पुत्र व्हावा ऐसा पढाकू
ऎसी अक्षरे (२०१५)साठी लिहीलेला हा लेख (http://aisiakshare.com/node/4133), इथे परत डकवत आहे-
सोप्या गोष्टींबद्दल लिहिणं फार कठीण असतं हे वाक्य अनंत वेळा वाचूनही टोचत नाही, जोपर्यंत ती वेळ तुमच्यावर येत नाही. आज ही वेळ माझ्यावर आणल्याबद्दल संपादकांचे आभार मानावेत की त्यांना बोल लावावेत हा प्रश्नच आहे.
भा. रा. भागवतांची पुस्तकं आनंदानं वाचणं वेगळं आणि त्यांच्या लिखाणाचं तथाकथित मूल्यमापन करणं वेगळं. आज मागं वळून बघताना जाणवतं, की भारांचं स्थान तेच आहे जे आपल्या आवडत्या मावशीचं, दादाचं, आजीचं असतं. तिथं डावं-उजवं करताना मनात एक हळवा कोपरा आधीच तयार झाला असतो. भारांच्या लिखाणाचं मूल्यमापन करताना हा दुसरा अडथळा! असो. प्रयत्न करण्यात फिजूल मुजोरी कशाला?
मराठी साहित्याच्या मर्यादित परिघात आपण असंख्य वर्तुळं आखून ठेवली आहेत; विविध साहित्यप्रकार (कथा, कादंबऱ्या, कविता, लघु-दीर्घ कथा, कविता, प्रवासवर्णनं, इ. इ.) हे सर्वात मोठं क्लस्टर. त्यातही आपण दलित-बहुजन-ब्राह्मणी, शहरी-ग्रामीण, पुरुष-महिला, प्राचीन-अर्वाचीन, पश्चिम महाराष्ट्रातलं-विदर्भाकडचं-वऱ्हाडी-मराठवाडी-खानदेशी, बालसाहित्य-कुमारसाहित्य-मोठ्याचं साहित्य, गंभीर-विनोदी-शृंगारिक अशी असंख्य डबकी तयार करून ठेवली आहेत.
त्यांतला सर्वांत दुर्लक्षित वर्ग म्हणजे बाल/कुमार साहित्य. ना समीक्षकांनी याची कधी फारशी दखल घेतली, ना गंभीर वाचकांनी. 'मुलांचं साहित्य... त्यात बोलण्यासारखं काय असतं?' हा जो आविर्भाव आपण सगळ्यांनीच बाळगलेला असतो, त्यामुळे राजा मंगळवेढेकर, साने गुरुजी, ना. धों. ताम्हनकर, भा. रा. भागवत, विंदा करंदीकर, सुमती पायगांवकर, लीलावती भागवत, आत्ताचे माधुरी पुरंदरे, दिलीप प्रभावळकर (आणि इथे उल्लेख नसलेली असंख्य नावं) यांच्या लिखाणाचा विशेष गंभीरपणे अभ्यास केला गेला नाही. भारांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ज्या काळात, ज्या संख्येनं आणि ज्या दर्जाचं लिखाण त्यांनी केलं, त्याला खरं तर तोड नाही. ज्यूल व्हर्नच्या कादंबऱ्यांचं भाषांतर असो, शरलॉक होम्सचं भाषांतर असो, हॅरी पॉटरचा बाबा शोभेल असा फाफे असो किंवा पुस्तकी किडा बिपिन बुकलवार असो; त्यांचं लिखाण प्रवाही, भाषांतर नैसर्गिक आणि भाषा वाचकाच्या वयोगटाला साजेशी होती. त्यांच्या दोन मानसपुत्रांपैकी फाफे निर्विवादपणे वाचकांचा सर्वात लाडका होता. फाफे स्वतःच त्याच्या साहसकथांचा नायक होता. पण दुसरी वल्ली - बिपिन बुकलवार, पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच तेव्हढीच जवळची वाटते हेही खरंच.
