झेन आर्ट ऑफ सुसाईड- प्रतिमांचे तारण
॥१।। "ब्रम्हदेवा, हैस का?" अशी दणदणीत हाक फक्त शिवराजच मारु शकतो. त्याला मी दार उघडुन आत घेतलं तेव्हा चार मजले चढून त्याचा भाता फुलला होता. खरं म्हणजे माझं नाव ब्रम्हे पण शिवराज मला कायमंच विविध नावानं हाका मारतो. आम्ही सगळी दोस्त मंडळी ठरवुन एमपीय्सी झालो. मी पोलीसात फौजदार, कुणी तलाठी, कुणी अजून काही आणि तसंच शिवराज राज्य वखार मंडळात चिकटला. "बोला चित्रगुप्त" मी त्याला डिवचुन बोलायचं म्हणून बोललो आणि अपेक्षेनुसार उसळुन निषेधाच्या स्वरात शिवराज म्हणाला "आम्ही वखारीतही कारकुन आणि देवांच्या राज्यातही कारकुनच म्हणा की एकुण! मरु दे. मला तुझा एक युनिफॉर्ममधला रुबाबदार फोटो दे" माझ्या बीटमधले शिपाई मला पिक्चरमधल्यासारखे साहेब म्हणतात मला माहीत होतं पण त्यांची लोणीबाजी शिवराजपर्यंत गेली असेल वाटलं नव्हतं. "अरे खेचत नाही बाबा. खरंच दे. तुला फेसबुक माहीतीए का? नसेलच माहीत, तुम्ही पैलवान लोक. ते असतं, त्यावर जुने मित्र शोधता येतात. नवे मित्र मिळवता येतात. त्यावर शिव नावासोबत तुझा फोटो टाकावा म्हणतो. आपला फोटो टाकला तर फेबु बंद पडायचं घाबरुन" राक्षसी हसत...