Posts

Showing posts from February, 2008

सपाट उताणा शुक्रवार

शुक्रवार म्हणजे तसा ही अफाटबापुच. हिरवा शर्ट, पिवळी चड्डी आणि लाल गमबुट घालून सुद्धा ऑफिसात आलेलं चालतं. थोडं काम, जास्त मजा, दुसरया दिवशीच्या सुट्टीचे आनंद यांचा विचार करत तसा ही बराच जातो दिवस. शिवाय त्या दिवशी का कोण जाणे पण स्त्रीवर्ग फॅशन-शो असल्यागत भरभक्कम कपड्यात असतो. त्यामुळे शुक्रवारी सगळ्याच पोरांचा चैनसुख मनवाणी झालेला असतो. आजचा शुक्रवार हे सगळे धंदे झाले तरी फताडा तो फताडाच आहे. दोन वेळा ब्रेकफास्ट, दोन चहा, आणि थोड्याच वेळात होणारा एका मित्राचा सेन्डऑफ, असलं भारी शेड्युल असून ही ऎन सकाळी मनावरचा थकवा काही जाण्याचं नावच घेत नाहीए. डोक्याचा वापर नाही केला तर डोकं गळून जाईल का या विचारासरशी दचकुन दहा डोक्याच्या रावणासारखा "हा हा हा हा" असं हसूनही पाहीलं. परीणाम शुन्य. सालं टीव्ही पाहाणं कमी केलं पाहीजे. भलतच खोटंनाटं दाखवतात वाटतं. आता दुपारी एक रॅगिंग कम रिव्ह्यु पण करुन घ्यायचाय! टीव्ही पाहाण्याचे फायदे! सहनशक्ती तीव्र वाढते आणि चाललेला प्रसंग आवडत नसेल तर चॅनल चेन्ज करता येईल असं उगीच वाटत राहातं. तर आज रिव्ह्यु म्हणजे साईबाबा. म्हणजे थोरला बॉस त्यांचा भक्त आह...

एका लग्नाची गोष्ट

म्हणजे फारच विचित्र दिवस होते. डोक्याचा नुस्ताच चौकोन झालेला. एका कोपरयात MBAचा कोळी भराभरा जाळं विणत होता, दुसरया कोपरयात BE च्या दुरावलेल्या मित्र परीवाराच्या ठसठसणारया आठवणी आणि त्याच्या अनुषंगाने आलेले स्पायरोगायरीय अनुभवांचे ताजेच साक्षात्कार, तिसरया कोपरयात तुच्छ साहित्यीक किडे आणि चौथा रोजच्या गणितांनी व्यापलेला. मेंदु वाळलेल्या नारळासारखा नुस्ताच टणटण इकडून तिकडे घरंगळत राहायचा कवटीच्या आत. शिवाय सोबतीला पुणे-मुंबै चकरा सतत सुरुच होत्या. सालं एकदा पाय उचलुन बघायला हवा होता, नक्की तीळ असायचा तेव्हा. कसला मॅडसारखा हिंडायचो मी. टाटा, अंबानी पेक्षा गुलझार, ग्रेस भारी वाटायचे. वाटायचं, चंद्राला कवटाळुन आतच कोलमडणारे कवी म्हणजे जबरा ग्रेट. व्यवहार MBAत शिकत होतो तरी नाचणारया काळ्या अक्षरांपलीकडे त्याचं अस्तित्व शुन्य. आणि तिथे नुस्ताच व्यवहार शिकवायचे नाही तर मध्यमवर्गीयपणाही घासुन पुसुन साफ केला जायचा. तोंडावर सिगरेटचा धुर सोडत फ्रेंच मधुन इंग्रजी बोलणारया पोरी आणि जरा अतीच कुल असणारे डुड्स. एकुणात सारं सुरेख सुरु होतं. असाच एक पुणे मुक्काम. दिवसभर मैत्रिणीसोबत हिंडत होतो. आधीच्याच ...