.
तर या पढाकू मुलाची ही 'किंचितकुंडली'...
बिपिन बुकलवारबद्दल लिहिण्याआधी, मुलं काय वाचतात, याबद्दल आपल्याला थोडासा विचार करावा लागेल.
बाल ते कुमार हा वयोगट सर्वसाधारण २ ते १८ वर्षं अश्या सोळा वर्षांमधे विभागला गेला आहे. या सोळा वर्षांमधे वाचनाच्या आवडी कशा बदलतात हे मांडण्याचा प्रयत्न या चित्रातून केलेला आहे. ही मांडणी कुठल्याही अभ्यासावर केलेली नाही, तर ती निरीक्षणावर आधारित आहे. शिवाय काळानुरूप यातली काही निरीक्षणं बदलतील किंवा बदललेली असतील. २ ते ६ या वयोगटातल्या मुलांना गोष्टी 'सांगितल्या' तरच त्यांना त्यांचं आकलन होऊ शकतं. त्या अर्थानं ते वाचक कमी आणि श्रोते जास्त असतात. पालक मुलांच्या वाचनासाठी कशी वातावरणनिर्मिती करतात (त्यांचं स्वतःचं वाचन, घरामधलं पुस्तकांचं स्थानं, पुस्तकांची खरेदी, इ.) यावर, भविष्यात हे श्रोते वाचन हा छंद म्हणून जोपासतील का, हे बर्याच अंशी अवलंबून असतं. ६ ते ८ वर्षं या वयोगटातल्या मुलांना जर वाचनाची आवड निर्माण झाली, तर ती छोट्या छोट्या गोष्टी स्वतः वाचू शकतात आणि ती खऱ्या अर्थानं वाचकाच्या भूमिकेत शिरतात. या वयोगटातल्या मुलांसाठी पुस्तकांची आणि विषयांची निवड बहुदा पालक मंडळीच करतात. नवव्या वर्षानंतर वाचणारी मुलं 'स्वतंत्र वाचक' या भूमिकेत अधिक ठामपणे शिरलेली असतात. आपल्याला काय वाचायचं आहे, आपल्याला काय आवडतं याच्या निवडीचा आत्मविश्वास त्यांच्यामधे निर्माण होतो.
आता या चित्राकडे जरा नीट बघितलं, तर असं लक्षात येईल की सर्वसाधारण ९ ते १८ वर्षं या सर्वात मोठ्या कालावधीच्या वयोगटामधे धाडस, पराक्रम, रहस्य, गूढ या जॉनरचं वर्चस्व आहे (हा कदाचित थोडा पुरुषी दृष्टिकोन असू शकेल!). गंमत म्हणजे इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीतही सर्वसाधारणपणे हाच साहित्यप्रकार जास्त 'चालतो'. या प्रकाराचं गारूड वाचकांवर दीर्घ काळ, पिढ्यानंपिढ्या चालत आलेलं आहे. या गोष्टींचे नायक एका अर्थानं कालातीत असतात. या नकाशावर आपण आपले लेखक मांडले तर असं लक्षात येतं, की भारांनी मुख्यतः या वयोगटासाठीच आणि याच जॉनरच्या गोष्टी लिहिल्या. भारांच्या नायकांची मोहिनी मराठी वाचकांवर प्रदीर्घ काळ रेंगाळण्याचं हे एक कारण.
बिपिनच्या बालमित्रांना तो ज्या गोष्टी सांगतो, त्या याच प्रकारात मोडणाऱ्या होत्या. पण एक फरक असा की त्या ६ ते ८ वर्षं या वयोगटातील मुलांनादेखील समजण्याजोग्या होत्या.
.
