बिनबुडाची टिपणं


काही टिपणं फार विक्षिप्त असतात. त्यांना ना बुड ना शेंडा पण त्यांचं अस्तित्व काही नाकारता येत नाही. बरं दोन टिपणांमधे काही साम्य असावंच असा ही नियम नाही. पारयासारखी ही टिपणं मनाला येईल तेव्हा एकत्र होतात आणि मनाला येईल तेव्हा परकी होतात. पण म्हणून लिहीलं नाही तर उरावरही बसतात

आमच्या सोसायटीकडून डहाणुकरला जाताना स्मृतीवन लागतं. किंचित जंगल म्हणता येईल इतपतच झाडांची दाटी आहे तिथे. सवयीने तिथली झाडे शिळी झालेली. हल्ली साधं लक्षही जात नाही तिकडे. परवा अखंड पाऊस पडत होता आणि अचानकच हिर्व्या रंगाचं काहूर माजलेलं दिसलं स्मृतीवनात. जुनीच कविता आठवली

झाडे
शांत रात्रीच्या येण्यानंतरही
स्तब्धतेची शाल पानांआडून
सावरुन किंचितशी दमल्यासारखी

झाडे
सारे ऋतु पानगळ मनात
असून नसल्यासारखी अलिप्त
खोल मुळे गाडून घट्ट उभी राहील्यासारखी

झाडे
माणसांवर कलम होतात कधी
स्वतःच्याही नकळत रुजून जातात
झाडे, मात्र वाटतात कधी कधी झाडांसारखी


झाडांची आठवण निघावी आणि फुलांचे ऋतु आठवु नयेत म्हणजे शुद्ध क्रुरपणाच. काय गडबड आहे मेंदुत माहीत नाही पण मला कधी गुलाबाचा वासच येत नाही. सुगंध म्हटलं की आधी माठातल्या पाण्यात तरळणारा मोगरा आठवतो. चिकाटीने दर ऋतुत आणलेल्या आणि तितक्याच चिकाटीने रुजलेल्या निशीगंधाच्या लांबसडक दांड्या आठवतात. लताच्या परिपुर्ण तानेसारखा टपोरा सोनचाफा आठवला तरी डोळे भरुन येतात आजही. माझ्या खोलीच्या काठावर रातराणी होती. भरती-ओहोटीच्या कोणत्याच नियमांना न जुमानता रोजचं चांदणं लगडायचं तिच्या हरेक डहाळीवर. लेकुरे मधे किती गोड गोड बाळ जसे या गाण्यात कुंदाच्या उगवाया लागल्या कळ्या असा सुरेख संदर्भ आहे. पोरीबाळी एकच गर्दी करायच्या कुंदाचा बहर वेचायला पण दिलदार फुलं कधी कमी नाही पडली. देठाकडून केसर पेरत जाणारा पारिजात जवळ जवळ वर्षभर दाराशी फुलांच्या पायघड्या घालायचा. रात फुलों की बात फुलों की गाणं नुस्तं लहडलेलं असतं आठवणीं मधून.

मंद, पिवळसर पांढरया फुलांचे ऋतु मावळले. रात्री कधी तरी जाग येते तर खिडकी बाहेर गुल्मोहर पेटलेला असतो. रस्ते किंचित ओले आणि दमट पिवळा प्रकाश. काळजात ताज्या कवितेचे काही अवशेष विखुरलेले असतात.

रात्रीचं आरंभशुर चांदणं मावळलं की
हवासाच असा तो अंधार
पडतो अन
शब्दहीन क्रांतीच्या उंबरठ्यावर
कविता झरते.
वेचावी तर
खिडकीच्या तंद्रीदार चौकटीच्या काठावर
मी डोळे सोडून दिलेले.
आत्म्यासारखे आकारहीन अर्थ
शब्दावाचून वाहात राहातात.

चांदण्यांनी अंधार ओढून घ्यावा असा
विलक्षण काळोख
मंद्र लयीतून पाझरणारा पावूस झेलत
मान खाली घालून उभी असणारी झाडे
तरी ही डोळ्यात उगवत असतात
माझ्या

Comments

शब्द आवडतात ना तुला? आख्खे, स्वतंत्र, संदर्भहीन, झगमगते, सुटे, अर्थाला लगडून येणारे... शब्दांचं झळाळतं ओलं-पोपटी झाड उगवलंय असं वाटत जातं वाचताना.
कोहम said…
पोरीबाळी एकच गर्दी करायच्या कुंदाचा बहर वेचायला पण दिलदार फुलं कधी कमी नाही पडली.

chaan
Nandan said…
uttam lekh, aavaDala.
Snehal Nagori said…
apratim!!
Your's and Meghana's posts penetrete deeper...
asa lihinyasathi khrach ti mhante tasa shabda awdawech lagtat.
Megha said…
donhi kavita aavadalya...
masta lihilayas.tarihi tuzyach room baherachi sayli aani gulmohor kasa kay visarlas? lahanpani mi aani sonu kundacha zaad vatun ghyayacho tyachi aathvan zali aani tyach zadavar aamhi tikhat mithachi purchundi lapaun thevali hoti....magchya bahetinchya kairya padayachya chorun aani tikhat meeth laun khayachya...aathvani pan ashach aambat god astat nahi??aata hi kuthlich zada nahi rahili..aaplya aaplya aathvani japun theva..tyat tari zada jivant rahtil.
a Sane man said…
झाडे
सुपीक संवेदनशीलतेत घट्ट रुतलेली
मूळांच्या अग्रांपासून अग्रांकुरांपर्यंत
केवळ सर्जनशीलता वाहणारी

झाडे
ज्यांच्याखाली शब्दांचे सडे पडतात
शब्दही रुजतात
नि मग शब्दांची अशी झाडे होतात

झाडेच!
Jaswandi said…
mastch! sampurn postla ek mast flow ahe.. chhan vattye vachatana... mi attaparyant 3da vachali.. surekhch!!

nav "binbudachi tipana"... thodasa khatakala... post barobar jat nahiye ..:)
संवेद

काय चाललं आहे हल्ली आपल्या ब्लॉगविश्वात?
ट्युलिप ने सगळी पोस्ट्स च काढून टाकली आणि सर्कीट ने आपला ब्लॉग रेस्ट्रीक्ट केला.
लोकांची नाराजी नक्की कशामुळॆ?
ब्लॉग्ज वर रोज एक फेरफटका मारणे खरं तर किती आनंददाय़ी असायचं!