अस्तित्वशोधाच्या दंतकथा
काही सुचत नसले की मला पंखांच्या आणि बिनपंखांच्या दंतकथा आठवत राहातात. भास पापण्यांना पेलेनासे झाले की त्यांच्या दंतकथा होतात म्हणे. नीज येण्यापुर्वीची ही कथा.. आज जरा वेगळंच. ती हसली. किती ऋतुंनंतर हसली याचे हिशोब करायलाच हवेत असं नाही पण बेदम सैबेरियन हिवाळ्यात एका रशियन राजकन्येचं हसणं नक्कीच अर्थपुर्ण असणार. ती जन्माला आली तेच जन्मदात्रीच्या मुळावर. "कुणी हिच्या गात्या गळ्यातून काळजापर्यंत बर्फाचे खंजीर आरपार नेईल तरच राजघराणं वाचेल. अन्यथा कुलक्षय निश्चित!" राजज्योतिष्याच्या या भविष्यानंतर गेली कित्येकं वर्षं न हसताच राजकन्या या वैराण सैबेरियन वाळवंटात मारेकरयाची वाट पाहात भटकत होती. पण आज जरा वेगळंच. आज ती हसली. ती हसली तसे तिचे गात्र गात्र हसले, क्षणभर कौतुकाने निसर्गही थबकला. आरस्पानी देह तिचा, वयाच्या नाजुक वळणावर स्वतःवरच मनापासुन हसला. "कुणी येणार असेल आज? की माझे डोळेच वाटुलीचे?" ती विचारती झाली. बर्फावरुन प्रकाश परावर्तित होतो तसा आवाजही. आपलाच घंटेसारखा किणकिणणारा आवाज ऎकून ती हिरमुसली पण एकट्या माणसांच्या मनाचे संकेत सहसा चुकत नाहीत. तुर्कस्तानातून जख्...