पात्रं
बिपिन बुकलवारच्या पुस्तकांचं स्वरूप हे 'कुणीतरी सांगितलेल्या गोष्टी' (असॉर्टेड गोष्टी) असं आहे. जेव्हा एक संदर्भबिंदू तेवढा पक्का असतो आणि इतर रचना विसविशीत असते, तेव्हा ही पद्धत वापरलेली दिसते. उदा. विक्रम-वेताळाच्या गोष्टी, सत्यनारायणाच्या गोष्टी, अरेबियन नाईट्स, इत्यादी. बिपिन आणि विजू-मोना हे एवढेच काय ते भारांनी ठरवलेले संदर्भबिंदू आहेत. त्यात बिपिन हा गोष्ट सांगणारा आणि विजू-मोना हे गोष्ट ऐकणारे, अशी रचना आहे. या तिघांबद्दल ठामपणे काही सांगणं थोडंसं कठीण आहे. 'भारा' ती पार्श्वभूमी तयार करत नाहीत. बिपिन कुठून आला, कुठे राहतो, विजू -मोनाशी त्याचं नेमकं नातं काय आहे, हे त्यांनी वाचकांवर सोडलेलं आहे. विजू-मोना ही जुळी देशपांडे भावंडं बिपिनच्या शेजारी राहतात हे नक्की. बिपिन कुठेतरी कॉलेजमधे जात असावा, बहुधा पदवीच्या दुसऱ्या वर्गात वगैरे, आणि त्याला विविध विषयांमधे रस असावा. त्याचं वाचन चौफेर आणि जबरदस्त आहे हे नक्की. विजू-मोना ही मराठी माध्यमातली आणि नुकतंच इंग्रजी येऊ लागलेली पाचवी-सहावीतली मुलं असावीत असा सावध अंदाज बांधता येतो.
जेव्हा लेखक पात्राधारित पुस्तकांची मालिका तयार करतो, तेव्हा त्या पात्रांना पार्श्वभूमी असेल तर वाचक नकळत त्या रचनेत सामील होऊन जातो. पण, हे फाफेच्या बाबतीत जसं होतं, तसं बिपिनच्या बाबतीत होत नाही. अर्थात असोर्टेड गोष्टी असं त्यांचं स्वरूप असल्यानं त्यानं फारसं नुकसान होत नाही. पात्राधारित पुस्तकांची मालिका जेव्हा तयार केली जाते, तेव्हा एक तर कालनिरपेक्ष सलगता (कंटीन्यूटी) किंवा काळानुरूप पात्रांची वयं, आजूबाजूची बदललेली परिस्थिती ही पुस्तकांत क्रमाने दाखवणं आवश्यक असतं (आठवा - हॅरी पॉटर). बिपिनच्या गोष्टींमधे बहुसंख्य पुस्तकांमधे कालनिरपेक्ष सलगता (कंटीन्यूटी) असली, तरी विजू-मोनाचे संवाद क्वचित त्यांच्या वयात होणारी स्थित्यंतर दाखवतात. 'पळालेला चोर', 'म्हातारी नवरी' आणि 'पिप' या गोष्टींत विजू छोटा आहे, तर 'सिग्नलमनचा गुन्हा' या गोष्टीत विजूची जुळी बहीण मोना ही 'गार्की' या रशियन लेखकाचा संदर्भ देते; मग तिचं वय काय? (दोन्ही उदाहरणं 'पुत्र असावा ऐसा गुंडा'मधून).
प्रश्न असा आहे, की हे निरीक्षण बरोबर असेल तर त्यानं वाचकाचा रसभंग होतो का? निदान माझं उत्तर तरी 'नाही' असंच आहे. जेव्हा आपण चित्रकलेतल्या क्युबिझमप्रमाणे विविध कोनांतून या पुस्तकांची चिकित्सा करतो, तेव्हाच असं काहीसं निरीक्षण संभवतं. अभ्यासासाठी, समीक्षेसाठी वाचणाऱ्या प्रौढ वाचकाला हे प्रश्न पडण्याची शक्यता जास्त. आनंदासाठी वाचणाऱ्या लहानग्यांचा सारा रस बिपिनच्या नव्या गोष्टीत तेवढा असतो हे नक्की!
