ओ सुनी ओ मीरा

सुनी

मेंदुचे तळ ढवळले की हरवलेली माणसेही मिळतात हे माझे साधे गणित. तू आठवणींच्या कोणत्याही कप्प्यात नाहीस याची खात्री होत असतानाच हाक दिल्यासारखी तू भुतकाळातुन हळुच डोकावलीस सुनी आणि संभ्रमाची पिशाच्चे झाली. जशी तू, तश्याच तुझ्या आठवणीही मुकाट सोशीक.

सुनी, दिसायचीस तेव्हा कायमच काम करत असायचीस तू आणि विश्रांती म्हणून तुझ्या भावांना सांभाळायचीस फावल्या वेळात. आम्हाला खेळात एक गडी कमी पडला की तुझ्या साठी तुझ्या आयशीशी भांडायचो आम्ही म्हणून तुझी तात्कालिक सुटका आणि आमच्या ससंदर्भ स्वार्थाचं आता सुचणारं उदात्तिकरण.

पायात चप्पल नाही, आखीव वेणीला तेलाचं बोटं नाही अश्या अवस्थेत परकराचा ओचा खोचून दात ओठ खात तू सागरगोटे उंच उडवायचीस तेव्हा मंत्रावल्यासारखं व्ह्यायचं. वरच्यावर तू झेललेले सागरगोटे पाहावेत की दुसरया हाताने उचलेले जमिनीवरचे सागरगोटे हे कळायच्या आत डाव संपलेला असायचा. 'पहीलं दान देवाला' हे तुझं पालुपद आमच्यापैकी कुणी तरी जिंके पर्यंत सुरुच असायचं हे तेव्हा कधीच कळालं नाही.

चांदण्याच्या रात्री देवीचा गोंधळ असायचा. तेलाच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात त्या घुमणारया बाया भयंकर वाटायच्या. पोत घेऊन नाचणारा बुवा आपल्याच अंगात घुसेल या भितीने जीव थोडा थोडा व्हायचा. 'बोल बये' असं म्हणत बुवा डोळ्यासमोर पोत नाचवायचा तेव्हा मागे कधीतरी पोताच्या आचेने परकर पेटल्याची जुनी भिती तुझ्या डोळ्यात तरारुन यायची. पण 'त्येंच्या अंगात येतय' हे तुझं कातर आवाजातलं भाबडं स्पष्टीकरण ऎकून गच्च धरलेलं अंग सुटं सोडण्याची हिंमत व्हायची माझी.

मुला-मुलींचे खेळ वेगळे ही अक्कल फुटल्यावर एकदा तू भेटलीस. वाळुची रांगोळी घालून त्यात गुंजा लपवायचा खेळ खेळायचो आपण. जाताना जिंकलेल्या सारया लालभडक गुंजा माझ्या ओंजळीत रित्या केल्यास तू, तेव्हा तळहातावर निखारे ठेवल्यागत वाटलं मला. तसं बोलून दाखवलं मी तेव्हा रागारागात माझा हात वरच्यावर उधळलास. लालबुंद गुंजा वाळूभर पसरल्या. चिडके माझे वार तुझ्या हातावरचं गोंदण दिसलं तसे आपसुक थांबले. विचारलं तसं तुझ्या अश्राप डोळ्यात हिरवं चांदणं पडलं. सुनी, तुझं लग्न झालं तेव्हा आपलं जग वेगळं झालं होतं, तुझं नसणं न जाणवण्याइतकं वेगळं.

डांबराच्या सुरेख गोळी सारखे दिवस उडाले. मग उगाच तुझी आठवण आली. विचारलं तर आजी चुप, तुझी आयशी चुप. तू जाळून घेतलस असं कुणी तरी सर्वसाधारण आवाजात म्हणालं. सुनी, हाऊ कॅन यू? पेटलेल्या पोताचे प्रतिबिंब तुझ्या टपोरया डोळ्यात मावायचे नाही म्हणून शरीरभर सामावुन घेतलेस? की बाईपणाचे भोगवटे तुला सहन नाही झाले? उधळल्या गेलेल्या रक्तलाल गुंजा वेचण्या एव्हढं धैर्य माझ्यात नाही सुनी. तुझ्या साठी बिनशपथांचे हे एक साधेच अवतरण.


मीरा

तुझ्या नावाचे ऎतिहासिक संदर्भ मरुभुमीतुन उगवलेले. ललाटरेखांचा लेखाजोखा कायमच धीट गडद होत जातो निसटत जाणारया काळाच्या पार्श्वभुमीवर. पण तुझेही लग्न राजवंशात झाले तेव्हा धानाच्या राशीवर सटवाईने रांगोळी घालताना तुझी सांगड कृष्णसखी मीरेशी घातली की काय असं उगाच वाटून गेलं.

एका बुडालेल्या संस्थानाचे अवशेष कोवळ्या वयात सांभाळताना तुझे खांदे वाकले असतीलही पण चेहरयावरच्या अकाल पोक्तपणात आणि डोळ्यातुन सांडणारया चुकार अल्लड हसण्यात कधीच ते लक्षातही आलं नाही.

