#सेन्स: गंध
माणसाचं शरीर हा इंजिनिअरींगचा अजब नमुना आहे. इतकं गुंतागुंतीचं, ईंटीग्रेटेड आणि कमालीचं सिंक्रोनायजेशन असणारं यंत्र अजून तरी माणसाला (बहुदा) बनवता आलेलं नाही. ज..रा हे यंत्र ऍस्थेटिकली मजेदार आहे. आपण स्वतःच जन्माला माणूस म्हणून आल्याने आणि आजुबाजुला माणसांचीच गर्दी पाहून, सवयीने कदाचित ही ऍस्थेटीक गंमत आपल्याला कळतच नाही. म्हणजे बघा नां, माणसाचे हात कसे खुंटाळ्याला टांगलेल्या बेंगरुळ नेहरुशर्ट सारखे लटकत असतात किंवा अचानक मुळं फुटावित तसे कंबरेपासून उगवलेले पाय किंवा चेहऱ्यावर बाहेरुन डकवलेलं नाक नावाचा ३D अवयव! बरं या प्रत्येक मशीनचा प्रत्येक पार्ट वेगळाच. या नाकाचेच तरी प्रकार किती; सरळसोट, नकटं, आपरं, फताडं, फेंदारलेलं, चोचीसारखं, पोपटासारखं इ इ. उपयोग? दोनंच... श्वासोश्वास आणि वास घेणं...श्वासोश्वासात फारशी गंमत नाही...तो चालु आहे तोपर्यंत यंत्रवत चालूच राहातो, जाणवतही नाही आणि थांबतो त्यानंतरही जाणवत नाही! वासाचं मात्र तसं नाही. चकलीच्या खमंग वासाने जिव्हा खवळते तर पहील्या पावसाच्या वासाने, खरं तर मृद्गंधाने, चित्तवृत्ती बहरुन येतात, फिनाईलच्या वासाला हॉस्पिटलच्या गंभीरतेची साथ...