.
भाषा आणि शैली
माझ्या मते योग्य साहित्यप्रकाराची निवड, कथाबीज आणि ते फुलवत नेण्याची हातोटी हे भारांच्या लेखनाचं ५०% यश असेल, तर उर्वरित ५०% यशाचं श्रेय त्यांच्या भाषेला आणि शैलीला द्यायला हवं. आपण ज्या वयोगटासाठी लिहितो आहोत, तो कोणती आणि कशी भाषा बोलतो याचं पूर्ण भान भारांना असावं. गोष्ट सांगताना बिपिन अकृत्रिम बोली भाषा वापरतो. तो उगाच प्रत्येक इंग्रजी शब्दांचं भाषांतर करत बसत नाही. त्यामुळे गोष्टीचा प्रवाह कुठे थांबत नाही, उदा. वॉचमन, सर्टिफिकेट, केबिन हे शब्द बिपिनच्या गोष्टीत सर्रास आढळतात. मुलांच्या पुस्तकात काय भाषा वापरावी, याचे हल्ली बरेच अलिखित नियम असतात. ते भारांच्या काळात नसतील, पण त्यामुळे बिपिनचे डाकू सहगत्या 'बदमाष', 'हलकट' या शिव्या देतात, त्यांना रक्ताच्या उलट्या होतात, ते एकमेकांचे मुडदे पाडतात... सर्वसाधारणपणे १२-१४ वर्षाच्या मुलांकडे इतपत शब्दसंपत्ती आणि अंगभूत शहाणपणा नक्कीच आलेला असतो. भारा हे न करते, तर बिपिनच्या गोष्टींमधले डाकू मिळमिळीत, तकलादू, पुठ्ठ्याचे वाटले असते. थरारकथांमध्ये सतत काहीतरी घडत राहण्याची गरज असते. मुलांसाठी अश्या कथा लिहिताना थरारक घटनांचा अतिरेक होणार नाही आणि गरजेपेक्षा तसूभरही जास्त हिंसाचार त्यात येणार नाही, याची 'भारा' पुरेपूर काळजी घेतात. या कथा वाचताना उसळणारं रक्त काबूत ठेवण्यासाठी ते अत्यंत कौशल्यानं विनोदाचा मर्यादित वापर करतात. केवळ बिपिनच नव्हे, तर विजू-मोना हीदेखील नर्मविनोदी कोट्या करतात. 'चल रे तट्टा टुणुक टुणुक' या गोष्टीमध्ये अगदी छोटासा विजूदेखील म्हणून टाकतो, "ऐटीची छान फैटी झाली!" किंवा मौसा नावाच्या माणसाबद्दल बोलताना मोना म्हणते, "मौसा म्हणजे मनीमावशीचा नवरा?"
.
भारांचा विनोद
हा एक वेगळा विषय आहे. तो निरागस अतिशयोक्तीतून फुलतो. "ह्यॅ… असं कुठं होतं असतं का?" म्हणणाऱ्यांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. 'अगडबंब मंडळाच्या गोष्टी'मध्ये सहा गोष्टी आहेत. प्रत्येक कथेची पार्श्वभूमी वेगळी असली, तरी एखाद-दुसरी कथा वगळल्यास साऱ्या भारताबाहेर घडणाऱ्या अतिशयोक्त गोष्टी आहेत. त्यांत जो विनोद आहे, तो कृतीतून घडणारा आहे, पण म्हणून तो हिणकस आणि अंगाशी झोंबणारा नाही. उदाहरणार्थ, 'सहा मूर्ख - महामूर्ख'मधली उडी मारून पॅन्ट घालण्याची कृती किंवा तलावातून चंद्र उपसण्याचा प्रसंग.
