बाष्कळ नोंदी

शप्पत- करंगळी, मरंगळी, मधलं बोट, चाफेकळी, अंगठा. हाताच्या बोटांचा हा क्रम ग्राह्य धरला तर चाफेकळी आणि अंगठा यांच्या चिमटीत (स्वतःचा) कंठ पकडला की होते शप्पत. काही भाषाप्रभुंना हा शब्द शपथ असाही आवडतो पण शप्पतची परिणामकारकता शपथला नाही. शप्पत हे एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्याला खात्री देण्याचं हुकुमी शस्त्र आहे. म्हणजे कसं की ’गोजमगुंडेबाई त्यांच्या घरात चेंडु गेला की विळीवर चिरुनच ठेवतात, तुझी शप्पत’ असं, यावर अपील नाही. प्रसंगी तो चेंडु विळीवर गळा कापून जीव देईल पण शप्पत खोटी जाऊ देणार नाही असलं भारी. शप्पत घेण्याच्या तीन पायऱ्या असतात; तुझी शप्पत, आई शप्पत आणि देवा शप्पत. कुणी खोटी शप्पत घेत असेल तर ज्याची शप्पत घेतली तो मेलाच समजायचं. फारसे बरे संबंध नसताना कुणी तुझी शप्पत म्हणालं की उतारा म्हणून डोक्यावर हात ठेवावा, शप्पत लागत नाही. परिणामी तुम्ही जिवंत राहाता. अश्यावेळी खरं खोटं करायचं झाल्यास घे आई शप्पत अशी गुगली तुम्ही टाकु शकता.



पाच मिनीटं- हे वेळ मोजायचं सर्वात छोटं परिमाण असे. इकडुन अमेरिकेला विमानानं जायला पाच मिनीटं लागतात असं काही तज्ञ मुलं छातीठोकपणे सांगत तेव्हा बाकीची मुलं तोंड उघडं टाकून हे सत्य ऎकत. थोडी मोठी मुलं साडेतीन वाजून पाच मिनीटं झाली किंवा पावणे दोनला पाच कमी असाही वेळ सांगत. काही मोठी माणसं कुणाला सारुन जायचं असेल तर एस्क्युज मी च्या चालीवर एक मिनीट हं असं ही म्हणतात. सगळ्याची गोळाबेरीज एकच.



अमेरिकेचा राष्ट्र्पती- हा जगातला सगळ्यात डेन्जरस माणूस. अमेरिकेकडे ऍटम्बॉम्ब असून एक बटण दाबलं की ते सगळे उडु शकतात. ते बटण नेमकं अमेरिकेच्या राष्ट्र्पतीच्या पलंगाच्या बाजुला असतं म्हणजे कसं की अचानक युद्ध सुरु झालं तर कधी ही ते बटण दाबणं सोईचं. चुकून कधी या माणसाचा हात झोपेत त्या बटणावर पडला तर? या कल्पनेनं मुलांचा नुस्ता थरकाप उडे. काही मुले चेहऱ्यावर बेफीकीर भाव आणून गळ्यातल्या बाप्पाच्या पदकावरुन चोरुन हात फिरवीत तर काही थोडी मोठी मुले आपल्या बाजुने युअस्सार आहे नां अशी अगम्य खात्री देत. एरव्ही दिवाळीच्या फटाक्यांना घाबरणाऱ्या पोरी मात्र अमेरिकेच्या राष्ट्र्पतीला आणि त्याच्या ऍटम्बॉम्बला घाबरत नसत.



टॅम्प्लीज- टॅम्प्लीज हा मराठीतलाच शब्द आहे या बद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. याचाच एक अपभ्रंश इंग्रजीत आहे असं मोठी मुलं सांगत; खरं खोटं मारुतीला माहीत. अंगठयाच्या बाजुचं बोटं पेरांमधुन वाकवायचं आणि (आपल्याच) ओठांवर टेकवुन टॅम्प्लीज म्हटलं की ऎन खेळात थांबण्याची मुभा. खेळता खेळता पाणी प्यायचंय, आई बोलावतेय, नं १/नं २ काहीही झालं की मिटा बोट आणि घाला टॅम्प्लीज. काही वाह्यात मुली लंगडी खेळताना टॅम्प्लीज घेऊन सरळ चालत कुणाजवळ तरी येऊन थांबत आणि अचानक सुटली म्हणत पाय वर करुन बाजुच्याला आऊट करुन टाकत. अश्या वागण्याने टॅम्प्लीज पातळ होते.



