ऋतुसंभव
लहानपणी मोठ्ठेच प्रश्न पडायचे. निबंध यायचा "माझा आवडता ऋतु". नक्की वसंत, शिशिराबद्दल लिहायचे की हिवाळा, पावसाळा या बद्दल लिहायचे हे ठरे पर्यंत पेनचं नीब वाळून जायचं. असं वाटायचं की सध्याचा जो ऋतु आहे त्या पेक्षा नेहमीच दुसरा कोणताही ऋतु चांगलाच असणार. पावसाळ्यात पाऊस पडून सगळा राडा होणार, हिवाळ्यात ऎन थंडीत खाकी चड्डी घालून सकाळी सकाळी शाळेत जावं लागणार आणि उन्हाळा म्हणजे तर सगळी कडे कहर नुस्ता. पण मग ऋतुंना नवे गंध, रंग, चव आणि स्पर्शही फुटले. धम्म पिवळा आंबा आणि डझनांनी पुस्तकं घरी आली की ओळखायचं उन्हाळा आला. मोगरयाचं फुल टाकलेलं माठातलं डोहगार सुगंधी पाणी, कधी फ्रीज मधलं कॉनसन्ट्रेटेड रसना डायरेक्ट प्यायची लहर, वेलची टाकलेलं पन्हं आणि कैरीची वाटलेली डाळ... कुणाची बिशाद आहे उन्हाळ्याला वाईट म्हणण्याची! ऎन पावसाळ्यात तासंतास पन्हाळीचं पाणी ओंजळीत जमा करत खिडकीत डोकं टेकवुन डोळे कधी स्वप्नांनी तर कधी पाण्याने भरण्याचे ही काही ऋतु होतेच कधी. गवताच्या पात्यावर टेकलेला एखादाच चुकार थेंब टिपलाच नाही तर मोती बनेल याची खात्री देणारा रंगबावरा ओला ऋतु. छत्री, रेनकोट न उघडताच रस्त्याव...