Saturday, January 9, 2010

अपुर्णांकाची अवतरणे- |१/४।-रम्य ते अभयारण्य

जात-संमेलनाला जायचं खरं तर पॅडीला फारसं पटलं नव्हतं. शाळा-कॉलेजच्या फॉर्मबाहेर त्याची जात कधी आली नव्हती पण इथं सगळं वेगळंच होतं. हॉस्टेलच्या खोलीत प्रवेश करताच रम्यानं कोण, कुठला, अमका नातेवाईक, तमकी सोयरीक असं करत शेवटी कोड क्रॅक केलाच. "म्हणजे तू आपल्यातलाच!" रम्यानं निर्णय जाहीर केला "सॅन्डी आपल्यातला नाही पण चॉईस नव्हता. त्याचे भाय-कॉन्टॅक्ट आहेत म्हणे. रॅगिंगच्या वेळी उपयोगी येतील म्हणाला. चल, आता आपल्या जातीचा मेळावा आहे आत्ता." डब्याबाहेर आलेला तुपाचा ओघळ बोटानं निपटून डब्यात ढकलावा तसं चापून चापून रम्यानं पोट पॅन्टमधे बसवलं. पॅडी तरीही मख्ख. आपले सिनिअर्स तिथे अभ्यासाच्या पुस्तकांची लिस्टपण देतात ऎकल्यावर कसाबसा पॅडी गेला.

जातीवर अन्याय....ढॅण्ढॅढॅण्ढॅढॅण्ढॅ . पॅडीला मोनोटोनस भाषणं भयंकर आवडली, त्याचे डोळे आपसूक लागायला लागले.

सगळीकडं आरक्षण, नौकरी नाही...ढॅण्ढॅढॅण्ढॅढॅण्ढॅ. पॅडीला स्वप्नात आपल्या जातीतली सगळी भावंडं नौकरी..नौकरी अशी याचना करताना दिसली. मधेच मोरपंखी निळा ड्रेस घातलेली मुलगी त्याच्याकडे बघून गोड हसली. पॅडीच्या पापण्या किलोकिलोच्या झालेल्या. पॅडीला वाटलं आपण झोपेतच मरणार.

सगळ्या जातींच्या संघटना आहेत. आपण एकत्र आलो की मात्र आपण जातीयवादी. आपल्याला एक व्हायला....ढॅण्ढॅढॅण्ढॅढॅण्ढॅ.

"च्युत्या काय रे तू?" रम्यानं पॅडीचं झोपणं फारच पर्सनल घेतलं "सालं सगळेजण कंठशोष करतायत की आपल्यावर अन्याय होतोय"

"कुठं? " पॅडीनं येडझव्यासारखा प्रश्न विचारला आणि रम्या खदाखदा फुटला.

"चल च्यामारी, तू पण नां..." रम्यानं यारी खात्यात पॅडीचा अपराध माफ करुन टाकला

हॉस्टेलच्या गेटवरच सॅन्डी भेटला. ओळख, हाय हॅलो झाल्यावर त्यानं पॅडीला सिगरेटच्या धुराचं प्रश्नचिन्ह बनून दाखवलं. पॅडीला सिगरेट आवडत नसली तरी ते प्रश्नचिन्ह भारी आवडलं. त्यानं हसून नुस्तीच मान हलवली. मागोमाग अजून एक प्रश्नचिन्ह. पॅडीच्या डोळ्यांसमोर बोट नाचवत सॅन्डी म्हणाला "हस्तो काय राव? दोनदा विचारलं कुठून आलात" "आम्ही होय? हे इथूनच की" पॅडीला काय बोलावं हे न सुचून त्यानं निरर्थक उत्तर दिलं. त्याच्या तोंडातून जात-मेळा शब्द काही निघाला नाही. "बरं ते जाऊ दे. तुम्हाला एन.पी. ला भेटायचं का?"

"एनपी" खर्जाच्या आवाजात तिकडून ओळख आली
"मी रमाकांत विश्वासराव भोगणकर" रम्यानं इंजिनिअरींग कॉलेजच्या परंपरेनुसार संपूर्ण नाव सांगत एक कडक सॅल्युट ठोकला.
"पॅडी" पॅडीनं हॅन्डशेकसाठी हात पुढे करत ओळख करुन दिली
"पॅडी? पुर्ण नाव?"
"पॅ-डीच. एनपी. "
मिनीटभराची सणसणीत शांतता. सॅन्डीला वाटलं झक मारली आणि या भानगडीत पडलो.
एनपीच्या बाजुला उभा असलेला काळा पहाड रागारागात पुढे येत असतानाच एनपीनं त्याला थांबवलं आणि पॅडीशी हातमिळवणी केली.
एनपीनं काळ्या पहाडाची ओळख करुन दिली "डोली बाबा"
डोली बाबा-उंची-जेमतेम ५ फुट ४ इंच-रंग- सहाणेवर उगाळलेल्या अमावस्येसारखा -पातळ कारकुनाच्या मांडीइतपत जाड दंड आणि टक्कर ढाल छाती.
अनोळख करत डोली पचकन थुंकला "एनपी, जाय्चं का? सॅन्डी, भाड्या, कायी लागलं तर सांग"

"सॅन्डी, भाड्या, काही लागायच्या आधी सांग हे काय प्रकरण आहे?" पॅडीनं डोली बाबाची पाठ वळताच वातावरण हल्कं केलं.
"एनपी आपल्या स्टुडंट कौन्सिलचा प्रमूख आहे. गेली ७ वर्ष तो शिकतोच आहे. आहे. इथल्या आमदारासाठी तो काम करतो विद्यार्थी संघटनेचं." हातपंपातून हापसून भसाभसा पाणी काढावं तसं सॅन्डी सिगरेटचा धूर ओकत सांगत होता "एनपी माझा गाववाला म्हणून तो माझ्या ओळखीचा पण हे डोली बाबा प्रकरण मात्र नवंच दिसलं."

