Saturday, March 15, 2008

"आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?"

"लिखाणामागच्या प्रेरणा आणि चौकटी"

मेघनाने दिलेला खो स्विकारुन ही खेळ मी पुढे चालु ठेवत आहे.

कोणत्याही कलेमागच्या प्रेरणा या काही मुलभुत मुद्यांभोवती फिरत असतात. त्या मुद्यांना हात घालण्याआधी या लिखाणाच्या आणि त्याच्या अनुषंगाने येणारया कलांच्या उल्लेखाच्या सीमा रेषा स्पष्ट केलेल्या बरया. आदी कला म्हणून ज्यांचा उलेख्ख करता येईल अश्या तीनच कला; चित्र, नृत्य आणि संगीत. कोणत्याही पुरातन संस्कृतीचा अभ्यास केला तरीही परत परत हेच सत्य अधोरेखित होत राहाते. आदी मानवाने त्याच्या भाव-भावनांना वाट करुन देण्यास अत्यंत मुल स्वरुपात या कलांचा वापर सुरु केला. आणि त्या नंतर भाषा आली. भाषेचे महत्व केवळ संभाषणाचे साधन एव्हढेच न राहाता विविध आदी कलांचे "प्रोसेसायझिंग" करणे असे ही आहे. कुणी चित्रकार चित्र काढतो म्हणजे त्याच्या मनातील मुर्त-अमुर्त विचारांना तो चित्रातुन व्यक्त करतो किंवा कुणी मृदुंगावर तडधमची थाप देतो, त्यामागे एक विचारप्रक्रिया असते. माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीनंतर चित्र, संगीत आणि नृत्य या केवळ संवादा पुरत्या मर्यादित न राहाता अभिजात कलांमधे परावर्तित झाल्या आणि सर्वसामान्य माणसाचे या कलांशी नाते तुटले. भाषेचे महत्व आणि सामर्थ्य हेच, की ती एकाच वेळी सामान्यजनांचे संवाद साधण्याचे माध्यम असते आणि कलावंताचे अदभुत विश्व लिपीबद्ध करण्याचे साधनही. जेव्हा भाषा कलांचे "प्रोसेसायझिंग" करते असे मी म्हणतो, तेव्हा विविध कलामाध्यमांचे हेच लिपीकरण मला अपेक्षित असते (उदा. कुमारांचे सांगितिक विचार शब्दबद्ध करणारे "मुक्काम पोस्ट वाशी" हे पुस्तक) . म्हणूनच, या पोस्टचा आवाका मी लेखन/शब्द/भाषा एवढ्यापुरता ठेवणार आहे. अर्थात या सीमांचे बंध लवचिक आणि भासमान असल्याकारणाने जेव्हा गरज असेल तेव्हा मी जरुरीचे संदर्भ उधारीने घेईनच.

अनुभवांचे सादरीकरण म्हणजे लिखाण नव्हे. आपल्या अनुभवांना वैश्विक करण्याच्या प्रतिक्रियेत त्यांचे सुलभिकरण, विलगीकरण, छ्टांच्या प्रतिवारी करणे आणि जरुर असेल तेव्हा मोडतोडही करणे, ही लेखनप्रक्रियेची बहुदा पहिली पायरी असावी. अनुभवांचे हे वैश्विकरण आवश्यक आहे अन्यथा भाषेचे कलेत रुपांतर होणे ही मोठी कठीण गोष्ट. एकदा हे वैश्विकरण मान्य केले की येणारे बहुतेक सारे अनुभव एका विशिष्ट चष्म्यातुन पाहाण्याची सवय लेखक/कवींना लागत राहाते. उदा. जी.ए. किंवा ग्रेसचे लिखाण. रुढ अर्थाने नव्हे पण एका विशिष्ट मानसिक स्तरावर अनुभवांचे पोत तपासले जातात. जशी त्या लेखक/कवीची जातकुळी तसे अनुभवांचे पोतानुसार स्विकारणे वा नाकारणे गणितीय पध्दतीने म्हणावे इतपत यांत्रिक पणे होत राहाते. लिखाणाची उर्मी, प्रतिभेचे झटके हे त्या अनुभवांच्या तीव्रतेवर जसे अवलंबुन असतात तसेच ते त्या अनुभवांना काळाच्या कसोटीवर तोलणारया काही प्रसंगांवरही अवलंबुन असतात. काही अनुभव काळ, अवकाश या संकल्पनांच्या पल्याडही असु शकतात. वीस वर्षांपुर्वीचा एखादा प्रसंग कोड्यातील एखाद्या तुकड्याप्रमाणे आजच्या एखाद्या अनुभवाच्या तुकड्याशी निरलसपणे बिलगुन एक अखंड अनुभव-साखळी निर्माण करु शकतो. अनुभवांना सामोरे जाण्याचे कसब ज्याला जमते त्याला ते शब्दबद्ध करण्याचे वरही असतिल तर रसिकतेची पायरी ओलांडून तो कलावंताच्या पदाला पोचु शकतो.