मराठीतले बरेच विनोदी लेखक येणाऱ्या काळात कालबाह्य होतील, कारण त्या विनोदाला प्रासंगिक, सांस्कृतिक आधार आहे. बदलत्या काळानुसार नव्या पिढीला या विनोदांमागचे संदर्भ कळणार नाहीत आणि ते लेखन केवळ इतिहास म्हणून उरेल. पण भारांच्या विनोदाची जातकुळी त्यातली नाही. एकतर तो मुलांना डोळ्यासमोर उभा करता येणारा, कृतीतून घडणारा, विनोद आहे. मर्यादित आहे, पण जास्त टिकाऊ आहे. किंवा तो भाषिक गंमती करणारा विनोद आहे. उदाहरणार्थ, 'अगडबंब मंडळाच्या गोष्टी'मधल्या पात्रांची ही नावं बघा. लंगडणार्या माणसाचं नाव 'तंगडोबा दौडे', जमिनीला कान लावून ऐकणार्या बुवाचं नाव 'काका कर्णे', थंडपणे हालचाली करणार्या माणसाचं नाव 'बाबू बर्फे', नेमबाज माणसाचं नाव 'बंदूकराव नेमे', जोरदार फुंकर मारून झाडाची फळं पाडणार्या बुवाचं नाव 'चक्रदेव फुंकरे'... किंवा त्यातला हा संवाद बघा - "आता तर राजानं बक्षीसच लावलंय म्हणे. हणगूबाई हडळीबरोबर धावून जो कुणी रेस जिंकील त्याला मोतंभर पोहरा बक्षीस?" "मोतंभर पोहरा नाही, पोहरा घेऊन विहीर का उपसायचीय? पोतंभर मोहरा!" अनुप्रास वापरून केलेली गंमत नि अक्षरांचा थारेपालट करून आणलेली धमाल हा त्यांचा लाडका विनोदप्रकार.
.
कथांचं स्वरूप आणि जागतिक स्थित्यंतरं
बिपिनच्या बऱ्याचशा गोष्टी भाषांतरित वाटाव्यात, इतपत वेगळ्या पार्श्वभूमीवरच्या आहेत. तो समुद्री चाच्यांच्या, क्रूर डाकूंच्या गोष्टी सांगतो. त्याच्या काही गोष्टी चिनी दंतकथा असतात, तर काही गोष्टींना इतिहासाची पार्श्वभूमी असते. अनेक गोष्टींमधे भौगोलिक संदर्भ असतात, चपखलपणे दडवलेले नीतिमत्तेचे पाठ असतात, संवाद आणि वर्णन यांचा योग्य समतोल असतो. पण- पण या गोष्टी एक-दोन दशकं जुन्या वाटतात. मराठीत फक्त लेखनावर जगणारे लोक कमी होते/आहेत. त्यांच्या अनुभवाचं संचित हे सुगीच्या काळात जीवनावश्यक गोष्टींची तरतूद करुन ठेवणाऱ्या मुंगीसारखं असतं. उद्याची पर्वा न करता आलेला दिवस, अनुभव बेडरपणे पचवण्याची नाकतोड्याची जिगर मुंग्यांमधे नसते.
भारांसकट खूपसे मराठी लेखक त्यांच्या सुवर्णकाळाचं आणि त्याच्याशी निगडित असलेल्या 'इको-सिस्टिम्स'चं (भाषा, नीती-अनीतीच्या कल्पना, भौगोलिक संदर्भ इत्यादी) प्रतिनिधित्व करत असतात, हे गृहीतक मानलं, तर बिपिनच्या गोष्टींमधले संदर्भ जुने का असतात याचा उलगडा होतो. याउलट पूर्ण वेळ कलावंतांकडे समाजात होणारे बदल निवांतपणे टिपण्याची मोकळीक असते (क्षमता आणि इच्छा असेलच असे नाही). अशा कलावंतांच्या कलाकृती काळाशी सुसंगत राहण्याची शक्यता जास्त असते, उदाहरणच द्यायचं झालं तर पाब्लो पिकासोचं देता येईल. भारा १९१० मध्ये जन्मले आणि आणि त्यांनी त्यांच्या नव्हाळीच्या काळानंतर, म्हणजे त्यांच्या सत्तरीत, बिपिनच्या गोष्टी लिहिल्या. हा पूर्ण काळ ते लेखक नव्हते. हे त्रैराशिक सोडवलं, तर असं दिसतं की भारांनी सर्वसाधारणपणे १९२५ ते १९५५ या काळात मराठी मध्यमवर्गीय समाजाशी सुसंगत असलेल्या गोष्टी बिपिनच्या माध्यमातून सांगितल्या असाव्यात. अर्थात असा सावध अंदाज.