नवनीत- लेखक श्री नवनीत हा माणुस भारीच असणार! नाहीतर एकच माणुस कसा काय चित्रकला ते गणित या सगळ्या विषयांवर पुस्तक लिहीणार? याला एक भाऊ ही असतो. तो ही दिसेल त्या विषयावर पुस्तक लिहीत सुटतो. त्याचं नाव लेखक श्री विकास. बहुदा त्यांचं आडनाव मजेदार घाणेरडं असणार म्हणूनच ते लावत नसणार. लेखक श्री नवनीत यांच गाईड म्हणून पुस्तक असतं. अभ्यास न येणारी ढ मुलं त्यातून घोकंपट्टी करुन परिक्षा पास होत. घरात गाईड बाळगणं हे लाजीरवाणं असं म्हणण्याची पद्धत होती.



लोणचं, सांडगे, पापड- हे पदार्थ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे घटक म्हणजे खुप साऱ्या मावश्या, काकवा आणि आज्या. उपघटक अर्थात त्यांची डझन-अर्धा डझन मुलं आणि पळापळ करणारा एखादा काका किंवा मामा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे लख्खं ऊन येणारी गच्ची. मुंबैत बेडेकर नावाच्या कुण्या भल्या माणसाची भारी गच्ची असल्याने, तिथल्या सगळ्या मंडळींसाठी तोच लोणचं घालतो असं मोठी मुलं म्हणत. एरव्ही ब्येष्ट स्वयंपाक करणाऱ्या आयांना लोणंच मुरायच्या आधीच चांगलं लागत हे का कोण जाणे कधीच कळत नसतं. पापड आणि सांडग्यांच तसंच. ते अर्धेकच्चे असतानाच खावे असा मुलांचा चोरटा नियम होत. त्यांचा वरचा वाळत आलेला पदर मोडला की आतला अर्धवट ओला चिक ब्येष्ट लागतो



तुळशीची पानं- गोड, तिखट, खारट, तुरट अशी कुठलीच ठराविक चव नसणारी तुळशीची पानं एरव्ही बकरीदेखिल खाणार नाही. पण परिक्षा आली की पोरं झोंबाझोंबी करुन तुळस ओरबाडायचे. लिहीता लिहीता काही विसरलं की एखादं पानं खावं म्हणजे विसरलेलं आठवतं असं मोठी मुलं म्हणत. परिक्षा म्हटलं की पोरांसोबत तुळशीच्या अंगावर देखिल काटा यायचा. एरव्ही दिवाळीतले उरलेले फटाके उडवायचा मुहुर्त म्हणजे तुळशीचं लग्न हाच काय तो उद्योग



जंगलचा राजा टारजन- मर्दाचा पवाडा मर्दानंच ऎकावा. टारजनची गोष्ट ऎकून झाडावरुन उडी न माराल तर थुत! ओ ओ ओ SSSआरोळी ठोकली की भलभलत्या उंचाड भिंतींवरुन अल्लाद उडी मारता यायची. पानांची शर्ट चड्डी करायची कितीही इच्छा असली तरी मोठं कुणी ते गंभीरपणे घ्यायचे नाहीत.



श्यामची आई- हे म्हणजे एकदम भारी काम. पुस्तकातला कांदाच की. सोललं की पाणी आलंच म्हणा. पुस्तक आईवर असलं तरी श्यामचं नाव घेऊन पोरांचा उद्धार करायची ब्येष्ट तरतुद. छोटी पोरं श्यामवर डाऊट खाऊन असायची तर मोठी पोर खुन्नस. झापऱ्या पोरींना मात्र श्याम फार आवडे

Comments

Prashant said…
मस्तच!

लहानपणीचे दिवस आठवले.

निरागस.....
मस्त आहेत नोंदी.
आवडल्या. :).

अनिकेत वैद्य.
Jaswandi said…
sahiye! bhaaree nondi ahet!

आम्ही "शप्पत्थ" म्हणायचो, म्हणजे अजुनही म्हणतो.. हे जास्त परिणामकारक असतं :)

आणि टॅम्प्लीज वरुन आमच्या गचाळ पद्धती आठवल्या, आम्ही टॅम्प्लीज घेताना मनगटाला थुकी लावायचो. मनगट सुखेपर्यंत किंवा मग घेणा-याने ते पुसेपर्यंत ती टॅम्प्लीज ग्राह्य धरली जायची.. ज्याने हे नियम शोधले असतील तो माणुस नक्की काय विचार करत होता?
Alhad said…
शप्पत, युअस्सार, टॅम्प्लीज


व्वा मस्त...
नवनीत विकास आणि अमेरिकेचा राष्ट्रपती तर त्याहून ग्रेट



लहानपणची मराठी असा एक लेख लिहावा भाषाशास्त्रज्ञांनी!!!
Samved said…
प्रशांत, अनिकेत- धन्यवाद.
Samved said…
जास्वंदी- शप्पत्थ!! हे पण भारी दिसतय. मी उच्चार करुन बघितला. हे भारी लागु शकतं. आणि हो, टॅम्प्लीज validate करण्याची पद्धत आवडली. किती वैज्ञानिक आहे नाही?