कॉलेज जोमात सुरु झालं तसं पॅडीच्या डोक्यातून हे प्रकरण पुर्णपणे गेलं. दिलेल्या मेंदूतून एक विचार जातो तेव्हा त्याच वस्तुमानाचा दुसरा विचार मेंदू व्यापतो; पण मेंदू कधी रिकामा राहात नसतो. पॅडीला रॅगिंगसाठी म्हणून खास पाठ केलेले फिजिक्सचे विचित्र नियम आठवले. मोरपंखी निळा ड्रेस पॅडीच्या मेंदूभर पसरायला लागला.

"ओळख करुन देऊ का?" नको तितकं, नको तेव्हा स्पष्ट बोलणं हा स्थायी भाव असणारया मीरानं पॅडीला आतून बाहेरुन वाचत विचारलं.
"मीरा-मिरी-मिरीटले! तू माझी लेथ पार्टनर आहेस की लेथल पार्टनर?" पॅडीनं निळ्या ड्रेसच्या नादात लेथचा मोठा कट मारला आणि कडरकट्ट आवाज करत टूल तुटलं. "अरे दळभद्री, संपत आलेला जॉब नासवलास की" दंडाला धरुन पॅडीला वर्कशॉप बाहेर काढताना मीराचा संताप संताप झालेला. "तिचं नाव दमयंती. गडचिरोलीची आहे. बाप जंगल कॉन्ट्रॅक्टर आहे. पृथ्वी नष्ट करण्याचं काम आहे त्याचं" मीरानं कॅन्टीनमधे जाताच केकचा मोठा तुकडा तोडत पॅडीचा लचका तोडला. "बरं" लाकूडतोड्याच्या पोटी असं रत्न जन्माला यावं हे कसलं दैव असला काही तरी विचार करत पॅडीनं निरर्थक होकार भरला. "बरं काय? मंदचैस. तिचं नाव दमयंती कसं असेल? अनिला नाव है तिचं. अजून माहीती हवीये?" मीरानं विनोद वाया गेलेला पाहून त्याचं ससंदर्भ स्पष्टीकरण दिलं. पॅडीला उगाच भारी वाटलं.पुढला भाग: अपुर्णांकाची अवतरणे- ।२/४।-सपाट इस्त्रीसारखा मेंदू

9 comments:

Yawning Dog said...

Sampoorna bhag avadala, vishesht: shevatacha parichched ashakya sundar ahe

Meghana Bhuskute said...

बाबौ. हे कायतरी भारी दिसतंय. नावं तर खासच. सपाट इस्त्रीसारखा मेंदू. तब्बेतीत लिही. (मी फुकटचा भोचक सल्ला देऊन काय होणार म्हणा. पण तरीही-) घाई काहीही नाही. लिही म्हंजे झालं. (हीदेखील माझीच सदिच्छा. :))

Samved said...

यॉ.डॉ.- धन्यवाद
मेघना- आता मला नस्तं टेन्शन नको आणुस. जसा कसा असेल सपाट इस्त्रीसारखा मेंदू, गोड sorry चविष्ट मानून घे. लिहीणार हे नक्की

Megha said...

masta zalay pan aata lihi na pudhacha bhag patapat...roj 2 da yetey tuzya blog var

Shireesh said...

झक्कास...ब-याच दिवसांनी तुझा ब्लॉग वाचायला मिळाला..या आधीचे २-३ लेख मी दादांकडून प्रिंटाउट घेउन आलो आहे.(त्यापैकी ’गणित’ मस्तच..त्याचे किस्से आम्ही आई-दादांच्या तोंडून प्रत्यक्षच ऐकले)ते पण सुंदर आहेत..मजा आली...तुझा शिरीषदादा

Shireesh said...

झक्कास...ब-याच दिवसांनी तुझा ब्लॉग वाचायला मिळाला..या आधीचे २-३ लेख मी दादांकडून प्रिंटाउट घेउन आलो आहे.(त्यापैकी ’गणित’ मस्तच..त्याचे किस्से आम्ही आई-दादांच्या तोंडून प्रत्यक्षच ऐकले)ते पण सुंदर आहेत..मजा आली...तुझा शिरीषदादा

Deep said...

hahaha khoop diwasaani as kahi vachaayla milaaly thanks!

Gouri said...

saheech lihiley ... aavadyaa

Samved said...

शिरीषदादा, थॅन्क्स! नेहमीच कळवत जा काय वाचतोस, कसं वाटतय ते.