मरुभुमीत ऋतुचक्राचे कौतुक कमीच पण निमित्तांचे गारुड उभे करुन आपल्यापुरते फितवता येतेच त्यांनाही. मीरा, तुझे डोहाळे एखाद्या कोड्यासारखे. पिठूर कॅनव्हासचे आरसे करावेसे वाटले तुला. तुझ्या कोवळ्या वयाला आणि वाढत्या देहाला रेखाटताना रंगही अपूरे पडत होते.

आईपणाचे सोहळे डोळ्यांतुन तुडूंब वाहात असतानाच पोटातील गर्भाची परिक्षा घेतल्यागत तू सहजपणे म्हणालीस "देखना, लडकाही होगा" ही भविष्यवाणी की शक्यता की भय, सांगणं कठीण होतं. तुझ्या राणाच्या पहील्या बायकोने गर्भ निसटल्याच्या भितीने जीव दिल्याची वंदता तुझ्या कानावर आली असेल का? राजवाड्यात कुजबुजींना पंख असतात.

अघटीताच्या भितीने तुझ्या जीवघेण्या आजारपणातही अर्धवट झालेलं पोर्ट्रेट्र पुर्ण करायचा हट्ट तुझ्या राणाचा. शुभाशुभांचे इतके दांडगे संकेत जर त्यांना मिळतात तर तुझा गर्भ पोटातच खचल्याचं त्यांना कसं नाही कळालं मीरा? आणि आज तू परत उभी असतेस अपूर्ण चित्र पुर्ण करायला एक अपुरेपण घेऊन.

"डॉक्टर आले म्हणून तुमचा जीव वाचला नाही तर त्या म्हातारया दाईने बाळासोबत तुमचाही जीव धोक्यात घातलाच होता" कॅनव्हासवरचे स्ट्रोक्स नव्याने आखत चित्रकार मान खाली घालून बोलला.

"सारंच खोटं आणि बेतून आणलेलं! मला शुद्ध येण्याच्या आत माझ्याच पान्ह्यात बुडवुन मारलं त्यांनी माझं बाळ, जीव गुदमरेस्तोर. राणांच्या वंशात मुली होत नसतात हे सत्य माझ्याहुन दाईला जास्त माहीत होतं."

मीरा, राणाच्या पहील्या बायकोचे सारेच धुसर संदर्भ क्षणात स्पष्ट झाले आज. मला तुझ्या शोकाचे आणि तुला जगण्याचे गहीरे शाप.

डोळे मिटले तरी स्वतःचेच प्रतलासारखे सपाट शरीर हातांनी चाचपुन पाहाताना दिसतेस मला तू मीरा. डोळे उघडले तर आतल्या आत धसणारया वाळुच्या किल्ल्यासारखे तुझे निव्वळ शारीर अस्तित्व.

Comments

Anand Sarolkar said…
"Suni" awadla. "Meera" nahi. Donhi madhe kahi tari sarkha ahe...pan kay?
बाईपणाचे भोगवटे... निमित्त बाईपणाचं खरं तर. नाहीतर आम्हांला नसते कळले हे भोगवटे? प्रत्येक जण आपापल्या दु:खाची मोहर कपाळावर उमटवूनच येतो हे खरं. मग निमित्तं काय, मिळतात.

प्रत्यक्ष भोगणार्‍याचं नशीब.
आणि हे असं अक्षरं कोरून ठेवणार्‍याचं. नशीब तुझं, संवेद.
Megha said…
"suni" aavadala jasti, karan tila aapan anubhavalay re samved...."meera" arthatach bhutkalatali asalyamule aani suni vartamanatali aslyamulehi asel tasa....
aata gendabai pan gelya,ticha to kachechya petimadhun chamkiche kanatale viknara navarahi gela....pan ajunahi asa vatata ki aaj suni asti tar aajiche haal barech kami zale aste. Aso...nidaan tuzya likhanatun tila jeevant thevalas tech khup zala.
>>> प्रत्यक्ष भोगणार्‍याचं नशीब.
>>> आणि हे असं अक्षरं कोरून ठेवणार्‍याचं. नशीब तुझं, संवेद.

- अगदी अगदी!

काळजाला हात घालणारं लिहीलंय.
कोहम said…
Samved,

Apratim.......shabdanshi kheLava tar tuch.....classic...
Unknown said…
khup diwasannii kaahitarii chaalanaa deNaaraM waachaayalaa miLaalay !!
chhanach !!

lihitaa rahaa samved!
AB said…
stabdha zalo wachun... far sundar wakya ahet ani vichar suddha... expecting more stuff from u...
TheKing said…
Kaahee goshTee saaMgoon saMpat naaheet aani kaahee veLaa tyaa poorNa saaMgaayacheehee garaj nasate, paTalM
TheKing said…
Kaahee goshTee saaMgoon saMpat naaheet aani kaahee veLaa tyaa poorNa saaMgaayacheehee garaj nasate, paTalM
a Sane man said…
केवळ अप्रतिम एवढे अपुरेच शब्द उरले वाचून झालं तेव्हा...
माणसांबद्दल लिहिणार्‍या तुझ्यातल्या माणसाला सलाम...जियो!
>>केवळ अप्रतिम एवढे अपुरेच शब्द उरले वाचून झालं तेव्हा... माणसांबद्दल लिहिणार्‍या तुझ्यातल्या माणसाला सलाम...जियो!

Ditto!! kaay lihitos!! keval uchch!!