अल्हाद- लहानपणीची मराठी आणि तेव्हाचे समज!! पण मला आता या प्रतिक्रया वाचून गंमत अशी वाटतेय की बरीच लहान मुलं सारखाच विचार करतात की....

जास्वंदी, अल्हाद- धन्यवाद
Sanket said…
हेहे...मस्त लिहिलंयस :)
आम्हीपण शप्पत्थ म्हणायचो...आणि टॅम्प्लीज ची पद्धतसुद्धा सेम !!!
out होणारा/री बरोब्बर पकडला जाण्याच्या क्षणी टॅम्प्लीज घेणार....मग होणारी चिडाचिडी...हेहेहेहेहेहेहेहेहेहेहे...धम्माल आली जुन्या दिवसांत
लेख जाम आवडला.
पण गेले ते दिन गेले.....
Megha said…
kay masta lihila aahes re....
gojamgunde kaku ambika la ambe mhatala ki pan ashya ragvayachya aai shappat...
aani tu mala lahanpani sangayachas ki ameriket gharamadhe ek button dabala ki ghar zadun pusun nighata aani ameriket bhandevali pan car ne yete....mi aapli sunita maushi car madhun aalya tar kasa vatel vichar karayachi....nahi re pan ithe marayala bhande swatahlach karave lagtat
परिक्षा म्हटलं की पोरांसोबत तुळशीच्या अंगावर देखिल काटा यायचा. this one's ultimate...
tuza aani ranjeet chi trzen aroli pan bhannat idea hoti....kay he masta firvun aanlas baalpanat...tari katti do visarlas ki kay???mi lihila asta tar chappi var ajun ek para zala asta....hi hi
..faar bhari zalay he...maja aali..
या नोंदींवर चक्क एक लेख होऊ शकतो असं वाटलंसुद्धा नव्हतं. मस्त जमलाय. लहानपणीच्या आठवणींना (शप्पत, टॅम्प्लीज, इ.) उजाळा मिळाला.

बाकी,
"काही भाषाप्रभुंना हा शब्द शपथ असाही आवडतो पण शप्पतची परिणामकारकता शपथला नाही."
लै भारी.
सुरेख पोस्ट .....एकदम आवडली.....
सगळे शब्द परत आठवून मजा आली.....
परिक्षा म्हटलं की पोरांसोबत तुळशीच्या अंगावर देखिल काटा यायचा.
वा!!...
a Sane man said…
mi lay ushira vachla ki he...best ch...shappatth aaNi templeej sathi Jaswandi shi sahmat...tuLashi cha he kay navinach aahe, paN mast aahe...

tyaa shappatth madhalaa 'th' spaShTa uchcharala nahi tar tee shappatth invalid dharali jaychi... :-)
sonal said…
aaj pahilyandach ha blog baghtey. khup chaan kahitari saapdalyacha aanand hotoy.
Khup chaan.
Samved said…
संकेत, सागर,संदीप, श्रद्धा, सेन, सोनल- सगळ्या "स" कारत्मक मंडळींना पोस्ट आवडलं म्हणजे प्रश्नच मिटला :)

मला मुंबै (+ पुणे, अलिबाग) साईडला शपत्थ! अशी पद्धत आहे. आणि निमिष तुला तुळशीची गंमत नाही माहित? कमाल आहे!!

मेघा- येस्स. चप्पी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कधी तरी लिहीण्यात येईल. तू करतेस का प्रयत्न?
तुम्हांला ’आई-रक्ताची शप्पत’ नव्हती म्हाईत? ती सगळ्यांत घोर होती.
शिवाय टॅम्प्लीज करताना आपल्या पालथ्या मनगटावर आपलीच थुंकी लावून ते ओलं करायचं, मग ते जमिनीवर घासून त्याच्यावर माती चिकटवायची. मगच प्रोसेस पूर्ण. नाहीतर नाही.
बाकी - पुस्तकातला कांदा, टॅम्प्लीज पातळ होते हे मात्र लोSSSSSल. :)
Kaustubh said…
And jaasti-chi-majorty, kamee-chi-minorty?
Samved said…
मेघना- आयशप्पत, कसं काय रायलं आयरक्ताची शप्पत? ती एक्दम भारी. तुझी प्रोसेस या मातीच्या फार जवळची होती दिसतय!!
केतन, कौस्तुभ- :) थॅन्क्यु