही).

पहीली पाच एक मिनीटं तो कुमारांचा मुलगा आहे वगैरे मनावर ठसवण्यावर जातात (आपणच आपल्याच मनावर रे). पुढची अजून काही मिनीटं त्याची कुमारांशी तुलना करण्यात जातात, त्याचा आवाज किती कुमारांसारखा आहे नै, पण कुमारांसारखा मोकळा गात नाही वगैरे टिपीकल सवाई गंधर्व महोत्सवी कळाहीन कॉमेंट्स नोट करण्यात जातात, आपण बिल्कुल लक्ष नाही द्यायचं. मुकुल गातच असतो.

मुकुल गात नसतो, मुकुल सुटलेला असतो.

मुकुल अप्रतीम सहजतेने रागाची मांडणी करतो, तानांची भेंडोळी उलगडणं वगैरे फालतु लाडच नाहीत, आरोह-अवरोहं सारं शिस्तीत. स्पष्ट उच्चार, अफाट effortless पणे रागाची मांडणी; मुकुल माझ्या अंगांगात भिनतो, या बाबतीत डिट्टो कुमार! मध्येच कधीतरी लक्ष्यात येतं त्याच्यावरच्या कर्नाटकीचे संस्कार, कुमारतर आहेतच पण तरीही याची अशी एक शैली आहे. शरीराला सहन न होणारा वेग - मग अचानक थांबणं - काही कळायच्या आधीच परत हा माणूस त्याच गतीतून प्रवास करत असतो, भौतिकशास्त्राचे सारे नियम खुंटीवर टांगून! मध्येच अंगावर येणारी एखादी तान; "ग म नि गा..ग म नि सा.." मला तर ऎरावतावरुन जाणारा एखादा राजाच आठवतो! कधी सुरांना अत्यंत लडीवाळपणे, तर कधी सरळ पणे भिरकावून देणारा राजा..."आवोजी लाला घर बिठलाऊ...रितू बसंत"

मुकुलनं आता माझा पुर्णपणे कब्जा घेतलेला असतो.

आता थोडा फ्लॅशबॅक..

२००७ च्या फेब्रुवारीत मी एक चक्कर मुंबईला मारली होती ती फक्त काही पेंटीग आणि चांगल्या CDs मिळतात का ते बघण्यासाठी. या वेळी सगळ्या नातेवाईकांना टांग मारायची असं ठरवलच होतं. फक्त आणि फक्त CST ते जहांगीर असेच दिवसभर हिंडायचे ठरवून आम्ही शेवटी जहांगीर समोरच्या म्युझीक शॉप मधे मुक्काम ठोकला. आणि अचानक मुकुलची CD दिसली. कोणत्याही कलाकाराच्या खाजगी आयुष्याशी त्याच्या कलेचा संबंध जोडायचा नाही या माझ्या नियमानुसार मी कधीच कुमारांचा family tree follow केला नव्हता. मला फक्त कलापिनीच माहीत होती. त्यामुळे मुकुल हे मला नविन find होतं.

पुण्याला आल्याआल्या धडधडत्या अंतःकरणाने मी कारच्या डेकमधे CD सरकवली; शिगेला पोचलेली उत्सुकता, भिती, आनंद असल्या काहीतरी विचित्र भावना मनात होत्या जणू माझीच मैफील होती! By the time Mukul completed his first few minutes, I was knowing, मुकुलनं मला झपाटलेलं आहे.

ताबडतोब सागर आणि आनंदला मेल टाकले; मुकुल ऎकला नसेल तर आयुष्य व्यर्थ आहे म्हणून. सागर काही बाबतीत आपलं बारसं जेवलाय माहीत असून मी बरयाच वेळा हा गाढवपणा करतो. काही मिनीटांनी सागरचा (नेहमी प्रमाणेच) शांतपणे मेल आला; आत्ता ऎकतोय हो लेका? अरे जबरा प्रकार आहे, गात राहीला तर कुमारांच्या पुढे जाईल असं वसंतराव म्हणायचे! काही हरकत नाही..मी मनाशी बडबडलो..आपण आपलं काम केलं. आनंदन काही ऎकलं नव्हतं हा त्यातल्या त्यात दिलासा :). घरी आल्या आल्या त्याला ऎकवला. तोही खलास.

नेहमीच्या प्रथेनुसार मुकुल अजून काय काय गायलाय शोधतोय, ईशा मिळालीय कदाचित कॄष्णा नावाची पण एक CD आहे. पुण्यात कुठे मिळेल?
Please अलुरकरांचा संदर्भ नको...पुण्यासंबधी ज्या काही अफवा आहेत, अलुरकरही त्यातलीच एक अफवा आहे...

1 comment:

Abhijeet Y Rajapure said...

SIR Mukul shivaputra yanche bharpur audio youtubewar available aahet