सामान

जीन्सच्या दोन्ही खिशात हात घालून परक्यासारखी तिने तिची खोली निरखुन पाहीली. लिमिटेड पसारा तिला नेहमीच आवडायचा. घर हॉटेलसारखं चकाचक कश्याला ठेवायचं? थोडं अस्ताव्यस्त असलं की घरात कसं चैतन्य वाटतं हा तिचा आणि तिच्या बाबाचा लाडका फंडा आईने गेल्या चार दिवसात गुंडाळुन ठेवला होता. "एनी वे" तिने मनातच खांदे उडवले, "लग्न झालं की हे घर सोडायचंच आहे. मग आई आणि बाबा त्यांना आवडेल आणि जमेल तसं घर ठेवतीलंच की. सुरुवात माझ्या खोलीपासून केली समजू" तिनं अस्वस्थपणे स्वतःशीच हसण्याचा प्रयत्न केला. "अजून चारंच दिवस!" कुठे जायचय यावर दिवसांचे वेग अवलंबुन असतात हे लक्षात न आल्याने चार दिवस म्हणजे अंतर जवळ की कमी, याचे हिशोब ती मनात मांडु लागली. मापनातली दोन भिन्न परिमाणे एकत्र आणूनही तिला ते उमगलं नाही. अर्थात तिच्या समजण्याउमजण्याने वेळ किंवा अंतर, काहीच कमी जास्त झालं नसतं. धडधडत्या मनानं तिने तिचं कपाट उघडलं. तिचा खजिना, आईच्या भाषेत कचरा, अजूनही तिथेच होता. हळूवारपणे तिने एकेक गोष्टं जमिनीवर ठेवायला सुरुवात केली. आजीने आणलेली भातुकलीची भांडी, हात मोडलेली बाहुली, बाबासोबत जम...

जेजुरी

माझ्या अहंकाराचे टोक प्रतिभेच्या बेचक्यातुन बाहेर येण्याआधी तुझा गोंधळ मांडु दे जेजुरी काट्याने कधी कोरावेच वाटले नाहीत तुझे डोळे अगणित डोळस तुझा उदे उदे उदे अंगांना प्रत्यांगे असतात, आतल्या बाजुने, कळवण्यासाठी उसवुनच टाकलेस त्वचेचे नाजुक कोवळे पोत, काही सिद्ध करण्याचे कसले हे उरफाटे हट्ट जेजुरी आत्म्याच्या संपृप्ततेला आव्हान देणारी शरीराची भाषा वसतीला आणलीस आणि सोबत माझ्या मर्त्यपणाचे अगणित पुरावे भरभरुन उधळु दे हळदीचे रान जेजुरी, माझं माणुसपण सिद्ध केलस चल आता उपभोगाचे उत्सव साजरे करु शेज पिवळी-देह पिवळा गंध तुझा मंद पिवळा श्वास पिवळे-रात पिवळी अंगावरचे बहरही पिवळे उरी फुटणारे वारे पिवळे तुझ्या देही जिरवले चंद्र ते ही मद्द संथ पिवळे जेजुरी, माझ्या डोळ्यातील उखाणे तुझ्या देहावर कवितेगत उतरले तेव्हा काय झालं? भंडारयाचं धुकं झालं दिवसांनं सोनं न्यालं रिकामं शहर वसतीला घेऊन अक्षर न अक्षर जेजुरी झालं आत्मभानाचे स्र्किझोफेनिक दुसरं टोकं जेजुरी बोटांनी अंगावर नव्याने कोरलेल्या जुन्याच कविता जेजुरी आत्मद्वेषाचे आणि अहंकाराचे उत्सव जेजुरी सवयीने मी जेजुरी

मोठा छान उजळ उंदीर

दिवस: आद्य आणि अनंत पाल, साप, उंदीर, सरडे यांना फक्त बायकांनीच घाबरावे असा नियम आहे का? म्हणजे, सारवासारव नाही करत मी, पण मला घाबरण्यापेक्षा किळसच जास्त वाटते त्यांची. दिवस: अकरावा (कुठून तरी सुरु करायलाच पाहीजे नाही का? Placeholder पलीकडे याचं फार काही महत्व नाही) अचानकच गावात फार उंदीर दिसताहेत. त्यांच्या दिसण्याची इतकी म्हणून सवय झाली आहे की मघाशी पल्याडच्या बिल्डींग मधल्या पांडेकाकु मला उंदरासारख्या दात विचकुन हसल्या सारख्या वाटल्या. आणि तो ढापण्या जोश्या, त्याच्या संघीष्ट मिशा, गेल्या दोन दिवसात जास्तच फेंदारलेल्या दिसताहेत, उंदरासारख्या? दिवस: तेरावा (१३? छान छान) डोकं भंजाळलं आहे नुस्तं. कसली ही करणी? कुणी केली? गावातले लोक हळु हळु उंदीर होताहेत? दिवस: सतरावा मी चिमटा घेऊन बघितला हो! पण खरच शेजारच्या टुमण्याचा उंदीर झालाय. आणि त्याची ती गोंडस, नुक्तच लग्न होऊन आलेली टुमणी पण...श्श्श्श्श्शी...तिची उंदरीण, आय मिन, गोंडस उंदरीण झालीय दिवस: तेविसावा आणि पुढे तसंच काहीसं... "हॅल्लो! काय चावटपणा चाललाय हा? कुणाला नाही कळालं तरी तुम्ही आपले प्राईम नंबर टाकून दिवसागणीक आमच्यावर एक ...