पण ते असो. ८०च्या दशकात जागतिक बाल-कुमार वाङ्मयात तरी नक्की काय घडत होतं?
१९७९-८० च्या आसपास भारांनी जेव्हा या कथा लिहिल्या, तेव्हा इंग्रजीमधल्या बालवाङमयाचा चेहरा बऱ्याच अंशी बदलेला होता. ९ ते १२ वर्षं या वयोगटातल्या मुलांच्या साहसकथा जास्त वास्तववादी झाल्या होत्या, रहस्यकथा सौम्य झालेल्या होत्या; कल्पनाशक्तीचा आविष्कार वेगळ्या पातळीवर जाऊन प्राणी, झाडं यांचा मुलांशी संवाद झालेला दिसत होता; भाषेच्या बाबतीत सजगता आली होती. 'डॉक्टर दे सोतो', 'फ्रॅन्क्लीन इन द डार्क', 'दी आयर्न मॅन', 'इंडिअन इन दी कबर्ड' ही त्या काळाच्या सुमारास आलेली पुस्तकं या बदलाची साक्ष देतात.
दरम्यानच्या काळात, १२ ते १८ वर्षं या वयोगटासाठी जागतिक साहित्यात एक नवीन क्लस्टर तयार झालं होतं. पौगंडावस्थेतल्या मुलांच्या या वेगळ्या साहित्यविश्वाला आता 'यंग-अडल्ट' किंवा 'कुमारसाहित्य' असं म्हटलं जातं. १९७०-८० चं दशक हे 'यंग-अडल्ट' साहित्याचा सुवर्णकाळ आहे असं मानलं जातं. 'अॅनी ऑन माय माईंड' (समलैंगिक संबंधावर आधारित), 'सीक्स मन्थ्स टू लीव्ह' (कॅन्सरशी लढा), 'एव्हरीवन्स पॅरेन्ट्स सेड येस', 'धिस प्लेस हॅज नो अॅटमॉस्फीअर' (२०५७ मध्ये घडणारी गोष्ट), 'दी वुमन हु राईड्स लाईक अ मॅन' ही यंग-अडल्ट' साहित्यामधली काही दादा पुस्तकं. त्यांच्या नावांवरूनदेखील विषयांमधली गुंतागुंत लक्षात यावी! आणि हे कधी? जेव्हा बिपिन 'दर्यावर्दी डाकू'सारख्या चाच्यांच्या गोष्टी सांगत होता, तेव्हा. तेव्हा इंग्रजी 'यंग-अडल्ट' वाङमयात स्वतःची ओळख, मानसिक तणाव, कौटुंबिक उलथापालथी, मुलांमधली दादागिरी (बुलीईंग) हे विषय हाताळले जात होते.
विजू-मोना ही मुलं ११-१२ वर्षांची असली तरी ती 'यंग-अडल्ट फिक्शन'च्या या बदललेल्या सुरापासून प्रचंड दूर दिसतात. मर्यादित भवतालामुळे (एक्सपोजर) असेल, वैयक्तिक आवडीनिवडींमुळे असेल किंवा सांस्कृतिक मर्यांदांमुळे असेल; पण भारांचा हा मानसपुत्र मध्यमवर्गीय मराठी घराला पेलतील अशाच गोष्टी सांगत राहिलेला दिसतो.
