आईने के उस पार...
तसं बघितलं तर मला चरित्र, आत्मचरित्र इ. प्रकार फारसा आवडत नाही. ज्या वयात पुस्तकं वाचायला सुरुवात केली त्या वयात पुस्तकात सतत काही तरी घडलं पाहीजे असं वाटणं फार नैसर्गिक होतं. त्यामुळे आत्मचरित्रांचा संथ आणि पसरट पसारा तेव्हा नाही आवडला तो नाहीच आवडला. पण गंमत म्हणजे गंभीरपणे वाचायला सुरुवात केल्यावर वाचलेल्या पहील्या दोन-तीन पुस्तकात गाडगीळांची ’दुर्दम्य’ होती. पण हा अपवाद. त्या नंतर किती तरी वर्ष या प्रकाराच्या वाटेला मी कधी गेलो नाही. नाही म्हणायला लोकवाङमयची आणि तशीच रुपडं असणारी इतर प्रकाशनांची डार्वीन, मेरी क्युरी, युरी गागारीन वगैरे शास्त्रज्ञ तत्सम मंडळींच्या पुस्तकांचा फडशा पाडणं सुरु होतं पण त्यांना नेमकं चरित्र म्हणता येईल का ही एक शंकाच. मग एका उन्हाळ्याच्या सुटीत, कदाचित सातवीच्या उन्हाळ्याच्या सुटीत, गंभीरपणे चरित्र वाचण्याचं फर्मान निघालं. गाढव वयात गाढव विचार असतात (असं थोड्या थोड्या वर्षांनी मागं वळून पाहीलं की परत परत वाटतं हा एक वेगळा विषय!). गांधी, आंबेडकर इ मंडळी कुठल्याही विशिष्ट कारणाशिवाय शत्रुपक्षात होती. विचारसरणी, तत्वज्ञान शब्द फार मोठे होत पण उगाच मत बनवणं ...