यमुआत्त्याचं अचाट धाडस
यमुआत्त्यांनी डोळे किलकिले करुन बघीतलं तेंव्हा त्यांच्या इतक्याच जुन्या घड्याळाने सहाचे ठोके दिले. "वसंतराव असते तर घड्याळ्याच्या ठोक्याला चहा द्यावा लागला असता" यमुआत्त्यांनी सुस्कारा सोडला. यमुआत्त्यांखेरीज, वसंतरावांच्या आठवणी आणि हे घड्याळ अश्या दोनच गोष्टी त्या वाड्यात ताज्या होत्या. यमुआत्त्यांनी परत उगाचच सुस्कारा सोडला. वेणीफणी केली तर कदाचित थोडं प्रसन्न वाटेल असं वाटून त्यांनी जरा हालचाल केली आणि तेवढ्यात त्यांचे गुडघे बोलले. "हरे राम! हरे कॄष्ण!! सगळं बसल्या जागी होतय म्हणून बरं आहे. अन्यथा या गुढघ्यांनी जेरीला आणलं आहे. देवा.." यमुआत्त्या जमीनीवर हात रोवत कशाबश्या उठल्या. दिवाबत्ती केली नाही तर वसंतराव वरुनही आपल्यावर ओरडतील अशी त्यांना सारखी भिती वाटायची. तसं बघीतलं तर वसंतराव कोणीतरी महाभयंकर जमदग्नीचे अवतार होते अश्यातला भाग नव्हता. रेव्हेन्युतून रिटायर्ड झालेले ते एक साधेसुधे कारकुन होते. ते जिवंत असताना गल्लीतली शेंबडी पोरंही त्यांना घाबरली नसतील पण हिंदुधर्माच्या परंपरेनुसार ते म्हणजे यमुआत्त्यांचं सर्वस्व होते. आता अश्या बायकांसाठी नवरा नाही हे सत...