८०च्या दशकाच्या उत्तरार्धात शहरांमधून (आणि त्यानंतर वेगानं निमशहरांतून आणि गावांतूनही) इंग्रजी माध्यमाच्या शाळा चांगल्याच रुजायला लागल्या होत्या. या माध्यमातून शिकणाऱ्या वाचकांना 'चॅप्टर बुक्स'चे (७-९ वर्षांच्या मुलांना चित्ररूप गोष्टी बालीश वाटतात. पण औपचारिक भाषेतल्या गोष्टी बोजड वाटतात. म्हणून त्यांच्यासाठी बोली भाषेतच 'चॅप्टर्स' (प्रकरणं) पाडून पुस्तकं लिहिली जातात. त्यांना 'चॅप्टर बुक्स' म्हणतात), 'यंग-अडल्ट फिक्शन'चे जागतिक संदर्भ उपलब्ध होते.
म्हणून मग बिपिनच्या गोष्टींमधे याचं प्रतिबिंब पडायला हवं होतं का? त्यानं बिपिनचे संदर्भ कालानुरूप राहिले असते का? की आज आपण अल्लादीनची, तेनालीरामाची एका काळात गोठून राहिलेली गोष्टही चवीने ऐकतो, तशी बिपिनची अजिबात संदर्भ न बदललेली गोष्ट उद्याही ऐकू?
कालौघात टिकलेल्या गोष्टी जश्याच्या तश्या राहिल्या, तर त्यांना हळूहळू अभिजात वाङ्मयाचं (क्लासिक्सचं) रूप यायला लागतं आणि त्या स्मरणरंजनाच्या आधारानं तगून राहातात. उदा. अकबर-बिरबल किंवा इसापच्या गोष्टी. त्याच गोष्टींना कालौघात नवे अर्थ प्राप्त झाले, तर त्या करमणुकीच्याही पल्याड जातात. त्यांची मिथकांकडे वाटचाल सुरू होते.
बिपिनच्या गोष्टी या प्रकारात मोडणाऱ्या नव्हेत. मराठी पुस्तकं वाचणारी पिढी आहे, तोवरच बिपिनच्या गोष्टी वाचल्या जातील. अभिजात वाङ्मयात मोडण्यासाठी त्यांना कालच्या-आजच्या १-२ पिढ्यांची पुण्याई पुरेशी नाही, हे दुर्दैवी सत्य आहे.
बिपिनच्या गोष्टींमधून बदलत्या साहित्यिक प्रवाहाचं प्रतिबिंब पडतं, तरीही कदाचित कुमार साहित्याची अधिक गंभीरपणे दखल घेतली गेली असती. येणाऱ्या लेखकांनी करमणुकीपल्याडच्या किंवा निदान वास्तवाजवळच्या गोष्टी लिहिल्या असत्या, तर कदाचित मुलांचे प्रश्न, त्यांची मानसिक जडणघडण, तंत्रज्ञानाचे त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम, आकुंचित झालेली कुटुंबव्यवस्था हे विषय गोष्टींमधे आलेही असते.
या कदाचिताला अंत नाही. पण दुर्दैवाने आजही मराठीत हा साचा कणखरपणे कुणी मोडलेला दिसत नाही.
.