खरी गंमत इथून सुरु होते. आपणच उभ्या केलेल्या रेखीव चौकटी कधी इतक्या जवळ येऊन उभ्या ठाकतात की पल्याडचे काही दिसुच नये. काही लेखक/कवींच्या बाबतीत या चौकटीच्याच बंदिस्त शवपेट्या झाल्या. अनुभवांना चाळणी लावता लावता नवे अनुभव शोषण्याची शक्तीच नाहीशी होत जाणे हे एका अर्थाने कलावंताचे मरणच. "शैली" असे गोंडस नाव दिले तरीही वास्तव तेच! असंख्य उदाहरणे आहेत आपल्याभोवती. परंपरांचे जिथे अवडंबर माजवले जाते त्या संगीत क्षेत्रात शैलीला नाकारणारे कुमार म्हणूनच ग्रेट ठरतात. शैली ठरते आहे हे लक्षात येताच क्युबिझमला रामराम ठोकून स्वतःच्याच प्रतिभेच्या विरोधात बंड करणारा पिकासो म्हणूनच काळाच्या कसोटीवर खरा ठरतो.

शब्दांच्या बाबतीत मोठा धोका हाच आहे की ते सर्वांच्याच परिचयाचे असतात. रोजच्या सरावाने त्यांच्या छटा जून झालेल्या असतात आणि अर्थ असंवेदनशील. नव्या शब्दनिर्मितीत शब्दबंबाळ होण्याच्या अजागळ शक्यता जपत जपत अर्थांना नेमक्या शब्दांना भेटवणे हे मोठे जिकीरीचे काम. शब्दांची प्रतीरुपे म्हटले तर अर्थाभोवती कोंदणागत बसतात आणि किंचितही फसले तर कृत्रिमही वाटू शकतात.

इतकी सारी सर्कस सांभाळीत लिहीण्याचे मनःपुत सोस तरीही का? पैसा आणि प्रसिद्धी ही सर्वमान्य कारणे दूर ठेवूनच या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. सगळेच लिहीतात म्हणून मी ही लिहीतो पासून सांगीतलेच नाही तर गुदमरुन जाईन इतपत टोकाच्या प्रतिक्रिया ऎकायला मिळतील असा हा दांडगा प्रश्न. कोडी घातल्यागत कविता लिहीताना नेमके काय साधायचे असते मला? बाटलीबंद संदेश ऎन समुद्रात भिरकावण्याचे समाधान? की तुम्हालाच ती बाटली मिळेल आणि तो संदेश तुम्ही डीकोड कराल याचे भय? दोन टोकांवर झुलत मी अनिश्चितकाल वावरत असतो. ती अनिश्चितता, तो संदिग्धपणा, अनुभवांच्या ओझ्यांखालुन उतरण्याची ती लगबग आणि नव्या अनुभवांची अपरंपार वाट.. सारेच लिखाणामागचे आदीम स्त्रोत.

एकाने एकालाच खो देण्याचा नियम जडपणे पाळत पुढचा खो मी फक्त ट्युलिपला देतो आहे.

8 comments:

Meghana Bhuskute said...

'खो खो'चं सार्थक झालं! मनापासून आभार. उत्तरल्याबद्दल, इतक्या गांभीर्यानं उत्तरल्याबद्दल आणि वेळ न घालवता साखळी पुढे चालू ठेवल्याबद्दल.

Megha said...

aai cha lecture aikalya sarakha vatala....mhanaje changlya arthane re..itka abhyaspurna lihila aahes ki asa vatatay aai ne dictate kelay....sadhya padlya padlya tila kahich kaam nahi na!!!!just kiddin'.nice work....keep it up

संवादिनी said...

mastach re... vichar karayala lavanara kho kho aahe ha......

SamvedG said...

मेघना b: खेळ सुरु केल्याबद्दल thanks. हे कधी तरी करायलाच हवं होतं, तू केलस. Good

संवादिनी: :) thanks

मेघा: मला अगदी वाटलच होतं तुझी reaction अशीच येईल...खरं सांगायच तर मी hospital मधेच बसून हे पोस्ट लिहिलय. तिला नाही माहित अजुन ;)

स्वाती आंबोळे said...

सगळंच पटलं असं नाही, पण बरेच दिवसांनी एखाद्या लेखाने इतकं विचारात पाडलं. धन्यवाद.

HAREKRISHNAJI said...

खुब कहा. Performing Arts मधे गायनवादन, नृत्य व चित्रकला येते.

कुमांरांचे मी हे पुस्त्क वाचले आहे

a Sane man said...

सहीच लिहिलयंस. विचारघन, मुद्देसूद...जवळपास सगळं पटलं मला

Silence said...

आवडलं लिखाण... खूपच छान लिहीले आहे.