"शांतता... कोर्ट चालु आहे" आणि "महानिर्वाण"
"हिंसा आणि वासना या माणसाच्या मुलभुत भावना आहेत!" "तें"च्या या विश्वप्रसिध्द वाक्याला कसल्याच सिद्धांताचा टेकु न देता मी पट्कन मान्य करुन टाकतो. शेपूट गळून गेलं तरी आपण आपल्यातलं जनावर जपतोच नां? जंगल काय झाडांचंच असतं? जनावरं राहातात त्याला जंगल म्हणतात मग ते भलेही इमारतींचं असो. आपल्या बहुतेक कुठल्याच साहित्यात/कलेत हा रासवटपणा का उतरत नाही? एक मिनीट; भडकपणे लिहीणं म्हणजे या विषयाला भिडणं नव्हे. किरण नगरकर (रावण आणि एडी) आणि नातिचरामी (मेघना पेठे) आणि तत्सम लिखाण (गौरी, अर्थातच अपवाद..सानिया पेक्षा कितीतरी जोरकस आणि सकस) निदान मला तरी मुद्दाम "धाडसी" केल्यासारखं वाटतं. किरण नगरकर तर अगदी इंग्रजीतल्या चलाऊ लेखकांइतका टाकाऊ... वासना आणि हिंसा यांच्या व्याख्या हिंदी सिनेमात दाखवतात तश्या पावसात भिजणारया बाया (किंवा एकमेकांवर आपटणारी "कलात्मक" फुलं) आणि टोमॅटो केचपचे डाग या पुरत्याच मर्यादित आहेत? "ईडिपस" आणि " ऑथेल्लो"त वासना आणि हिंसा नाही? मराठीत असे मैलाचे दगड का नसावेत? पांढरपेश्यांनी लिहीलं म्हणून आणि झाकून ठेवण्याच्या तद्...