आज आणि उद्या
'बिपिन बुकलवार आज असता तर…' हा कल्पनाविस्तारासाठी छानच विषय आहे. जगाची अफलातून उलटापालट झाली आहे. लहान मुलांसाठी लिहिलेल्या 'हॅरी पॉटर' आणि 'गेम ऑफ थ्रोन्स'सारख्या गोष्टी मोठी माणसं आवडीनं वाचताहेत. 'काईट रनर'सारख्या मोठ्यांच्या वाङ्मयात लहान मुलांचं विश्व चितारलं जातं आहे. रुबिक क्यूब विस्कट्वून सुंदर असं नक्षीकाम करावं तसं गोष्टींचे विषय, वाचकांचं वय, गोष्टींचे सरळसोट अर्थ आणि शब्दांच्या त्वचेखाली लपलेले अर्थ, यांची सरमिसळ होऊन नवी परिमाणं लाभलेल्या देशोदेशीच्या गोष्टींचा खजिना आज बिपिनला केवळ एका क्लिकच्या अंतरावर उपलब्ध आहे.
.
आज बिपिन असता तर?
.
(पण विजू-मोनाला बिपिन हवासा तरी असता का? त्यांना 'ऑडिओ-बुक'मुळे एक यांत्रिक बिपिन बुकलवार भेटता. कानात बोंडूक घालून अल्लादीनच्या दिव्यासारखं किंडलचं बटन घासलं की बिपिन नावाचा यक्ष हजर!) बिपिन आज असता, तर मोना-विजूंच्या 'मॅड्च्याप' वेळापत्रकापुढे तो कदाचित हताश झाला असता. कदाचित इंटरनेटमुळे उपलब्ध असलेल्या स्वस्त करमणुकीपुढे त्याचा निभावही लागला नसता. किंवा गोष्टींमधली हरवत जाणारी निरागसता बघून तो अवाकही झाला असता.
किंवा नाहीही...
कदाचित संगणकावर हजारो भाषांमधल्या गोष्टींचा खजिना उपलब्ध असलेला बघून त्याला हर्षवायूही झाला असता. दुर्मीळ पुस्तकांसाठी रद्दीवाल्याचं दुकान पालथं घाणाऱ्या बिपिननं एखाद्या चोरट्या साईटवरून पायरेटेड पुस्तक उतरवून घेतलं असतं का? कदाचित. शेवटी पुस्तकांचा मोह फार वाईट! पण भारांची मुलं 'अच्छे बच्चे' होती. मला नाही वाटत, त्यानं तसं काही केलं असतं. तो नक्कीच 'प्रोजेक्ट गुटनबर्ग'सारख्या प्रकल्पात सामील झाला असता आणि त्यानं दुर्मीळ पुस्तकांचं डिजीटलायजेशन करवून घेतलं असतं.
त्यानं विजू-मोनाला या सगळ्या गोष्टी नक्की सांगितल्या असत्या.
या साऱ्या शक्यता आजचं वास्तव आहेत. मुलांना बिपिन बनून गोष्टी सांगणं ही त्यांना बुक-लव्हर बनवण्याची पहिली पायरी आहे. अशी काही पढाकू मुलं उद्या लिहिती झाली तरच भारांच्या बिपिनचं गोष्ट सांगणं सुफळसंपूर्ण होईल.
-----
(चित्रे: जालावरून साभार)
-----
.
संदर्भ:
मुंबईला चक्कर
अक्काचे अजब इच्छासत्र
साखर सोंड्या
थॅंक्यू मिस्टर शार्क
जुनाट भावलीची भन्नाट कथा
दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा
दर्याई डाकू शार्की
सिंकदरचा बिलंदर कुत्रा
कॅप्टन किडचा खजिना
पुत्र असावा ऐसा गुंडा
डर्याई डाकूच्या गोष्टी
अगडबंब मंडळाच्या गोष्टी
ढोरगावचा चोर
डाकू बनला डिटेक्टिव्ह
https://www.ideals.illinois.edu/handle/2142/7052
http://en.wikipedia.org/wiki/List_of_children's_literature_writers
https://www.goodreads.com/genres/childrens?original_shelf=children-s
http://www.goodreads.com/list/show/24589.Favorite_Children_YA_books_from...
http://childrensbooksguide.com/top-100
http://www.whatdowedoallday.com/2012/11/classic-childrens-books-1980.html

Comments