अस्तित्वशोधाच्या दंतकथा

काही सुचत नसले की मला पंखांच्या आणि बिनपंखांच्या दंतकथा आठवत राहातात. भास पापण्यांना पेलेनासे झाले की त्यांच्या दंतकथा होतात म्हणे. नीज येण्यापुर्वीची ही कथा..

आज जरा वेगळंच. ती हसली. किती ऋतुंनंतर हसली याचे हिशोब करायलाच हवेत असं नाही पण बेदम सैबेरियन हिवाळ्यात एका रशियन राजकन्येचं हसणं नक्कीच अर्थपुर्ण असणार.

ती जन्माला आली तेच जन्मदात्रीच्या मुळावर. "कुणी हिच्या गात्या गळ्यातून काळजापर्यंत बर्फाचे खंजीर आरपार नेईल तरच राजघराणं वाचेल. अन्यथा कुलक्षय निश्चित!" राजज्योतिष्याच्या या भविष्यानंतर गेली कित्येकं वर्षं न हसताच राजकन्या या वैराण सैबेरियन वाळवंटात मारेकरयाची वाट पाहात भटकत होती.

पण आज जरा वेगळंच. आज ती हसली. ती हसली तसे तिचे गात्र गात्र हसले, क्षणभर कौतुकाने निसर्गही थबकला. आरस्पानी देह तिचा, वयाच्या नाजुक वळणावर स्वतःवरच मनापासुन हसला. "कुणी येणार असेल आज? की माझे डोळेच वाटुलीचे?" ती विचारती झाली. बर्फावरुन प्रकाश परावर्तित होतो तसा आवाजही. आपलाच घंटेसारखा किणकिणणारा आवाज ऎकून ती हिरमुसली

पण एकट्या माणसांच्या मनाचे संकेत सहसा चुकत नाहीत. तुर्कस्तानातून जख्मी उमर राजापासून लपतछपत सैबेरियात पोचला होता. उमर कोण ते पुसु नका. उमर कवींचा कवी, गानगंधर्व आणि शिल्पकारसुद्धा.

महान उमर सैबेरियातल्या बर्फामुळे थिजला होता की जगरहाटीमुळे कळायला कसलाच वाव नव्हता. पण राजकन्येच्या अथक कष्टांनंतरही तो मुकाच राहीला. हिवाळ्यातल्या जखमा लवकर भरत नाहीत म्हणतात आणि कलाकाराच्या मनात कसले ऋतु वसतीला असतात कोण जाणे.

दिवस गेले, रात्र गेली.

पर्याय नसल्याची सवय झाली की निवडीचे प्रश्नच मुळी उरत नाहीत. उमर किंचित उलगडायला लागला. राजकन्येच्या सहवासात अर्थांना परत शब्द मिळायला लागले. अतीव दुःखाची गाणी लिहीणारा उमर जगण्यावर भाष्य करु लागला.

उमरला वेध लागले होते अमाप सुंदर राजकन्येला शब्दात बंद करण्याचे, दगडी शिल्पातुन जिवंत करण्याचे. त्याच्या कलाकार डोळ्यांना राजकन्येच्या शरीरापलीकडचं दिसत होतं आणि मातीत घडलेली राजकन्या मात्र उमरच्या एका स्पर्शासाठी आतूर झाली होती. रात्र रात्र राजकन्या उरी फुटत होती आणि उमर; विक्षिप्त शब्दांचे कंगोर पारखत राहीला.

कहनेवालों का कुछ नहीं जाता
सहने वाले कमाल करते हैं
कौन ढुन्ढे जवाब दर्दों के
लोग तो बस सवाल करते हैं

उमरला राजकन्येचं मन समजत का नव्हतं. पुरुष असला तरी कलाकार होता तो. टोकदार संवेदनांचे पीळ काय फक्त स्त्रियांच्याच आत्म्याला असतात?

दिवस गेले, रात्र गेली.

चंद्राळलेल्या रात्री उमर राजकन्येच्या डोळ्यात काही शोधत होता, एखादाच शब्द की एखादाच सुर ज्याने अमर बनवले असते उमरला; उमरच्याच लेखी. पण उमर हरवत गेला, राजकन्येच्या निळ्या डोळ्यांमधे. पुर्ण चंद्राच्या रात्री उमर स्वतःचे अस्तित्व राजकन्येच्या देहावर खचवित गेला.

देह पांघरावा-आंथरावा देह
देहापरी देह- झिजवावा

कैफ निवळला तसा उमर भानावर आला. त्याच्या कलाकार हातांनी जिथे जिथे चाचपलं तिथे तिथे त्याला राजवंशी अस्तित्वच जाणवलं.

तो क्षण त्याने शिल्पात गोठवायचा ठरवला. त्याला जाणवलं आणि राजकन्येलाही; की जगातल्या एका अप्रतिम शिल्पाचा आता जन्म होत आहे. त्याला शिल्पात राजकन्येचा देह नव्हे तर कलाकाराच्या अस्तित्वाचा आरंभ आणि अंत कोरायचा होता आणि त्याला आता कसलेच अडथळे नको होते, राजकन्येच्या वस्त्रांचेही.

दिवस गेले, रात्र गेली.

