ऊन: ताजे संदर्भ


सुडाचं बेफाम संतप्त ऊन नव्हतं ते. उभे आडवे वार करुन संपून जातं असं ऊन सायंप्रहरी, आणि आईच्या पदराआड दमून, हमसुनहमसुन लपून जावं तसं ढगांआड मिटून जातं.

हे ऊन जरा निराळं; द्रौपदीच्या कुळातलं. इथे दिवस-रात्र सुडाची चक्रं फिरतील, आत्मनाशाच्या बोलीवर, पराभव पलटवले जातील पण युद्ध संपणार नाही. दिवसाचे प्रहर अस्ताला गेले तरी आग शमत नसते आणि द्रौपदीच्या अस्पर्श केसांसारखे किरण, निळ्या गडद शाईला आटवत राहातात. आकाशात दुरवर काही ही दिसत नसतं. फक्त एखादाच चुकार पक्षी पंखातलं बळ तुटण्याआधी घट्ट मनानं उडत असतो.

रस्त्यावर घम्मटगार, खारट, शांतता, त्याच्या एका टोकाला उगवलेलं बोन्साय क्षितीज, आणि डोळ्यांना उघड दिसणारी ऊन्हाची तरल लहर. मी मान फिरवत दमट डोळे मिटतो तर पापण्यांआड सुर्याचे किंचित वर्तमान.

"स्वतःपुरते सुटकेचे पुल तयारच ठेवावेत आपण" कारच्या बंद डबक्यात एसीचा नॉब पिळत मी कितीदाही हे ब्रम्हवाक्य उच्चारलं तरी मला लाज वाटणार नसते.

डोळ्यांवरच्या थंड काचांतुन सरावाचा बहावा दिसला नाही तसा मात्र मी चरकलो. पार त्याच्या झाडाखालीच जाऊन थांबलो तसा जुन्या ओळखीतुन घट्ट भेटला तो.

"जुना परिचय?" एक खेळकर प्रश्न. बहाव्याच्या वीतभर सावलीतदेखिल मावत होता तिचा देह. डोळ्यात नवथर तारुण्य आणि घालमेल. "हो" मी काही तरी बोललं पाहीजे या कृतज्ञ भावनेतुन संभाषण पुढे नेण्याच्या प्रयत्नात विचारतो "इतक्या ऊन्हाच्या तुम्ही इथे काय करताय?" "कच्च्या सुर्यात बहाव्याच्या झाडाखाली भेटायचं ठरलं होतं माझं आणि मैत्रिणीचं. किती तरी वेळ झाला पण अजून पत्ताच नाही" मला लबाड हसु फुटतं. एक गल्ली पलीकडे दुसरया बहाव्याच्या झाडाखाली कच्च्या सुर्यात अजून एकाला मी उभा पाहीलेलं असतं, वाट बघतं...

Comments

Anand Sarolkar said…
Aha...kay gaar vatala vachun ;)
a Sane man said…
:)...jarasa mitakshari..paN sahiye!
a Sane man said…
:)...jarasa mitakshari..paN sahiye!
किती अल्लाद मूड बदलून टाकलास... अप्रतिम झालंय.