जगण्याची शुद्ध हरवली तरी उमरची छिन्नी कशीबशी सुरु होती. मात्र शेवटचा घाव घालण्याआधी त्याने पापण्यांवर जमलेला बर्फ दुर केला. त्याच्या प्रेमापोटी राजकन्या ऎन बर्फात विवस्त्र उभी होती. किती तास-किती दिवस? तिच्या पर्यंत पोचण्याइतपतही शक्ती नव्हती उमर मधे, पण तो खुरडत खुरडत तिच्यापाशी गेला. त्याला माहित होतं की तो एक घाव घातला की त्या दोघांनी जे जन्माला घातलं होतं ते पाहून राजकन्या सारं दुःख विसरणार होती.


पुढे काय लिहु मी? नाही लिहावं वाटत मला. शेवट अपेक्षित असले की परिणामकारकता येत नाही म्हणतात. शेवट अपुर्ण असले की कलाकृती उमलत जाते? रशियन राजकन्येच्या विवस्त्र पुतळ्यागत? उमर शेवटच्या घावापाशी येऊन कोसळला होता त्यामुळे पुढचे सारे तर्कवितर्क, अर्थाचे अनपेक्षित शोध तुमच्या आमच्या माथी.

राजकन्येला असलेला शाप उमरला माहित असता तर? या प्रश्नापाशी येऊन माझी नीज थबकली आहे.

Comments

फारच छान.
अशी एखादी रशियन लोककथा अस्तित्वात आहे की स्थळ काळासहित ही तुमच्याच कल्पनेची भरारी?
Megha said…
BHANNAT!
vakya n vakya bhannat!
a Sane man said…
kasakaay yanchach prashna malahi padlay...but in either case post bhannat surekh zalay!
किती वाक्यांना ठेच लागते आहे सांगू?

"भास पापण्यांना पेलेनासे झाले की त्यांच्या दंतकथा होतात म्हणे. नीज येण्यापुर्वीची ही कथा.."

"बेदम सैबेरियन हिवाळ्यात एका रशियन राजकन्येचं हसणं नक्कीच अर्थपुर्ण असणार.."

"..एकट्या माणसांच्या मनाचे संकेत सहसा चुकत नाहीत.."

"..हिवाळ्यातल्या जखमा लवकर भरत नाहीत म्हणतात आणि कलाकाराच्या मनात कसले ऋतु वसतीला असतात कोण जाणे.."

"..पर्याय नसल्याची सवय झाली की निवडीचे प्रश्नच मुळी उरत नाहीत.."

"..पुरुष असला तरी कलाकार होता तो. .."

"..पुर्ण चंद्राच्या रात्री उमर स्वतःचे अस्तित्व राजकन्येच्या देहावर खचवित गेला..."

"...पुर्ण चंद्राच्या रात्री उमर स्वतःचे अस्तित्व राजकन्येच्या देहावर खचवित गेला..."

घिसाडघाईनं प्रतिक्रिया लिहायला घेतली खरी. पण आता नकोच वाटतं आहे काही लिहायला, असे अनेक अर्थ आहेत तू मुकाट सोडून दिलेल्या शेवटाआड.
Anonymous said…
faarach chhan! sampurna kalpanik ahe, ki itihasacha kahi adhar ahe?
Samved said…
Thanks to everybody for good comments :)

सगळ्या दंतकथा ऎतिहासिक किंवा खरयाच असाव्यात असं नाही! This one is my baby! जसं कसं आहे तसं :)

खुप सारया मेघा/मेघना झाल्यात..कसं कळणारं? मेघा, मेघना, thanks and as I said, it's my baby.

Meghana B. तुझा "चढा हुआ था जो दरया उतर गया यारों" झाला की परत comment लिही (काय हा हावरटपणा)

सेन, प्रश्नांना उत्तर म्हणून पुढचा भाग लिही! मजा येईल
Anonymous said…
simply great ... zhakaas
Dhananjay said…
Truly good write-up!
Monsieur K said…
absolutely stunning!
meghana b ni namud kelele lines... kharach.. the impact of each n every line.. each n every word... is absolutely stunning!!

mast lihili aahe... dant-kathaa :)
a Sane man said…
"सेन, प्रश्नांना उत्तर म्हणून पुढचा भाग लिही! मजा येईल"...

baap re! yachya pudhacha bhag lihaycha tar to yala toDis toD hava...meghana ne vakya copy paste karayche tari kshTa ghetle...mala tar vakyagaNik thech lagat hoti...suchala tar lihinahi paN frankly he evdha bhannat surekh aahe ki mala tari khatri nahi bua!
Jaswandi said…
aah.. hyala chhan mhanu ki dushtapana mhanu?
ka na itka mast lihaycha? ani shevat asa anun soadaycha?
khupch surekh!
arre he post mi adhich vachalela, pan mag kasakay nisaTala mazya comment lihinyatun?

jabbrii lihilayes re. ekeka vakyala vaahwwaa dyaavi asala great zalaye. :-)

end tar ekdum punching ahe!
Nandan said…
Varatimagun chalalelya ghoDyasarakha vaaTatay pratikriya lihitana...pan harkat nahi. bhannaaT lihilay. Dusarya eka pratikriyet meghanane mhaTalyapramaNe ajoon kahi lihila tar te shabda-bambaaL hoeel!